June 20, 2024
Mumbai Lok Sahba Election
Home » मुंबईवर वर्चस्व कोणाचे ?
सत्ता संघर्ष

मुंबईवर वर्चस्व कोणाचे ?

अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी सोमवारी, २० मे रोजी देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील सहा मतदारसंघांत मतदान होत आहे. तब्बल ९६ लाख ५४ हजार मतदार आपला मतदानाचा हक्क बजवतील. गेली अनेक वर्षे अविभाजित शिवसेना व भाजप युतीने महामुंबईत लोकसभा व विधानसभा निवडणुका लढवल्या. सन २०१९ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही शिवसेना-भाजप युती कायम होती. पाच वर्षांपूर्वी मुंबईकरांनी सर्वच्या सर्व युतीचे सहा खासदार लोकसभेवर निवडून पाठवले व नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला.
मावळत्या लोकसभेत मुंबईत शिवसेनेचे तीन व भाजपचे तीन खासदार होते. यंदा २०२४ च्या निवडणुकीत सर्वच राजकीय समीकरणे बदलली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला आहे, तर भाजपा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला बरोबर घेऊन निवडणूक लढवत आहे.

गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन प्रमुख राजकीय पक्ष दुभंगले. दोन्ही पक्षांत आमदार-खासदार-पदाधिकाऱ्यांनी मोठा उठाव केला. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व झुगारून दिले, तर अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवारांचे नेतृत्व नाकारले.

दोन वर्षांत महाराष्ट्रात दोन मोठे राजकीय भूकंप झाले, त्यानंतर होणारी लोकसभा निवडणूक ही महायुती व महाआघाडीच्या दृष्टीने मोठी परीक्षा आहे. एकेकाळी मुंबईतून काँग्रेसचे पाच-पाच खासदार लोकसभेवर निवडून जात होते, आता एखादा खासदार निवडून जाणेही त्या पक्षाला कठीण जात आहे. ठाकरेंची शिवसेना व भाजपा यांच्यात काडीमोड झाल्यापासून गेल्या साडेचार वर्षांत हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर वैरी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरेंची शिवसेना शिल्लक राहणार नाही, असे भाजपाचे नेते ठामपणे सांगत आहेत, तर याद राखा, मोदी मला संपवू शकत नाहीत, आपली शिवसेनाच तुम्हाला इंगा दाखवेल, अशी भाषा उद्धव ठाकरे यांनी वापरली आहे. म्हणूनच मुंबई कोणाची? या प्रश्नावर ९६ लाख मुंबईकर २० मे रोजी ईव्हीएमचे बटण दाबून आपला कौल देणार आहेत.

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद नाही. शरद पवारांनी सोनिया गांधींना विदेशी जन्माच्या मुद्द्यावरून विरोध करून १९९९ मध्ये त्यांच्याशी पंगा घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईतच स्थापना झाली. पक्षाला पंचवीस वर्षे उलटली, पण मुंबई महानगरात पाळेमुळे रुजवता आली नाहीत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या लढाऊ व आक्रमक नेतृत्वाला मुंबईतील मराठी लोकांनी ते हयात असताना नेहमीच मनापासून साथ दिली. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर मुंबईकरांनी शिवसेनाप्रमुखांना नेहमीच प्रतिसाद दिला. मराठी माणूस मुंबईत ताठमानाने उभा राहिला तो शिवसेना प्रमुखांमुळेच, हे त्यांचे राजकीय शत्रूही मान्य करतात. शिवसेनाप्रमुखांच्या हयातीनंतर पक्षाची सर्व सूत्रे उद्धव ठाकरेंकडे आली. पक्षात तेच सर्व शक्तिमान बनले. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार असे त्यांनी शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते. प्रत्यक्षात संधी मिळताच ते स्वत:च मुख्यमंत्री झाले. तिथूनच पक्षात खदखद सुरू झाली.

यंदाची लोकसभा निवडणूक भाजपच्या दृष्टीने नरेंद्र मोदींची पंतप्रधानपदाची हॅटट्रीक व्हावी आणि अब की बार ४०० पार हा संकल्प साकार व्हावा यासाठी जशी प्रतिष्ठेची आहे तसेच मुंबई महानगरात जनाधार कोणाच्या पाठीशी आहे? ठाकरेंची शिवसेना की एकनाथ शिंदेंची शिवसेना? हे या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे. एकनाथ शिंदे यांना भाजपच्या आशीर्वादाने राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळाले, निवडणूक आयोगाने त्यांना पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह दिले. त्याचा लाभ ते किती उठवू शकतात, हे निकालानंतर उघड होणार आहे.

शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यावर एकनाथ शिंदे यांचा पक्ष राज्यात निवडणुकीला प्रथमच सामोरे जात आहे. ठाकरे सरकार कोसळल्यावर मुंबईत अंधेरी, पूर्व येथे विधानसभेची पोटनिवडणूक झाली. त्या निवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा रमेश लटके निवडून आल्या, ती निवडणूक शिंदे गटाने लढवलीच नव्हती. त्यामुळे शिंदे गटाचा जनाधार किती आहे याची परीक्षा झालीच नाही. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मावळत्या लोकसभेतील पाच खासदारांची तिकिटे कापली गेली. सर्व्हेमध्ये जिंकून येण्याची शक्यता नाही, असे कारण सांगितले गेले. ही तिकिटे कापण्यासाठी भाजपाचा आग्रह होता. कारण अब की बारचा संकल्प साध्य करायचा असेल, तर निवडणुकीत जिंकणारेच उमेदवार हवेत हा त्यामागे हेतू होता. भावना गवळी (वाशीम-यवतमाळ), हेमंत पाटील (बुलढाणा), गजानन कीर्तिकर (मुंबई उत्तर – पश्चिम), राजेंद्र गावित (पालघर), कृपाल तुमाने (रामटेक) यांनी ठाकरेंच्या विरोधात झालेल्या उठावात एकनाथ शिंदे यांना साथ दिली, पण लोकसभेसाठी पक्षाची उमेदवारी त्यांना मिळाली नाही. भविष्यात त्याची भरपाई केली जाईल, असे त्या सर्वांना आश्वासन देण्यात आले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार २१ लोकसभा मतदारसंघांतून लढत आहेत, तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे उमेदवार १५ मतदारसंघांतून मैदानात आहेत. ठाकरे व शिंदे यांना आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणणे हे प्रतिष्ठेचे बनले आहे. शिंदे हे मुख्यमंत्री आहेत आणि देशातील सर्वात बलाढ्य अशा भाजपाची ताकद त्यांच्या पाठीशी उभी आहे ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. शिवसेनेत मोठा उठाव झाल्यानंतरही ठाकरे यांच्या पक्षाच्या शिवसेनेच्या शाखांचे जाळे कायम आहे. गेल्या दोन वर्षांत संघटना बांधणी म्हणून शिंदे गटाने आपले किती नेटवर्क उभे केले व किती ठिकाणी ते मजबूत उभे राहिले याचा कस मतदानातून लागणार आहे.

उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आदित्य लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी बरेच फिरले. एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत हे स्वत:च कल्याण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. शिवसेनाप्रमुखांचे पुत्र म्हणून उद्धव प्रत्येक सभेत आवर्जून सांगतात, एकनाथ शिंदे हे शिवसेनाप्रमुखांच्या विचारांचा वारसा सांगतानाच धर्मवीर आनंद दिघे यांचे कट्टर निष्ठावान शिष्य म्हणून संवाद साधताना दिसतात. उद्धव हे कोणताही प्रशासकीय व संसदीय अनुभव नसताना शरद पवार व सोनिया गांधींच्या मदतीने थेट मुख्यमंत्री झाले होते. एकनाथ शिंदे हे मोदी-शहांच्या आशीर्वादाने राज्याच्या सर्वोच्च पदावर बसले आहेत. ठाकरे यांनी सत्ता गमावली आहे, शिंदे यांनी सत्ता कमावली आहे. म्हणूनच मुंबईकर कोणाला कौल देणार हा कळीचा मुद्दा आहे. ठाकरे व शिंदे या दोन्ही नेत्यांपुढे आपला पक्ष टिकविण्याचे व जास्तीत जास्त खासदार निवडून आणून विधानसभा निवडणुकीचा पाया भक्कम करण्याचे आव्हान आहे.

शिंदे यांची शिवसेना राज्यात पंधरा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवत असली तरी ठाकरे यांच्या शिवसेनेशी तेरा लोकसभा मतदारसंघात थेट लढत आहे. मुंबई, ठाणे, कल्याणमध्ये शिवसेना विरुद्ध उबाठा सेना अशी अग्निपरीक्षा आहे. मुंबईतील ३ तसेच ठाणे, कल्याण व नाशिक अशा सहा जागा वाट्टेल ते करून जिंकणे हे शिंदे यांच्यापुढे मोठे आव्हान आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नाशिकमधील संघर्ष म्हणजे दोन्ही शिवसेनेत, करो या मरो, अशी निकराची झुंज आहे.
मुंबई दक्षिणमध्ये शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव आणि उबाठा सेनेचे उमेदवार अरविंद सावंत अशी थेट लढत आहे. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून राहुल नार्वेकर, मंगल प्रभात लोढा, मिलिंद देवरा अशी नावे प्रारंभी चर्चेत होती. यामिनी यांचे पती यशवंत जाधव हे मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे तीन टर्म चेअरमन होते. ईडीच्या नोटिसा आल्याने जाधव कुटुंब वादाच्या भोवऱ्यात सापडले. पती-पत्नी दोघेही शिंदे गटात आहेत.

मुंबई उत्तर पश्चिममध्ये शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर व उबाठा सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्यात लढत आहे. अमोल यांचे वडील गजानन कीर्तिकर हे मावळत्या लोकसभेत शिवसेनेचे खासदार होते. वायकर पती-पत्नी तसेच अमोल कीर्तिकरही ईडीच्या रडारवर आहेत.
मुंबई दक्षिण-मध्य मतदारसंघात शिवसेनेचे राहुल शेवाळे व उबाठा सेनेचे अनिल देसाई अशी लढत आहे. शेवाळे हे मावळत्या लोकसभेत खासदार आहेत. अनिल देसाई यांच्याकडे राज्यसभेचे खासदार म्हणून अनुभव आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के व उबाठा सेनेचे राजन विचारे असा सामना आहे. येथून भाजपाचे संजीव नाईक लढण्यास उत्सुक होते, पण मतदारसंघ शिवसेनेला गेल्याने देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करून वाद शांत करावा लागला. कल्याण मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे व उबाठा सेनेच्या वैशाली दरेकर-राणे यांच्यात लढत आहे. श्रीकांत हे मावळत्या लोकसभेत खासदार आहेत. पालघरमधून भाजपाचे डॉ. हेमंत सवरा यांच्याविरोधात उबाठा सेनेच्या भारती कामडी आहेत.

मुंबईतील सहापैकी तीन जागांवर भाजप लढत आहे. उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उत्तर – मध्य मुंबईतून अॅड. उज्ज्वल निकम आणि इशान्य मुंबईतून मिहीर कोटेजा मैदानात आहेत. त्यांच्याविरोधात अनुक्रमे भूषण पाटील (काँग्रेस), वर्षा गायकवाड (काँग्रेस) व संजय दिना पाटील (उबाठा सेना) उमेदवार आहेत.

सन २०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत अविभाजित शिवसेनेने २२ जागा लढवल्या, १८ जिंकल्या. पैकी १३ खासदारांनी जुलै २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला.

डॉ. सुकृत खांडेकर

Related posts

साहित्य सदैव समाजाला घडवते, दिशा दाखवते – प्रंचित पोरेड्डीवार

गुरुमाऊलीच्या प्रेमातूनच आत्मज्ञानाची गोडी

देहविक्रीचं जग

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406