December 5, 2024
Farming of British Sahebs rule period article by Indrajeet Bhalerao
Home » इंग्रजकालीन साहेबांची शेती
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

इंग्रजकालीन साहेबांची शेती

॥ इंग्रजकालीन साहेबांची शेती ॥
शिवशाहीतून निर्माण झालेलं मराठ्यांचं राज्य ई. स. १८१८ साली लयाला गेलं आणि १९ व्या शतकाच्या सुरुवातीलाच इथं इंग्रजांचं राज्य सुरू झालं. या इंग्रज साहेबांकडं सरंजामी नसली तरी साहेबी थाट होता. शेतकऱ्यांसाठी सरंजामी आणि साहेबी थाट दोनही सारखेच दुःखदायक. मुस्लिम आक्रमकानंतर आलेल्या या एकूणच परकीय सत्ता आणि त्यांच्या कृषीधारणा आपल्या देशात कशा रुजत गेल्या याविषयी सुरुवातीला इथं आपण थोडक्यात पाहूयात.

इंद्रजीत भालेराव

२० मे १४९८ रोजी वास्को-द-गामा कालीकत बंदरावर त्याचं जहाज घेऊन उतरला तिथून या नव्या परकीय सत्ता देशात यायला सुरुवात झाली. पोर्तुगीज लोक भारताच्या गरम मसाल्याचे खूप शौकीन होते. त्यासाठीच त्यांनी भारत हळूहळू काबीज केला. त्याची सुरुवात गोव्यापासून झाली. त्याआधी ते जगभर फिरले होते. त्यांनी जगभरातून फळझाडं भारतात आणली आणि ती गोव्यात लावली. नंतर त्यांनी कोकणही व्यापला. आपला हापूस आंबा त्यांनीच आणलेला आहे. आपणाला तो खास आपला वाटतो पण तसं नाही. त्यांनी बाहेरून आणलेली अल्फान्सो ही आंब्याची जातच आपल्याकडं हापूस म्हणून प्रसिद्ध झाली. भुईमूग, तंबाखू , बटाटा आणि लाल मिरची त्यांनीच प्रथम भारतात आणली. इतकंच नाही तर मका, टोमॅटो, बीट त्यांच्याचमार्फत ब्राझीलमधून आपल्याकडं आलेलं आहे. आज आपल्याच वाटणाऱ्या या सगळ्या वस्तू आपल्याकडं बाहेरून आलेल्या आहेत. त्या अवघ्या पाचसहाशे वर्षांपूर्वी आपल्याकडं आलेल्या आहेत. चिकू, काजू , अंजीर, अननस त्यांनीच प्रथम भारतात आणले.

पोर्तुगीजांपाठोपाठ भारतीय मसाल्याच्या लालसेने इतरही देशातल्या लोकांना भारत गाठावासा वाटला. त्यातले इंग्रज सर्वाधिक हुशार निघाले. त्यांनी इथल्या मसाल्याच्या पदार्थांच्या व्यापारासाठी आपली ईस्ट इंडिया कंपनी इथं पाठवली. आणि या कंपनीनं हळूहळू आपला संपूर्ण देश कसा काबीज केला हे वेगळं सांगण्याची गरज नाही. याच इंग्रज सरकारनं त्यांच्या फायद्यासाठी आपल्या शेतीत अनेक सुधारणा केल्या. पशु आणि पिकांच्या जातीत सुधारणा करण्यासाठी त्यांनी तिकडून पशुतज्ञ आणि पीकतज्ञ आणले. पशुंच्या आणि पिकांच्या नव्या जाती आणल्या. कृषीसंस्था आणि कृषीमहाविद्यालये सुरू केली. त्यातून शेतीचा पुष्कळ विकास झाला. प्रत्यक्ष शेतकऱ्याचा मात्र फारसा फायदा झाला नाही. शेती सुधारली पण शेतकरी श्रीमंत झाला नाही. कारण या इंग्रज सरकारनं इथल्या शेतीची सुधारणा इथल्या शेतकऱ्याला श्रीमंत होण्यासाठी केलेली नव्हती, तर कंपनी सरकारला श्रीमंत करण्यासाठी केलेली होती.

मुस्लिमानंतर या देशावर राज्य करणाऱ्या इंग्रज राजवटीतही शेतकऱ्यांची पिळवणूकच झाली. फक्त या पिळवणुकीची तऱ्हा वेगळी होती. भारतीय पारंपरिक शेती मोडीत काढत इंग्लंडच्या कारखान्यांना आवश्यक असणारा माल पिकवण्याची इंग्रज राजवटीनं इथल्या शेतकऱ्यांवर सक्ती केली. मँचेस्टरच्या कापड गिरण्यांना लागणारी नीळ पिकवण्याची शेतकऱ्यांवर बळजबरी केली. तिथलं कापड इथं विकण्यासाठी इथले हातमाग उद्योग बंद केले. इंग्रजांच्या दुर्दैवाने त्यांची राजवट भारतात सुरू झाली तेव्हा वारंवार दुष्काळ पडायला सुरुवात झाली होती, शेती पिकेनाशी झाली होती. तेव्हा इंग्रजांनी व्होलकर या कृषी शास्त्रज्ञाची एक समिती नेमून भारतीय शेतीत करावयाच्या सुधारणांचा अहवाल द्यायला सांगितला. त्या अहवालात व्होलकर म्हणतात, “भारतीय शेतीत सुधारणा करण्याची गरज आहे काय ? असा प्रश्न मला कुणी विचारला तर मी हो आणि नाही अशी दोन्ही उत्तरे देईल. याचे कारण काही बाबतीत ब्रिटिश शेतकऱ्यांपेक्षा भारतीय शेतकरी श्रेष्ठ आहेत. काही बाबतीत इथला शेतकरी ब्रिटिश शेतकऱ्याच्या मागे आहे. मागे असण्याचे कारण त्याला आवश्यक ती साधनसामग्री उपलब्ध नसते. माझे असे निश्चित मत झाले आहे की कठीण श्रमाने काळजीपूर्वक पिकवलेल्या आणि जमिनीची सुपीकता कायम राखलेल्या भारतीय शेतीचे चित्र मला जगात इतरत्र कुठेही पाहायला मिळालेले नाही”

इंग्रजांची राज्यव्यवस्था सुरू झाल्यावर आधीच्या इथल्या राज्यव्यवस्था नष्ट झाल्या. त्यामुळे आधीच्या सगळ्या अर्थव्यवस्था मोडकळीस आल्या. इंग्रजांनी देशभर एकच यंत्रणा सुरू केली. या अर्थव्यवस्था बदलाच्या खडखडाटात मंदी निर्माण झाली. त्यावर मात करण्यासाठी इंग्रजांनी सक्तीचा वाढीव शेतसारा वसुली सुरू केली. आधी इथले राजे शेतकऱ्यांशी चर्चा करून अशावेळी काही मार्ग काढीत असत. पण अवाढव्य इंग्रज सत्तेला त्याची गरज वाटत नव्हती. त्यामुळे त्यांनी एक पक्की शोषणव्यवस्था इथं सुरू केली. त्यातून शेतीची वाताहात होत गेली. कारण एका बाजूला शेतसाऱ्याचं ओझं आणि दुसऱ्या बाजूला झपाट्यानं उतरलेल्या शेतमालाच्या किमती. ब्रिटिश राजसत्ता ही चिरेबंदी स्वरूपाची असल्यामुळे त्यांना इथल्या समाजघटकांना सहभागी करून निर्णय घेण्याची गरज वाटत नव्हती. त्यामुळे जनता आणि राज्यकर्ते यांचे संबंध कठोर व निर्दयी होत गेले.

