July 27, 2024
Review of Ubalat Gopal Gavde Book by Ramesh Salunkhe
Home » उंबळट : चकोटल्या चकोटल्या गोष्टी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उंबळट : चकोटल्या चकोटल्या गोष्टी

व्यक्तिचित्रण हा प्रांत मराठी साहित्याला तसा नवा नाही. व्यंकटेश माडगूळकर, जी. ए. कुलकर्णी, जयवंत दळवी, अण्णा भाऊ साठे. पु. ल. देशपांडे, विद्याधर पुंडलिक, सुधीर रसाळ अशी कितीतरी नावं व्यक्तिचित्रण हा शब्द मनात घोळवला की, चटचट आपसूकच आठवतात. या लेखकांनी रेखाटलेली माणसं निघून गेली कायमची, तरी रसिक वाचकांच्या मनात ती चिरंजीव होऊन राहिलेली आहेत. जिती-जागती, हाडामासाची, लेखकांनी प्रत्यक्ष पाहिलेली अनुभवलेली माणसं जेव्हा साहित्याचा विषय होतात तेव्हा त्यांना कथा कादंबऱ्यांमधील पात्रांपेक्षा अधिकचं महत्त्व येतं. अशा माणसांना वाचनं, अनुभवणं यातला आनंद काही औरच असतो. कारण, त्यांना वास्तवाचा भरभक्कम आधार असतो. म्हणून कथा-कादंबऱ्यांमधील पात्रांना वास्तवाचा स्पर्श असत नाही असं नव्हे तर वास्तवाच्या प्रत्यक्ष जगण्याच्या अनुषंगाने विचार करता ही पात्रं काल्पनिकतेच्या अधिक जवळ जाणारी असतात. आणि अर्थातच यात वावगं असंही काही नाही.

व्यक्तिचित्रणाच्या संदर्भात मात्र वास्तवातील पात्रांना साहित्याचा विषय करताना कल्पनेचे जरी कलम करावे लागले; तरीही ही व्यक्तिचित्रणं वास्तवाच्या पातळीवर काल्पनिक पात्रांपेक्षा दशांगुळं अधिकच उरतात. आणि म्हणूनच या व्यक्तिचित्रणांवर जीव ओवाळून टाकावासा वाटतो. बऱ्याच कालावधीनंतर अशी जीव ओवाळून टाकावीशी वाटणारी माणसं गोपाळ गावडे यांनीही ‘उंबळट’ या व्यक्तिचित्रणपर पुस्तकाच्या निमित्ताने मराठी साहित्यात कायमची वस्तीला आणून ठेवलेली आहेत. या माणसांना वाचता अनुभवता चंदगडी मातीतली ही माणसं कधी जीवाभावाची होऊन जातात हे कळतच नाही.

खरं तर ही चंदगडी कृषीनिष्ठ माणसं याआधीच मराठी साहित्यात यायला हवी होती; पण उशिराने का होईना या माणसांना गोपाळ गावडे यांनी अक्षरबद्ध केलं आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा अशा सीमावर्ती परिसरातील अलक्षित माणसं, निसर्ग, भाषा, समाज आणि संस्कृती हे सारं काही अत्यंत जिव्हाळ्यानं या लेखकानं “उंबळट’ या नितांत रमणीय पुस्तकात रेखाटलेलं आहे. हे पुस्तक साहित्य, समाज आणि संस्कृतीच्या अनुषंगानं विचार करता खूप महत्त्वाचं आहे. कारण, ऐशीच्या दशकानंतर एकूणच आपल्या समाज वास्तवात, विशेषतः ग्रामजीवनात कमालीच्या वेगानं जे बदल होताहेत त्याचं नेमकं प्रतिबिंब या पुस्तकात पहावयास मिळतं.

गोपाळ गावडे ‘उंबळट’च्या माध्यमातून शहरी कामाला वैतागलेल्या संवेदनशील वाचकाला थेट त्याच्या गावात चंदगडात घेऊन जातात. चंदगड या प्रदेशाला विशिष्ट अशा प्रकारचा इतिहास, भूगोल आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा यांच्या सीमारेषेवर असलेला हा निसर्गसंपत्र प्रदेश निसर्गाचं संपन्न असं वरदान असलेला कुठलाही परिसर आणि तितकीच अशा परिसरात राहणाऱ्या बहुतांश भागांच्या समग्र जीवनाला व्यापून उरणारी आर्थिक आणि सामाजिक अभावग्रस्तता यांच्यातल्या ताणांमधला संबंध पूर्वापार अनाकलनीय ठरलेला आहे. नैसर्गिकदृष्ट्या संपन्न असलेला प्रदेश माणसांचं अवघं जीवनमान संपन्न करतोच असं सहसा दिसत नाही. किमान भारतात तरी हे चित्र दुरापास्तच. दिवसागणिक ते अधिकच दुरापास्त ठरत आहे. त्याचा या पुस्तकात ज्या परगण्याचा उभा आडवा आलेख आलेला आहे त्याचा विचार करू जाता निसर्ग आणि अभावग्रस्तता अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाही.

कुणाच्या अध्यात मध्यात नसलेली माणसं, कुणाच्या वाळलेल्या काडीवर पाय न देणारी माणसं, कष्ट तर इतके पाचवीला पुजलेले की, अंगावरच्या धडूताचेही भान नाही, चोरी- मारी नाही की लबाडी नाही, की कारणाशिवाय कुणाचे पाच पैसेही घेणे नाही असतीलच तर ते मोठ्या मनाने इतरांना कुठलीच अपेक्षा न ठेवता देणे, इतके सारे स्वतःच्या आणि इतरांच्याही तनामनाला किंचितसाही धक्का न लागेल असे वागणाऱ्या माणसाच्या बाटल्या दुदैवाचे दशावतार का यावेत ? असा प्रश्न या पुस्तकातली माणसं वाचताना हटकून मनात आल्याशिवाय राहत नाही. त्यामुळं जी. ए. कुलकर्णी यांच्या कथांमध्ये शोभून दिसावीत अशी माणसं गोपाळ गावडे यांच्या या पुस्तकात जागोजागी भेटतात, असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. तुलना करू नये; पण जी. एं. ची लेखनभूमीही हीच की. नियतीच्या निष्ठूर आघातानं कोसळणारं दुःख दोन्ही ठिकाणी कमी- अधिक फरकानं तिथंही भेटतं आणि इथंही. योगायोग म्हणू झालंच तर.

‘उंबळट’मध्ये आलेल्या तांबड्या मातीत आजही दरसाल धुंवाधार पाऊस, आंबा, फणस, काजू अशी रसदार फळं आणि तांदळाची-भाताची शेती, सदाहरित आता काहीशी विरळ होत चाललेली जंगलं, पानं- फुलं असा हा भरगच्च प्रदेश. कृषी हा इथला मुख्य व्यवसाय बाकी हरेक गावात असतात तशी किडुकमिडूक उद्योग-व्यापार करणारी माणसं इथेही आहेत. आठवडी बाजार म्हणजे यांच्यासाठी जणूकाही उत्सवच. अशा परगण्यात राहणारी गरीब, कष्टाळू, श्रद्धावान प्रामाणिक आणि विलक्षण स्वाभिमानी माणसं, शेताशिवारात राबणारी, गाई-गुरं घेऊन दिवसभर माळरानात जंगलात जाणारी हालअपेष्टा निमूटपणे सोसणारी, दारूच्या गुत्यात दुःख विसरू पाहणारी मोजकीच, पण लोकविलक्षण नितळ आणि पारदर्शी माणसं गोपाळ गावडे यांनी या पुस्तकात मोठ्या आत्मीयतेनं रेखाटलेली आहेत. आजच्या एकूणच मानसिक आणि भावनिक पातळीवर तुटलेपणाच्या काळात अशीही जिवंत हाडामासाची माणसं आपल्या अवतीभवती होती हे वाचून थक्क व्हायला होतं. या माणसांकडून आपणही काही घेतलं पाहिजे असं सतत वाटत राहतं.

तसं पाहिलं तर ‘उंबळट मधील सगळीच माणसं गोपाळ गावडे या लेखकाच्या ना नात्याची आहेत ना गोत्याची आहेत; पण माणसांशी या लेखकाचे अतूट नातेबंध, सख्ख्य असल्याचं जाणवतं. रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेली नाती बळकट असतात, या विधानाची येथे सदैव आठवण येत राहते. गोपाळ गावडे यांनी या माणसांना आपले मानले आहे. ही सारी माणसं कृषी संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर वावरणारी पात्रं आहेत. या माणसांच्या सुख-दुःखाचे अनंत अवतार त्यांनी जवळून पाहिले आहेत. अशा माणसांविषयीची सहानुकंपा या लेखकाच्या मनात रुतून बसलेली आहे. म्हणूनच इतक्या प्रांजळपणाने या लेखकाने या माणसांना अक्षरबद्ध केलं आहे. या लेखकानं अगदी बालपणापासून ज्यांना पाहिलं आहे, अनुभवलं आहे, त्यांच्याशी दोस्ती केली आहे. अशा माणसांचं म्हटलं तर चिमूटभर आयुष्य अत्यंत तरलपणानं शब्दबद्ध केलं आहे. पोटापाण्याच्या निमित्तानं शहरी संस्कृतीशी नातं जरी जुळलेलं असलं तरी गावाशी असणारी नाळ या लेखकाने तुटू दिलेली नाही. म्हणूनच चंदगडी निसर्ग, माणसं, चंदगडी भाषा आणि चंदगडी निवेदन या पुस्तकाचं चांगलंच बलस्थान झालेलं आहे. आशय आणि त्याचा आविष्कार इतका एकजीव होऊन एखाद्या पुस्तकात यावा, असं उदाहरण इतरत्र अपवादानंच वाचायला मिळतं.

या पुस्तकातली माणसं जशी भावतात तशीच ती मनाला चटका लावून जातात, चुटपूट लावून जातात, अनोखी हुरहूर लावून जातात. ग्रामजीवनातल्या भोळ्या- भावड्या, प्रामाणिक पण अलक्षित माणसांना या लेखकाने साहित्याचा विषय केलं आहे. कारण, गोपाळ गावडे यांनी रेखाटलेली आण्णूबाबा, रोंगा, किंवडा तुका बाबूभावो, गण्या ही सारीच माणसं वाट्याला आलेल्या दुःखामुळे त्रस्त झालेली आहेत. परिस्थितीशी झगडताना हतबल झालेली आहेत. एकटी, एकाकी झालेली आहेत. गाव, नातीगोती, कुटुंब इतकेच नव्हे तर जिवलग मित्रांपासूनही अलग झालेली आहेत. असे असले तरी ती जगावर सूड उगवत असल्यासारखी वागत बोलत नाहीत. पळवाटा शोधत नाहीत. तर वाट्याला आलेल्या दुःखाचा स्वीकार करून समृद्ध शहाणपण जगाला कसं द्यावं याचा धडा अबोलपणानं देणारी माणसं या पुस्तकात आपणास भेटतात. शिवाय अनवाणी चालणारी, काजू राखणारी, हिरडे गोळा करणारी, डिंक गोळा करणारी, जंगलातली लाकडं विकून बाजारहाट करणारी, देवा-धर्मावर नितांत श्रद्धा असणारी, सतत कष्ट करीत नाना उद्योग, व्यवसाय करीत पोटं भरणारी माणसं या पुस्तकात भेटतात.

साधीभोळी माणसं, स्वतःजवळ काही नसलं तरीही इतरांना नेहमी मदत करण्यास तत्पर असणारी माणसं आपल्या घरातून कुणी रिकाम्या हातानं जाऊ नये अशी श्रद्धा असणारी माणसं. अशा माणसांना असलेच तर घोटभर दारू आणि चिमूटभर तंबाखूचे व्यसन हीच त्यांची एकमेव करमणूक. या अशा व्यसनापायी अवधं आयुष्यच पणास लावलेली काही माणसंही या पुस्तकात अत्यंत तपशीलवारपणानं रेखाटण्यात आलेली आहेत. या समस्त माणसांच्या अनुषंगाने गोपाळ गावडे यांनी ग्रामजीवनाचे अत्यंत तपशीलवार आणि वास्तव चित्रण करण्याचाही प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचे लेखन करताना त्यांनी कुठेही काल्पनिकतेचा आधार घेऊन, फेवळ मनोरंजनात्मक अथवा विडंबनात्मकतेला, रंगवून सांगण्याला शरण जाऊन हे लेखन केल्याचे तसूभरही दिसत नाही. असे असले तरीही वास्तवतेचा आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे माणसांवरील प्रेम, ममत्व आणि प्रगाढ़ करूणा या वैशिष्ट्यांमुळे या पुस्तकातील सर्व माणसं वाचकांच्याही जिवाभावाची केव्हा होऊन. या परिसरात भेटलेल्या माणसांच्या आयुष्यातल्या तपशीलवार गोष्टी सांगणे एवढेच या लेखकाला अभिप्रेत आहे असं वाटत नाही; तर या पुस्तकाच्या अनुषंगाने जागतिकीकरणानंतर भारतीय समाजव्यवस्थेतून नष्ट होत चाललेल्या भाषेचं, लोकसंस्कृतीचं, श्रद्धा-अंधश्रद्धांच विश्व प्रामाणिकपणे आणि अत्यंत प्रवाहीपणे आलेलं आहे.

तसं पाहिलं तर या पुस्तकात भेटतात तशी माणसे पूर्वीही आणि अपवादानं का होईना; पण आजच्या समाजवास्तवातही जागोजागी सापडतील; पण या पुस्तकात भेटणाऱ्या माणसांच्या मनाचं मोठेपण हे की, ती आपल्या वाट्याला आलेल्या बऱ्यावाईट परिस्थितीचे खापर निसर्गावर तिथल्या पशुपाखरांवर अथवा कुणाही तिऱ्हाईत माणसांवर फोडत नाहीत. तर आपल्या वाट्याला आलेले दुःखभोग निमूटपणेचा प्रयत्न करतात. मरणाला निर्भयपणानं सामोरं जातात. शिवाय, प्राणपणानं जपलेल्या स्वाभिमानाला कोणत्याही किमतीत भौतिकाच्या बाजारात उभे करीत नाहीत. उदाहरणच द्यायचे झाले तर आण्णूबाबाचे देता येईल.

रात्री-बेरात्री गावात रुबाबात हिंडणारा, वादळवाऱ्याची भीती नसलेला, बेदरकारी, लाकडं फोडून हॉटेलवाल्यांना विकणारा त्या पैशातूनच दारू पिणारा, दारूच्या नशेत शिट्या मारून बाया बापड्यांना डोळा मारणारा, कुणासही वाईट शब्द न बोलणारा, आण्णूबाबाचं हे रात्रीचं रूप. दिवसा मात्र अत्यंत नम्र. गावातल्या सगळ्या स्त्रियांना आऊ, अक्का म्हणून हाक मारणारा हा ‘बैलगाडीत चढला की कोलापुरी पईलवानागत रुबाबात उभे ऱ्हाई. गाडी खाड-खाड-खाड हादरे तशा आण्णूबाबाच्या काळ्याकुट्ट पिंढऱ्या लाड लाड हालेत.’ यावरून या माणसाच्या शरीरयष्टीची नेमकी प्रतिमा वाचकांपुढे उभी राहते. अशा या प्रेमासाठी भुकेलेल्या माणसाला जवळचं तसं कुणी नव्हतं. पोरं आणि सुना असून नसल्यागत.

मस्त कलंदर असलेल्या आण्णूबाबाचा नात्यांवरील विश्वास कधीचाच उडून गेलेला होता. जे ते आपापल्या नादात. मुलांसाठी सारं आबादान करून ठेवलेला हा माणूस, एक मुलगा, दोन सुना, नाती होत्या; पण स्वत:च्याच घरात बेवारस म्हणून पडलेला. केवळ शहरांमधीलच नव्हे, तर ग्रामीण परिसरातीलही नातेसंबंध व्यवहाराच्या पातळीवर आल्याचे हे प्रातिनिधिक चित्र जिवंतपणी अंगावर ऊबांचे बुजबुजणे घेऊन हा माणूस अबोलपणानं मरुन जातो; पण स्वाभिमान इतका की, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी विश्वासू माणसाच्या हातावर पस्तीस रुपये ठेवून, ‘मी मेलो तं वा पैशाचं कपान घे. माज्या कपनास कुणाक्नबी पैसे घू नकोस.’ असं बजावून सांगतो. अशा प्रकारची जगण्याच्या प्रत्येक पातळीवर स्वतःचे स्वत्व राखून जगणारी माणसं या पुस्तकात आपणास भेटतात.

हे पुस्तक म्हणजे एक अस्सल सामाजिक दस्तऐवजही आहे. या परिसराचा इतिहास, भूगोल, माणसांचं विषेशतः तत्कालीन ग्रामजीवनातील स्त्रियाच सामाजिक स्थान आपणास दिसून येतं. ग्रामजीवनातली असो वा समाजाच्या कोणत्याही स्तरातली स्त्री असो तिच्या वाट्याला येणारं जे अठराविश्वे दारिद्र्य असतं, समानतेच्या पातळीवर जाणीवपूर्वक दुर्लक्षिलं जाणं असतं, ते या पुस्तकातल्या व्यक्तिचित्रणांमध्येही लेखकानं मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात निवेदनाच्या ओघात मोजक्याच पण काही स्त्रियांच्या करुणार्त कहाण्याही येतात. त्या घटना-प्रसंगांमधून मांडताना ग्रामजीवनातल्या स्त्रियांकडे पाहण्याची लेखकाची उदारदृष्टीही दिसून येते. रोंगा या माणसाची बायको पार्वती हिच्या संदर्भात पंच आपापसांत जे बोलतात त्यावरून स्त्रियांचे समाजातील स्थान काय होते आणि आजही ते कसे आहे हेच दिसून येते.

पंच बिनदिक्कत म्हणतात, ‘बाईस काडीची किंमत नस्ताय लोकं तीस किसपाटासारखं समाजतात. म्हूण्णच तिच्या हातात पायात गवताचे तोडे घाटले व्हत्ते. जनावरास किंमत हाय तवडीबी बाईस किंमत न्हाय. बाईच्या जातीस जनावरा एवढाच मान. म्हू्ण्णच बयलाच्या गळ्यातला सर तिच्या गळ्यात घाला हाय. दुसरं काय करणार?” स्त्रीचं एकटा ला झालं की तिचं माहेरचं नातं तुटती परक्याचं धन होते. सासरकडचं काही बिनसलं तर तिची अवस्था ना घर का ना घाट का अशी होते. सुधारणेच्या कितीही गप्पा मारल्या तरीही स्त्रियांच्या या स्थितीत म्हणावा तितका बदल झाल्याचं दिसत नाही. पार्वतीचीही अशीच अवस्था होऊन गेली आहे. त्यामुळं पार्वतीच्या बापानंही, ‘जब पोरीचं लगीन लावून देतोय, तब्बंच ती आम्हास मेली, तिस घून जावा. तिच्या रट्ट्यास धरून बड़ीत घेऊन जावा. परत हिकड़ी बात सोडू नकोशी काय भेटोसारखं झालं तं आमीच यताव तिकड़ी. पार्वतीचे वागणे हे नेमके कशामुळे झाले आहे? चूक नेमकी कोणाची आहे? ती अशी नेमकी का वागते आहे? याचा विचार एक माणूस म्हणून आजही होताना दिसत नाही.

मुक्यानेच मरणे हे स्त्रीच्या नशिबी असते. कसे का असेना तिनेच मन मारून संसार करत राहिले पाहिजे, तिथेच न्हाणं लागत नाही. अशा सोयीस्कर पुढे दामटत असलेल्या पुरुषी सबधीपुढे स्त्रिया कशा हतबल होतात. याचे प्रातिनिधिक चित्रण पार्वतीच्या माध्यमातून लेखकाने केल्याचे आपणास पहावयास मिळते. त्यामुळे चाबकानं मारत धिंड काढली गेलेली रोंग्याची बायको पार्वती, ‘मेल्या मढ्यागत दिसोलाल्ली.’ हे लेखकाने केलेले विधान या लेखकाचा ग्रामीण स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे सुचित करते. पार्वतीने काडीमोड घेतला म्हणून तिचा प्रश्न कायमचा सुटला असे होत नाही. रोंग्याने दुसरे लग्न केले. तो निदान बांधावयल्या फण्सागत तग धरून हाय. पण पार्वतीचे पुढे काय झाले? तिच्यासमोर नेमके काय वाढून ठेवले असेल? असे प्रश्न वाचकांच्या नजरेसमोर उभे राहतात.

अल्पाक्षरता हे या व्यक्तिचित्रणांचं आणखी एक महत्त्वाचं वैशिष्ट्य. या पुस्तकातली सगळीच व्यक्तिचित्रणं अत्यंत अल्पाक्षर रमणीय झालेली आहेत. खरं तर या ‘उंबळट मध्ये आलेल्या पात्रांच्या एकूणच जीवनव्यवहाराकडे पाहिलं तर यातल्या प्रत्येक व्यक्तिमत्वाचं आयुष्य हा एक कादंबरीचा विषय आहे पण लेखकानं या माणसांच्या आयुष्यातील घटना प्रसंगांना जवळून पाहिलं -अनुभवलेलं आहे. ते साक्षेपानं मांडलेलं आहे. एखादी घटना, प्रसंग अथवा गावखेड्यातल्या माणसांचं चित्र गोपाळ गावडे अत्यंत कमीत कमी शब्दांत करतात. अधिक विस्ताराची गरज त्यांना भासत नाही. त्यामुळे पाल्हाळिकपणा हा या पुस्तकात अगदी अभावानेच जाणवतो. उदा- किंवडा तुक्का’चे वर्णन लेखकाने ‘हिळवान बोलणारा तुका म्हजेन, तमाशात्ली मावशीच व्हता. ‘असे केले आहे. त्यामुळे या व्यक्तीच्या शरीरयष्टीचे, पोशाखाचे, त्याच्या चालण्याबोलण्याचे वर्णन विस्ताराने करायची गरजच भासत नाही. तुका ही व्यक्ती या एका वाक्यातून वाचकांच्या नजरेसमोर दिसू वावरू लागते. त्यामुळे ही व्यक्तिचित्रं अत्यंत आटोपशीर झालेली आहेत.

बाबूभावो ही लेखकाने रेखाटलेली आणखी एक अल्पाक्षर रमणीय व्यक्तिरेखा. दारूच्या व्यसनात आकंठ बुडालेल्या या माणसाविषयी गोपाळ गावडे अत्यंत तळमळीने लिहितात. ते जेव्हा कोल्हापुरातून गावाकडे यायचे, तेव्हा बाबुभावोंना हमखास भेटायचे, भावो लेखकाला प्रेमानं मिठी मारत असे आणि मनापासून ‘अरे गोपाळ, कव्वं येलेस?’ अशी विचारपूस करीत असे. तेव्हा लेखकाला घट्ट मिठी मारलेल्या या असाधारण माणसाविषयी लेखकही मनःपूत लिहून जातात, ‘मिठी मारल्यान, की दारूचा वास घमघमे. मला वास आवडोस नव्हता. खरं त्यातला बाबुभावो अत्तरासखा भेटे.’ हा प्रसंग तर चित्रदर्शीपणाने नजरेसमोर उभा राहतोच; पण गावाकडल्या माणसांविषयीची सध्या अत्यंत दुर्मिळ होत चाललेली विलक्षण आत्मीयता आपणास जाणवल्याशिवाय राहात नाही. ही सगळी जिवाभावाची माणसं या लेखकानं कमालीच्या अल्पाक्षरात रेखाटलेली आहेत. गोपाळ गावडे यांच्या लिखाणाचे हे कौशल्य वाखाणण्यासारखे आहे. अशा या दारूचे व्यसन सोडण्याकरिता पंढरपूरच्या वारीला गेलेल्या बाबुभावोच्या आयुष्याची फरफट पाहून व्याकूळ व्हायला होतं. एकटा एकाकी मरून गेलेल्या आणि बेवारस म्हणून तिकडेच दहन केल्या गेलेल्या या माणसाविषयीचे, ‘बाबुभावो गावात मरेता त मढ्यास माण्सं मावेत नस्ती’ असे सार्थ निरीक्षण लेखक नोंदवून जातात. जगण्याची दिशा चुकली की माणसाची कशी दशा होऊन राहते, हे अप्रत्यक्षपणे या व्यक्तिरेखेकरवी लेखक वाचकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करताना दिसतात.

या पुस्तकातल्या सर्वच माणसांबद्दल लेखकाच्या मनात कमालीचे ममत्व असल्याचे पानोपानी सतत जाणवत राहते. इथे हेही नमूद केले पाहिजे, की या लेखकाने या माणसांमधील केवळ चांगुलपणाचेच कथन केलेले नाही. तर माणसांच्या बऱ्यावाईट वृत्ती-प्रवृती की, ज्या सर्वच माणसांच्या हाडीमासी खिळून राहिलेल्या असतात. तेही अगदी निरलसपणाने सांगितले आहे. त्यामुळे या पुस्तकातली माणसं केवळ विभूतिपूजेपुरती राहात नाहीत. माणसांमधील षड्विकारांचं दर्शन घडविता घडविता ही माणसं या विकारांच्या पल्याड जाऊन आपलं माणूसपण कसं जिकिरीनं सांभाळतात, याचा चांगलाच प्रत्यय गोपाळ गावडे वाचकांना देण्याचा प्रयत्न करतात. यामुळे ही माणसं परकी वाटत नाहीत. आपल्या अवतीभवतीच ती जणू काही वावरत असल्याची जाणीव हे पुस्तक वाचताना होत राहते.

भीमराव चिणके हे असेच एक खास चंदगडी मातीत उपजलेले दिलदार आणि माणसात मिसळलेलं व्यक्तिमत्व. या माणसाविषयी लेखक लिहितात, ‘साहीब म्हजेन चिखलात कसं कमाळ तसं वाळकुळीच्या दगड धोंड्यातलं हे फूल हाय.’ भावाच्या आजारपणात, स्वतःच्या जिवास धोका असूनही भाऊ वाचणार असेल तर माझी किडनी घ्या असे उद्गार काढून डॉक्टरांना ‘यवढं कळोनबी, मी माझ्या भावास जाणून- भुजून मारल्यागत व्हईल. आयुक्शभर भावाच्या मर्णाचं वझं मला धूंच लागेल. भावास मारून मी यकटा लई वर्स जगण्यापरास, आमी दोगंबी थोडं थोडं जगतावं. घेवा तुमी!’ असे बाणेदार उत्तर देऊन कमालीचा त्याग करतात.

अशी पाहिलेली, साहिलेली आणि जोखलेली ही अशी माणसं या पुस्तकात आपणास भेटतात. पाठच्या भावाला दुसरा जन्म देणाऱ्या या साहेबांचा सत्कार गावकरी करतात. त्यांना ‘साहेब’ अशी पदवी देतात. त्यामुळे लेखकांनी त्यांचा उल्लेख ‘भाताच्या रूपानं, नाचण्याच्या रूपानं, उसाच्या रूपानं सायब दिसताय’ असा करतात. निसर्गाच्या बहरलेल्या रूपात अशा माणसांचं दर्शन घडावं हेच एका पातळीवर माणसांचं अजरामर होणं असतं. तेही या पुस्तकात सगुण साकार झालं आहे असं म्हणावंसं वाटतं.

गोपाळ गावडे यांच्या या लेखनात वर्णनपरता अथवा अवाजवी विस्तार आणि पुनरुक्ती ही क्वचितप्रसंगी पाहावयास मिळते हेही सांगितलं पाहिजे. त्यामुळे व्यक्तिचित्रण करता करता आशयाकडे लेखकाचे दुर्लक्ष होते की काय अशी शंकाही हे पुस्तक वाचताना सहज मनात आल्याशिवाय राहत नाही. तथापि, ही वर्णनपरता अथवा विस्तार एखाद्या चांगल्या ललित गद्यात शोभून दिसावा, अशाप्रकारे पुस्तकात उतरला आहे. ही सगळीच मांडणी ललितरम्य भाषेत झालेली असल्यामुळे वाचकांची या पुस्तकाच्या वाचनावरील पकड ढिली होत नाही. त्यामुळं ‘नरसिंगरावाच्या शिवारापास्नं केरुङयापतरचा रस्ता कधीकाळी झाल्ला ते आत्तंच्या पिळगीस कुणास म्हाईत न्हाय.’ असे लेखकाने पेरलेले कितीतरी संदर्भ वाचकांचा रसभंग करीत नाहीत.

‘उंबळट’मध्ये लोकगीतांचा वापरही लेखकाने मोठ्या खुबीने केला आहे. ही लोकगीतं या पुस्तकाच्या आशयाशी एकजीव होऊन गेलेली आहेत. लोकगीतं आपल्या इतिहासाचा, परंपरेचा पूर्वापार चालत आलेला संपन्न वारसा आहे. तो ग्रामजीवनाचाही अविभाज्य घटक होता. केवळ ग्रामजीवनाचाच नव्हे, तर मराठी साहित्य आणि संस्कृतीचीही एक महत्वाची धरोहर आहे, पण भौतिकाच्या न थांबवता येणान्या रहाटगाड्यापुढं हा समृद्ध वारसा झपाट्याने कालबाह्य होतो आहे. तो जतन करण्याचा प्रयत्नही अनेक पातळ्यांवर सुरू असला तरी आपल्या समाजजीवनातल्या विशिष्ट अशा प्रकारच्या घटना, प्रसंग, सण-समारंभ यावेळी अभिव्यक्त होणारी लोकसंस्कृती वातावरणात एक प्रकारचा कसा तजेला आणत असत. जीवनात कसा उत्साह, रंग भरत असते याचाही प्रत्यय या पुस्तकात लेखकाने समयोचित वापरलेल्या लोकगीतांमधून पाहावयास मिळतो.

तुक्यास लग्नातली सगळी गाणी इतकेच नव्हे, तर शिमग्यातली गाणीही येत असत. त्याला खेळे खेळण्यातही रस असे; पण त्याच्या बायकी वागण्या-बोलण्यामुळे त्याला या खेळात कोणी सहभागी करून घेत नसे. या माणसाला येणाऱ्या काही गाण्यांचा संदर्भही लेखकाने आवर्जून दिला आहे. शिवाय, अशा या तुक्याच्या बायकोनं नदीत उडी घेऊन जीव दिल्यावर तो कायमचाच कसा खूचन जातो. केवळ अन्नपाण्यावरची नव्हे, तर जगण्यावरचीच त्याची वासना कशी उडून जाते. हे वाचताना लोकसंस्कृतीच्या एका प्रामाणिक उपासकाच्या आयुष्याची कशी वाताहत होते हे पाहून गलबलून जायला होतं. असा हा तुका मरून गेल्याचं जेव्हा लेखकाला समजतं तेव्हा, ‘आमीच बाटके. बोलतं करीताव तं सगळी गाणी तेच्यावनं मिळेती. चंदगडचा रितीरिवाज टिकवणारा, जमनीत पुरला खजिना व्हता तो. अशी कायमची सुटपुट लेखकाला आणि पर्यायानं संवेदनशील वाचकालाही कायमचीच लागून राहते.

पुस्तक वाचत असताना आणखी एक गोष्ट सतत अधोरेखित होते, आणि ती म्हणजे माणसांचा निसर्गाचा आणि घटना-प्रसंगांचा लेखकाने त्यांच्या लेखनात आणलेला ओघवतेपणा. प्रासादिकता. व्यक्तिचित्रण करताना भाषेचा आशयाचा अनावश्यक विस्तार टाळून एकूणच लेखानाला गोपाळ गावडे एकसंघपणा देण्याचा प्रयत्न करताना दिसतात. हा ओघवतेपणा निवेदनातून आणि संवादांच्या सारणीतून सतत पाझरताना दिसतो. प्रासादिक बोलीभाषेचा वापर सर्जनशील लेखनात कसा करावा, आशयनुसारी भाषा कशी असावी याचा उत्तम नमुना म्हणूनही या पुस्तकाकडे आपण पाहू शकतो. या पुस्तकातले कोणतेही व्यक्तिचित्रण वाचत असताना सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही भाषा वाचकांच्या मनाची पकड घेते. चंदगडी भाषेचा अंगभूत गोडवा या पुस्तकात सतत भेटत राहतो. लेखकाला भेटलेल्या माणसांच्या मनासारखीच पारदर्शक, प्रवाही भाषा हे या पुस्तकाचे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे असे म्हणावेसे वाटते.

‘तळ्याच्या वरच्यांगास बांदूडकरांचं भात आणि तेच्या घरच्यांगास लाकळू गावड्यांचं गवात व्हतं. दोर हिकड़ी बऊन्हेत म्हूनून लोकळू गावड्याच्या बागेजवळ बसलाय. ढोरं चरोलाली. कुणाच्या पिकात जाऊची भीती न्हवती. म यका जागेस बसोन सगळ्यांनी आमी कविता म्हटल्याव, पाढे म्हटलाय. गाणी म्हटलाव. ‘मामाचं पत्र हारावलं’ तेबी खेळ्ळाव. पायात उन्हं यली. म भाकरी खाल्लाव. दुपारच्या येळेस ढोरास्नं तळ्यात पाणयास सोडलाव.’ अशा प्रकारचा चंदगडी भाषेचा लहेजा अत्यंत समर्पकपणानं या पुस्तकात सातत्याने भेटत राहतो. ही भाषा वाचायला, ऐकायला अत्यंत मृदु अशी भाषा आहे. क्लिष्ट, टोकदार, रुक्ष, तटस्थ, कानांवर आणि पर्यायाने मनावर ही भाषा आघात नसून वाचत, ऐकत राहावी अशी ही मनभावन भाषा आहे, हे या पुस्तकातून सतत अधोरेखित होताना दिसते. अशा प्रकारच्या बोलीभाषांचे आपल्या आयुष्यातून हळूहळू उच्चाटन होणे, त्या अस्तंगत होणे म्हणजे किती मोठ्या सांस्कृतिक धनाला आपण पारखे होत आहोत, याची जाणीव झाली की विषण्ण व्हायला होते.

या अनुषंगानेही चंदगडी बोलीचा उत्कृष्ट नमुना या लेखकानं या पुस्तकाच्या रूपानं जतन करून ठेवला आहे. हे देखिल एक अत्यंत महत्वाचं सांस्कृतिक कार्य आहे, असं म्हटलं पाहिजे. चंदगडच्या परिसरात वापरात असलेल्या खूप साऱ्या शब्दांचा वापर या लेखकाने या पुस्तकात मुक्तहस्ताने केलेला आहे. दुक्कूल, हू लाली, घराडे, जिऊस, आबादान, गोमगाला, सौसार, कव्वतरी, दिक्कूल, जव्वं- तव्वं, गसाली, भिकनेसी, हिळवान, लजेत, हेंमल्यागत, घराडे, आग्रेव, पिळगी, आंबटढव, काणया, परमाणिक, मंगळाष्टका, इरगळ्यागत, घोमाणूस, मग्न-मग्न, कोसाळ्ळा, खाईम, आपचित, आईतवार, रैवार, आठुड्यास असे असंख्य चंदगडी शब्द या पुस्तकात पदोपदी भेटतात. विशेष म्हणजे, यातले बरेचसे शब्द वाचकांना अपरिचित असले तरी हे पुस्तक वाचताना कोणत्याही प्रकारचा व्यत्यय वाचकाला येत नाही. आशयाचा हात धरून पुढे गेलं की शब्दच अर्थाचं निबिड जंगल पार करायला वाचकांना मदत करीत असतात.

इंडाल कॉलनीतला सिनीमा पाहून चार किलोमीटर रात्रीचा प्रवास करणारे गोपाळ गावडे यांचे चंदगडी मित्रमंडळ, किंवा हलकर्णी कारखाना येथे सादर केलेले मृत्युंजय नाटक पाहून भल्यापहाटे मित्रांसमवेत नागणवाडीस आलेले लेखक ‘कोंबा बोबोस गावात यलाव’, यवढ्या काळोकात्नं यवश्शीर यलाव अशी नितांतसुंदर वाक्ये सहज लिहून जातात. या अशा साध्याशाच वाटणाऱ्या एका वाक्यात ते नाटक पाहिल्याचे समाधान, सायकलवरून केलेला जंगल झाडीतला रात्रीचा प्रवास, मित्रांच्या नातेबंधातील ओलावा, नवे काही पाहण्याची बालसुलभ ओढ अशा अनेक गोष्टींचा प्रत्यय येतो. एकातून एक असे घटना-प्रसंग सर्वच व्यक्तिचित्रांमधून उमलत जातात. केवळ गतकाळाच्या आठवणी शब्दबद्ध करण्याच्या पल्याड जाऊन समग्रपणाने परिसराकडे, माणसांकडे, माणसांच्या सुख- दुःखाच्या नानापरींकडे पाहणे आणि ते जसे भावले तसेच अम्लानपणाने साहित्याचा विषय करणे; यात गोपाळ गावडे पहिल्याच पुस्तकात कमालीचे यशस्वी झालेले दिसतात. त्यामुळे या लेखकाने खूप आधीपासूनच अशाप्रकारची साहित्यनिर्मिती करायला हवी होती; असे मनोमन वाटत राहते.

आशयानुसार सहजगत्या निवेदनात आणि संवादातही आलेले शब्द आणि त्या शब्दांचा नेमका अर्थ वाचकांना सहज उलगडत जातो. अर्थात खास चंदगडी परिसरात वापरले जाणारे शब्द आणि त्या शब्दांचे काही अर्थही गोपाळ गावडे यांनी पुस्तकात वाचकांच्या सोयीसाठी, त्यांच्या आकलनासाठी दिलेले आहेत. अर्थातच तेही दिले नसते तरी चालण्यासारखे होते. कारण हा परिसर, या परिसरातली माणसं आणि त्यांची सहजसुंदर अशी नादमयी भाषा ही सगळी काही अनुभूती विनाव्यत्यय वाचकांच्या मनात आपसूकच संक्रांत होत राहते. लेखकाचे आणि या परिसराचे, या परिसरातल्या माणसांचे अत्यंत जवळचे नातेसंबंध असल्याचे या पुस्तकात निदर्शनास येते. या लेखकाने हा परिसर तटस्थपणानं न पाहता तो स्वतः अनुभवल्याचा, त्या परिसराशी एकरूप झाल्यामुळे माणसांविषयीचा परिसराविषयीचा आणि भाषेविषयीचा रुक्षपणा न जाणवता एक प्रकारच्या दुर्मिळ अशा एकरसतेचा, निरागस निष्पापतेचा प्रत्यय सतत येत राहतो.

केवळ चंदगडी ग्रामवास्तवच नव्हे, तर देशपातळीवरील सर्वच खेडी आतून बाहेरून कमालीची बदलत चालली आहेत. कोणत्याही संवेदनशील माणसाला धास्ती वाटावी असा होत असलेला बदल थोपविण्याची कोणतीही यंत्रणा दृष्टीच्या टप्यात दिसेनाशी झाली आहे. भौतिकाचा अतिरेकी हव्यास, चंगळवादी माध्यमसंस्कृती, विदिर्ण होत चाललेली कुटुंबव्यवस्था, नातेसंबंधातील उठवळपणा आदिंच्या विळख्यातून एकही गाव-खेडं मुक्त नाही असं चित्र आहे. ही अशी व्यवस्था गावगाड्याकडे, डोंगरकपारीकडे आणि आदिवासी मुलुखाकडेही वेगाने चाल करू लागली आहे. चंदगडी परगणाही त्याला अर्थातच अपवाद नाही. त्यामुळे ‘उंबळट मधील माणसं, त्यांची भाषा, जगण्याच्या पद्धती, चालीरीती श्रद्धा-अंधश्रद्धा, निसर्ग कालपरवापर्यंत दिसत जाणवत होता; ही अचंब्याची आणि आर्श्चयाची गोष्ट वाटू लागण्याचा संभवही नाकारता येत नाही. हजारो वर्षे चालत आलेले संस्कार घेऊन माणसं आपलं बरंवाईट जगणं मरणं घेऊन वाटचाल करीत असतात. जगण्यातूनच आलेलं समाजहितैषी मूल्ययुक्त भान ते पुढील पिढ्यांना देत असतात. त्यामुळे अशा माणसांचं जगणं भोगणं समाजस्वाथ्यासाठी खूप महत्त्वाचे आणि गरजेचेही असते. हे सर्वकाही दुर्दैवाने संपत चालले आहे. त्यामुळे या अशा पुस्तकांचे मूल्य आणखी वधारत असते. त्याअनुषंगाने विचार करू जाता. नम्र, साधीभोळी आणि पापभिरू माणसं समजून घेण्याकरिता तीनही ऋतूला पशू-पक्षी-पाखरं जनावरं यांना सामावून घेणारा निसर्ग समजून घेण्याकरिता अवीट नातेसंबंध समजून घेण्याकरिता, बोलीभाषेतला रसपूर्ण गोडवा समजून घेण्याकरिता असे ग्रंथ गरजेचे असतात. म्हणूनही ‘उंबळट’ खूप महत्त्वाचे आहे असे वाटते.

तत्त्वं विचारसरणी, मूल्यभान असे पंडिती शब्द ग्रामजीवनातल्या शोषिताला, कष्टकला ठाऊक नसतात. त्याची गरजही त्यांना वाटत नाही. आपल्या जगण्यातूनच त्यांनी स्वत:चं असं एक सहजसुंदर तत्त्वज्ञान बनवलेलं असतं. या पुस्तकातला भाऊसाहेब हा एक असाच सहजसुंदर माणूस. आयुष्यभर काबाडक करताना कोणत्याच व्यवसायात त्याचा फारसा जम बसला नाही. म्हणून हा माणूस वायफळ आकांडतांडव करत, जगाला शिव्याशाप देत बसला नाही. गावातल्या सर्वांची आपुलकीनं विचारपूस करणारा हा माणूस ‘तुझ्या बाबानं मला लई मदत केलेनाय. तेथे उपकार मी कधीच इसरोचा न्हाय. भाऊसाहेब, तुमास्नं सांगतो, माण्सानं उपकार इसरोचे नसतात. माणसाच्या चकोटल्या- चकोटल्या गोष्टी आयुष्यभर ध्येनात ठूस व्हयेत. वाईट गोष्टी इसरोच्या, म सगळं जग चकोट वाटताय. आणि वरचा बधित अस्ताय, ‘ या माणसाचं अनुभवसंपन्न असं मूल्ययुक्त तत्त्वज्ञान, तो हे जीवनाचं सारं सार जगाला उगाचच सांगत फिरत नाही. स्वतः तशाप्रकारे जगण्याचा प्रयत्न हा माणूस करतो. म्हणूनच भाऊसाहेब मोठा असा आचार आणि विचार ठेवणारी माणसं मोठी, आदर्शवत आजकालच्या माणसांच्या एकूणच जीवनव्यवहारातून हद्दपार होत चाललेलं हे अशाप्रकारचं तत्त्वज्ञान. हे सारं काही या पुस्तकात जाणता-अजाणता आलेलं आहे. त्यामुळेच या पुस्तकातल्या अशा चकोटल्या चकोटल्या गोष्टी वाचून आपण आपल्याही जगण्या वागण्या-बोलण्यात त्या आणल्या पाहिजेत. म्हणूनही गोपाळ गावडे यांचं ‘उंबळट’ हे पुस्तक खूप महत्वाचं आहे असं वाटत राहतं.

रमेश साळुंखे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Happy Republic Day : संचालनात महाराष्ट्राची वारली कला

जगाचे उत्पत्ती स्थान म्हणजेच आदिशक्ती

ब्रह्मसंपन्नतेच्या स्वप्नपूर्तीसाठी…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading