कोल्हापूर – अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतील वास्तव व सम्यक समूहाचा विचारपट म्हणजे अण्णाभाऊंची कादंबरी: आशय आणि समाज चिंतन हा ग्रंथ होय. अण्णाभाऊंच्या सम्यक कादंबरीचा आढावा घेणारा हा ग्रंथ म्हणजे अण्णाभाऊंच्या कादंबरी वाङ्मयाची पुनर्भेटच म्हणता येईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक डॉ. रणधिर शिंदे यांनी केले.
साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या ५६ व्या स्मृतिदिनानिमित्त राजर्षी शाहू स्मारक भवन सभागृहात डॉ. सोमनाथ कदम यांनी संपादित केलेल्या अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाजचिंतन या ग्रंथावर चर्चासत्र घेण्यात आले. यामध्ये अण्णाभाऊंच्या कादंबरी वाङ्मयावर उत्तम विचार मंथन झाले.
सामाजिक बांधिलकी व तळमळीतून अण्णा भाऊ साठे यांनी कादंबरी लेखन केले. अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यातील सामाजिक दृष्टी, वैश्विक जाणीवा, स्त्री जगताचे अवलोकन, मानवी जीवनातील करुणा, शौर्य, संस्कृती ,परंपरा व बहुजन समूहातील नायक आणि नायिका यांचे नव्याने आकलन करून घेणे महत्त्वाचे आहे असेही डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.
एखाद्या कादंबरीकाराच्या सर्वच कादंबरी वरील समीक्षा लेख प्रसिद्ध करण्याची नाविन्यपूर्ण संकल्पना डॉ. कदम यांनी साधली आहे. साहित्यातील आस्वाद समीक्षा बरोबरच समाज चिंतनाला यात महत्त्व दिले आहे. मराठीतील हा अभिनव प्रयोग म्हणता येईल. समकालीन प्रश्नावर अण्णा भाऊ कसा विचार करत करतील, भारतातील आणि जागतिक परिप्रेक्ष्यातून सध्याचे आकलन काय असेल याची मीमांसा या सर्व कादंबरी वरील लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नामवंत अभ्यासकांनी केली आहे.
डॉ. अनिल सकपाळ, डॉ. गिरीश मोरे ,जी. के. ऐनापुरे, प्रतिभा टेंबे, डॉ. नारायण भोसले, डॉ. मिलिंद कसबे, डॉ. मारोती कसाब, डॉ. प्रमोद गारोडे, डॉ. संजय शिंदे, डॉ. पी. विठ्ठल, डॉ. कैलास अंभूरे, डॉ. शरद गायकवाड, डॉ. शिवाजी जवळगेकर, प्रा. प्रकाश नाईक, डॉ. सुशील प्रकाश चिमोरे, लोकसाहित्याचे अभ्यासक सोपान खुडे, डॉ. विठ्ठल भंडारे, डॉ. अनिल फराकटे, डॉ. महादेव कांबळे, डॉ. शिरीष लांडगे, डॉ. सतीश मस्के, डॉ. राजा भाऊ भैलुमे, डॉ. विवेक खरे, डॉ. दत्ता घोलप,डॉ. सतीश कामत, डॉ. वैशाली बेटकर या अभ्यासकांचे महत्त्वपूर्ण संशोधन पर लेख या ग्रंथात समाविष्ट आहेत.
अण्णा भाऊ साठे यांच्या फकिरा, मयुरा, चित्रा, केवड्याचं कणीस, अहंकार, अग्निदिव्य, माकडीचा माळ, पाझर, अलगुज, डोळे मोडीत राधा चाले, वारणेचा वाघ, वैर, चिखलातील कमळ, रत्ना, रूपा, मास्तर, राणगंगा, वारणेच्या खोऱ्यात, अशा ३० कादंबऱ्या वरील समीक्षा लेख एकत्रितपणे प्रतिमा पब्लिकेशनने प्रसिद्ध केले आहेत. मुक्ता फाउंडेशन, अण्णा ब्रिगेड आणि दत्तगिरीजा प्रतिष्ठानच्यावतीने या चर्चासत्राचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रसेवा दलाचे जेष्ठ कार्यकर्ते, विचारवंत प्रा. भरत लाटकर उपस्थित होते.
यावेळी प्रतिमा पब्लिकेशनचे प्रकाशक डॉ. दीपक चांदणे, लेखक व संपादक डॉ. कदम, मुक्त फाउंडेशनचे संस्थापक डॉ. अमोल महापुरे यांनी समयोचित विचार व्यक्त केले. या निमित्ताने उदगीर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते, आदर्श शिक्षक प्रा. रामभाऊ कांबळे, सामाजिक कार्यकर्ते उत्तम आप्पा चांदणे, देविदास बानकर, भारत धोंगडे, अस्मिता चांदणे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे राष्ट्रीय समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक डॉ. अमोल महापुरे यांनी केले व सूत्रसंचालन प्रल्हाद येवरीकर यांनी केले.
या चर्चासत्रास प्रा. रामकिशन सोनकांबळे, कार्यकर्ते अनिल म्हमाने, शंकर भाऊ तडाखे, डॉ. सर्जेराव पद्माकर, प्रा. प्रकाश नाईक, डॉ. पांडुरंग गावडे, अनिल माळवी आदी सह कोल्हापुरातील अण्णाभाऊ प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.