July 27, 2024
bala-kadam-vastraharans-gopya-to-malvani-popular-poet
Home » बाळा कदम: वस्त्रहरणचा गोप्या ते मालवणी लोकप्रिय कवी
मनोरंजन

बाळा कदम: वस्त्रहरणचा गोप्या ते मालवणी लोकप्रिय कवी

बाळा कदम: वस्त्रहरणचा गोप्या ते मालवणी लोकप्रिय कवी

मालवणी ‘वस्त्रहरण’ या अजरामर नाटकातील ‘गोप्या ‘ या लोकप्रिय व्यक्तिरेखेसह वस्त्रहरणच्या १८०० प्रयोगात बाळा कदम या गुणी कलावंताने काम केलं.बाळा हा लोकप्रिय मालवणी कवीही आहे.त्याच्या अभिनय आणि कवितेच्या लेखन संघर्षा विषयीची ही कहाणी !

अजय कांडर

मालवणी कवितेच्या परंपरचा जेंव्हा जेंव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा तेव्हा कवी बाळा कदम यांच्या कवितेची दखल घेतली नाही तर तो इतिहास अपुराच राहील. पण बाळा एक उत्तम अभिनेता आहे. अनेक नाटके आणि मालिका यामध्ये विविध व्यक्तिरेखा साकारताना त्याने आपल्या अभिनयाने जाणकार नाट्यरसिकांचा लक्ष वेधून घेतला. मालवणी नटसम्राट म्हणून ख्याती मिळवलेल्या मच्छिंद्र कांबळी यांच्या गंगाराम गवाणकर लिखित अजरामर वस्त्रहरणच्या तब्बल 1800 प्रयोगात त्याने विविध व्यक्तिरेखा सादर केल्या. त्यात 250 प्रयोगांमध्ये गोप्याची भूमिका सादर करताना रसिकांकडून उदंड प्रतिसाद मिळविला. या बद्दल बाळाचं कौतुकच ! परंतु अशा या गुणी कलावंताची विजयदुर्ग सारख्या मुख्य प्रवाहाच्या दृष्टीने सांस्कृतिक दृष्ट्या बाजूला पडलेल्या भागात त्याच वास्तव राहिले. त्यामुळे त्याच्यावर तसा अन्यायच झाला. तरीही या सगळ्याकडे दुर्लक्ष करून निवळ आपल्याला पुरेसा वेळ देता आला नसल्यामुळेच कविता आणि अभिनय या क्षेत्रात पुढे जायला मीच कमी पडलो अशी खंत तो व्यक्त करतो !

आपल्या नाट्यप्रवासाविषयी बोलताना बाळा म्हणतो, मी लिहिलेल्या अनेक मालवणी, मराठी एकांकिकांनी अनेक पारितोषिके मिळवली. दरम्यान, मीच लिहिलेली ‘ छेद ‘ तसेच ‘आली बाबा चाळीत पोर’ ही नाटके रंगभूमीवर आणली. पुढे मुंबई येथे गेल्यावर मच्छिंद्र कांबळी यांची भेट झाल्यावर माझी अभिनयाची आवड बघून त्यांनी वस्त्रहरण नाटकात काम दिलं. अर्जुन आणि प्रान्टर या भूमिका मी कायम केल्या. २५० प्रयोगात लोकप्रित गोप्या केला. 1800 वस्त्रहरण प्रयोगात मी राक्षस ते गोप्या असा प्रवास केला. बाबूजींच्या रमेश पवार लिखित ‘विमानहरण ‘ या नवीन नाटकातही मी काम केले. योजना भाट्ये यांच्या ‘उंटावरचे शहाणे ‘ हे नाटक केले. काही घरगुती कारणांमुळे मला मुंबई सोडावी लागली. आता माझं नवीन नाटक शेजारीण रंगभूमीवर आले आहे.

शिक्षक सतिश सरनोबत यांनी बाळाला अभिनयासाठी प्रेरणा दिली. त्यातून त्याने अभिनयाबरोबर नाट्य लेखनही करायला प्रारंभ केला. मग गावात मित्र रमेश चव्हाण यांच्या साथीने चादरीचे पडदे लावून नाटक सादरीकरण करायला लागला. याच दरम्यान पाठ्यपुस्तकातील कविता वाचून तो काव्य लेखनाकडे वळला. देवगडला तिसरं मालवणी संमेलन झालं त्याच त्याने पहिली मालवणी कविता ‘ रेडीमेड फॅशन ‘ आणि पहिली मालवणी कथा ‘ राकेल इला ‘ सादर केली. त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला. त्यावेळी संमेलनाचे आयोजक तथा प्रसिद्ध इतिहासकार, कथाकार मनोहर कदम यांनी फार त्याचे कौतुक केले.यातून मालवणी कविता लिहिण्याची उर्मी त्याला मिळत गेली. बाळाची मालवणी कविता सादर करण्याची देहबोली पहाण्यासारखी असते.प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. झी मराठी वरील ‘ गाव गाता गजाली ‘ या सिरियलच पस्तीस एपिसोडच त्याने कथा, पटकथा, संवाद हे लेखन केलं आहे. या सिरियलचे निर्माते संतोष काणेकर यांनी त्यानंतर व्यावसायिक नाटकाचं लेखन तुला करायला सांगितलं. पण बाळा म्हणतो माझ्या आळशीपणामुळे ते होऊ शकल नाही. त्याने राखेतून जन्म घेतोय. ‘ शेजारीण ‘ ही मालवणी नाटक लिहिली आणि रंगभूमीवरही ती आणली आहेत.

बाळा आणि त्याच्या मिसेसने कोकणच्या एकांकिका स्पर्धा गाजवल्या आहेत.या विषयी बाळा म्हणतो, नाटकाच्या तालमीला बहिनी ती यायची.तिथेच आमचं प्रेम वाढत गेलं.मग घरच्यांचा विरोध झुगारून लग्न केलं आणि माझा एकत्र नाट्य प्रवास सुरू झाला.

लग्नानंतर पत्नी शुभाने गावातल्या ‘ वस्त्रहरण ‘ नाटकात माझ्या सोबत द्रौपदीकाकूची भूमिका केली. माझ्या प्रत्येक एकांकिकेत ती असते. आता ‘ शेजारीण ‘ या माझ्या नाटकात नव्या नाटकात मुख्य भूमिका साकारतेय. या व्यतिरिक्त झी टीव्हीच्या ‘ गाव गाता गजाली ‘ या सिरियलमध्ये तिने काम केलं. सोनी मराठीवरील ‘ छोट्या बयोची मोठी स्वप्न ‘ या सिरियलमध्ये तिने भूमिका केली. अभिनयासोबत ती राजकारणातही आहे. विजयदुर्गची ती सरपंच होती. मग पुन्हा निवडून ग्रा. पं. सदस्य. नंतर देवगड पंचायत समिती सदस्य झाली. आता पुन्हा ग्रामपंचायत सदस्य आहे. वीस वर्षे राजकारणात आहे. मुलगी रिद्धी हिलाही अभिनयाची आवड आहे. छोट्या बयोची मोठी स्वप्न या सिरियलमध्ये तिने छोट्या बयोच्या बहीणीची भूमिका केली.

इथले कलाकार चित्रपटाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात फार पुढे जात नाहीत याविषयी बाळा म्हणतो, सिंधुदुर्गातील अनेक भागात चित्रपटाचं चित्रिकरण चालू असतं. स्थानिक कलाकारांना संधी मिळते. पण आज अनेकांची बाहेर जावून चित्रिकरण करण्याची मानसिकता नाही. इथलं सांभाळून इथेच शुटींग असेल तर ते काम करतात. आता या क्षेत्रात स्पर्धा ‘ अघोरी ‘ झालीय. इथेही जातीचं कार्ड चालतं. स्ट्रगल राक्षसासारखा अक्राळविक्राळ झालाय. मात्र चित्रिकरणाला लागणारी यंत्रणा स्थानिक व्यावसायिकांनी उपलब्ध केल्या तर जिल्ह्यातील चित्रिकरणाला अधिक गती मिळेल. उदा. जनरेटर, लाईट्स, दर्जेदार कॅमेरा हे सगळं मुंबई येथून आणणं निर्मात्यांना खर्चिक पडतं. त्यामुळे नवीन रोजगारही उपलब्ध होईल. मालवणी भाषेतही चित्रपट झाले. पण त्याला तंत्रज्ञानाची एक मर्यादा पडली आहे.सर्व गोष्टी लक्षात घेऊन परिपक्व मालवणी चित्रपट बनवला तर तो निश्चितच गाजेल आणि मग कलाकार, तंत्रज्ञानांना व्यावसायिक चित्रपटाची दारे अधिक प्रमाणात खुली होतील.बाळा सारखा कलाकार जे हे सांगतोय ते स्व अनुभवातून सांगतो आहे ते सत्यच आहे.पण अशाही परिस्थितीत बाळाने सगळ्या परिस्थितीवर मात करत केलेला कविता लेखन आणि अभिनयाचा प्रवास स्थानिक नव्या कलावंतांना प्रेरणा देणाराच आहे!

अजय कांडर
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. 9404395155


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

प्रबोधनास्तव मनं प्रज्वलित करणारी कविता

शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ !

स्त्री लिंग गुणोत्तरात घट या समस्येकडे एकाकीपणे पाहाणे चुकीचे – डॉ. शालिनी फणसळकर जोशी

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading