मुंबई – गोवा येथील गोमंतकीय मराठी भाषिकास सहकार्य करण्याचे आवाहन विविध मराठी प्रेमी आणि मराठी संवर्धनासाठी कार्य करणाऱ्या संघटनांनी केले आहे, अशी माहिती राज्य भाषा सल्लागार समितीचे सदस्य श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी दिली आहे. ‘मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळ, महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी तसेच वैश्विक मराठी परिवार यांनी हे आवाहन केले आहे.
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई व कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांनी मराठीबाबत संतापजनक वक्तव्ये केली आहेत. गोव्यात मराठीचे अस्तित्व नाकारणारे आणि राजभाषा कायद्यात मराठीला स्थानच नको अशा प्रकारची वक्तव्ये त्यांनी केली आहेत. या वक्तव्यांचा निषेध मराठी प्रेमींच्यावतीने करण्यात येत आहे.
एकंदरीत पाहता गोमंतकातून मराठीला पूर्णपणे उखडून टाकण्याची भाषा कोकणी समर्थक करीत आहेत. या गंभीर प्रकारांचा केवळ निषेध करून आता भागणार नसून त्यांच्या कारवायांना आळा घालण्याकरता सर्व गोमंतकीय मराठी भाषिकांनी एकत्र येण्याची आणि प्रखर भूमिका घेण्याची गरज आहे. मराठी विरोधकांना आता पोट तिडकीने आणि तेवढ्याच ताकदीने उत्तर देण्याची आवश्यकता आहे. यासंबंधी विचार विनिमय करण्यासाठी मराठी राजभाषा समिती गोवा, प्रागतिक विचार मंच गोवा, गोमंतक मराठी भाषा परिषद, प्रतिभा फ्रेंड सर्कल बोरी, इत्यादी संस्थांतर्फे रविवारी (1 सप्टेंबर 2024 रोजी ) सकाळी दहा वाजता किड्स नेस्ट हायस्कूल विद्यावृद्धी संकुल शांतीनगर फोंडा गोवा येथे सर्व गोमंतकीय मराठी भाषकांची सभा बोलावण्यात आली आहे. या सभेस सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
आम्ही ‘ मराठीच्या व्यापक हितासाठी ‘ चळवळीतर्फे तसेच वैश्विक मराठी परिवार आणि महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडीतर्फे देखील समस्त मराठी भाषिक समाजाला याबाबत या सर्व संस्था व गोमंतकीय मराठी समाजाला पाठिंबा देण्याचे आवाहन करीत आहोत. मराठीबाबत कार्य करणाऱ्या अनेक संस्था,समूह, संघटना तसेच अनेक मान्यवर लेखक, कार्यकर्ते यांचे ‘मराठीच्या व्यापक हितासाठी’ हे तसेच महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी आणि वैश्विक मराठी समूह हे व्यासपीठ आहे.
श्रीपाद भालचंद्र जोशी
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.