March 27, 2023
Know difference between Soul and Body article by rajenda ghorpade
Home » आत्म्यापासून वेगळे असणारे छत्तीस तत्त्वांचे क्षेत्र
विश्वाचे आर्त

आत्म्यापासून वेगळे असणारे छत्तीस तत्त्वांचे क्षेत्र

आत्म्यापासून वेगळे असणारे छत्तीस तत्त्वांचे क्षेत्र

क्षेत्र म्हणजे शरीर. शरीर आणि आत्मा वेगळे आहेत. हे जाणून घेण्यासाठी प्रथम शरीर काय आहे याची माहिती करून घ्यायला हवी. हे शरीर छत्तीस तत्त्वांनी तयार होते.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

तैसीं छत्तीसही इयें तत्त्वें । मिळती जेणें एकत्वें ।
तेणें समूहपरत्वें । क्षेत्र म्हणिपे ।।१५५।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा

ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें हीं छत्तीस तत्त्वे ज्या एकतत्त्वाने जमा होतात. त्या समुदायपरत्वाने त्यास क्षेत्र असे म्हटले जाते.

क्षेत्र म्हणजे शरीर. शरीर आणि आत्मा वेगळे आहेत. हे जाणून घेण्यासाठी प्रथम शरीर काय आहे याची माहिती करून घ्यायला हवी. हे शरीर छत्तीस तत्त्वांनी तयार होते. आता ही छत्तीस तत्त्वे कोणती? पाच महाभुते (पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश), अहंकार, बुद्धी, अव्यक्त (मूलप्रकृती), दहा इंद्रिये व अकरावे इंद्रिय मन, कान, डोळे, त्वचा, नाक, जिव्हा ही पाच ज्ञानेंद्रिये तर जीभ, हात, पाय, उपस्थ आणि गुद हे पाच इंद्रियांचे प्रकार, तसेच इच्छा, द्वेष, सुख, दुःख, चेतना, धैर्य आणि संघात अशी ही छत्तीस तत्त्वे आहेत. या सर्वांची ओळख करून घ्यायला हवी.

हे मी केले. ते माझ्यामुळे झाले. हे मी कमावले. हा मीपणा म्हणजे अहंकार. सगळे जग जिंकता येते पण हा अहंकार गेल्याशिवाय स्वतःच्या आत्म्यावर विजय मिळवता येत नाही. मीपणा हा अहंकार आहे. बुद्धी हे तेज तत्त्वाचे उत्पत्तिस्थान आहे. सत्त्व गुणांची वाढती अवस्था म्हणजे बुद्धी आहे. आत्मा आणि जीव यांच्या जागेत बुद्धी राहते. बुद्धीमुळे सुख-दुःखाची जाणीव होते. पाप-पुण्य, शुद्ध-अशुद्ध याची निवड ही बुद्धीमुळे होते. जीवरुप प्रकृतीला येथे अव्यक्त म्हटले आहे.

बीज असेल तरच त्याचे झाड होईल. या देहाचे जे सूक्ष्मरुप बीजाच्या रूपाने अस्तित्वात असते तेच येथे अव्यक्त आहे. वस्त्र आहे पण वस्त्राचे मूळरुप तंतू आहे. तसे शरीराचे मूळरुप हे अव्यक्त आहे. शरीरात पाच कर्मेंद्रिये आहेत. जीभ, हात, पाय, उपस्थ आणि गुद हे जे पाच इंद्रियाचे प्रकार आहेत तीच कर्मेंद्रिये आहेत. शरीरामध्ये क्रियाशक्ती म्हणून जी प्राणांची स्त्री आहे, तिचे शरीराच्या आंत येणे व बाहेर जाणें या पाच द्वारांनी होते.

आता मन कशाप्रकारचे आहे ते जाणून घेऊया. इंद्रिये आणि बुद्धी यांच्यामधील जागेत रजोगुणांच्या आश्रयाने मन चंचलपणाने राहते. आकाशातील निळा रंग हा प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. तो आपल्या डोळ्यांना होणारा भास आहे. किंवा मृगजळ जसे लाटांप्रमाणे दिसतात. तसे मनाचाही भास हा खोटा असतो. वास्तविक पाहता मन ही एक मुर्तिमंत कल्पनाच आहे. मनाच्या संगतीमुळेच ब्रह्माला जीवदशा प्राप्त झाली आहे. मन हे प्रवृत्तीचे मूळ आहे, कामाचे बळ आहे तर अहंकाराला ते अखंड चेतवत असते. इच्छा- आकांक्षा या त्याच्यापासूनच उत्पन्न होतात. अशा या पस्तीस तत्त्वांचा जिवाभावाचा असणारा हा समुदाय आहे. हा समुदाय छत्तीसावे तत्त्व संघात या नावाने ओळखला जातो. या छत्तीस तत्त्वांनी हे शरीर तयार झाले आहे. यापासून आत्मा हा वेगळा आहे. तो वेगळा आहे हे जाणण्यासाठी छत्तीस तत्त्वाचे क्षेत्र जाणणे गरजेचे आहे.

Related posts

अध्यात्मातून मिळते दूरदृष्टीचा विचार करण्याची प्रेरणा 

तुळसीचे संवर्धन फायद्यासाठी नव्हे तर जैवविविधता जोपासण्यासाठी व्हावे

मनाच्या स्थिरतेसाठी विचार शून्य व्हायला हवेत

Leave a Comment