November 21, 2024
article by Sukrut Khandekar on Maharashtra assembly Election
Home » आवाज कुणाचा ?
सत्ता संघर्ष

आवाज कुणाचा ?

लाडकी बहीण ही अडीच कोटींची व्होट बँक महायुती व एकनाथ शिंदे यांची मोठी जमेची बाजू आहे. गद्दार, औरंगजेब, अदानी, टकमक, आरक्षण, महाराष्ट्राची लूट, भ्रष्टाचार, एन्काऊंटर हे सर्व मुद्दे त्यापुढे गौण ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना म्हणजे शिंदे की ठाकरे, आवाज कुणाचा? याचा कौल विधानसभा निवडणुकीत मतदार देणार आहेत.

डॉ. सुकृत खांडेकर

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सहा राजकीय पक्ष व त्यांच्या दोन आघाड्या यांच्यात अटीतटीचा सामना होतो आहे. यापूर्वी असा राजकीय संघर्ष कधी झाला नव्हता. यंदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदार कोणला विधानसभेत विरोधी बाकांवर बसवणार व कोणाच्या मस्तकावर राजमुकुट चढवणार याचा अंदाज करणे खूप कठीण आहे. महाराष्ट्राच्या निकालाचा थेट राष्ट्रीय पातळीवरील राजकारणावर परिणाम होणार आहे.

१९९० मध्ये राज्यात काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या तीस वर्षांत विधानसभेच्या सहा निवडणुका झाल्या. तेव्हापासून कोणत्याही एका राजकीय पक्षाला बहुमत मिळालेले नाही. राज्यात सातत्याने युती किंवा आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. आघाडी सरकार ही राज्याची गरज बनली आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबई महानगर असलेल्या या राज्यात येत्या निवडणुकीत काही वेगळे घडू शकेल असे वाटत नाही. कारण गेल्या पाच वर्षांत राज्याने तीन मुख्यमंत्री व तीन सरकारे अनुभवली आहेत. एकमेकांच्या विरोधात लढलेल्या प्रमुख सहा पक्षांना पाच वर्षांत सत्ता उपभोगण्याची संधी मिळाली आहे.

राज्यात ठाकरे यांची शिवसेना व शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी फूट पडली. नेतृत्वाच्या विरोधात बंड करणाऱ्या दोन्ही गटांनाच निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव व निवडणूक चिन्ह बहाल केले. एका बाजूला सत्तारूढ भाजपा, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अप (महायुती) व दुसऱ्या बाजूला काँग्रेस, उबाठा सेना व राष्ट्रवादी काँग्रेस शप (महाआघाडी) अशा दोन आघाड्या एकमेकांच्या विरोधात मैदानात आहेत.

महाआघाडीने महायुतीला सत्तेवरून हटविण्याचा पण केला आहे. महाआघाडीचे शिल्पकार ८४ वर्षे वयाचे शरद पवार निवडणूक प्रचारात महाराष्ट्र पिंजून काढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी प्रचारात महाराष्ट्र ढवळून काढला आहे. मूळचे शिवसैनिक असलेले व शिवसेनेच्या मुशीतून तयार झालेले राज ठाकरे, एकनाथ शिंदे, नारायण राणे हे सर्व दिग्गज नेते उबाठा सेनेच्या विरोधात जिद्दीने मैदानात उतरले आहेत. एकनाथ शिंदे व त्यांच्या चाळीस आमदारांवर गद्दारीचा शिक्का मारून त्यांना घरी बसवा असे उबाठा सेनेचे नेते आवाहन करीत फिरत आहेत, तर उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी हिंदुत्व सोडले म्हणून बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही काम करीत आहोत, असे एकनाथ शिंदे ठसवून सांगत आहेत.

जुलै २०२२ मध्ये शिवसेनेत बंड झाल्यापासून एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे हे एकमेकांचे कट्टर शत्रू बनले आहेत. शिवसेनेत यापूर्वी तीन वेळा फूट पडली. पण चाळीस आमदार व तेरा खासदारांनी बंडाचे निशाण फडकवले ही घटना अभूतपूर्व होती. या बंडखोर आमदारांचे भविष्य २० नोव्हेंबरच्या मतदानात ठरणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे आपल्याला मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावे लागले, आपले सरकार कोसळले ही जखम उद्धव ठाकरे कधीच विसरू शकणार नाहीत.

भाजपबरोबर असलेली पंचवीस- तीस वर्षांची युती तोडून उद्धव यांनी मुख्यमंत्रीपद घेण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी केली व त्याची शिक्षा त्यांना मिळाली हे ते कदापि मान्य करणार नाहीत. एकनाथ शिंदे यांनी जे जबरदस्त धाडस दाखवले त्याची किंमत भाजपाने त्यांना दिलीच आणि शिंदे यांनीही मुख्यमंत्री म्हणून अडीच वर्षांत अहोरात्र काम करून आपल्या कामाचा ठसा
उमटून दाखवला.

महाराष्ट्रातील सर्वात जास्त उपयुक्त व कार्यक्षम नेता अशी एकनाथ शिंदे यांची ओळख दिल्ली दरबारी आहे. म्हणूनच मोदी-शहा यांचा त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे यांच्या पक्षाला दिले आणि उद्धव यांच्या पक्षाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असे नाव देऊन त्यांच्या पक्षाला मशाल हे नवीन चिन्ह दिले. उबाठा सेना हे नाव व मशाल घेऊन ठाकरे लोकसभा निवडणूक लढले व त्यांच्या पक्षाचे नऊ खासदार निवडून आले. भाजपचे तेवढेच खासदार महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून आले आहेत.

लोकसभेत शिंदे यांच्या पक्षाने १५ जागा लढवल्या व ७ खासदार विजयी झाले, अर्थात त्यांच्या पक्षाच्या स्ट्राईक रेट ठाकरेंच्या पक्षापेक्षा सरस ठरला. आता पुन्हा विधानसभा निवडणुकीत ठाकरेंपेक्षा आपण सरस आहोत हे शिंदे यांना सिद्ध करून दाखवावे लागेल. उबाठा सेनेला एकाच वेळी एकनाथ शिंदे यांची शिवसेना, राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप अशा तीनही पक्षांशी लढायचे आहे.

लोकसभा निवडणुकीत उबाठा सेनेला मुस्लीम मतांनी तारले, हे कोणी नाकारू शकत नाहीत. मुस्लीम व्होट बँक हाच उबाठा सेनेचा मोठा आधार आहे. पण लोकसभेप्रमाणे विधानसभेला मुस्लिमांची एकगठ्ठा मते उबाठा सेनेला पडतील का, या मुद्द्यावर मतभिन्नता आहे. लोकसभेला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतदारांचाही उबाठा सेनेला लाभ झाला, तसा एकगठ्ठा लाभ विधानसभेला होईल का हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मुख्यमंत्रीपद गमावल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लोकांची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळात आपण मुख्यमंत्री असताना कुटुंबप्रमुख म्हणून कसे वागलो व कशी लोकप्रियता संपादन केली या मुद्द्यावर त्यांनी लोकांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला. पण लोकसभेच्या निवडणुकीत त्याचा फारसा लाभ झाला नाही. मग विधानसभेच्या मतदानापर्यंत कुटुंबप्रमुख म्हणून सहानुभूती राहील का तसेच गद्दारांना घरी पाठवा हा मुद्दा टिकू शकेल का?

या निवडणुकीत पराभव झाला, तर संघटनेवरील पकड संपुष्टात येईल. म्हणूनच आपल्या पक्षाचे अस्तित्व टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. आजही उबाठा सेनेवर ठाकरे परिवाराचा प्रभाव आहे. कौटुंबिक वरचष्मा आहे. मातोश्रीचा निर्णय अंतिम आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत हे जरी खासदार असले तरी पक्षाला शिंदे परिवाराचा विळखा आहे असे कोणी म्हणू शकत नाही. स्वत: शिंदे सामान्य कार्यकर्त्यालाही चोवीस तास उपलब्ध आहेत. कार्यकर्ता अडचणीत असेल, तर शिंदे स्वत: त्याच्या मदतीला धावतात हा अनुभव आहे.

शिंदेंच्या पक्षाकडे अडीच वर्षांत शाखांची बांधणी झालेली नाही, पण नेते, सहकारी व कार्यकर्ते यांचे नेटवर्क उत्तम आहे. महाराष्ट्रात शिवसेना ८५ जागा लढवत आहे, तर उबाठा सेना ९४ मतदारसंघांत उतरली आहे. शिवसेनेच्या पारंपरिक मतांचे या निवडणुकीत विभाजन अटळ आहे. अनेक मतदारसंघांत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे. वरळीमध्ये मिलिंद देवरा (शिवसेना) विरुद्ध आदित्य ठाकरे (उबाठा सेना), कोपरी-पाचपाखडी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे (शिवसेना) विरुद्ध केदार दिघे (उबाठा सेना), कुडाळमध्ये निलेश राणे (शिवसेना) विरुद्ध वैभव नाईक (उबाठा सेना), दिंडोरीमध्ये संजय निरुपम (शिवसेना) विरुद्ध सुनील प्रभू (उबाठा सेना) अशी अनेक उदाहरणे आहेत. माहीम मतदारसंघात तर सदा सरवणकर (शिवसेना), अमित ठाकरे (मनसे) व महेश सावंत (उबाठा सेना) अशी तिरंगी लढत आहे.

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर केदार दिघे हे धर्मवीर आनंद दिघेंचे पुतणे. निलेश राणे हे माजी खासदार व नारायण राणे यांचे पुत्र, तर वैभव नाईक तिसऱ्यांदा लढतील. मिलिंद देवरा माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार व आदित्य ठाकरे हे माजी मंत्री व उद्धव पुत्र. अमित ठाकरे हे राज ठाकरेंचे पुत्र, तर सदा सरवणकर चौथ्यांदा लढतील. संजय निरुपम माजी खासदार, तर सुनील प्रभू हे माजी महापौर. शिवसेनाप्रमुखांच्या शिकवणुकीतून तयार झालेले एकमेकांच्या विरोधात जिद्दीने लढत आहेत. लाडकी बहीण ही अडीच कोटींची व्होट बँक महायुती व एकनाथ शिंदे यांची मोठी जमेची बाजू आहे. गद्दार, औरंगजेब, अदानी, टकमक, आरक्षण, महाराष्ट्राची लूट, भ्रष्टाचार, एन्काऊंटर हे सर्व मुद्दे त्यापुढे गौण ठरण्याची शक्यता आहे. शिवसेना म्हणजे शिंदे की ठाकरे, आवाज कुणाचा? याचा कौल विधानसभा निवडणुकीत मतदार देणार आहेत. सरकार कुणाचे येणार, मुख्यमंत्री कोण होणार, त्याचप्रमाणे आवाज कुणाचा हाही प्रश्न या निवडणुकीत लाखमोलाचा आहे. करो या मरो, अशी ही लढाई आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading