माणूस म्हणजे दुसरे तिसरे काय एक भूतच ! फक्त अनेक लेबले लावून जगणारा. आगंतुक ‘ मी ‘ त्यातलाच एक. तो देखील स्वतःला यातलाच एक मानणारा. तरीही आपण कोणीच नसण्याच्या अस्तित्वशून्य असण्याच्या वयात वावरणारा मानतो. आणि शेवटी स्वतःच्या मनाचे समाधान मानून घेताना या सर्व लोककथा आहेत. दंतकथा आहेत. आपण सारी त्यातील पात्र आहोत.हजारो वर्षांपासून या लोककथांचे वाहक म्हणून आपण जगतो आहोत. शेवटी माणूस हेच सत्य. विज्ञान हेच वास्तव आहे.
प्रा. डॉ. संजय नगरकर
प्र. प्राचार्य
दादा पाटील महाविद्यालय, कर्जत
मो.९ ० ९ ६८७५७३७
मराठी कांदबरीला १६५ वर्षांची परंपरा लाभलेली आहे . “यमुना पर्यटन” या बाबा पद्मनजी यांच्या पहिल्या सामाजिक कांदबरीपासून सुरू झालेला मराठी कांदबरीचा प्रवाह पुढे तात्त्विक कादंबरी , पत्रात्मक कादंबरी , संज्ञाप्रवाही कादंबरी, प्रयोगशील कादंबरी, अशा नवे मापदंड निर्माण करणाऱ्या कांदबऱ्यांच्या माध्यमातून अखंडपणे वाहत आहे. वामन मल्हार जोशी, बा . सी . मर्ढेकर , भालचंद्र नेमाडे, विलास सारंग व श्याम मनोहर या कादंबरीकारांनी मराठी कांदबरीला नवे आयाम प्राप्त करून दिले . या परंपरेतील एक कादंबरीकार म्हणजे बाळासाहेब लबडे होत . ‘ “पिपिलिका मुक्तिधाम” सारख्या प्रयोगशील कादंबरीनंतर त्यांची “शेवटची लाओग्राफिया” ही प्रयोगशील कादंबरी आहे.
या कांदबरीच्या शीर्षकापासूनच सदर कादंबरीचे वेगळेपण सुरू होते . ग्रीक लोकसंस्कृतीत असलेले लोककथेचे प्राबल्य व त्याचा आधार घेऊन भारतीय परिप्रेक्ष्यात लिहिलेली “शेवटची लाओग्राफिया ‘ ही कादंबरी आहे. या कादंबरीचा घाट, तिची शैली व बिनचेहऱ्याच्या पात्रांची सरमिसळ याबाबतीत एक नवप्रयोग म्हणून या कादंबरीकडे पाहावे लागते. कादंबरीच्या रूढ घाटाला छेद देताना या कादंबरीने कथानकप्रधानता नाकारली आहे.
कादंबरीची सुरुवात ‘ मी ‘ च्या निवेदनाने होते. हा ‘ मी ‘ म्हणजे आत्मभग्न अवस्थेत कादंबरीभर डोकावणारी व्यक्तिरेखा.’ मी ‘च्या मनात सतत डोकावणारा उडता घोडा, त्याचे माणसासारखे मुख, लांबसडक केस, बुचकेदार दाढी, इंद्रधनुष्यी पंख,धीरगंभीर व बांधीव चेहरा व नीटस नाक आणि स्वतःला देवदूत म्हणून सज्जनांना न्याय देण्यासाठी आपण आलो आहोत, असे म्हणत लुप्त होणे. आत्मभग्न ‘ मी ‘ स्वप्नातून वास्तवात येणे अशा चित्रणाने कादंबरीची सुरुवात होते. एखाद्या दिव्यकथेतून वर्तमानात यावे त्याप्रमाणे आपणही वर्तमानात येतो; परंतु पुढे पुन्हा वर्तमानातून भूतकाळात व भूतकाळातून वर्तमानात असा येरझरा सुरू होतो.
