February 23, 2025
Arvind Kejriwal's bubble burst article by Sukrut Khandekar
Home » केजरीवालांचा फुगा फुटला…
सत्ता संघर्ष

केजरीवालांचा फुगा फुटला…

गेली वर्ष दीड वर्षे भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीवर आपले लक्ष्य केंद्रित केले होते. मध्य प्रदेश, झारखंड, हरियाणा, महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीची विधानसभा जिंकायचीच असा भाजपने दृढनिश्चय केला होता. केंद्राची सत्ता हाती असल्यावर अनेक गोष्टी सत्ताधारी पक्षाला साध्य करता येतात. बूथ बांधणीपासून ते मतपत्रिकेच्या पन्ना प्रमुखापर्यंत निवडणुकीचे सूक्ष्म व्यवस्थापन भाजपने दिल्लीच्या निवडणुकीत राबवले.

डॉ. सुकृत खांडेकर

दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपल्याला कोणी आव्हान देऊ शकत नाही, दिल्लीत ‘आप’ला कोणी पराभूत करू शकत नाही, आम आदमी पक्षाचा पराभव करणे मोदींना या जन्मात शक्य होणार नाही… अशी दर्पोक्ती करणाऱ्या आपचे सर्वेसर्वा व माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा फुगा फुटल्याचे सर्व देशाने पाहिले. मुख्यमंत्रीपदाची व आपच्या विजयाची हॅटट्रीक संपादन करण्याचे केजरीवाल यांचे स्वप्न भंगले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू हीच दिल्लीत अधिक प्रभावी व लोकप्रिय आहे, हे भाजपाला मिळालेल्या प्रचंड बहुमताने दाखवून दिले. कोट्यवधी रुपयांचा मद्य विक्री घोटाळा ते शीशमहलवर कोट्यवधी रुपयांची केलेली उधळपट्टी यामुळे केजरीवाल यांची प्रतिमा भ्रष्ट ठरविण्यात भाजपाला यश मिळाले. राजधानीत मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या शीशमहलने केजरीवाल यांचा दिल्लीचा गड उद्ध्वस्त केला. गेली अकरा वर्षे आम आदमी पक्षाची देशाच्या राजधानीवर सत्ता होती. भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व विजयामुळे आपची सत्ता तर गेलीच पण आपचे व केजरीवाल यांचे भविष्य काय, या प्रश्नावर चर्चा सुरू झाली. मोदी-शहा यांच्या नेतृत्वाने केजरीवाल पर्वातून दिल्लीला मुक्त केले.

दिल्लीत आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला. माजी मुख्यमंत्री आतिशी वगळता पक्षाच्या सर्वच नेत्यांचा पाचोळा झाला. २०१५ मध्ये आपने ७० पैकी ६७ जागा जिंकल्या होत्या. २०२० मध्ये आपचे ६२ आमदार निवडून आले होते. २०१५ मध्ये भाजपाचे केवळ ३ आमदार निवडून आले होते, तर २०२० मध्ये भाजपाला ८ जागा मिळाल्या होत्या. यंदा २०२५ मध्ये भाजपाचे ७० पैकी ४८ जागांवर कमळ फुलले. २७ वर्षांपूर्वी भाजपाच्या नेत्या सुषमा स्वराज केवळ ५२ दिवस मुख्यमंत्रीपदावर राहिल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा दिल्लीच्या तख्तावर भाजपाचा मुख्यमंत्री बसणार आहे.

गेली वर्ष दीड वर्षे भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीवर आपले लक्ष्य केंद्रित केले होते. मध्य प्रदेश, झारखंड, हरियाणा, महाराष्ट्र पाठोपाठ दिल्लीची विधानसभा जिंकायचीच असा भाजपने दृढनिश्चय केला होता. केंद्राची सत्ता हाती असल्यावर अनेक गोष्टी सत्ताधारी पक्षाला साध्य करता येतात. बूथ बांधणीपासून ते मतपत्रिकेच्या पन्ना प्रमुखापर्यंत निवडणुकीचे सूक्ष्म व्यवस्थापन भाजपने दिल्लीच्या निवडणुकीत राबवले. भाजपकडे निष्ठावान केडर आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची फौज आहे. भाजपकडे मोदी – शहांसारखे बलदंड नेतृत्व आहे. आम आदमी पक्षाकडे सर्व काही केजरीवाल या एका व्यक्तिभोवती केंद्रित झाले आहे. भाजपाकडे केंद्राची सत्ता, पोलीस, प्रशासन आणि पक्ष संघटन मजबूत असल्याने कार्यकर्त्यांचे मनोबल नेहमीच उंचावलेले असते.

