निपाणीकडल्या मराठी कन्नड भागातले डंककमल्ले, इदरकल्याणी, छत्तराशिंगी सारखे अनेक अपरिचित पण गोड शब्द जागोजागी भेटतात. तसेच काही वाक्यही उदाहरणार्थ कमळी तुरकाटीवानी असली तरी दिसाया उजवी होती किंवा समदी अजून शेंबडात माशी घुटमळल्यागत इथंच हायीत, अशा नव्या शब्दकळेनं नटलेल्या या ग्रामीण कथांची लज्जत वाढली आहे आणि त्या वाचताना शहरी वाचकाला कष्ट पडत नाहीत, हे या कथांचं आणि लेखिकेचं यश म्हणावे लागेल.
अशोक बेंडखळे
अनेक ग्रामीण कथा वाचल्यानंतर कथांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात येतो की ग्रामीण लेखकांनी एक संपूर्ण खेडे त्यातल्या अक्षांश व रेखांश यासकट साकार केलेले आहे किंवा या लेखकांनी ग्राम रचनेचे ग्राम व्यवस्थेचे शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या गावगाड्याचे यथार्थ दर्शन घडविले आहे. व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, रा. रं. बोराडे, आनंद यादव यांच्यानंतर अलीकडील राजन गवस, सदानंद देशमुख, कृष्णात खोत, आसाराम लोमटे अशा अनेक लेखकांनी ग्रामीण कथेचे दालन समृद्ध केले. या सार्याच कथा लेखकांनी भूक, दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा, उपेक्षा आणि शोषण यांच्या विळख्यात सापडून जगणार्या सामान्य माणसाचे व्याकूळ हुंदके वाचकांपर्यंत पोहोचवून स्मरणीय केले. या ग्रामीण लेखकांच्या पूर्वसुरींचा मागोवा घेत नवोदित लेखिका सुचिता घोरपडे हिने खुरप या कथासंग्रहातून ग्रामीण कथांच्या दालनात पाऊल टाकले आहे.
या कथासंग्रहात 10 कथा असून सर्व कथा ग्रामीण भाषेचा एक वेगळा गंध घेऊन आलेल्या आहेत. आठ कथांमधून सामान्यांची दुःखे आली आहेत तर दोन कथा येडताक आणि खेकडा विनोदाच्या अंगाने जाणार्या आहेत.
अवदसा या पहिल्या कथेत कृष्णा नदीकाठच्या एका गावात पुराने जो हाहाकार माजतो आणि त्यातून माणसांचे दर्शन घडते ते आले आहे. यशवंता त्याची गर्भार पत्नी सुमी, केरवाची मुलगी संगी व जावई, नाम्या आणि त्याचा म्हातारा बाप जन्या, पक्या हे दोघे मित्र, ही त्यातील प्रमुख पात्रे आहेत. मिरगात पाऊस धो-धो कोसळू लागला. रातीला राधानगरी धरणाचे पाणी सोडलं आणि गावच्या नदीला पाणी आलं. गावातली सगळी माणसं बाहेर पडतात आणि विठ्ठलाच्या देवळात जमतात. देवळातही पाणी येतं आणि मग गावचा सरपंच माणसांना नावे मधून नदीपलीकडे नेण्याचा निर्णय घेतो. नावेची एक फेरी करताना नाम्या पुरात ओढला जातो.
दुसर्या फेरीत जिवाच्या आकांताने सगळी माणसं नावे चढतात आणि नाव पाण्याच्या भोवर्यात सापडून माणसांसह वाहून जाते. या भयंकर प्रसंगातून गावाची रया जाते. घराच्या आणि मनाच्याही भिंती कोसळल्या होत्या, त्याची ही हृदयद्रावक कथा संग्रहातील शीर्षक कथा खुरप म्हणजे एका स्त्रीच्या असहाय्यतेची कहाणी होय. यामध्ये लग्न झालेली चंद्री तिचा मुर्दाड नवरा आणि चंद्रीवर प्रेम करणारी शेजारीण बायजाक्का अशी तीनच पात्रे आहेत. नवर्याने शेतातच खोपटं केलं आणि चंद्रीला कामाला जुंपले. एक वेळ अशी येते तिला गर्भारपणाच्या काळा लागतात आणि तिने एकटीने त्या प्रसंगाचा जो सामना केला, गर्भारपण निभावलं त्यानं डोळ्यात पाणी येते. पोरासाठी चंद्रीने जे अवसान गोळा केलं होतं ते पाहून बाईजाक्का भारावून जाते. मात्र निर्दयी काळजाचा तिचा नवरा खूरपं फेकून तिला खुरपणी करण्यास सांगतो. खुरपं इथे ग्रामीण स्त्रीच्या हतबलतेचे, असहाय्यतेचे प्रतिक म्हणून समोर येतं. खेडेगावांमध्ये पुरुषांना जडलेले दारूचे व्यसन ही काही नवी बाब नाही.
‘माचुळी’मध्ये अशीच कथा येते. या कथेत इष्णू, त्याची बायको कमळी आणि गोड मुलगी मंजी. या तीन प्रमुख व्यक्तिरेखा आहेत इष्णू बांधकाम करणारा चांगला कारागीर. त्याच्या हातात पैसा आला आणि त्याची मती फिरली. मित्रांच्या संगतीने त्याला दारूचे व्यसन लागले. तो कमळीला मारझोड करू लागला. मुलगी मंजीवर त्याचा खूप जीव पण दारू चढली की कशाच भान राहायचं नाही. एकदा भांडणांमध्ये तो कमळीच्या डोक्यात वरवंटा हाणतो. मंजीला आई घरात नाही हे कळतं आणि एक दिवस तिचा पत्ता लागतो. बुजवलेल्या फडताळात आईचा सांगाडा दिसतो आणि मंजीची दातखीळ बसते. ती आडवी पडते. इष्णूही आल्यावर तिथेच कोसळतो. दारूच्या व्यसनापायी एका कुटुंबाची जी वाताहत होते ती सांगणारी ही कथा खेडेगावांमध्ये अंधश्रद्धा अजूनही मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे बायकांच्या अंगात येणे देवऋषीच स्तोमही आहे. या स्तोमामागचा फोलपणा सांगणारी कथा ‘लागिर’मध्ये सांगितली आहे.
किसन्या, त्याची आई, शाळेत शिकविणारी त्याची बहीण चंद्री आणि लग्न होऊन परत आलेली कानडी बायको भारती असे हे चौघांचे सुखी कुटुंब. एकदा अचानक किस्ना नजर लावून कुचासंगती बोलू लागतो. माणसांची मात्र धड बोलत नाही. त्याची आई त्याला देवऋषीकडे नेण्याचे म्हणते तर शिकलेली चंद्रा तालुक्याला डॉक्टरकडे जाऊन इलाज करून म्हणते. देवऋषीकडले अमानुष प्रकार बघून त्याच्या आईलाही चंद्रीचे म्हणणं पटते आणि ती त्याला मोटारीत घालून तालुक्याला नेते. डॉक्टर औषध देतो आणि किसनाला कसला तरी धक्का बसल्याचे सांगतो. चंद्री कारण शोधून काढते आणि किसना बरा होतो. पुढे चंद्रीवर अतिप्रसंग होतो आणि ती अंगात आल्याचे करते हे कथेमध्ये थोडं नाटकी झाल्यासारखे वाटते असो.
‘चईत’मध्ये सुदाम्या या सडाफटिंग तरुणाची कथा येते. मुडशिंगी गावच्या श्रीपत पाटील काळीज नसलेला चेंगट माणूस असतो. पाटलाच्या घरी सुदाम्या हरकाम्या म्हणून काम करतो. जनाबाईच्या नात्यातला नसूनही सुदाम्यावर मुलासारखे प्रेम करते. तिच्या भाचीच्या मुलीचं शालीचं लग्न ती सुदाम्याशी लावून देते. सुदाम्याला प्रेम देणारी बायको मिळते. श्रीपत पाटील सुदामाला राबवून घेऊन नडीला पैसे देत नाही. सुदामा निराश झाला असतानाच शाली त्याला वंशाचा कुंभ तिच्या उदरात वाढत असल्याची गोड बातमी देते आणि या बातमीने धीर खचत चाललेल्या सुदाम्याची भीती दूर पळते. त्याच्या मनात चैत्राची पालवी फुटते.
‘उंबरणी’ कथा म्हणजे उनाडक्या करण्यात पटाईत असलेल्या अंशी या गावच्या मुलीचा कसा कायापालट होतो ते सांगणारी आहे. म्हादबानं अशी आणि विजय या दोन मुलांना आईविना वाढवले होते. बहिणीची मुलगी शांती हीच विजयशी लहानपणीच लग्न ठरलं होतं. अंशीला घरकामात रस नव्हता. तर शांती सुगरण होती. अंशीचं लग्न नाराजीने केले जाते आणि एक दिवस ती बोजाबिस्तरा घेऊन म्हादबाकडे परत येते. म्हादबांनी सांगूनही ऐकत नाही. विजय शांतीचे एकमेकांवरचे प्रेम बघून तिला नवर्याची आठवण येते. वडील एक दिवस सोडचिठ्ठीचा कागद सहीसाठी समोर ठेवतात आणि तिचा जीव विरघळतो. अंशीला तीची चूक कळते आणि ती आलेल्या नवर्याला थांबवायला पळत जाते. चरईत आणि उंबरणी या दोन्ही कथांचे शेवट सुखांत आहेत, हे या कथांचे वेगळेपण.
नियतीचा खेळात एक बाई हरते त्याची गोष्ट किनव्यामध्ये आली आहे. चंद्राक्काचा नवरा महादू झाडपाल्याचा औषध देणारा वैद्य होता. त्याची औषध खूप गुणकारी असायची. एकदा दृष्ट लागली आणि महादू औषधी पाला करताना पाय सटकून डोक्यावर आदळला. त्याचा त्यामध्ये अंत होतो. चंद्राक्का मुलगी पारूचं लग्न लावून देते. पण सासरला तिचा जात होतो. सासरवाले तिला मारून परत धाडतात. आता चंद्राक्का झाडपाल्याचे औषध देऊ लागली. तिने एका मुलाला झटके येण्यावर औषध देऊन त्याला बरं केले. पण, घरी येऊन पाहते तो तिच्या मुलीनं विहीरीत उडी मारुन आत्महत्या केली होती. नियतीच्या खेळात हरून चंद्राक्का गाव सोडते. डोळ्यात पाणी आणणारी ही कथा आहे.
‘उतारा’कथे सुमी नावाची मुलगी आपल्या आजारी भुकेल्या छोट्या भावासाठी स्मशानात जाऊन तेथे ठेवलेला भाताच्या पत्रावळीचा उतारा आणते ते सांगणारी आहे. तिच्या बाचे शेवटचे शब्द मार्मिक आहेत. तो म्हणतो, न खाणार्या देवाला सगळी उतारा ठेवतात. भुकेसाठी चार घास जालीम उतारा असतो, हे समजायला शहाणं असावं लागतं. भुकेचं सार्वकालिक तत्वज्ञान सांगणारी ही मार्मिक कथा आहे.
विनोदी अंगाने जाणार्या दोन कथा संग्रहात आहेत. ‘येडताक’मध्ये नवरा नसलेली शिलाक्का आणि तिची मुलगी गोदी यांची कहाणी सांगणारी आहे. सासरच्या जाचाला कंटाळून गावातली माली विहिरीत जीव देते आणि शिलाक्काला आपल्या मुलीची काळजी लागते. भाऊ एक स्थळ आणतो. स्थळ बघायला मायलेकी भावाच्या गावी जायला निघतात. जाताना रस्त्यात तीन पैलवान भेटतात. गैरसमजातून त्यांची घाबरगुंडी उडते ते सांगणारेही मस्त कथा.
‘खेकडं’ कथेमध्ये ही खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या मुलांची फटफजिती दाखवली आहे. वाघजाईला खेकडे मिळतात म्हणून एका काळ्याकुट्ट रात्री तिकडे जातात. त्यांना खेकडे भरपूर मिळतात. ती टिक्कंमध्ये टाकतात. मात्र कास्या नाना आणि त्याचे दोस्त मुलांना घाबरवून त्यांना पळवून लावतात आणि खेकडे यांनी भरलेली टिक्कं हस्तगत कसे करतात त्याची ही विनोदी कथा मिरासदारी शैलीतली कथा चेहर्यावर हसू आणते. निपाणीकडल्या मराठी कन्नड भागातले डंककमल्ले, इदरकल्याणी, छत्तराशिंगी सारखे अनेक अपरिचित पण गोड शब्द जागोजागी भेटतात. तसेच काही वाक्यही उदाहरणार्थ कमळी तुरकाटीवानी असली तरी दिसाया उजवी होती किंवा समदी अजून शेंबडात माशी घुटमळल्यागत इथंच हायीत, अशा नव्या शब्दकळेनं नटलेल्या या ग्रामीण कथांची लज्जत वाढली आहे आणि त्या वाचताना शहरी वाचकाला कष्ट पडत नाहीत, हे या कथांचं आणि लेखिकेचं यश म्हणावे लागेल.
पुस्तकाचे नाव : खुरपं
लेखिका : सुचिता घोरपडे
प्रकाशक : आर्ष पब्लिकेशन
मुखपृष्ठ: राजू बाविस्कर
पृष्ठे :164
मूल्य : 200 रुपये
पुस्तकासाठी संपर्क – 8788754382