‘ मी ‘ बरोबरच आपणा सर्वांचे जगण्याचे प्रश्न सारखेच आहेत. फक्त त्या प्रश्नांची जातकुळी वेगवेगळी आहे. आत्मभग्न ‘ मी ‘ स्वतःच्याच तंद्रीत जगणारा असला तरी भवतालच्या वास्तवाला आपल्या पुढ्यात ठेवत ठेवत तो जगतो आहे. जगाची सुरुवात सृजनाने होते व शेवट विनाशाने. त्याची साक्ष असणारे स्मशान कादंबरीत भेटते. कचऱ्याचा हक्काचा निवारा व जगण्याचा सहारा असलेले हे स्मशान ‘ मी’ च्या घरापासून हाकेच्या अंतरावर आहे. अनामिक प्रेताला कवेत घेऊन जळणारे हे स्मशान मानवी क्षणभंगुरतेचे प्रतीक आहे; परंतु हेच स्मशान , कचऱ्यासारख्या भणंगाच्या जगण्याचा आधार आहे.आत्ममग्न ‘ मी’ला कचऱ्याचा हेवा वाटतो, कारण भणंगहून भणंग असे जगणे ‘ मी’ च्या वाट्याला आले आहे. कधी कधी त्यालाही कचऱ्यासारखे प्रेतयात्रेवरून उधळलेले पैसे, प्रेताच्या राखेतून सापडणारे किडूक-मिडूक शोधून जगावेसे वाटते. पुढे येणाऱ्या भुताच्या गोष्टी, किरवंताचे पंचांग सांगणे, वसतिगृहात असताना बरोबरीच्या मित्रांना भुतांच्या नावाने संबोधणे, ही सर्व भुते म्हणजे विविध स्वभावाच्या वृत्ती-प्रवृत्तीच्या जातीच. हे भूतांचे संदर्भ व स्मशान, ग्रीक लोककथेतील ओलंपिक देवता व अपोलो, पायथिया, डॉल्फिन यांचे संदर्भ असा सर्व लोकमनातील प्राचीन परंपरेचा गुंता आत्मभग्न,’ मी’च्या मनात सतत निर्माण होताना दिसतो.
या आगंतुक ‘ मी’चा प्रवास साधा सरळ नाही. कधी स्वप्नातल्या घोड्याचे संदर्भहीन येणे, तर कधी अचानक अघोरी सदानंद लकडेच्या अघोरी उपचारा विरोधात अनिसची तक्रार, कधी विद्यापीठाच्या वसतिगृहातील मित्रांचा भुतावळी मेळा, तर कधी चंद्राच्या कलेने होणारे कालचक्राचे मोजमाप, कधी उत्सवात सजून जाणारे व सतत कात टाकणारे मायावी शहर म्हणजे मोठं भूतच वाटतं, तर कधी नीरव शांतता, निखळ सौंदर्याने नटलेले;परंतु अभावग्रस्त असलेले गाव यांच्यातील दरीत लोंबकळणारा मी, गावचाही नाही आणि शहराचाही नाही, अशी स्वतःची दोलायमान अवस्था व्यक्त करतो.कधी हा ‘ मी’ टोकदार तत्त्वज्ञानाची भाषा बोलतो, समाजवाद, भांडवलशाही, अंधश्रद्धा, देशविकास, ऋतुचक्र, कालमान मन आणि मानसशास्त्र , शहर आणि गाव , स्त्रीस्वातंत्र्य, अघोरी पंथ , साहित्य, धर्म, शिक्षण, राजकारण, देशभक्ती अशा एक ना अनेक धाग्या दोऱ्यांना उसवतो आणि अचानक भूतकथेत शिरतो जणू हे सारे जग हाच एक भूतखाना आहे. भुतावळ आहे.
माणूस म्हणजे दुसरे तिसरे काय एक भूतच ! फक्त अनेक लेबले लावून जगणारा. आगंतुक ‘ मी ‘ त्यातलाच एक. तो देखील स्वतःला यातलाच एक मानणारा. तरीही आपण कोणीच नसण्याच्या अस्तित्वशून्य असण्याच्या वयात वावरणारा मानतो. आणि शेवटी स्वतःच्या मनाचे समाधान मानून घेताना या सर्व लोककथा आहेत. दंतकथा आहेत. आपण सारी त्यातील पात्र आहोत.हजारो वर्षांपासून या लोककथांचे वाहक म्हणून आपण जगतो आहोत. शेवटी माणूस हेच सत्य. विज्ञान हेच वास्तव आहे. बाकी भूत,राक्षस वगैरे सर्व आपल्या मनोकल्पना; परंतु वास्तवात समोर वावरणाऱ्या वृत्ती – प्रवृत्तींना घेऊन जगणाऱ्या. विश्वाच्या प्रारंभापासून अंतापर्यंत कोणतीच लोककथा शेवटची नसते .प्रत्येक युगात प्रत्येक क्षणात नवे नवे रूप घेऊन जन्म घेते. विवेकाने तिला हाताळले पाहिजे हे सत्य कादंबरीच्या शेवटी सांगितले जाते.
कादंबरीत येणारा आगंतुक “मी” आणि त्याचे मध्ये मध्ये येणारे निवेदन व निवेदनाच्या ओघात आतला ‘ मी’ व बाहेरचा ‘मी’ या लंबवर्तुळात भेटणारी आई , कचऱ्या ,चौधरी सर, प्रा.कांबळे, गण्या, गायकवाड, सुन्या,चव्हाण, ढमाले मामा ,सुरेंद्र, नामदेव कानडे, गोविंद, सागर, मारुती, सोपान, खिलारे, विलास कदम, सर्जेराव, संदेश, दगडू ,केदार बाई, जित्या, बनसोडे ,चम्प्या कन्नमवार, समीक्षा मेलोरे, उणेकर सर, यादव सर, यशश्री घाटे, हनम्या, दिलबऱ्या, भंग्याचा चिरफाडया ,अघोरी नागा अशा एक ना अनेक व्यक्तिरेखा कादंबरीत येतात. परंतु त्या संदर्भापुरत्याच. आगंतुक ‘ मी’च्या ‘ लायोग्राफिआ’ यामधील ही पात्रे बिन चेहऱ्याची आहेत. त्यात ‘ मी’ ची आत्मभग्नता मिसळून जाते. कथानक नाही. सरळ सरळ एकसाची निवेदन नाही. निवेदनात देखील ‘ मी ‘ च्या आत्मनिवेदनाकडून ‘ पर’चा अलिप्ततेचा कॅलिडोस्कोप केल्यासारखे वाटते.
भाषेचे केलेले अनेक प्रयोग म्हणजे “मी” च्या कोलांटउड्या असल्यासारखे वाटते. केवळ भाषाशैलीच्या अंगाने जरी या कादंबरीचा विचार केला तरी ते कादंबरीचे शक्तिस्थळ ठरेल. प्रतीके, प्रतिमा, लोकगीते, काव्यमय शैली, विज्ञान भाषा, बोलभाषा, कोड्यात टाकणारी संदिग्ध भाषा, प्रमाणभाषा, तत्त्वज्ञानाची भाषा, असे एक ना अनेक भाषिक प्रयोग कादंबरीत केलेले आहेत. उदा. “आसमंताच्या कपाळावर धुराचा मळवट भरला जात होता” (पृ.८ )”शून्य हा कायम शून्य राहत नसतो.काळ आणि वेळ स्थिर राहिलेली कुणी पाहिली आहे का?” ( पृ.१२ ) ” माझ्या इच्छा या वेगाने धावत आहेत.त्यांना मला खुंट्याला बांधून ठेवायचे आहे”( पृ.१४ ) ” संबळांग…. बंबळांग….वाजत होतं…. दिमडी घुमत होती…. दिमडी हलत होती…. मुरळी नाचत होती .” ( पृ.१७ )”शहर माणसाला पोटाला देतं.गाव वेशीवर आपली अब्रू टांगतं. बिगारी म्हणून घडवतं” (पृ.२७ )” जन्माला येणारा जीव एकटाच येत असतो.आणि एकटाच जात असतो” (पृ.२७ )”मी जिथे उभा आहे आणि मी जिथे उभा नाही, त्यात अंतर आहे”(पृ.२९) ” माणूस जन्माला येतो, तेव्हा फक्त टिंबच असतो” (पृ.५०), ” भयकारी वातावरण व्यवस्थेची देन असते” (पृ.५९ )अशा एक ना अनेक उदाहरणातून कादंबरीतील शैलीविषयक प्रयोगांचा वेध घेता येईल.
उडत्या घोडयाचे मिथक व देवदूताची दंतकथा , भूत पिशाच्चाच्या प्रवृत्तीनुरूप जाति- प्रजाती , कॅलिडोस्कोपसारखी “मी” च्या मनाची विविध रूपं , आगंतुक व्यक्तिरेखेचं मध्येमध्ये आगंतुकपणे उगवणं व आत्मनिवेदन करणं , भारतीय लोकसंस्कृतीतील कथारुपांना उजाळा देणं , आत्ममग्न मी ‘ चं शून्यवत जगणं , स्पेस अँण्ड टाईमचं गणित , त्यातील दुनियेचा कोलाहल , स्मशानातल्या कचऱ्याचं भणंगपण , दावडीच्या खंडोबाचा लोकोत्सव , शहर आणि गाव यातील द्वंद्व , विद्यापीठाच्या वसतिगृहातील नॉन अँकेडेमिक वातावरण व सवंगडयांच्या वृत्ती प्रवृत्तीप्रमाणे दिलेली भुतांची नावे व त्यांच्यातही असलेल्या जाती -प्रजाती मध्येमध्ये स्वप्नात डोकावणारा पंखवाला घोडा व वसतिगृहातल्या मित्रांच्या कथांच्या लोककथा , मध्येच येणारे राजकीय भाष्य व समकालीन वास्तवातले उभे आडवे धागे , चंद्राच्या कला व त्यानुसार पडलेले मराठी महिने , मानवी मनातील आभासी भीती , प्रेमपत्रातील प्रतीकात्मकता , जागरण गोंधळाच्या वेळी उचलली जाणारी तळी , उखाणे , कोडी यांचे शैलीप्रयोग , भांडवलशाही व समाजवाद यातील द्वंद्व , भोगवाद व चंगळवादी वृत्ती , पायाळू माणसाविषयीचं लोकमत , वेताळाची पालखी , घुबडाविषयीचे लोकसंकेत , शरपंजर देह व कवटी असलेला प्राणी म्हणजे माणूस व त्याचे कवटीपुराण , साती आसराची लोककथा , इस्लाम धर्मीय प्रेषित व शारिअतची संकल्पना , वैदिक धर्मातील अद्वैत भाव व षड्रिपू , आगंतूक व्यक्तिरेखेची दोन मने ( एक आतले व एक बाहेरचे ) , कालपुरूष , कालसर्प , ‘ “मी ‘ चे रितेपण , ग्रीक लोककथेतील विश्वनिर्मितीची संकल्पना , तमाशाची भाषा , येशू ख्रिस्त व त्याचे दहा प्रेषित , आगंतुक व्यक्तिरेखेचं निवेदन संपता संपता वर्तमानात आणून सोडलेले सूत्र, अशा अनेक कोलांटउडया मारीत ही कादंबरी पूर्ण होते.
कादंबरीच्या पांरपरिक संकल्पनेला धक्के देताना वाचकांच्या आकलनक्षमतेची परीक्षा पाहणारी ही कादंबरी शेवटी मानवी जीवनातील निरर्थक झगडयाशी व शून्याने सुरू होणाऱ्या शून्यवत विश्वाच्या निर्वात पोकळीतील काने कोपरे धुंडाळत आपणास लोककथेजवळ आणून सोडते . आपले जीवनही एक लोककथा असल्याचा संदेश ही कादंबरी देते. मराठी कादंबरीला नवा आयाम प्राप्त करून देणारी कादंबरी म्हणजे “शेवटची लाओग्राफिया” ही कादंबरी होय.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.