भाजपने दिल्ली निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केला नव्हता. समोर अरविंद केजरीवालसारखा आपचा मुत्सद्दी नेता होता. भाजपाने या निवडणुकीत सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती. दिल्ली विधानसभेवर कोणत्याही परिस्थितीत कमळ फुललेच पाहिजे, अशी रणनिती आखली होती. दुसरीकडे आप आणि काँग्रेस पक्ष हे भाजपाच्या विरोधात नव्हे तर एकमेकांना पराभूत करण्यासाठी निवडणुकीत उतरलेले दिसले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, असे भाजपने अडीच डझन दिग्गज नेते प्रचारात उतरवले होते.

केजरीवाल यांच्या हुकूमशाहीला कंटाळून आपमधून बाहेर पडलेले कुमार विश्वासपासून ते स्वाती मलिवालपर्यंत अनेक नेते आपवर रोज धारदार हल्ले चढवत होते. निवडणुकीनंतर आपची सत्ता आली असती तरी केजरीवाल मुख्यमंत्री होतील की नाही याविषयी कुणीच बोलत नव्हते. भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेले व तुरुंगवारी करून जामिनावर बाहेर असलेले केजरीवाल मुख्यमंत्री होणे कठीणच होते. त्यांनी आपल्या गैरहजेरीत अातिशीला मुख्यमंत्री केले तरी अातिशी पुन्हा मुख्यमंत्री व्हाव्यात म्हणून मतदार आपल्याला मतदान करतील, असे गृहीत धरणेही चुकीचे होते. आपचे जे बडे नेते भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगात गेले, त्या दिग्गजांना दिल्लीकर मतदारांनी घरी बसवले. अरविंद केजरीवाल (नवी दिल्ली), मनीष सिसोदिया (जंगपुरा), सौरभ भारद्वाज (शकुर बस्ती), सोमनाथ भारती (मालवीय नगर) या सर्वांचा पराभव झाला. दिल्लीकर मतदारांचा राग केवळ केजरीवाल यांच्यावरच नव्हता तर त्यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सर्व बड्या नेत्यांनाही जनतेने धडा शिकवला.

दिल्लीवर आम आदमी पक्षाने एक दशकाहून अधिक काळ राज्य केले. सलग इतके वर्षे आपचे सरकार असल्याने लोकांमध्ये बैचेनी, असंतोष वाढला होता. केजरीवाल सरकारने जनतेच्या किमान अपेक्षा पूर्ण केल्या नव्हत्या. दिल्लीत परिवर्तन व्हावे, अशी भावना मध्यमवर्गीय व नोकरदार तसेच सामान्य मतदारांमध्ये बळावली होती. यमुना नदी स्वच्छ करू, राजधानीतील रस्ते पॅरिससारखे बनवू आणि स्वच्छ पिण्याचे पाणी पुरवू ही तीन प्रमुख आश्वासने आप सरकार दशकभरात पूर्ण करू शकले नाही, याचा जनतेत राग होता. केजरीवाल, सिसोदिया, जैन, संजय सिंह या चारही नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप ठेवले व त्यांना जेलमध्ये पाठवले, यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेला तडा गेला.

पक्षाचे नेतेच जेलमध्ये गेल्यामुळे पक्षाचे नेतृत्व अस्थिर बनले. पक्ष व सरकार कोण सक्षमपणे चालवू शकेल हे जनतेला समजलेच नाही. आम आदमी म्हणायचे पण शीशमहलवर नूतनीकरणासाठी ४५ कोटी खर्च करायचे, हे उघडकीस आल्यामुळे केजरीवाल बोलतात एक व वागतात वेगळे असा संदेश जनतेत गेला. राजकारणात प्रवेश करताना केजरीवाल यांनी व्हीआयपी कल्चर संपुष्टात आणू असे म्हटले होते. मोटार, बंगला, सुरक्षा व्यवस्था आपण घेणार नाही असे त्यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात राहणीमान उंचावलेले दिसले. केंद्राने त्यांना झेड सुरक्षा व्यवस्था दिली असतानाही पंजाब सरकारची विशेष सुरक्षा व्यवस्था केजरीवाल यांनी का घ्यावी हे कोडे होते. आपच्या मोफत सेवा-सुविधांवर स्वत: मोदींनी व भाजपाने रेवडी कल्चर अशी टिंगल केली होती. केजरीवाल यांनी केलेल्या घोषणा अमलात आणताना आप सरकारला तारेवरची कसरत करावी लागत होती.

जनतेच्या मनात सरकारविषयी नकारात्मक भावना वाढीला लागली. प्रदूषण, ठिकठिकाणी साचलेले गलिच्छ पाणी, महानगरात साचलेले कचऱ्याचे ढीग हटविण्यात आपला अपयश आले. निवडणुका येताच आपने महिला, मुले, विद्यार्थी, रिक्षाचालक यांना खूश करण्यासाठी आश्वासनांचा वर्षाव केला. सर्व सवलती सत्ता मिळाल्यावर देऊ असे म्हटले. भाजपाने आपने केलेल्या घोषणांवर आपली जादा आकडेवारी घोषित करून आपला मागे सारले. रेवड्या वाटपात आप व भाजपा यांची शर्यत बघायला मिळाली. त्यात लोकांनी भाजपावर विश्वास ठेवला.

भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या विरोधात लढणारा नेwता अशी प्रतिमा केजरीवाल यांची दहा-बारा वर्षांपूर्वी होती. इंडिया अगेंस्ट करप्टशन या नावाखाली त्यांनी २०११ मध्ये आंदोलन उभारले होते. क्रुसेडर अगेंस्ट करप्टशन ही त्यांची दिल्लीत ओळख झाली होती. भ्रष्ट राजकीय व्यवस्था संपवून आपण स्वच्छ व पारदर्शक कारभार करू, असे ते सांगत असत. सन २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने चमत्कार घडवला. देशात तेव्हा मोदी लाट उंचावत होती आणि त्याचवेळी केजरीवाल यांचा दिल्लीच्या राजकीय पटलावर उदय झाला. सन २०१५ मध्ये काँग्रेसला ९.७ टक्के मते मिळाली. २०२० मध्ये मतांची टक्केवारी ४.३ पर्यंत घसरली. यावेळी काँग्रेसच्या मतांची टक्केवारी वाढली पण त्याने आपचे किमान १४ ठिकाणी उमेदवार पराभूत झाले.

निकालानंतर काँग्रेस व आप दोन्ही पक्ष एकमेकांवर पराभवाचे खापर फोडताना दिसले. गेल्या तीनही निवडणुकीत काँग्रेसचा एकही आमदार दिल्ली विधानसभेत निवडून आला नाही. गेल्या तीनही लोकसभा निवडणुकीत काँग्रेस किंवा आपचा एकही खासदार दिल्लीतून लोकसभेवर निवडून गेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारात आपचा उल्लेख आपदा करून केजरीवालांची खिल्ली उडवली होती… हम एक है तो सेफ है, या घोषणेने भाजपला जनादेश मिळाला आणि आपला मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणवून घेणारे आम आदमी पक्षाचे नेते चार्टर्ड विमानातून फिरू लागले, अंगावर महागडे कपडे घालू लागले व शीशमहलमध्ये राहू लागले, तेव्हापासून पक्षाच्या अधोगतीला सुरुवात झाली. दिल्लीच्या निवडणूक निकालानंतर स्थानिक लोकांनी केजरीवाल यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. विशेष म्हणजे, महिलांनीच तिरडी हातात धरली होती. भ्रष्टाचारीओंका एकही लाल, उसका नाम है, केजरीवाल… असे रंगवलेले फलक अंत्ययात्रेत सामील झालेल्या लोकांच्या हाती होते. देशाच्या कोणत्याही दुसऱ्या मुख्यमंत्र्यांवर अशी अपमानजनक पाळी आली नसावी.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading