October 14, 2024
book-review-of Dakal Bedakah shivaji satpute poetry collection
Home » Privacy Policy » तरल प्रतिभेद्वारे रसिकांना भूरळ घालणारा कवितासंग्रह
मुक्त संवाद

तरल प्रतिभेद्वारे रसिकांना भूरळ घालणारा कवितासंग्रह

एकंदरीत एकापेक्षा एक सरस अशा काव्यरचनांमधून कवीने आपल्या तरल प्रतिभेद्वारे रसिकांना अक्षरक्षः भूरळ घातलीय. शब्दप्रतिभेचे अनुपम लेणे लेवून कवीने काही कविता खूप सजवल्यात तर काही कवितेतून त्याची शब्दवीज अक्षरक्षः कडाडलीय व त्याद्वारे त्याने आजच्या समाजव्यवस्थेवर तीव्र प्रहारही केलेत.

सौ.शगुफ्ता शेख (हुंडेकरी)

करमाळा. जि. सोलापूर.

कविता ही कवीच्या अंतर्मनाचा आविष्कार व कवीचं प्राणतत्व असते. त्यामुळे कवीच्या अंतर्मनात शब्दांचे फुटलेले, उफाळलेले कारंजे कवीने आपल्या प्रतिभेचा गाभारा उजळवत ठेवून रसिकांच्या झोळीत हा काव्यसंग्रह अर्पण केला जातो. कोणत्याही कवीची अद्वितीय कलाकृती ही त्याने भोगलेल्या मृत्यूकळांचा सुंदर आविष्कार असते अगदी त्याचप्रमाणे वाचन, चिंतन, प्रगल्भता, अनुभव आदींचा संग्रह म्हणजे कवी शिवाजी सातपुते यांचा काव्यसंग्रह होय.

मंगळवेढ्याचे प्रसिद्ध कवी शिवाजी सातपुते यांचा दखल – बेदखल काव्यसंग्रह आवर्जून वाचला. काव्यसंग्रहामधील प्रत्येक काव्यरचना अतिशय साधे, सोपे पण तितकेच मौल्यवान वाटले. कमीतकमी शब्दांमध्ये जास्तीत जास्त गर्भितार्थ सांगणाऱ्या त्यांच्या सर्व कविता आहेत. एक कविता वाचली आणि शेवटपर्यंत वाचतच गेले अगदी अधाशासारखी …! आणि वाटले आपल्या परीने आपण या काव्यसंग्रहाबद्दल लिहावे.

या काव्यसंग्रहाला महावीर जोंधळें सारख्या ज्येष्ठ साहित्यिक तथा पत्रकार यांची प्रस्तावना लाभलीय आहे. यावरूनच त्याची उंची कळते. या काव्य संग्रहातील माती नाती जाणावी या काव्यातून काळजीचा वणवा उरी पेटवून अंतरीच्या आठवणीतील मोरपिसे जपणारी आई (सासू) तिचे एकांतवासी अबोल हृदय, कंठात रुतलेल्या वेदना प्रकट करते. तर यंत्रवत या कवितेतून आजची स्त्री जिच्यासाठी करियरच्या नावाखाली प्रगतीचं एक कवाड उघडं झालं खरं, पण सुपरवूमनचा रोल करता करता तिला तिच्या संसाररूपी यज्ञात त्यागाची आहूती टाकतच राहावी लागते आणि त्यासाठी तिला प्रसंगी आपले मूल देखील पाळणाघरात ठेवावे लागते ही तिची व्यथा कवीने अगदी कळकळीने मांडलीय.

आकाल या कवितेतून देशाची खरी व्यथा सांगताना कवीने सध्याच्या कंगाल जनतेला आधार पाहिजे आणि अशी साथ देणारं असली सरकार हवं आहे हे

ना संसद खतरेमें है,
ना धर्म खतरेमें है ,,
यहाँ गाँव गाँवमें,
रोटी खतरेमे है ।
या ओळीद्वारे सध्याच्या राजकीय व्यवस्थेवर जोरदार प्रहार केला आहे.

तर कोरोनाकाळात शाळा बंद असल्यानं विद्यार्थ्यांचा किलबिलाट, त्यांचे हसरे चेहरे , आनंददायी शिक्षणातील त्यांचा प्रतिसाद हे सगळं मावळल्यानं गुरुजींच्या मनाची झालेली भयाण अवस्था , हृदय भरून आणणारी कळकळ आणि विद्यार्थ्यांची शाळा सुरु होण्याविषयीची हुरहुर, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील प्रेमानं आणि आदरानं सांधलेल्या नात्याची आठवण आमची शाळा कुठं हाय या कवितेद्वारे करून दिलीय.

न विझणारे, न शमणारे धगधगते धर्मकुंड पेटवून देऊन त्या कुंडात सर्वसामान्यांना तडफडवणाऱ्या , लोकशाही विकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना ‘धर्मांध कुठले ‘ असे संबोधून कोण आहेत ही माणसे या कवितेद्वारे कवीने त्यांना जोरदार चपराक लगावली आहे तर ‘बदलली सारी माणसे, बदलले सारे गाव, उरले फक्त गावाचे सांगण्यापुरते नाव ‘ याप्रकारे जुन्या आठवणींमधला जिव्हाळा कवीने आमच्या काळात असं नव्हतं या कवितेद्वारे वाचक रसिकांपर्यंत पोहचवलाय.

मत ‘दान ‘ करा या कवितेतून निवडणूकीच्या धुंदीत फायदा किंवा वायदा न पाहता निर्लोभी भावनेतून जाणकारपणे मत ‘दान’ करण्याचे आवाहन कवी मतदारांना फार चाणाक्षपणे करतो तर तवा माणूस माणसात हुता या कवितेद्वारे पूर्वीच्या माणसांशी तुलना करून आजच्या वरून तुडूंब भरून साचत चाललेल्या आणि आतून मात्र आटत चाललेल्या, भिंतीमधे घुसमटलेल्या माणसाची स्थिती आणि त्याच्या मुखवट्यामागचे भेसूर चेहरे उघडे पाडतो.

एकंदरीत एकापेक्षा एक सरस अशा काव्यरचनांमधून कवीने आपल्या तरल प्रतिभेद्वारे रसिकांना अक्षरक्षः भूरळ घातलीय. शब्दप्रतिभेचे अनुपम लेणे लेवून कवीने काही कविता खूप सजवल्यात तर काही कवितेतून त्याची शब्दवीज अक्षरक्षः कडाडलीय व त्याद्वारे त्याने आजच्या समाजव्यवस्थेवर तीव्र प्रहारही केलेत.

या कवितासंग्रहामधील कवितांची भाषा समजण्यास अत्यंत सोपी, सुस्पष्ट अक्षरे , अक्षरांचा योग्य फाँट अशा आभूषणांनी संग्रहाचे रुप अधिकच खुललेय. एकंदरीत कवी शिवाजी सातपुते यांच्या या शब्दसरींमधे रसिकांना चिंब भिजायचे असेल तर रसिक वाचकांनी आणि नव्या पिढीने तर हा काव्यसंग्रह आवर्जून वाचला पाहिजे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading