July 27, 2024
Anup Jatrakar Success Story
Home » आडवळणाचा दिग्दर्शक जेव्हा २७ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोहचतो !
फोटो फिचर

आडवळणाचा दिग्दर्शक जेव्हा २७ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोहचतो !

आडवळणाचा दिग्दर्शक जेव्हा २७ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पोहचतो !

निपाणी सारख्या आडवळणाच्या भागात ‘गाभ’ सारखा आशयघन चित्रपट तो बनवतो. हा चित्रपट पुढे २७ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्येही पोहोचतो आणि तिथे पारितोषिकेही मिळवितो. असं खणखणीत यश मिळविणाऱ्या तरुण दिग्दर्शक अनुप जत्राटकरची ( संपर्क – 78293 96051 )ही संघर्षमय यशोगाथा!

अजय कांडर ९४०४३९५१५५

कोल्हापूर हे चित्रपटाचे माहेरघर समजले जाते. पण कोल्हापूरच्या सीमेवर असलेले कर्नाटकातील निपाणी ह्या आडवळणाच्या भागातील वातावरण चित्रपट सारख्या चमचमत्या क्षेत्राला पोषक नाहीच. तरीही एक तरुण चित्रपट माध्यमाचे शिक्षण घेतो, याच गावात स्वतःचा रेकॉर्डिंग स्टुडिओ सुरू करतो आणि अनेक संकटांवर मात करत ‘गाभ’ सारख्या पूर्ण लांबीच्या आशयघन चित्रपटाची निर्मिती करतो. एवढंच नाही तर हा चित्रपट पुढे जगभरातील २७ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शित करताना तिथे अनेक पारितोषिकेही मिळवितो. अर्थात निव्वळ आपल्या गुणवत्तेवर असे निर्मळ यश मिळविणारा गुणी कलावंत म्हणजे निपाणीचा तरुण दिग्दर्शक अनुप जत्राटकर होय. या घवघवीत यशाबद्दल अनुपचे कौतुक करावे तेवढे थोडेच!

काही ओळख नसताना २०१४ साली ‘हत्ती इलो’ या दीर्घ कवितेवर मला चित्रपट बनवायचा आहे; असे सांगण्यासाठी अनुप निपाणीहून मला भेटायला कणकवलीला आला होता. अनुपने ‘हत्ती इलो’ चित्रपटासाठीचे स्टोरी लेखनही केले. मात्र पुढे माझे आजारपणं वाढत गेले आणि ‘हत्ती इलो ‘ चित्रपटाची संकल्पना मागे पडली. पण मधल्या काळात अनुपने अनेक चांगल्या शॉर्ट फिल्म बनवल्या. त्यांना आंतरराष्ट्रीय पारितोषिकेही मिळाली आणि आता पूर्ण लांबीचा ‘गाभ’ चित्रपट बनवून या चित्रपटातील अभिनेता कैलास वाघमारे यांना प्रतिष्ठित अशा थर्ड आय एशियन चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याचा पुरस्कारही प्राप्त झाला.

‘गाभ’ विषयी बोलताना अनुप म्हणतो, २०१३ साली स्त्री-भ्रूण हत्या या विषयावर लघुपट तयार करताना वेगवेगळ्या संकल्पना तयार केल्या होत्या. त्यावेळी दुसर्‍या संकल्पनेवर लघुपट केला. त्यालाही बरेच पुरस्कार मिळाले पण, ही संकल्पना तशीच होती. मग पूर्ण लांबीच्या पहिल्या चित्रपटासाठी हाच विषय निवडला. चित्रपटाचा आशय सांगायचा तर, एक तिशी ओलांडलेला तरुण ज्याला लग्नाला मुलगी मिळत नाही आणि त्याच्या जवळ असलेल्या म्हशीला गाभ घालायला रेडा मिळत नाही. कारण माणसांमध्ये जशा मुली मारल्या जातात तसंच जनावरांमध्ये रेडा कापून टाकला जातो. हा जो कांही विरोधाभास आहे त्यावर व्यंगात्मक पद्धतीने भाष्य करण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला आहे. या चित्रपटाची आजवर २७ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून निवड झाली आहे, त्यापैकी महत्वाचे म्हणजे कान्स चित्रपट महोत्सव, टोरांटो लिफ्ट ऑफ महोत्सव, मा-बीग, अनाटोलिया महोत्सव, पॅरिस चित्रपट महोत्सव शिवाय अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. येत्या जून किंवा जुलै महिन्यात हा चित्रपट चित्रपटगृहांमधून प्रदर्शित होत आहे.

अनुपला पहिल्या पासूनच चित्रपट माध्यमाची आवड. तो लहानपणी ४-५ वर्षांचा असताना घरी आलेले पाहुणे, त्याच्या बाबांचे मित्र जेंव्हा कधी त्याला विचारत, बाळा तू मोठा होऊन काय करणार ? तेंव्हा, तो म्हणायचा, “मी पिच्चर काढणार” शेवटी त्याचं हे वाक्य खर ठरलं.

अर्थात त्याचा हा प्रवास सोपा नव्हता. आई-वडिल शिक्षक असल्यामुळे घरी वाचनाचे संस्कार झाले. आईचे आई-वडिल शिक्षक आणि उत्तम साहित्यिक; वडिलांचे वडिल कॅरोनेट वाजवत आणि आजी जात्यावरच्या ओव्या स्वत: तयार करून म्हणायची. त्यामुळे हा वारसा आपसूकच अनुप आणि त्याच्या भावामध्ये आला. त्याचे उच्च शिक्षण झाल्यावर त्याने नोकरी करावी अशी घरच्यांची अपेक्षा होती. पण बी.ए. च्या शेवटच्या वर्षात असताना त्याने फोटोग्राफीमधून जमा केलेल्या पैशांमधून एक लघुपट तयार केला आणि “जर तू या क्षेत्रात गेलास तर आम्हाला मेलास” असे ठणकावून सांगणार्‍या त्याच्या घरच्यांना तो लघुपट पाहून “हा या क्षेत्रात कांहीतरी करू शकेल” असा विश्वास वाटला.

http://www.youtube.com/c/ajmchannel

अनुप म्हणतो, “मी निपाणी इथे राहून काम करेन आणि एक दिवशी लोकं स्वत:हून कामासाठी माझ्याकडे निपाणीला येतील अस ठरवल. आणि आज चित्रपट क्षेत्रातील लोकं आपणहून निपाणीला येताहेत. स्टुडिओमध्ये डबिंग, रेकॉर्डींग करताहेत.” ‘गाभ’ चे सारे पोस्ट-प्रोडक्शनचे काम हे निपाणीमध्येच पूर्ण झाले आहे. त्रास तसा जेंव्हा २००५ मध्ये सुरूवात केली तेव्हा झाला पण तो वेगळ्या अर्थाने. आज लघुपटांचे पेव आले आहे. पण त्यावेळी लघुपट ही संकल्पनाच नवीन होती. लोकं वेड्यात काढायचे आणि निपाणीत तर तसे वातावरण नसल्याने लग्नाचे चित्रीकरण-मेकअप करणारे, सुतारकाम, बांधकाम करणारे, चित्रपट प्रेमी अशा लोकांना एकत्र करून त्यांना शिकविण्यापासून सुरूवात केली आणि मग स्वत:ची टिम या लोकांच्या भरवशावर तयार केली आणि यातीलच कांही लोकं आजही माझ्यासोबत काम करतात आणि त्यांना आज प्रोफेशनल म्हणून ओळखले जाते, हेच माझे मोठे यश आहे! सध्या अनुप दोन मराठी चित्रपटांसाठी पटकथा लिहीत आहे. स्वत:च्या पुढच्या चित्रपटाचे प्री-प्रोडक्शनचे काम सुरू आहे. शिवाय शिवाजी विद्यापीठात यंदाच्या वर्षापासून बी.ए. ईन फिल्म मेकिंग हा अभ्यासक्रम सुरू होतो आहे, त्याच्या अभ्यासक्रम समितीवर तो काम तर करतोच आहे. शिवाय त्याचे तिथे आणि मास कम्युनिकेशन विभागात शिकविण्याचे कामही सुरू आहे.

‘निष्पर्ण पिंपळाच्या छायेत’ या महाराष्ट्र शासनाच्या ‘विजय तेंडुलकर पुरस्कार’ प्राप्त एकांकिका संग्रहाच्या दुसर्‍या आवृत्तीचेही त्याचे काम सुरू आहे. तसेच यू-ट्यूब वरील स्वत:च्या चॅनेलवरून चित्रपटांची माहिती पुरविणारे व्हिडीओ तयार करण्याचे कामही सुरू आहे.अर्थात चित्रपट माध्यमाची घरची परंपरा नाही. माध्यम मार्गाने जगणाऱ्या कुटुंबात वाढ.तरीही स्वतः च्या कलेच्या उपजत आवडीमुळे अनुपसारखा मुलगा चित्रपट क्षेत्रात यशस्वी होण्याचा प्रयत्न करतो. ही गोष्ट सहज घेण्यासारखी नाहीच आहे; परंतु जिद्दीने आपापल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करणाऱ्या मुलांसाठी ती एक प्रेरणाच आहे!

http://anupjatratkar.com/

अजय कांडर
(लेखक विख्यात कवी,व्यासंगी पत्रकार आहेत. )


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

जाणून घ्याः सुधारित कृषि अवजारे व यंत्रे ( भाग -2 )

स्त्री मनाची घुसमट..”नाती वांझ होताना”

ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. मंगेश उत्तम गौंस यांची नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस, इंडिया (NASI) चे फेलो म्हणून निवड

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading