पुण्याच्या साहित्यदीप प्रतिष्ठान या संस्थेने डाॅ. प्रतिमा इंगोले यांना त्यांच्या एकंदर कथा लेखनाबद्दल कथादीप हा पुरस्कार दिला आहे. डाॅ. प्रतिमा इंगोले यांचे आतापर्यंत तेरा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्या प्रत्येकाला एकेक अथवा दोन ते तीन पुरस्कार मिळाले आहेत. तीन कथासंग्रहाला शासनाचे राज्य पुरस्कार मिळाले आहेत. हजारी बेलपान, अकसिदीचे दाने, हॅट्ट्रिक असे पुरस्कार मिळालेली कथासंग्रह आहेत. इतर संग्रह सुगरनचा खोपा, जावायाचं पोर, लेक भुईची, हिरवे स्वप्न, अंधार पर्व, अमंगल युग, उलटे झाले पाय, येळी माय, पजाया अशी आहेत. त्यांच्या कथांवर अनेकांना पीएच डी व एम फील मिळाली आहे. त्यांच्या कथा अभ्यासक्रमात आहेत. गढी कथा सध्या बारावीच्या अभ्यासक्रमात आहे. एसएनडीटी विद्यापीठात त्यांचा सुगरनचा खोपा अभ्यासक्रमात आहे. हा त्यांना मिळालेला एकशे अठ्ठावीसावा पुरस्कार आहे. या निमित्ताने डॉ. इंगोले यांनी व्यक्त केलेले मनोगत…
मायबापहो ! हा शब्द गाडगेबाबांचा. ते माझ्या तालुक्यातील. म्हणून मुद्दाम त्यांचे संबोधन वापरले. डाॅ. मिलींद जोशी व साहित्य दीप संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि इथे आवर्जून उपस्थित असणारे माझ्यावर लोभ करणारे सर्व स्नेही मंडळींना मनापासून धन्यवाद. स्नेह व ऋणपूर्वक प्रणाम. साहित्य दीप हे नाव मला आधीच आवडत होते. त्यांच्या एका कार्यक्रमाला मी उपस्थित होते. त्यात मी कथा सांगितली होती.आता कथादीप हे पुरस्काराचे नावही मला खूप आवडून गेले आणि असे वाटायला लागले की, या अंधारल्या युगात आपण कथेचा दीप हातात घेऊन हिंडतो आहे. किंवा संयोजकांनी त्याच उद्देश्याने आपणास हा पुरस्कार दिला आहे. आता हे खरे आहे की, माझी कथा दीप जरी नसली तरी इवली पणती होऊन नक्कीच तेजाळली आहे. बारावीच्या अभ्यासक्रमात सध्या माझी गढी नावाची कथा आहे. ती शिक्षकांना आणि संवेदनक्षम वयाच्या विद्यार्थ्यांना नीतिमत्तेचा उजेड नक्कीच देते आहे. ती प्रतिकात्मक कथा आदर्शाचे व संस्कृती व पर्यावरण रक्षणाचे मूल्यदायी संस्कार करते आहे.
त्यापूर्वी माझी सपन कथा अकरावीला होती. तिने तर महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्याचे मतपरिवर्तन केले होते. त्यांनी तशी पत्रे मला पाठविली होती. माझाच करंटेपणा की, मी ती पत्रे जपून ठेवू शकले नाही. पण काही निवडक संग्रही ठेवली त्याचा “वाचकवेचे” नावाचा संग्रह आता येतो आहे. मी जरी सर्वच वाड़मय प्रकार हाताळले तरी मला खरा सन्मान कथे नेच दिला आहे. माझी पहिली कथा तरुण भारत च्या मध्यमा पुरवणीतून प्रकाशित झाली आणि तिने मला सर्वात महत्वाचा सन्मान प्रदान केला, तो म्हणजे हजारो वाचकांशी माझे थेट नाते जोडले आणि हेच वाचक पुढे मला घडवत गेले. त्यांनी वाचकप्रियतेचा सन्मान मला दिला. याच तरुण भारतच्या कथास्पर्धेत मला पहिले पारितोषिक मिळाले. त्या पुरस्कार वितरण सोहळ्याने मला दीपवून टाकले. स्व. मधुकर केचे आणि स्व. मधुकर आष्टिकर त्या कार्यक्रमाला उपस्थित होते.
त्याचवेळी कथाकथन करायचे होते. माझ्या कथाकथनाच्यावेळी रसिकांनी धनवटे रंगमंदिर अक्षरशः डोक्यावर घेतले. पुढे या कथांचा संग्रह पुण्याच्या समाज प्रबोधन संस्थेने प्रकाशित केला. नंतर त्याला स्व. यशवंतराव चव्हाण राज्य पुरस्कार मिळाला, त्यावेळी भरसभेत शांताबाईनी या संग्रहाची तारिफ केली आणि मी भरून पावले. माझी कथाकार म्हणून महाराष्ट्राला ओळख झाली. हा हजारी बेलपान निखळ वऱ्हाडीतला पहिला कथासंग्रह आहे. पण माझ्या वऱ्हाडीच्या योगदानाची दखल जरी महाराष्ट्राने घेतली नसली तरी मला वाचकांचे उदंड प्रेम आणि योग्य निर्मितीचे सुख नक्कीच मिळाले.
माझा दुसरा कथासंग्रह “अकसिदीचे दाने “हा संग्रह १९८६ मध्ये प्रकाशित झाला आहे. हाही निखळ वर्हाडी तला कथासंग्रह असून ह्याने तर मला अक्षरशः जीवदान दिले आहे. ह्या कथासंग्रहात नऊ कथा असून, त्या कुठल्या ना कुठल्या विद्यापीठात अभ्यास क्रमात लागल्या होत्या. या कथासंग्रहातील गढी कथा सध्या बारावीच्या अभ्यासक्रमात आहे. या संग्रहाला राज्य पुरस्कार जाहीर झाला त्यावेळी मी मुंबईला नायर रुग्णालयात उपचार घेत होते. माझी स्थिती चांगली नव्हती. मन नैराश्याने ग्रासले होते. पुरस्काराचे वाचून मला महाराष्ट्रातून दोनशेच्यावर पत्रे आलीत. माझ्या मिस्टरांना कसे सुचले कुणास ठाऊक पण त्यांनी मला भेटायला आले तेव्हा ही पत्रे सोबत आणली आणि त्या एकेका पत्राने मला नैराश्याच्या खाईतून बाहेर काढले. मी नव्याने आयुष्याकडे पाहू लागले. मला जगण्याची उमेद मिळाली. हे कथेचे ऋण मी कधीच विसरणार नाही.
माझ्या प्रत्येकच कथासंग्रहाने माझ्या पदरी असे आगळे वेगळे पण अलौकिक दान टाकले आहे. पुरस्कार तर त्यांना मिळालेच आहेत. पण त्यांनी मला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. नाहीतर मी एक सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मालेली मुलगी. त्यातही लहानपणीच वडील वापरले.आईच्या वडिलांनी आधार दिला. त्यामुळे खेड्यात यावे लागले.तिथे ही कथा भेटली.कधी लोककथेच्या स्वरूपात तर कधी मजूर बायकांच्या गोष्टीत, तर कधी म्हातार्या आज्यांच्या कथनातून, पण या कथा माझ्या मनात ठसत गेल्या. त्यांनी माझ्या आयुष्याचे सोने केले. पुढे त्याच कथा म्हणून प्रगट झाल्या, मला वैभव देत गेल्या. त्यामुळे मी कथेची कायम ऋणी आहे. त्यामुळेच या पुरस्काराची धनी ग्रामीण स्त्री आहे. तसेच हा ग्रामीण स्त्री कथेचा सन्मान आहे.
आज पुरस्काराचे पेव फुटले आहे. तरी या कथादीप पुरस्काराने मला कृतार्थ केले आहे. कारण आयुष्याच्या उत्तरार्धात माझ्या एकूणच कथालेखनाबद्दल मिळालेला हा पुरस्कार आहे. एखाद्या कथासंग्रहाला नाही तर एकंदर कथालेखनासाठी हा पुरस्कार मिळाला आहे. म्हणूनच तो महत्त्वाचा आहे. निदान आज माझी कथा वाचली जाते आहे. याची ती साक्ष आहे. उद्या ती वाचली जाईलच याची खात्री नाही. कारण मराठी शाळा खटाखट बंद पडताहेत. त्यामुळे मराठी कोण वाचणार?अशावेळी या पुरस्काराने माझ्या हातात हा कथेचा दीप दिला आहे. तो पाजळत तर मला हिंडावेच लागणार? बघूया कितपत जमते ते! माझी नवी कादंबरी येते आहे “दास्तान” नावाची. तिच्या मनोगतात मी मराठी शाळा बंद पडताहेत याची खंत व्यक्त केली आहे. शेवटी सर्वांप्रती ऋण व्यक्त करून वाचकांसाठी व तुम्हासाठी ही कविता म्हणते.
कलत्या संध्याकाळी
मन सैरभैर असताना
अंधाराचे काळे पक्षी
अलगद खाली उतरताना
गडद काळोख अस्तित्व मिटवीत
दिशा दिशा व्यापताना…….
माती माणूस माणूसकी
सीमारेषा मिटवताना…..
हाती घ्यावी एक चूड
अंधाराला आव्हान देत
धावत निघावे चौखूर
ठिबकलेल्या साऱ्या वेदना
फेकाव्यात दूर दूर
प्रसवकळा सोशीत
प्रकाशाला जन्म द्यावा
तेव्हाच मग भान हरवून
उदयसोहळा भोगून ध्यावा…….
प्रतिमा इंगोले. ९८५०११७९६९
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.