April 16, 2024
Book Review of Kalokhache Kaidi by Ambadas Kedar
Home » सामाजिक वास्तवाचे सशक्त चित्रण: काळोखाचे कैदी
मुक्त संवाद

सामाजिक वास्तवाचे सशक्त चित्रण: काळोखाचे कैदी

1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे पण स्वातंत्र्य मिळूनही दलितांचे प्रश्न सुटलेले नव्हते. त्यांच्या वरचा अन्याय दूर झालेला नव्हता. त्यांच्या वाट्याला आलेले दुःख, दारिद्र्य, जीवनानुभव हे इतरांपेक्षा वेगळे होते. प्रत्येकाला आर्थिक, सामाजिक,आध्यात्मिक संधी मिळावी अशी बाबासाहेबांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी दलितासाठीचा लढा उभा केला. त्यामुळे दलित चळवळ उदयाला आली.

अंबादास केदार
मु.पो.देउळवाडी ता.उदगीर, जि.लातूर
मो.9604354856

अलीकडच्या कालखंडात मराठी साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कथा, कादंबरी, आत्मकथनाबरोबरच कविताही लिहिल्या जाऊ लागल्या. जीवन जगत असताना जगण्याच्या वास्तवासोबत सामान्य माणसांचा प्रश्न आणि समस्या याचे चिंतन कवितेच्या माध्यमातून अभिव्यक्त होताना दिसू लागले. त्यात दलित कवितेनेही मराठी साहित्यात मोलाची भर घातली आहे. जसे दलित कथा, कादंबरी आणि आत्मकथनाने मराठी साहित्याला योगदान दिले आहे. तसेच योगदान दलित कवितेनेही मराठी साहित्याला दिले आहे. एकूणच, दलित साहित्यामध्ये दलित कवितेचे योगदान अधिकत्तर आहे .खऱ्या अर्थाने दलित कविता जितकी उत्कट तितकीच चिंतनशील सुद्धा आहे.

दलितांचे जीवन हे इतराहून वेगळे होते. त्यामुळे दलित साहित्यातून दलितांचे जीवन सर्वसामान्य लोकांच्या प्रत्ययाला आणण्यासाठी प्रयत्न झाला. आणि त्यातूनच दलित साहित्याची निर्मिती झाली.
1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे पण स्वातंत्र्य मिळूनही दलितांचे प्रश्न सुटलेले नव्हते. त्यांच्या वरचा अन्याय दूर झालेला नव्हता. त्यांच्या वाट्याला आलेले दुःख, दारिद्र्य, जीवनानुभव हे इतरांपेक्षा वेगळे होते. प्रत्येकाला आर्थिक, सामाजिक,आध्यात्मिक संधी मिळावी अशी बाबासाहेबांची धारणा होती. त्यामुळे त्यांनी दलितासाठीचा लढा उभा केला. त्यामुळे दलित चळवळ उदयाला आली. हीच चळवळ दलित साहित्याच्या उगमास कारणीभूत ठरली.

स्वातंत्र्यानंतर प्रजासत्ताक शासनपद्धतीचा स्वीकार केला गेला. त्यामुळे दलितांना वस्तुस्थितीचे भान प्राप्त होऊ लागले. त्यांच्यात जाणीव जागृती निर्माण होऊ लागली. आणि तेथूनच ते बंड करायला लागले. ते आपल्या हक्कापायी लढू लागले. मग ते लेखनाच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यांना इतरांच्या जीवनात व आपल्या जीवनात फरक जाणवू लागला. आपणही इतरांसारखे आहोत, आपणही माणूसच आहोत अशी जाणीव त्यांना होऊ लागली. समाजात आपले स्थान कोणते आहे? याचा ते शोध घेऊ लागले. त्यातूनच ते साहित्याच्या निर्मितीकडे वळले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या विचाराने प्रेरित होऊन दलित समाजातील दुःख, वेदना, आक्रोश ते साहित्यातून मांडू लागले. असे असले तरी मराठवाड्यात आंबेडकरी चळवळ फार उशिरा पोहोचली. त्याचे कारणही तसेच होते. कारण निजामाच्या राजवटीतून परिवर्तन करू पाहणाऱ्या समाज सुधारकावर बंदी घातली होती. परंतु बाबासाहेबांच्या आणि महात्मा फुले यांच्या विचाराने प्रभावित झालेला तरुण आपोआपच शिक्षणाकडे आकर्षित झाला. तो शिक्षण घेऊ लागला आणि हाच शिकलेला तरुण जीवनातील दहाक अनुभव घेऊन कवितेच्या रूपाने शब्दबद्ध होऊ लागला. आणि एक नवा आयाम घेऊन तो कविता लिहू लागला.

मराठवाड्याच्या मातीत पहिल्यांदा हरिहरराव सोनुले यांच्या कवितेने पाय रोवले. इथल्या जुन्या, बुरसटलेल्या विचाराला मोठा माती देण्याचे काम केले. त्यानंतर वामन निंबाळकर, त्र्यंबक सपकाळे, प्रा. यशवंत मनोहर, प्रा. हरिश्चंद्र हडसनकर, राम दोतोंडे या कविंनी दलित समूहाच्या अनुषंगाने आपली बाजू मांडली. त्यानंतर दु. मो. लोणे, भगवान सवई ,शरणकुमार लिंबाळे, प्रा. परशुरामेकर, भुजंग मेश्राम ही पिढी उदयास आली. आणि समाजात होणारे बदलाचे चित्रण ते करू लागले. दलित कवितेच्या परंपरेतील किशोर घोरपडे, वामनराव जगताप, जगन्नाथ कांबळे याचबरोबर अर्जुन वाघमारे, जी. जी.कांबळे, नागोराव उत्तकर, सुरेंद्र नाईक, महादेव कांबळे, लक्ष्मण दांडेकर, अशोक कुमार दवणे, शिवाजी जवळगेकर, राजेंद्र कांबळे या कवींनी वास्तव जीवनाचे रोखठोक चित्रण केले.

सामान्य माणूस संघर्षाची एक नवी परिभाषा घेऊन जगत असतो. अशा संघर्षाची परिभाषा घेऊन जगत असलेला जळकोट तालुक्यातील केकतसिंदगी या छोट्या गावचा सक्षम कवी म्हणून अंकुश सिंदगीकर यांच्याकडे पाहता येईल. मराठी दलित कवितेच्या प्रांतात नव्याने दाखल झालेला “काळोखाचे कैदी “हा त्यांचा चवथा कवितासंग्रह. आजही खेड्यात जाती – पातीच्या नावाने बाटाबाट, अस्पृश्यता पाहावयास मिळते. खेड्यात दलितांना देवळात प्रवेश नाकारला जातो. याचा खेद व्यक्त करीत हा कवी दलित काव्य प्रांतात स्वतःची पायवाट निर्माण करताना दिसतो. त्यांच्या ” काळोखाचे कैदी “या कवितासंग्रहातील काही कविता ह्या प्रामुख्याने विचार गर्भ कविता आहेत. त्या विचार मंथनातून समाज मनाचा तळ ढवळून काढणाऱ्या कविता आहेत. जीवन जगत असताना माणसांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. हा सामना करता – करता वास्तवाचे भान ठेवून परिवर्तनवादी विचार व्यक्त करताना हा कवी दिसतो. एवढ्यावरच तो थांबत नाही तर तळागाळातील माणसांच्या दुःखाचे आणि दारिद्र्याचे चित्रण करीत देव, देश, धर्म, जाती यावर घणाघाती प्रहार करतो.

अंकुश सिंदगीकर हा कवी बाबासाहेबांच्या विचाराने भारावलेला कवी आहे. म्हणून त्यांच्या लेखणीत लढण्याची आणि भिडण्याची भाषा येते .’विकास कशात मोजू ?’या कवितासंग्रहातील ही पहिलीच कविता अनेक प्रश्न उपस्थित करून जाते. हे स्वातंत्र्या तुझा विकास कशात मोजू? असे प्रश्न विचारत कवी संताप व्यक्त करताना दिसतो. ज्या ठिकाणी कुत्रे, मांजरे ,गाढव ,पाणी पीत होते परंतु अशा ठिकाणी माणसासारख्या माणसांना मात्र पाणी पिता येत नव्हते. अशा चवदार तळ्यासाठी बाबासाहेबांनी लढा उभा केला. हा लढा पाण्यापुरता मर्यादित नव्हता तर तो मानवी मूलभूत हक्कांच्या चळवळीची सुरुवात होती. पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या बाबासाहेबांचा हा कवी अनुयायी आहे.

“कुत्रे मांजर पाणी पिती तळ्यामधधी
भीम एकटाच लढला माझा रणामधी”

विकासाच्या आड येणाऱ्या प्रवर्तिला मोडून काढले पाहिजे .आम्ही किती दिवस गुलामीचे घाव सोसावेत. ज्यांनी ज्यांनी आमच्यावर जुलुम केले त्यांना आता आळा घालायचा आहे म्हणूनच कवी अंकुश सिंदगीकर तमाम गाव कुसाबाहेरील माणसांना आव्हान करताना दिसतात.

“गुलामीचे घाव किती सोसावे आता
सळसळणारे रक्त तुझे नाव त्या वैऱ्याला
भिड अन्यायाला आता “

अंकुश सिंदगीकरांची कविता जशी स्वातंत्र्याचे स्वागत करते. तशीच ती माणुसकीच्या संघर्षासाठी रणांगणात उतरणारीही आहे. सामाजिक न्यायासाठी आणि शोषित पिढी त्यांच्या संघर्षासाठीही आवाहन करणारी आहे. समाज व्यवस्थेच्या चक्रात सापडलेल्या माणसांचे हृदयस्पर्शी भयान चित्र मांडताना कवी समतेच्या वाटेने जायला सांगतो.

“सारे मिळून जाऊया समतेच्या वाटेनं
एकजुटीच्या रथाला पुढे नेऊया एकीनं”

दलितांना इथल्या संस्कृतीने माणूस म्हणून कधी स्वीकारले नाही. त्यामुळे इथल्या संस्कृतीने नागवल्या गेलेल्या देशात कवीने माणुसकीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु इथे माणुसकीचा शोध लागला नाही. उपेक्षाच वाट्याला आली .याचा परिणाम कवी मनाला झाल्याने कवीच्या तोंडून क्रांतीची भाषा येऊ लागली. उद्याच्या समाज रचनेसाठी क्रांतीचे गीत गाऊ लागला.

“दोस्तहो उठा आता सज्ज व्हा
क्रांतीचे गीत गा
काळोखाच्या चिखलात
रुतण्यापूर्वी युद्धाला सामोरे जा!”

तसे पाहिले असता विषम व्यवस्थेच्या विरोधात जाऊन लिहिणं हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. परंतु या व्यवस्थेला आव्हान देणाऱ्या व्यक्तिरेखा अंकुश शेंदगीकरांनी त्यांच्या कवितानमधून उभ्या केलेल्या आहेत. समतेचा विचार पेरायचा असेल आणि तो अमलात आणायचा असेल तर पारंपारिक धारणेवर प्रहार केल्याशिवाय गत्यंतर नाही .अशा या व्यवस्थेत समतेचा विचार पेरणे हे मोठेच आव्हान आहे .ते आव्हान कवी स्वीकारताना दिसतो अशा अवस्थेत तो पाय रोवून उभा राहायला सांगतो.

“व्यवस्थेला आग लावणार हाय
पाय रोवून उभा रहा
अन्यायाच्या छातीवर”

बाबासाहेबांच्या विचाराने उभी राहिलेली चळवळ आज थंडावलेली दिसते .त्याचे कारणही तसेच आहे. नेते खंडीभर आणि काम करणारे कार्यकर्ते मात्र मुठभर अशी अवस्था झालेली आहे. चळवळीची अशी वाताहात झालेली कवीना सहन होत नाही. बाबासाहेबांच्या नंतर त्यांच्या अनुयायांनी दलित चळवळीचे कसे तीन – तेरा केले यावर त्यांनी सूचकतेने भाष्य केले आहे. कार्यकर्ता जिवंत तर चळवळ जिवंत राहते अशी धारणा कवीची आहे.

“बाळसेदार चळवळ
आज मुरझून गेली
ते त्याला कंटाळून
कार्यकर्ते पसार झाले”

दलित समाज संघटित झाला पाहिजे. बाबासाहेबांनी चालू केलेला लढा पुढे नेला पाहिजे. असा विचारभाव “संविधान म्हणाले “या कवितेत मांडला आहे.

तसे जर बघितले तर अंकुश सिंदगीकरांची कविता समाजाचं प्रातिनिधिक दर्शन घडविते. ती पेटून उठू इच्छिते.” काळोखाचे कैदी” या त्यांच्या कविता संग्रहामध्ये दलित समाजातील दुःखीतांच्या तमाम छटा व त्यातून मुक्त करणाऱ्या वाटा कवी अधिक अधिक स्पष्ट करीत जाताना दिसतो. इथला जातीचा, धर्माचा विचार पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करून नंतर तिथे माणूस हा माणूसच असावा. तो गुलामीत राहू नये. विषमता नष्ट व्हावी आणि सर्वांना समानतेने व बंधुभावाने वागविले जावे असा मानवतावादी विचार त्यांच्या कवितेतून दिसतो .अन्यायाशी लढत ,न्याय मिळेपर्यंत मातीलाही पेटवणारा हा कवी माणुसकीच्या अथांग महासागराची आशा करतो.

“जमलंच तर एक कर
अन्यायाशी लढत रहा
न्याय मिळेपर्यंत
मातीलाही पेटवत जा…”

परिवर्तनाचे स्वप्नं अंकुश सिंदगीकरांच्या कवितेच्या मुळाशी आहे. त्यांच्या या कवितासंग्रहातील अनेक कवितेतून समाज परिवर्तनाची उत्कट तळमळ दिसून येते. कारण बदलावर त्यांचा विश्वास आहे. विद्रोहाच्या जाणिवेबरोबरच अत्यंत संयमपणे “ती म्हणाली”या कवितेत ते व्यक्त होतानाही दिसतात. त्यांच्या कवितेतून आंबेडकरवादी जाणीवांचे एक रसायनच आढळते. स्वातंत्र्य प्राप्ती नंतरच्या राजकीय, सामाजिक स्थितीचा उदाहरण उपहास त्यांच्या अनेक कवितातून आढळतो. आंबेडकर -फुले यांचे समतेचे स्वप्न उराशी बाळगून स्त्री स्वातंत्र्यावर प्रकाश टाकणारी आणि एक परिवर्तनवादी विचार मांडणारी नव्या वळणाची “बुद्ध आणि मार्क्स”ही कविता.

अंकुश सिंदगीकर यांच्या कवितेत माणूस ,माणुसकी, राजकीय नाकर्तेपणा, मानवी मूल्ये ,संघर्ष, व्यथा वेदना आणि विद्रोह यांचा शोध ती घेते. माणसाला माणुसकीची किंमत असावी, विषमतेला थारा नसावा, सर्वांना समान न्याय मिळावा अशी अपेक्षा बाळगून तो पेटूनही उठतो.

“म्हणून म्हणतोय भावांनो
उठा आणि पेटवा मशाली
उजळू द्या दाही दिशा
देश वाचवण्यासाठी”

एवढेच नाही तर माणुसकी जपली पाहिजे. जोपासली पाहिजे. याचे भान आणून देण्याचे काम हा कवी करतो. एकोप्याने राहिले तरच माणुसकी जोपासली जाईल अशी आशाही कवी व्यक्त करतो. आशावादी दृष्टिकोन ठेवताना तो म्हणतो.

“माणुसकीचे बीज आपण
या भूमीत पेरू या”

बुद्धाचे पंचशील हे मानव जातीच्या विकासाला चालना देणारे आहे. तो बुद्ध माझ्या हृदयात कोरला आहे. बाबासाहेबांच्या विचारा सोबत बुद्धाचाही विचार पेरला पाहिजे. तो हृदयात कोरला पाहिजे हे सांगायला ते विसरत नाहीत.

“भीम बुद्धांच्या साक्षीने
पंचशिल ग्रहण केले
कोरले घरावर अशोक चक्र
मी बुद्ध हृदयात करून घेतले”

सत्तेचा आणि अहिंसेचा मार्ग आपण कितीही चोखाळलो तरी हिंसेची वृत्ती अजून गेली नाही .अजून जाती-पातीच्या नावावर हिंसा घडत आहेत .आणि पैशाच्या जोरावर कायदा येथे विकला जात आहे अशी खंत व्यक्त करताना कवी म्हणतो.

“इथली हिंसेची वृत्ती
कधी संपत नाही
कायदा कितीही कडक असू दे
कलम होते पैशापुढे लीन…”

समाजातील अनेक प्रश्नांनी चिंतित झालेल्या मनाचे दुभंगलेपण आणि वैफल्यग्रस्तता यातून व्यक्त होते.

या कवितासंग्रहात कवीच्या वाट्याला आलेल्या वेदनांचे आविष्करण तर आहेच. पण समाजाकडून पोळलेले कवीचे मन, निरक्षणदृष्टी आणि त्या वेदनांना शब्दबद्ध करण्याची शैली अनोखी आहे. कमीत कमी शब्दात आशयपूर्ण विषयाची मांडणी अंकुश सिंदगीकर यांच्या कवितेत दिसून येते. कवी यांची भूमिका सुस्पष्ट अशीच आहे. त्यातून ते स्वतःच्या सजग संवेदनशीलतेची ग्वाही देतात. माणसा माणसात जातीच्या भिंती उभ्या करून अमानवी जीवन, पशुतुल्य जीवन लाधणाऱ्या क्रूर व विषमवादी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवीत हा कवी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्त्वज्ञानाचा पुरस्कार केलेला दिसतो. तो उपेक्षित वंचित समाजालाही आंबेडकरी विचाराची दृष्टी देतो. ग्रामीण जीवनातील चाली, रीती, मागासलेपणा, देवधर्मावरील श्रद्धा ,अंधश्रद्धा ,दारिद्र्य यांच्या व्यथा -वेदना यांची तो बेधडकपणे मांडणी करतो. जाचक रुढी,परंपरा, भ्रष्टाचार आणि शोषणावर लक्ष केंद्रित करून डॉ. बाबासाहेब यांचा मानवमुक्ती विचारांच्या प्रेरणा हा कवी देतो.

प्रेमासाठी किंवा मनोरंजनासाठी त्यांच्या कविता जन्माला येत नाहीत, तर त्या प्रबोधनाचा विचार मांडून प्रस्थापित शोषित व्यवस्था बदलून टाकण्यासाठी, इथल्या व्यवस्थेला प्रश्न विचारीत जीवनाचा तळ शोधणारी त्यांची कविता आहे. माणुसकीची थट्टा करणाऱ्या प्रवृत्तीचा वेध घेत -घेत हा कवी माणसाला जवळही करतो. माणुसकी जपली पाहिजे, जोपासली पाहिजे याचे भान तो आणून देतो. वर्तमानाला सामोरे जाण्यातूनच भविष्याची दिशा मिळणार आहे. त्यामुळे परिस्थितीच्या अवघडलेपणात अवघडून बसण्यापेक्षा ,परिस्थितीला सामोरे जाण्यात, संघर्षासाठी सिद्ध होण्यातच खरी माणुसकी आहे असेही कवी सूचित करतो.

“काळोखाची कैदी “या कविता संग्रहाचा विचार करता वेदना, विद्रोह ,नकार ,ही त्रिसूत्री सातत्याने या कवितेच्या केंद्रस्थानी असल्याचे दिसते. वेदनेचा उगम जिथून झाला त्याच उगमावर बोट ठेवले पाहिजे असे कवीचे ठाम मत आहे. बाबासाहेबांच्या चळवळी बरोबरच धम्मचिंतनही अंकुश सिंदगीकरांनी आपल्या काव्यातून मांडले आहे. बोलक्या मुखपृष्ठासह ,लोकशाहीर संभाजी भगत यांची पाठराखण घेऊन बंडाची भाषा करणारा कवी .नक्कीच ही बंडाची भाषा आजच्या नव्या युगाला दिशा दाखविणारी ठरेल यात मुळीच शंका नाही.

पुस्तकाचे नाव – काळोखाचे कैदी
लेखक – अंकुश सिंदगीकर

Related posts

जगभरातील संसदांमध्ये महिला अल्पसंख्यच !

ईस्राईल अभ्यास दौरा केल्यानंतर…

मुक्त सृजन साहित्य पत्रिकेचे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय निर्मिती पुरस्कार जाहीर

Leave a Comment