एकंदरीत पाहता पक्ष्याविषयी पूर्वीच्या काळी असलेला कमी अभ्यास, अतार्किक आकलन, धनलोभ आणि नीलावंती सारखे भ्रामक साहित्य यातून असे गैरसमज वेगाने पसरलेले आढळून येतात. यातील काही अंधश्रद्धा जरी त्या पक्ष्यांसाठी तारक ठरल्या तरी बहुतांशी वेळेला मारक ठरल्या आहेत.
प्रतिक मोरे
पर्यावरण अभ्यासक
लहानपणीची गोष्ट, रात्री जेवणं उरकली की मांडवात भावंडं गोळा होत. भाताच्या पेंढ्याने शाकारलेल्या मांडवात आणि सारवलेल्या जमिनीवर सुटणाऱ्या वाऱ्याचा आस्वाद घेत गप्पा रंगत. एके दिवशी गप्पा रंगात आलेल्या असताना जवळून एखादी बाई किंचाळवी असा आवाज ऐकू आला. सर्वांची जाम घाबरगुंडी उडाली. नव्वदीच्या काळात वीज पुरवठा तसा मर्यादित, घराभोवतीचा काळोख आणि भयाण शांततेने तो आवाज अजूनच भयप्रद भासत होता. कोणी तरस कोणी हडळ असे तर्क लावून झाल्यावर शेवटी प्रकरण आजीकडे गेलं आणि हूमण ह्या शब्दाशी माझी पहिली ओळख झाली.
हूमण म्हणजे घुबड ( ब्राऊन फिश आऊल). याला दगड मारला की तो चोचीत पकडतो आणि मग नदीवर जाऊन घासत बसतं. जसा दगड झिजतो तसा दगड मारणारा माणूस ही झिजून मरतो असा समज अजूनही या घुबडाबद्दल आहे, यातूनच मग याच्या शिकारीचे प्रयत्न होतात. घुबडं एकंदरीतच अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेला पक्षी. याचं वास्तव्य तसें अंधारी, शांततेच्या निर्जन स्थळी, स्मशानात आणि सोडलेल्या किंवा रिकाम्या घरांमध्ये. बराचसा वावर काळोखातला. घुबड जिथे बसेल त्या घराचा निर्वंश होऊन नायनाट होतो असं मानलं जातं. खरं तर भोंदू, मांत्रिक, वैदू आणि इतर औषधी व्यवसाय करणारे मांत्रिक घुबडाला पकडून त्याचे अवयव, पिसे, हाडे यांचा वापर करत असल्याचे आढळते यामुळे अलीकडच्या काळात वर्षभर शिकारीला सामोरे जावे लागत असले तरी दिवाळीच्या काळात ही शिकार शिखरावर पोचते.
लक्ष्मीचे वाहन मानले जाणाऱ्या या पक्ष्याचा दिवाळीच्या दिवसात उत्तर भारत आणि अनेक ठिकाणी बळी दिला जातो. तर आंतरराष्ट्रीय तस्करीमध्ये ब्राऊन फिश आऊल आणि इंडियन स्कोप आऊल यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही घुबड पिंजऱ्यात बंदिस्त करून पाळण्यासाठी युरोप आणि इतर देशांमध्ये पाठवली जातात असा अंदाज आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणानुसार इंडियन ईगल आवुल ही प्रजाती सर्वाधिक तस्करी होणारी प्रजाती ठरली आहे. (ARCC)
टिटवी हाही एक असाच दुर्दैवी पक्षी. रात्रीच्या काळोखात धोक्याची जाणीव होऊन ओरडणाऱ्या या पक्ष्याचा आवाज कानावर पडला तर त्या गावातील माणूस मरतो असा गैरसमज आहे आणि त्यामुळे याची अगदी अंडी, पिल्ले पण नष्ट केली जातात. प्रत्यक्षात मात्र टिटवी अत्यंत सावध पक्षी असून जवळपास असणाऱ्या धोक्यांची पूर्वसूचना तो ओरडुन देत असतो .तसेच बदक, कोंबडी, राजहंस, मोर, ईगल, पोपट अश्या पक्ष्यांच्या दर्शनाविषयी आणि पाळले तर शुभ अश्या अनेक अंधश्रद्धा आपल्याला दिसून येतात. काळी जादू करणारे मांत्रिक आणि भगतगिरी मध्ये अश्या पक्ष्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. उलटी पिसे असणारी कोंबडी आणि इतर पक्षी अश्या वेळेस बळी दिले जातात. तर भारद्वाज सकाळी दिसला की शुभ असते ही सुद्धा अशीच एक अंधश्रद्धा. खरं तर भारद्वाज हा शिकारी पक्षी, लहान पक्षी, सरडे, पाली , साप यांची शिकार करून खातो. याच्या दर्शनाने हे जीव उलट लांब पळतात. काही ठिकाणी भारद्वाज पकडुन त्याला पिंजऱ्यात सुद्धा ठेवला जातो. तसेच याच्या घरट्याची काडी प्रवाहात टाकली तर ती उलट्या दिशेने वाहते असाही समज रूढ आहे.
हे झाले वर्तमान काळातील पक्षी. परंतु चातक, जटायू, नीलकंठ, धनचीडी, राजहंस असे पक्षी अगदी पुराणकाळापासून विविध अंधश्रद्धांच्या जाळ्यात फसलेले आहेत. चातक हा पक्षी पावसाचे पाणी पिऊन राहतो, चकोर पक्षी चांदण्यात आंघोळ करतो, फिनिक्स पक्षी राखेतून जन्म घेतो, राजहंस नीरक्षीरविवेकाने दूध आणि पाणी वेगवेगळे करतो, दसऱ्याच्या दिवशी नीलकंठ पक्ष्याचे दर्शन घ्यावे अश्या रूढी साहित्यात आणि समाजात रूढ झालेल्या आपल्याला आढळतात. तर धनेश किंवा धनचीडी त्याच्या घरट्यात धन लपवून ठेवतो असा समजातून त्याची ढोली फोडली जाते. मोराचे मीलन न होता त्याचे अश्रू पिऊन लांडोर पिल्ले घालते हा ही असाच एक समज. गिधाडे दिसली की मृत्यू येतो असे अनेक समज रूढ झाले आहेत.
खरं तर रामायण सारख्या महाकाव्याची सुरुवात क्रोंच पक्ष्याचा वर्णनाने झालेली आहे. अश्या अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भात अनेक पक्षी आणि तत्कालीन जैव विविधतेच्या नोंदी झालेल्या पाहायला मिळतात. ऋग्वेदापासून मृगपक्षीशास्त्र, महाकवी कालिदासाच्या रचना, वत्सायनाचे कामसूत्र, ते अगदी मुघलकालीन संदर्भ ग्रंथ, चित्रे सर्वत्र पक्ष्यांचा आढळ असल्याचा दिसून आलेला आहे. पक्ष्यांचे माणसाशी असणारे सहजीवन जसे प्राचीन आहे तश्याच अंधश्रद्धा सुद्धा रूढ झालेल्या पाहायला मिळतात. एकंदरीत पाहता पक्ष्याविषयी पूर्वीच्या काळी असलेला कमी अभ्यास, अतार्किक आकलन, धनलोभ आणि नीलावंती सारखे भ्रामक साहित्य यातून असे गैरसमज वेगाने पसरलेले आढळून येतात. यातील काही अंधश्रद्धा जरी त्या पक्ष्यांसाठी तारक ठरल्या तरी बहुतांशी वेळेला मारक ठरल्या आहेत.
पितृपक्षात आणि कार्याच्या वेळी कावळ्यांना केलें जाणारे अन्नदान त्यांच्या नैसर्गिक सवयी बदलण्यास कारणीभूत ठरले आहे. पूर्वी सर्वत्र आढळणारे कावळे आता शहरे, मानवी वस्तीच्या ठिकाणी स्थलांतरित झाले असल्याचे सहज दिसून येते. तर पुण्य मिळवण्याच्या समजुतीपायी कबुतरांना खाणे घालण्यातून त्यांची झालेली प्रचंड वाढ चिमणी, पोपट सारख्या शहरी पक्ष्यांना मारक ठरली आहे. अनेक ठिकाणी कबुतरांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. त्यांच्या वाढत्या संख्येमुळे वेगवेगळे श्वसन रोग होत असल्याचे सुद्धा समोर आले आहे. आधीच शिकार, अधिवास नष्ट होणे, हवामान बदल असे अनेक संकटातून पक्षिसृष्टी जात असताना अंधश्रद्धा आणि भ्रामक समजुती पायी येणारे दबाव हे पक्ष्यांच्या संख्येवर भर टाकत आहेत. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोनातून श्रद्धा पाहणे आणि अंधश्रद्धा दूर करणे ही पर्यावरण समतोल राखण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब ठरत आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.