मराठी संत साहित्यातील उत्तुंग व्यक्तिमत्त्व. .. संत साहित्याचे गाढे अभ्यासक.. थोर भाष्यकार ..ज्येष्ठ प्रतिभावंत लेखक ..अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे साहित्यिक डॉ. प्रल्हाद नरहर जोशी पुणे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष.1924..2024 या अनुषंगाने त्यांच्या जीवन व एकूणच लेखन कार्यावर विस्तृत असा प्रकाश टाकणारा हा लेख…
डॉ. मार्तंड कुलकर्णी,
मराठी विभाग प्रमुख सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय किनवट, जि. नांदेड
महाराष्ट्र भूमी ही संतांची, महंतांची, वीरांची ., शुरांची, पराक्रमी पुरुषांची, प्रतिभावंत लेखक, कवी, थोर समाज सुधारकांची, कलावंताची, कार्यप्रवण राजकीय पुढार्यांची कर्मभूमी. त्याग, समर्पण हे काय असावे याचा परिपाठ म्हणजे महाराष्ट्राची ही शौर्यभूमी होय. अशा या भूमीत आपल्या संत साहित्याचा वारसा ..वसा पुढे चालवत येणाऱ्या पिढीला सोप्या भाषेत अवगत करून देत समाजोद्धाराचे कार्य करणारे थोर लेखक, समीक्षक व संत ज्ञानदेव रचित ज्ञानेश्वरीचे ज्येष्ठ भाष्यकार प्रोफेसर डॉ. प्रल्हाद नरहर जोशी खरशीकर म्हणजेच डॉ. प्र. न. जोशी. यांनी आपल्या वडिलांची साहित्य लेखनातील मिरासदारी तेवढ्याच थाटाने सन्मानाने सांभाळत, स्वीकारत संत साहित्याबरोबरच इतर लेखन कार्यात स्वतःला पूर्णपणे समर्पित करून दिले. असे व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. प्र. न. जोशी हे होत.
डॉ. जोशी यांचे वडील म्हणजेच नरहर सदाशिव जोशी खरशीकर यांनी आपल्या मामांचा म्हणजेच संत कवी विष्णुदास माहूरगड यांच्या मातृभक्ती संप्रदायाचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार केला. अशा या नरहर शास्त्री जोशी यांच्या कुटुंबात प्र. न. जोशी यांचा जन्म हा महत्त्वाचा ठरतो. संत विष्णुदास म्हणजेच कृष्णा रावजी धांदरफळे हे न .स. खरशीकरांचेच मामा. संत विष्णुदासांनी दत्त उपासने बरोबरच देवी उपासनेत केलेले अद्वितीय काव्य लेखन तेवढेच महत्त्वाचे ठरणारे आहे. अशा आपल्या मामांचा एकूणच साहित्य संपदेला प्रकाशित करत अजरामर करण्याचे कार्य नरहर सदाशिव जोशी यांनी केले. अशा या प्रतिभावान मातृपासक देवी भक्तांच्या कुटुंबात डॉ जोशी यांचा जन्म हा एक भाग्यवंत ठरणारा ठरला. आपल्या वडिलांचा लेखन विचार संत साहित्याचा वारसा तेवढाच तनमयतेने एकनिष्ठ भावनेतून प्र.न.जोशी यांनी पुढे चालवला आपल्या आठ दशकाच्या प्रदीर्घ अशा जीवन प्रवासात डॉ. जोशी यांनी मराठी साहित्य भांडारात आपल्या लेखन कार्यातून मोठी भर घातली. चरित्र कोश, वाङ्मय कोश, शब्दकोश व्याकरण याबरोबरच विज्ञान विषयावरील लेखन प्रभावी ठरणारे आहे.
डॉ.जोशी यांचे मराठी भाषेवर तेवढेच प्रभुत्व जेवढे हिंदी, इंग्रजी, संस्कृत भाषेवर दिसून येते. संत साहित्याबरोबरच मराठी साहित्या बरोबरच प्राचीन व आधुनिक मराठी साहित्याची केलेली निस्पृह व निपक्षपणे केलेली समीक्षा मराठी वाङ्मयात मैलाचा दगड ठरणारी आहे. महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार संत वाङ्मयाचे भाष्यकार बाबा महाराज सातारकर यांनी प्रकाशित केलेल्या “ऐश्वर्या वती ज्ञानेश्वरी” या महान ग्रंथास प्र. न. जोशी यांची अभ्यासपूर्ण व दीर्घ अशी प्रस्तावना ज्ञानेश्वरी वरील सखोल तत्वज्ञान व्यक्त करणारे आहे.
डॉ. प्र. न. जोशी यांची ज्ञानसाधना व ग्रंथ साधना एक अभ्यास विषय ठरणारी आहे. पुण्यातील श्रीमंत व प्रसिद्ध अशा प्रभात रस्त्यावरील सामदा इमारतीतील रेणुका हे निवासस्थान एक ज्ञान तीर्थच होते. प्रचंड वाचन. अफाट ग्रंथ संपदा हीच खरी प्र. न. जोशी यांची श्रीमंती होती. डॉ. जोशी यांच्या ग्रंथसंपदेत पौराणिक धर्मग्रंथापासून आधुनिक साहित्य तसेच सर्वच विषयातील ग्रंथसंपदा कुणालाही नवलच वाटणारी. संत परंपरेचा वारसा लाभलेल्या डॉ. प्र. न. जोशी यांचे प्रभावी पुढे लेखन समीक्षणातून समाज सन्मार्गासाठी मोलाचा उपयोगी ठरणारे आहे. मुळात डॉ. जोशी यांना संत ज्ञानदेव रचित ज्ञानेश्वरीची मोठी आवड. निष्ठा श्रद्धा यातून ज्ञानेश्वरी वरील प्रवचने श्रोत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणारी होती. दैनंदिनी ज्ञानेश्वरी या ग्रंथात डॉ. जोशी यांनी संपूर्ण 365 दिवसांसाठी निवडलेल्या ओव्या जीवनाला नवीन चेतना व ऊर्जा देणाऱ्या आहेत. दररोज एका ओवी वरील सुरेख व रसाळ चिंतन श्रोत्यांसाठी रसिकांसाठी मोठी ठेवत होती.
आरंभी काही काळ डॉ. प्र. न. जोशी यांनी पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयात प्राध्यापक पदाची नोकरी केली. प्राध्यापक पदावरून ज्ञानार्जनाचे यशस्वी कार्य करत डॉ जोशी यांनी संपूर्ण काळ चिंतन वाचनात घालविला. नोकरीही आपल्या ज्ञानसाधनेत अडसर ठरते हे पाहून प्राध्यापकी पदाला अखेरचा नमस्कार केला. आणि पूर्ण वेळ प्रवचन व्याख्यान लेखन वाचन यातच घालवला. एक ज्ञानवंत. ज्ञानसूर्य ठरलेल्या डॉ. प्र. न.जोशी यांनी आयुष्यभर दिवाळी अंकात मासिकात त्रैमासिकात वार्षिक अंकात सातत्याने लेखन करून वाचकांना नवा नवा विषय साध्या सोप्या भाषेतून समजावून सांगितला. या एकूणच कार्याचा सन्मान गौरव म्हणून डॉ. जोशी यांना अनेक राजमान्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांचे अनेक साहित्य संस्थांशी जवळचे संबंध होते. विद्यापीठाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून त्यांनी केलेलं नाविन्यपूर्ण कार्य नव्या नव्या विषयाला उजागर करणारे ठरले. असंख्य विद्यार्थ्याला विद्यावाचस्पती पदवी मिळवून देण्यात त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणारे आहे. महाराष्ट्रातील जवळपास नामांकित तसेच इतर प्रकाशकां सोबत त्यांचे संबंध प्रेमाचे होते.
अनेकांनी त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित केली आहे .जवळपास 300 पेक्षा जास्त अधिक भरणारी ग्रंथांची रचना मराठी साहित्यात महत्वपूर्ण भर घालणारी आहे. पुणे येथील स्नेहवर्धन प्रकाशनाच्या प्रमुख व मॉडर्न महाविद्यालयातील माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. स्नेहल तावरे यांच्या स्नेहवर्धन प्रकाशनाचे व डॉ. प्र. न. जोशी यांचे जवळचे नातेच म्हणावे लागेल. डॉ. तावरे यांना डॉ. जोशी आपली मानसकन्याच मानत होते. डॉ जोशी यांचे नाते हे वडील व मुली सारखेच. डॉ. तावरे प्रेमाने व आपुलकीने प्र.न. जोशी यांना ‘ अप्पा ‘ म्हणायच्या. डॉ. तावरे यांनी डॉ. प्र. न. जोशी यांच्या अनेक साहित्यकृतीला अनेक वेळा प्रकाशित करत मराठी साहित्य दालनात प्रवेशित केले. डॉ. तावरे यांनी डॉ. प्र. न. जोशी यांच्या हयातीतच त्यांच्या नावाने पुरस्कार देण्याचे कार्य आरंभ केले. अनेक लेखकांना हा सन्मान देऊन डॉ. जोशी यांच्या कार्याचा व लेखनाचा प्रचार व प्रसार अखंडपणे चालू ठेवला आहे.
आधुनिक काळातील दानशूर..
महाभारत काळातील एक उत्तुंग व्यक्तीत्व व दानशूर व्यक्तित्व म्हणून महावीर कर्णाला ओळखले जाते. आपल्याकडून इतरांना जे हवे ते देण्याचे कार्य अखेरपर्यंत केले. तोच विचार आधुनिक कालखंडात समाजासमोर ठेवत डॉ. प्र. न. जोशी यांनी आपल्या पाल्यांना आपल्या संपत्तीचा वाटेकरी न करता प्रभात रस्त्यावरील लाखो रुपयाचे निवास व निवासातील अमूल्य अशी ग्रंथसंपदा भारतीय विद्या भवन या संस्थेला अर्पण करून टाकली. असा हा आधुनिक युगातील ज्ञानसाधनेत अखेरपर्यंत आनंद घेणारा साधक साहित्यशास्त्रातील कवी मम्मटाच्या काव्य प्रयोजनानुसार अर्थप्राप्ती पेक्षा आनंद प्राप्तीला महत्त्व देणारा ठरला.
मराठी साहित्यातील मधुराभक्ती या विषयावर विद्यावाचस्पती उपाधी मिळवत मधुराभक्तीवर अत्यंत अर्थपूर्ण असा शोधनिबंध प्रबंध विद्यापीठाकडे सुपूर्त करत एका नाविन्यपूर्ण अशा विषयात डॉ. प्र. न. जोशी यांनी शोधनिबंध लिहिला. संशोधनाचे कार्य करून विद्यापीठाचा नावलौकिक उंचावला डॉ. जोशी यांचे योगदान तेवढेच महत्त्वाचे ठरते. त्यांचे भाषाशास्त्र , व्याकरण, निबंध साहित्यशास्त्र या विषयावरील ग्रंथलेखन अभ्यासपूर्ण ठरणारे आहे. प्राचीन तसेच आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास त्याची अनेक खंड आजही विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे ठरणारे आहेत. डॉ. जोशी यांच्या लिखाणातून एखादा विषय सुटलेला आहे असे शोधूनही सापडत नाही. हे त्यांच्या लिखाणाचे वेगळेपण म्हणावे लागेल. प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास असो व आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास असो यात डॉ. जोशी यांचा हातखंडच मोलाचा ठरणार आहे. इतिहास, भूगोल, विज्ञान, इंग्रजी या विषयाबरोबरच डॉ. जोशी यांचे लेखन इतर विषयात सुद्धा वस्तुपाठ ठरणारे आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून विद्वत जणांपर्यंत वाचनीय ठरणारा ग्रंथलेखनाचा भाग डॉ. जोशी यांनी सर्वांसाठी उपलब्ध करून दिला. सबंध भारतभ्रमण करून आलेले अनुभव प्रवास वर्णनातून डॉ. जोशी यांनी मांडले. वयाच्या सत्तरीनंतर शरीर स्वास्थ्य ठीक नसतानाही डॉ. जोशी यांनी लेखन प्रवास चालूच ठेवला. मनात आलेले विचार शब्दबद्ध करून घेत लेखनिक लावून ग्रंथ लेखनात योगदान दिले. अखेरपर्यंत त्यांचा हा लेखन प्रपंच सुरूच होता.
डॉ. प्र. न. जोशी यांचा अनेक गणमान्य प्रतिभावंत कलावंतांशी संबंध तेवढाच महत्त्वाचा. श्रीक्षेत्र माहूर येथील श्री पुरुषोत्तम आश्रम म्हणजेच संत कवी विष्णुदास यांचा मठ या मठाशी. डॉ. जोशी यांचे नाते तेवढेच महत्त्वाचे आहे. श्री क्षेत्र माहूरगड निवासीनी माता रेणुका ही डॉ. जोशी यांची व त्यांच्या वडिलांची कुलदैवता व आराध्य देवताच. अशा या देवतेला प्रसन्न करून आपला लेखन प्रपंच काव्याच्या माध्यमातून सर्व दूर नेणारे संत कवी विष्णुदास हे नरहर सदाशिव खर्शीकर म्हणजेच प्र. न. यांचे वडील. पुढे मामा व भाचे यांचे कार्य श्रीक्षेत्र माहुरात मातृभक्ती संप्रदाय वृद्धिंगत करण्यात मोलाचे ठरलेले आहे. पुढे संतकवी विष्णुदास यांनी पवित्र मातृ तीर्थाच्या शेजारी उभारलेल्या श्री पुरुषोत्तमा श्रमात समाधी घेतली. आज या स्थळाला जनमानसात प्रेमाने विष्णू कवी मठ असे म्हणतात. या आश्रमात अनेक संत, महंत, तपस्वी यांनी ज्ञानसाधना. उपासना केली आहे. सर्वांसाठी हा आश्रम एक ज्ञानपीठ म्हणून ओळखला जातो. या आश्रमाचा पुढे विकास व्हावा ..इथे ज्ञानसाधना. नाम साधना. उपासना व्हावी यासाठी डॉ. जोशी यांनी अखेरपर्यंत प्रयत्न केले. संत विष्णुदासांची लेखन संपदा न स खरशीकर यांनी मोठे योगदान देत प्रकाशित केली. चरित्राचे तीन खंड व संत कवी विष्णुदासांच्या कवितेचे तीन खंड प्रकाशित करून सबंध देवी भक्तांसाठी मोठी पर्वणीच उपलब्ध करून दिली. नरहर सदाशिव जोशी यांचे शिष्य अकोला येथील थोर देवी भक्त शिवनारायणजी पनपालिया यांनीही नरहर सदाशिव जोशी यांच्या कार्यकर संत विष्णुदासांच्या साहित्याचा प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात केला.
आज विद्यमान काळात शिवनारायणजी पनपालिया यांचे चिरंजीव थोर देवीभक्त डॉ. गिरधर पणपालिया हे करत आहेत. प्र. न. जोशी व माहूरगडावरील काही देवी भक्त तसेच यवतमाळ येथील डॉ. या. खु. देशपांडे आदींनी यासाठी मंडळाची उभारणी करून हे ग्रंथ प्रकाशनाचे कार्य मोठ्या प्रमाणात केले. माहूर येथील संत विष्णूदासांचा पुरुषोत्तम आश्रम हा सर्वांसाठी ज्ञान देणारा आधारवड आहे. हे जाणीवपूर्वक मनात ठेवून डॉ. जोशी यांचे कार्य अखेरपर्यंत राहिले. आज विद्यमान काळात या पुरुषोत्तमाश्रमाची वाटचाल अनेक संकटांना तोंड देत चालू असून ज्ञानसाधना उपासना, नाम साधनेसाठी पुण्यवंत ठरणारा हा आश्रम अंत :करणातून विष्णुदासांच्या साहित्यावर व कार्यावर प्रेम करणाऱ्या भक्तांच्या प्रतीक्षेत आहे.
या जन्मशताब्दी वर्षात या पुरुषोत्तमाश्रमात अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम व्हावेत हीच खरी डॉ प्र. न. जोशी यांना आदरांजली ठरेल. अशा या बहुआयामी व्यक्तित्वाचा जीवनप्रवास आठ दशकाचा राहिला 05 जून 2004 रोजी डॉ. जोशी यांनी शेवटचा श्वास घेतला. विद्यमान काळात श्रीक्षेत्र माहूरचा विकास दिवसेंदिवस होत असून भक्तांसाठी अनेक नाविन्यपूर्ण सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्यक्ष काही कामांचे सुद्धा निर्माण सुरू झालेले आहे. परंतु हजारो भक्तांसाठी, ज्ञानवंतांसाठी आधार वड असलेला हा विष्णू कवी मठ म्हणजेच श्री पुरुषोत्तमाश्रम याचा जिर्णोद्धार व्हावा यासाठी महाराष्ट्र शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. या ठिकाणी शासनाने मोठा निधी उपलब्ध करून दिल्यास गतवैभव पुन्हा प्राप्त होण्यास काहीही वेळ लागणार नाही. या मठासाठी असलेली मुबलक जागा.. निसर्गरम्य वातावरण ..निश्चितच हजारो भक्तांना आनंदवत ठरेल असाच भाग आहे. तेव्हा महाराष्ट्र शासनाने या महत्त्वपूर्ण असलेल्या व माहूरचे लौकिक ठरणाऱ्या श्री पुरुषोत्तमाश्रमाचा जिर्णोद्धार करत या ठिकाणी भक्तांची मांदियाळी पुन्हा एकदा प्रस्थापित करण्याचे कार्य करावे हीच अपेक्षा. हे जर कार्य या जन्मशताब्दी वर्षात सुरू झाल्यास खऱ्या अर्थाने डॉ. प्र. न. जोशी यांचे जन्म शताब्दी वर्ष साजरे केल्यासारखे होईल.
( या लेखाचे लेखक डॉ. मार्तंड कुलकर्णी, मराठी विभाग प्रमुख सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालय किनवट, जि. नांदेड येथे मराठी विषयाचे प्राध्यापक आहेत.. डॉ.कुलकर्णी हे संत साहित्याचे अभ्यासक असून संत विष्णुदासांच्या एकूणच साहित्यावर स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठातून विद्यावाचस्पती ही उपाधी प्राप्त करणारे महाराष्ट्रातील पहिले अभ्यासक ठरले आहेत. ते सध्या शासनाच्या लोकसाहित्य समितीचे सदस्य आहेत.)
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.