साधना करताना शरीर अवघडल्यासारखे होते. अनेक ठिकाणी वेदना उत्पन्न होतात. बऱ्याचदा शरीर जड होते. अशामुळे साधनेवर याचा परिणाम होतो. या घटनांनी मनात भय उत्पन्न होते. पण साधनेत या सर्व घटना घडत असतात, हे लक्षात घेऊनच साधना करायला हवी.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
आगीतें न सांडी तापु । सळातें जातीचा सापु ।
कां जगाचा वैरी वासिपु । अखंड जैसा ।। ७५९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – ज्याप्रमाणें अग्नीला उष्णता सोडीत नाही, अथवा जातिवान सर्प जसा वैर सोडीत नाही, अथवा भय जसे नेहमी जगाचा शत्रु आहे.
मनामध्ये भय कधीच आणू नये. भयाने मन खचते. मनातील भयच स्वतःचा पराभव करते. यासाठी जागरूक राहून भयापासून मनाला दूर ठेवायला हवे. भय कारण नसताना मनात शंका उत्पन्न करते. त्याने मन वारंवार विचलित होते. ध्येयापासून मन विचलित झाल्याने ते गाठताच येत नाही. यासाठीच मनाला भयमुक्त ठेवायला हवे. मनात भय उत्पन्नच होणार नाही, याची काळजी प्रथम घ्यायला हवी. हे सर्व जसे दैनंदिन जीवनातील आहे. तसेच साधनेमध्येही भय उत्पन्न होता कामा नये. यासाठी मनाची योग्य ती तयारी ठेवायला हवी. भयामुळे असाध्य रोगही बळावतात. योग्य औषधी देऊनही त्या शरीराला लागू पडत नाहीत. भय या सर्वात मोठा शत्रु आहे असे समजूनच मनाला भयमुक्त ठेवण्याचा प्रयत्न नित्य करायला हवा.
साधना करताना शरीर अवघडल्यासारखे होते. अनेक ठिकाणी वेदना उत्पन्न होतात. बऱ्याचदा शरीर जड होते. अशामुळे साधनेवर याचा परिणाम होतो. या घटनांनी मनात भय उत्पन्न होते. पण साधनेत या सर्व घटना घडत असतात, हे लक्षात घेऊनच साधना करायला हवी. कधी शरीरातून घाम बाहेर पडतो. तर कधी शरीर गरम होते. अशा घटनांची मनाला सवय करून घ्यायला हवी. होतायेत वेदना तर होऊ द्यायच्या. मन या वेदनावरून फिरवायचे, अन् पुढे जात राहायचे. म्हणजेच मन त्यात अडकू द्यायचे नाही. त्या वेदनांची, त्या घटनांची अनुभुती घ्यायची असते. मग हळूहळू या वेदनांचा त्रास कमी होतो, अन् मन साधनेकडे वळते. मनाला साधनेची गोडी लागते.
पण मनामध्ये या वेदनांनी भय उत्पन्न झाल्यास मात्र या वेदना अधिक बळावतात. साधनेत नित्य व्यत्यय उत्पन्न करतात. साधनेत मन पुढे जातच नाही. यामुळेच आपणास ध्येय गाठता येत नाही. यासाठी मनाला कठोर करत मनातील भिती दूर सारून मन साधनेवर नियंत्रित करायला हवे. वेदनांची अनुभुती घेत वेदनाचा त्रास कमी करायला हवा. हे झटपट होत नाही पण सवयीने यात बदल निश्चितच होतो. मन साधनेत रमू लागल्यानंतर या सर्व वेदनांचा त्रास कधीही जाणवत नाही. उलट या सर्व वेदना नष्ट होऊन आरोग्यात सुधारणा होते. शरीरातील पित्त जळाल्याने अनेक व्याधी दूर होतात. भुक लागते. श्वासोच्छश्वास अधिक संवेदनशिल होतो. दूरचे वासही पटकन लक्षात येऊ लागतात. इतकी जागरुकता वाढते. पण यामुळे मनाचा समतोल मात्र ढळू द्यायचा नाही. मन विचलित होणार नाही, याची काळजी मात्र सातत्याने घ्यायला हवी. अन्यथा मनात नाना शंका उत्पन्न होऊन मन पुन्हा भयभित होते.
यासाठी मनाचा दृढसंकल्प, दृढनिश्चय, दृढनिग्रह हा खूप महत्त्वाचा आहे. असे केल्यासच साधनेतील उचित साध्य आपण गाठू शकतो. वारंवार सरावाने या सर्व व्याधी दूर होऊन साधनेची गोडी लागते. यातूनच आत्मज्ञानाची अनुभुती येते.