कवितांमध्ये व्यक्त झालेले अनुभव हे एका संवेदनशील कलावंतमनाने घेतलेले अनुभव आहेत आणि त्यांचे मूळरूप चिंतनाला कारणीभूत असले तरी त्यावर कवयित्रीच्या रसिकतेचे, वाचनाचे, चिंतनशील वृत्तीचे संस्कार झाले आहेत आणि कलात्म कोंदणात अर्थपूर्ण शब्दबंधात ते सौंदर्यपूर्ण आणि आस्वाद्य झाले आहेत.
अनंत देशमुख
‘चित्रधून’ हा राजश्री कुलकर्णी, शिल्पा चिटणीस, अनघा दातार आणि मंजिरी कुलकर्णी या एके काळच्या शाळकरी मैत्रिणींचा सिद्ध झालेला ५० कवितांचा संग्रह ‘संवेदना प्रकाशन, पुणे’ यांनी प्रकाशित केलेला आहे. या मैत्रिणी व्हॉट्सअप ग्रूप चालवतात. त्यांच्यापैकी अरुणा या भूलतज्ज्ञ असून त्या वेगवेगळ्या वृक्षांची, पाना-फुलांची, पक्षी-प्राण्यांची छायाचित्रे ग्रूप वर टाकीत असत. ती पाहून त्यांच्यावर कवितालेखनाची प्रेरणा त्यांना मिळाली. त्यातून त्यांचे कवितालेखन बहरले. या कवितांचा संग्रह करावा अशी कल्पना पुढे आली आणि त्याचे फलित म्हणजे ‘चित्रधून’ हा संग्रह सिद्ध झाला आहे. यात शिल्पा चिटणीस यांच्या १३ कविता आहेत.

कवितांमध्ये व्यक्त झालेले अनुभव हे एका संवेदनशील कलावंतमनाने घेतलेले अनुभव आहेत आणि त्यांचे मूळरूप चिंतनाला कारणीभूत असले तरी त्यावर कवयित्रीच्या रसिकतेचे, वाचनाचे, चिंतनशील वृत्तीचे संस्कार झाले आहेत आणि कलात्म कोंदणात अर्थपूर्ण शब्दबंधात ते सौंदर्यपूर्ण आणि आस्वाद्य झाले आहेत. ‘काजवा’, ‘उत्सव’, ‘जिव्हाळघरटे’, ‘शैशव’, ‘परिस’, ‘भान’, ‘जोगिया’, ‘शब्दाविना’, ‘स्वप्न’, ‘कृष्णमंजिरी’, ‘व्रतस्थ’, ‘तो गंधभारला’, ‘मन बहावा बहावा’..अशी या कवितांची नावे.
आपल्या कवितांच्या स्वरूपाविषयी शिल्पा चिटणीस लिहितात : ‘.. प्रत्येक कवितेला विविध पोत आहेत. जीवनानुभवाचे अनेक कंगोरे आहेत. विशेष म्हणजे एक समाजभान देखील आहे. अंतस्थ अनुभवांचे चित्रण आहे. काही मनात साचलेलं, काही रुतलेलं, काही भोगलेलं, तर काही हसत हसत स्वीकारलेलं. अशा जाणिवांना शब्दचित्रांतून साकारलेलं आहे, चित्रांना बोलकं करण्याचा आगळा वेगळा प्रयत्न केला आहे थोडाफार.’
आपल्या साहित्यकृतीसंबंधी लेखक काय म्हणतो या पेक्षा प्रत्यक्ष त्या साहित्यकृतीचे स्वरूप कसे आहे, कोणता अनुभव ती मांडते, त्यात जीवनातील अर्थवत्ता आणि व्यस्तता किती सूक्ष्मतेने टिपली आहे, तिच्यातून व्यक्त होणारे सामाजिक भान नेमके काय आहे, तिच्यात मानुषतेचे मूल्य कितपत व्यक्त झाले आहे, ती ज्या भाषेत बोलते ती कशी आहे, तिच्यातील प्रतिमांचे स्वरूप कसे आहे, हे सारे पाहिले जाते. यादृष्टीने या कवितांचे विश्लेषण करायला हवे.
कवयित्रीने आपल्या निवेदनात ‘एक समाजभान देखील आहे’ हे जे विधान केले आहे त्याचा प्रत्यय आणून देणारी ‘स्वप्न'(पृ.६७)ही कविता आहे. अलिकडच्या काळात स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी गरीब मुलं तिरंगी झेंडे घेऊन सिग्नलपाशी उभी राहून विकताना दिसतात. त्यावर होणाऱ्या उत्पन्नावर ते आणि त्यांचे कुटुंब गुजराण करीत असते. अशा मुलांना केंद्रस्थानी ठेऊन ही कविता लिहिली गेली आहे. हे एक चित्र आहे आणि ते तितक्याच कणवेतून उतरले आहे :
डोळ्यांत फडफडे त्याच्या
आर्त भूकेचे पक्षी
तो एक घोट चहाचा
ती घर्मबिंदूंची नक्षी
खुरटून गेले बालपण
बहर गळून गेलेले
स्वातंत्र्याचे निशाण हाती
जीवापाड जपलेले’
या दृश्यचित्रात त्या मुलाच्या गरिबीची, त्याच्या देशप्रेमची आणि कष्टाने कमावणाऱ्या वृत्तीची मन अस्वस्थ करणारी जाणीव व्यक्त होते. म्हणूनच-
‘उत्तरास मी शोधीत बसते
दाटून येते पोटी माया’
हे शब्द कवयित्रीच्या ठिकाणचा माणुसकीचा भाव स्पष्ट करतात.
गेल्या पन्नास वर्षांपूर्वीचे महाराष्ट्रातील समाजजीवन कसे होते याचे चित्रण ‘भान’ या कवितेत व्यक्त झाले आहे. उत्तर पेशवाईपासून साधारणत: एकत्र कुटुंबपद्धती, कृषिव्यवस्था, पहाटे उठून जात्यावर दळण दळण्याची पद्धत, तेव्हा घरातील तरुण सासुरवासिनी जात्यावर ज्वारी, बाजरी दळत असत आणि नंतर त्या भाकऱ्या करीत असत. हे काम करताना त्या आपल्या माहेराविषयीची सुखदु:खं एकमेकीशी बोलून आपलं दुःख कमी करीत असत. या स्त्रिया फिरणाऱ्या जात्याच्या तालावर परंपरेनं चालत आलेल्या आणि त्यांना मुखोद्गत असलेल्या ओव्या गात असत. इथे कवयित्रीने त्या स्त्रिया गात असलेल्या ओव्या आणि जातं यांचे अतूट नाते कल्पिले आहे आणि त्याचा सुंदर अनुबंध शब्दबद्ध केला आहे. चौथ्या कडव्यात विठोबाचा उल्लेख येतो आणि कविता एकदम विठोबा-जनाबाई संदर्भ घेऊन उंचावर जाते.
‘शैशव’ ही एक चिंतनशील कविता म्हणता येते. स्त्रियांच्या आयुष्यातील बालपणाचा काळ, त्यावेळचे मैत्रिंणींबरोबर झोपाळ्यावरील झुलणे, निष्पाप, निरागसपणे परस्परांशी हास्यविनोद करणे, एकमेकींना चिडवणे हे सारे कळत नकळत त्या त्या व्यक्तीच्या स्मृतिमंजुषेत साठवले जाते आणि पुढे तारुण्यावस्थेत वा प्रौढत्वी ते मनात जागे होते नि तो सारा भूतकाळ डोळ्यांसमोरून झरझर सरकतो. याला फारतर काहीजण नाॅस्टाल्जिया म्हणतील. पण तिथला त्यांचा हृद्य भावबंध प्रत्ययाला आल्यावाचून राहात नाही. कवयित्रीपाशी विलक्षण अल्पाक्षरी, चित्रमय शैली आहे आणि तिच्याद्वारे ही चित्रे एकेका कडव्यातून आपल्यासमोर साकारते. कसे ते या शेवटच्या दोन कडव्यांच्या आधाराने पाहा :
‘सुखदु:खाच्या कितीक गाठी
विणल्या होत्या गोफावरती
गोड गुपिते झोक्यासंगे
ओलीस होती झाडांवरती
सरले शैशव उडले अत्तर
घमघमणाऱ्या दिवसांचे
षड्ज वाजती मनात अविरत
आठवणींच्या झोक्याचे’
भारतीय समाजमानसात राधा आणि कृष्ण यांना असाधारण स्थान आहे. केवळ हे दोघेच नव्हे तर पेंद्या, सुदामा, गोप, गोपी, कालिंदी इतकेच नव्हे तर श्रीकृष्णाची बासरी किंवा त्याच्या गळ्यातील तुलसीमाला यांना महत्त्व आहे. ‘कृष्णमंजिरी’ या कवितेत कवयित्रीने हा पौराणिक संदर्भ अतिशय कल्पकतेने वापरला आहे..
‘जिव्हाळघरटे’, ‘परिस’, ‘जोगिया’, ‘शब्दाविना’, ‘व्रतस्थ’, ‘मन बहावा वहावा’ या कवितांमध्ये झाडांचे संदर्भ आणि चित्रण कधी थेट तर कधी अप्रत्यक्ष आलेले आहे.
निसर्गप्रेम हा शिल्पा चिटणीस यांचा अत्यंत आस्थेचा विषय आहे. त्यामध्ये वृक्ष या विषयावरील त्यांच्या कविता लक्षवेधक आहेत. विषय एक असला तरी त्यात व्यक्त झालेले दृष्टिकोन भिन्न आहेत. पण प्रत्येक कवितेतील आशय अतिशय तरल असून त्यातील सूक्ष्म तपशील भरण्याचे कवयित्रीचे कसब कौतुकास्पद आहे. आता ‘जिव्हाळघरटे’ ही कविता पाहा. ही कविता एखाद्या वृक्षाच्या फांदीची सुरक्षित जागा निवडून मग तिथे काडी काडी गोळा करून कलात्म, ऊबदार घरटे बनविणाऱ्या, त्यात अंडी घालून पिल्लांना जन्म देणाऱ्या, त्यांचे पुरेसे भरणपोषण करून, त्यांच्या पंखांमध्ये उडण्याचे बळ देणाऱ्या आणि शेवटी ज्या घरट्याच्या आधाराने तिचा संसार फुलला त्याला त्या वृक्षावर सोडून पिल्लांसह दूर जाणाऱ्या पक्षिणीचे चित्रण अत्यंत अल्पाक्षरी पण चित्तवेधक नि चित्रमय शैलीत इथे साकारण्यात आले आहे. निसर्गातील पक्षीवर्गाच्या सर्जनाचे हे सुखकर चित्र काढलेले.
‘परिस’ हे एका वृक्षाचे जणू आत्मकथनच. त्याचीच जीवनकहाणी त्याच्याच वाणीतून व्यक्त झालेली. त्याच्या विविध स्थित्यंतराची रेखीव चित्रे. ‘जोगिया’ ही कविता म्हणजे साक्षात पलाश वृक्षाचे चित्रण. दुर्गा भागवत यांनी त्यांच्या ‘ऋतुचक्र’मध्ये त्याचे अवर्णनीय दर्शन घडविले आहे. इथे कवयित्रीचा तसाच प्रयत्न दिसून येतो असेच काहीसे ‘व्रतस्थ’ कवितेविषयी म्हणता येते. बारकाईने पाहिल्यास हेही वृक्षाचे अंतरंगदर्शन आहे असे वाटत राहाते.
‘शब्दाविना’ ही कविता वाचकाला चकवणारी आहे. सुरुवातीला पक्षिणी शब्द आल्याने झाडाच्या फांदीवरून दूर गगनात झेप घेण्यास उत्सुक असलेल्या पक्षिणीचे हे अंतरंगदर्शन आहे असे वाटू लागते. त्यावेळचे तिच्या मनात उचंबळून आलेले भावकल्लोळ कवितेत शब्दबद्ध झाले आहेत. अर्थाचा एक सुंदर गोफ आपल्या मानसात निर्माण होतो. मग आपण हळूहळू कवितेच्या गाभ्याकडे सरकतो आणि लक्षात येते की ‘पक्षिणी’ ही प्रतिमा आहे. ऊबदार मायेच्या झुलीतून स्वत:ला सोडवून भविष्याकडे प्रयाण करण्याच्या पवित्र्यात असणाऱ्या ‘ती’चे हे मानसदर्शन. अशी दोन भिन्न अर्थवलये घेऊन ही कविता आपल्याशी संवाद साधते.
‘मन बहावा बहावा’ या कवितेत उन्हाळ्यात वर आकाशात सूर्य आग ओकीत असताना, रानावनात पलाशावर अग्नीच्या लोळांसारखी फुलं फुलत असताना, बगिच्यांमधून वा रस्त्याच्या कडेला शिरीष आपल्या नक्षीदार, नजाकतींनी सिद्ध फुलं अंगावर लेवून असताना, सोनमोहर आणि गुलमोहर फुलत असताना, आपल्या सर्वांगाने फुलणारा बहावा हा सर्वांचे लक्ष वेधून घेतो ते त्याच्या मोहक पिवळ्या फुलांनी. दारात बहावा फुलताना घरातल्या गृहिणीचे मनदेखील बहावासारखे प्रसन्न होऊन जाते. त्या गृहिणीची ही जी अवस्था होते त्याचे सुंदर, सुबक चित्रण ‘मन बहावा बहावा’ या कवितेत येते.
शिल्पा चिटणीस यांची कविता अल्पाक्षरी, अर्थगर्थ, नादात्म आणि प्रतिमांकित आहे. वरवर ती साधी, सरळ आणि कळायला सोपी वाटत असली तरी तिचा नूर वेगळा आहे. तिला चिंतनाचा, नाट्यात्मतेचा आणि सूचकतेचा स्पर्श आहे. समर्थ कवितेच्या खुणा या कवितेत पदोपदी जाणवतात…
पुस्तकाचे नाव – चित्रधून (कवितासंग्रह)
कवयित्री – राजश्री कुलकर्णी, शिल्पा चिटणीस, अनघा दातार, मंजिरी कुलकर्णी
प्रकाशक – संवेदना प्रकाशन, पुणे’
किंमत – १०० रुपये
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.