एक प्रतिभावान चित्रकार जेव्हा चित्रपटाच्या पडद्यालाच कॅनव्हास बनवू इच्छितो तेव्हा अत्यंत गहिरं, नजर खिळवुन ठेवणारं आणि काळजाचा ठाव घेणारं चलतचित्र तयार होतं !
कोल्हापुरच्या स्वप्निल पाटीलचा लघुपट ‘मधुबाला’ पहाताना नेमकं हेच होतं. स्वप्निल आजवर रंग आणि ब्रश हातात घेऊन कागदावर आयुष्य रंगवणारा म्हणून प्रसिद्ध…पण कॅमेरा हातात घेऊन जगण्यातले बारकावे टिपताना तो कणभरही कमी पडला नाही. पंधरा मिन्टांच्या या शाॅर्टफिल्ममध्येच त्याच्यात दडलेल्या मोठ्या दिग्दर्शकाचा त्याचा आवाका लक्षात येतो.
एका घरात घडणार्या पंधरा मिन्टांच्या छोट्या छोट्या प्रसंगांमधून एक जगावेगळं नातं उलगडत जातं… एक संघर्षरत कवी आणि एक वेश्या यांच्यातल्या या तरल नात्यावरची ‘मधुबाला’ पहाताना काळजाच्या एका स्पेशल कप्प्यात जपलेल्या गुरूदत्तच्या ‘प्यासा’ची हलकीशी आठवण येते… अस्वस्थ करून जाते. स्वप्निलच्या दिग्दर्शनासोबतच अपर्णा चोथे आणि विकास पाटील यांचा अभिनय आणि शंतनु खांडगेचा कॅमेरा या शाॅर्टफिल्मला उंचीवर नेऊन ठेवतात. अर्थात ही छोटी झलक आहे. पुढील काळात स्वप्निल मराठी सिनेमाला वेगळी उंची गाठून देईल ही आशा वाटते.
नुकतंच ‘मधुबाला’ला फिल्मफेअर अवाॅर्डसाठी नामांकन मिळालंय. ती बघितल्यावर तुम्ही तिला नक्कीच व्होट कराल याचा विश्वास आहे !
– किरण माने, अभिनेता
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.