त्या काळात सामान्य माणसांना इंग्रज सरकारविषयी काय वाटत होतं याचं एक उदाहरण काशीबाई कानिटकर यांच्या आत्मचरित्रात पाहायला मिळतं. रेल्वे प्रवासात एकदा त्यांच्या शेजारी एक शेतकरी बाई बसली होती. तेवढ्यात काही युरोपियन अधिकारी रेल्वे तपासणीसाठी आले. तेव्हा त्या शेतकरी बाईनं काशीबाईंना अंगावरील दागिने वस्त्रांनी झाकायला सांगितले. काशीबाईंनी कारण विचारल्यावर ती शेतकरी बाई म्हणाली, “हे लोक आपलं फक्त सोनं घेऊन जाण्यासाठी आपल्या देशात आलेले आहेत. जोपर्यंत बायकांच्या अंगावर सोनं आहे तोपर्यंत ते इथून जाणार नाहीत. ज्या दिवशी बायकांना लाकडाच्या बांगड्या घालाव्या लागतील तेव्हाच ते इथून जातील”

अशीच इतिहासात नमूद असलेली आणखी एक घटना इथल्या इंग्रज अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर प्रकाश टाकणारी आहे. येजूआर्डो गलीआनो यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेली ही मूळ घटना गणेश विसपुते यांनी मराठीत अनुवादित केलेली आहे. ती लोकवाङ्मयवृत्तच्या मे २०१५ च्या अंकात प्रकाशित झालेली आहे. ती अशी, “राणी व्हिक्टोरिया लॉर्ड लिटनच्या कवितांची एकमेव वाचक आणि प्रखर प्रशंसक होती. लॉर्ड लिटन तेव्हा भारताचे व्हाईसरॉय होते. त्यामुळे कृतज्ञतेने भारावून जाऊन म्हणा अथवा देशप्रेमाच्या उन्मादात म्हणा, विक्टोरिया जेव्हा सम्राज्ञी होणार हे जाहीर झालं, तेव्हा तिच्या सन्मानार्थ लॉर्ड लिटननं जंगी भोजन समारंभाचे आयोजन केले होते. दिल्लीमधील त्यांच्या निवासस्थानी लिटन साहेबांनी या समारंभासाठी सात दिवस सात रात्री सत्तर हजार पाहुण्यांना निमंत्रित केलेलं होतं. टाइम्सच्या म्हणण्यानुसार, हे जागतिक इतिहासातलं भव्य आणि अतिशय महागडं असं जेवण होतं. दुष्काळानं तेव्हा परिशिमा गाठलेली होती आणि शेतं उन्हानं होरपळून गेली होती. अशावेळी भोजन समारंभात लिटन साहेब उठून उभे राहिले आणि सम्राज्ञीकडून आलेला आनंदाचा संदेश त्यांनी वाचून दाखवला. संदेशात राणीनं प्रजेचं सुख आणि कल्याण चिंतीलं होतं. विल्यम डीग्बी नावाचा एक इंग्रजी पत्रकार तेव्हा तिथं उपस्थित होता. त्याच्या गणितानुसार तेव्हा त्या सात दिवसांच्या प्रचंड मोठ्या मेजवान्यांच्या काळात भुकेनं मरणाऱ्यांची देशातील संख्या एक लाख होती”

तरीही या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर इंग्रजांनी काही गोष्टी केल्या त्याचीही नोंद घ्यायला हवी. १८९९ साला महाभयंकर दुष्काळ आणि १९०३-०४ साली आलेली भयंकर टोळधाड यामुळे शेतकरी पुरता नागावला होता. यावर उपाय म्हणून इंग्रज सरकारनं काही शेतीविषयक सुधारणा केल्या. धरणं बांधायला सुरुवात केली. पण त्याचा प्रत्यक्ष शेतकऱ्यांना फायदा व्हायला फारच उशीर झाला. त्या काळात इंग्रजांनी शेती सुधारणेसाठी वीस लाखांची वार्षिक तरतूद केली होती. पण ती यंत्रणेवरच जास्त खर्च होते, अशी तक्रार तेव्हाचे सामाजिक कार्यकर्ते करताना दिसतात. जागोजाग कृषी प्रदर्शन भरवून शेतकऱ्यांना तीथपर्यंत नेण्याचं कामही सरकार करत होतं. काही सहकारी पतपेढ्या काढून शेतकऱ्यांना बिनव्याजी भांडवल उपलब्ध करून देण्याचाही प्रयत्न सरकार करत होतं.

पण याच काळात आपल्या देशात काही असे संस्थानिक होते जे शेतकऱ्यांसाठी बऱ्यापैकी काम करत होते. त्यातल्या प्रातिनिधिक दोन संस्थानातली शेतीविषयक कामं आपण थोडक्यात पाहूयात. बडोद्याच्या सयाजीराव गायकवाड यांनी शेतीकडं त्या काळात फार लक्ष दिलं. आपल्या खास माणसाला म्हणजे खासेराव जाधव यांना त्यांनी शेतीचं शिक्षण घेण्यासाठी विलायतेला पाठवलं. खासेराव जाधव शिक्षण घेऊन परत येताच त्यांच्या सल्ल्यानं महाराजांनी शेतीविषयक सुधारणा आणि प्रयोग सुरू केले. १८९५ साली सयाजीरावांनी पाटबंधारे व पाणीपुरवठा खातं सुरू केलं आणि १८९७ साली त्यांनी शेतकी खातं सुरू करून त्याची संपूर्ण जबाबदारी खासेराव जाधव यांच्यावरच सोपवली.

१८९९ साली गंभीर स्वरूपाचा दुष्काळ बडोदा संस्थानातही पडला होता. तेव्हा संपूर्ण राज्याचा दौरा करून स्वतः महाराजांनी दुष्काळावर कायमस्वरूपी उपाय काय करता येतील, याचा अभ्यास केला. हा दुष्काळ निसर्गनिर्मित असण्यापेक्षा मानवनिर्मित आहे, हे प्रथम सयाजीरावांच्याच लक्षात आलं. त्यावर आपण उपाय करू शकतो, हेही त्यांना कळलं. म्हणून कायमस्वरूपी उपाय शोधून इलाज केला तर असं वारंवार दुष्काळाला सामोरं जावं लागणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी विहिरी, तळी, धरणं, पाटबंधारे असा दूरदृष्टी विकास आपल्या संस्थानात सुरू केला.

सयाजीरावांनी आधीची अन्यायकारक शेतसारा पद्धतीही बदलली. शेतात किती बैलांचा नांगर चालतो आणि राखणीसाठी किती माचवे उभे केलेले आहेत यावरून आधी शेतसारा आकारला जाई. त्यामुळे शेतकऱ्यांवर बऱ्यापैकी अन्याय होत असे. महाराजांनी नव्यानं अभ्यास करून शेतकऱ्यांच्या सोयीची शेतसारापद्धती सुरू केली. सयाजीरावांनी शेतीत आधुनिक सुधारणा केल्या. नवी पिकं आणली. त्यासाठी आपल्या संस्थानातली माणसं त्यांनी अभ्यास करायला म्हणून बाहेर पाठवली. बाहेरचे कृषीतज्ञ आपल्या संस्थानात बोलावले. रेशीम शेतीचे प्रयोग केले. शेती कसण्याच्या नव्या पद्धती सुरू केल्या. त्यासाठी नवी औजारं उपलब्ध केली. शेतीला पूरक उद्योग सुरू केले. तसं स्वतःहून करणाऱ्यांना प्रोत्साहन दिलं. इतकंच नाही तर शेतीचा नवा विचार रुजावा म्हणून त्यांनी महात्मा फुले यांच्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या ग्रंथाचं दरबारात जाहीर वाचन करवलं. आणि हे पुस्तक प्रकाशित करायला आर्थिक मदतही केली. सयाजीरावांचे शेतीतले हे सगळे प्रयोग पाहून तेव्हाचे अर्थतज्ञ इंग्रज सरकारला सांगत होते की, तुमच्या अखत्यारीतला एक संस्थानिक शेतकऱ्यांसाठी इतकं सगळं करतोय, ते तुम्हाला तुमच्या राज्यात करता येत नाही काय ? यावरून सयाजीरावांच्या शेतीविषयक कामाचं मोल आपणाला पटतं.

सयाजीराजांसारखाच महाराष्ट्रातला आणखी एक लोकराजा म्हणजे राजर्षी शाहू छत्रपती. यांनी देखील आपला राज्यकारभार करायला सुरुवात केल्यावर प्रथम लक्ष दिलं ते शेतीकडं. राज्यकारभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी संपूर्ण संस्थानाचा दौरा केला आणि शेतकऱ्यांच्या स्थितीचं ज्ञान करून घेतलं. महाराजांना कृषीकर्माविषयी आदर होता. राजाचा एक दिवस कृषी कर्मात गेला पाहिजे अशा विचारांचे शाहू महाराज होते. त्यांनी स्वतःच्या मुलाला म्हणजे युवराजांना कृषीविद्या शिकायला सुरुवातीला अलाहाबादला आणि नंतर विलायतेला पाठवलं होतं. १९०२ साली एडवर्डच्या राज्यरोहणासाठी परदेश प्रवास केला तेव्हा स्वतः शाहू महाराजांनी तिथल्या शेतीचा अभ्यास केला. त्या शेतीचा महाराजांवर खूप प्रभाव पडला. तिकडून परत आल्यावर त्यांनी स्वतंत्र पाटबंधारे खातं सुरू केलं. संस्थानातल्या विहिरी, तळी यांचा सर्वे केला. त्यात सुधारणा, भर, नव्या विहिरी, तळी करायला सुरुवात केली. १९०९ साली मोठ्या धरणासाठी सर्वे केला. राधानगरी या एका महत्त्वाकांक्षी धरणाचा प्रकल्प त्यांनी सुरू केला. त्यासाठी १४ लाख रुपये त्या काळात खर्च केले. हे धरण सुरू असताना महायुद्धाचा अडथळा आला. हे धरण पुढं राजाराम महाराजांनी पूर्ण केलं. देशातलं तेव्हाच ते सगळ्यात मोठे धरण होतं.

अशा काही संस्थानांचा अपवाद वगळला तर बाकी देशभर काही खरं नव्हतं. शेतकऱ्याचे दुर्दैवाचे दशावतार सुरूच होते. या शेतकऱ्याचा टाहो महात्मा फुले यांनी आपल्या ‘शेतकऱ्याचा आसूड’ या पुस्तकात मांडलेला आहे. त्याविषयी आपण पुढील प्रकरणात पाहणार आहोत.

संदर्भ :
१. गौरवगाथा युगपुरुषाची – सं. बाबा भांड, महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती, औरंगाबाद (२०१७)
२. दोन अभिजात अर्थशास्त्रीय निबंध – सं. नीरज हातेकर आणि राजन पडवळ, लोकवाङ्मय गृह, मुंबई (२०१३)
३. कृषीशासनम् – सं. दशरथ शास्त्री, अनु. डॉ. वा. ब. राहुडकर, एशियन ॲग्री हिस्टरी फाउंडेशन, सिकंदराबाद (२०११)
४. भारत में कृषि – रणजीत सिंह, नॅशनल बुक ट्रस्ट, (२०००)
५. मध्ययुगीन भारत : एक सांस्कृतिक अभ्यास – इरफान हबीब, अनु. विजया कुलकर्णी, नॅशनल बुक ट्रस्ट, (२०१३)
६. राजर्षी शाहू गौरव ग्रंथ – सं. जयसिंगराव पवार, गौरव ग्रंथ प्रकाशन समिती, कोल्हापूर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading