संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाने मराठी भाषेला अमरत्व दिले आहे. या प्रांतात त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला आहे. ही परंपराही अखंड सुरू आहे. यावर साहित्य निर्मितीही होत आहे आणि यापुढेही साहित्य निर्मिती होत राहील. त्यामुळे मराठी लुप्त पावण्याची भीती बाळगणे व्यर्थ आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
मऱ्हाठियेचां नगरीं । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी ।
घेणे देणे सुखचिवरी । हो देई या जगा ।। १६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा
ओवीचा अर्थ – या मराठी भाषेच्या गावात आत्मज्ञानाची रेलचेल कर व या जगाला केवळ ब्रह्मसुखाचेंच घेणें देणें होऊ दे.
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून मराठी भाषेच्या संवर्धनावर विचारमंथन होत आहे. भाषेच्या संवर्धनासाठी विविध प्रयोगही केले जात आहेत. वाचन संस्कृती वाढावी या उद्देशाने सर्वच भाषात हा वाचन चळवळ उभी राहीली जात आहे. देश परदेशातही हे प्रयोग होत आहेत. व्यक्ती जगभरात कोठेही गेली तरी तो त्याची बोली भाषा विसरत नाही. अचानक परदेशात त्याचा बोलीच्या लयीमध्ये बोलणारा कोणी भेटला तर त्याला निश्चितच त्याच्या मातृभूमीची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. इतकेच शहरात राहाणारी व्यक्ती शहरातील वातावरणात कितीही रुळली तरी त्याच्या गावाकडील बोलीत बोलणारा कोणी भेटला तर त्याला तो लगेच ओळखतो. यासाठी भाषेच्या व्याकरणात भांडत न बसता भाषेच्या, बोलीच्या संवर्धनासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.
सध्या अनेक ठिकाणी मराठी भाषा वापराचा आग्रह धरला जातो. कदाचित अशा व्यक्तींना मराठी भाषा लुप्त पावते की काय, याची भीती वाटत असावी. जागतिकीकरणामुळे अनेक प्रांतांतील लोक महाराष्ट्रात आले, तसे महाराष्ट्रातील लोकही परप्रांतात गेले, पण हे प्रमाण इतरांच्या तुलनेत कमी आहे. कारण, मराठी माणसाला घर सुटत नाही. महाराष्ट्राबाहेर जाऊन काम करण्याची त्याच्या मनाची तयारी नाही. यामुळे मराठी माणसाचे स्थलांतराचे प्रमाण इतरांच्या तुलनेत कमी आहे. महाराष्ट्रात सध्या परप्रांतियांची संख्या वाढत आहे. पुण्यातील पिंपरी-चिंचवडमध्ये लोक मराठी ऐवजी हिंदीच अधिक बोलतात. मुंबईतही अशीच परिस्थिती आहे. परप्रांतियांच्या खिचडीने हिंदीचा वापर वाढत आहे. मराठी हळूहळू मागे पडत आहे. कदाचित यामुळे मराठी लुप्त होईल की काय, अशी चिंता व्यक्त केली जात असावी; पण खरे पाहता कोणत्याही भाषेचा प्रभाव आणि वापर हा त्यामध्ये निर्माण होणाऱ्या साहित्यावर अवलंबून असतो. चांगल्या साहित्याच्या निर्मितीने साहजिकच प्रभाव वाढतो. भाषेची लोकप्रियताही वाढते. वापरही वाढतो. मराठी मागे पडत आहे कारण यामध्ये तशा तोडीच्या साहित्याची निर्मिती केली जात नाही, हे परखड सत्य आहे.
हिंदीमधील मालिकांमुळे हिंदी भाषेचा देशभर प्रभाव वाढला. पण दाक्षिणात्य राज्यांनी त्यांच्या भाषेच्या विस्तारासाठी प्रभावी चित्रपट निर्मिती करून भाषेला संजिवनी मिळवून दिली आहे. त्यांचे चित्रपट अनेक भाषात भाषांतरीत झाले तरी त्यांच्या प्रांतात मात्र त्यांची स्थानिक भाषा प्रभावी होत गेली आहे. याचाच अर्थ भाषेचा वापर कसा वाढतो हे यातून स्पष्ट होते. भाषेमध्ये चांगल्याची निर्मिती सातत्याने होत राहीली तर निश्चिचत भाषेचा प्रभाव हा वाढतो. भारतीय भाषा वसाहित्याचे अभ्यासक डॉ. सुनीलकमार लवटे यांच्यामते बोडो भाषा अल्पसंख्याक असूनही सरस नि सकस राहीली. कारण त्या भाषेच्या संवर्धनासाठी झालेल्या साहित्यनिर्मितीच्या प्रयत्नामुळे. अलीकडच्या काळातील ज्या बोलींना भाषेचा दर्जा प्राप्त झाला अशा बोडो, संथाली, मैथिली, मणिपुरी भाषांपैकी डोंगरी ही अशी एकमात्र भारतीय भाषा आहे की, जी भाषा होऊनही तिच्यात बोलीत लिहिण्याची परंपरा अखंडित राहीली आहे. त्याचं कारण ती पहाडी प्रदेशात उमटत-घुमत राहिली. भाषा तज्ज्ञांची, संशोधकांची ही मते विचारात घेऊन भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न झाल्यास भाषेला निश्चितच अमरत्व प्राप्त होईल.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाने मराठी भाषेला अमरत्व दिले आहे. या प्रांतात त्यांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ केला आहे. ही परंपराही अखंड सुरू आहे. यावर साहित्य निर्मितीही होत आहे आणि यापुढेही साहित्य निर्मिती होत राहील. त्यामुळे मराठी लुप्त पावण्याची भीती बाळगणे व्यर्थ आहे. भाषेचा वापर कमी झाल्याचे पाहून भीतीने इतरांना त्रास देणे, ही मराठी संस्कृती निश्चितच नाही. याचे राजकारण करणे, हे यापेक्षाही वाईट. मराठी भाषा लुप्त होईल अशी चिंता करणाऱ्यांनी वाचनाची आवड वाढेल, अशा उत्तम दर्जाच्या साहित्याची र्निमिती करावी. अमरत्व प्राप्त झालेली भाषा लुप्त होईल, ही चिंता करणे व्यर्थ आहे. मराठी भाषा अमर आहे, मनाला चिरंतन स्फुर्ती देणारी भाषा आहे, हे या भाषेचे वैशिष्ट्य जपायला हवे.
मराठी भाषेत ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्याचा प्रयत्न व्हायला हवा. भाषा जेव्हा ज्ञान भाषा होते तेव्हा ती खऱ्या अर्थाने विस्तारते. ब्रह्मज्ञानाचा प्रसार, प्रचार हा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून होत आहे. आजही ज्ञानेश्वरीची पारायणे करण्याची परंपरा सुरु आहे. जागतिकीकरणाने झालेला आर्थिक बदल, धकाधकीचे झालेले जीवन यामुळे यात अडथळा जरूर होत आहे. पण धकाधकीच्या जीवनात चैतन्य निर्माण करण्याचे, एक मानसिक आधार देण्याचे काम ज्ञानेश्वरीतील आत्मतत्वज्ञान करू शकते हे विचारात घेऊन त्याची गोडी नव्या पिढीला लावून देण्याचे काम झाल्यास ज्ञान दानाच्या परंपरेबरोबरच भाषेचेही संवर्धन होऊ शकेल. यासाठी ब्रह्मज्ञानाचा प्रसार, प्रचार करणाऱ्या गुरु-शिष्य परंपरेचे संवर्धन होणे गरजेचे आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.