February 22, 2024
book-review-of-harishchadrachee-factory-by-raju-garmade
Home » झाडीबोली पुर्नजीवीत करणार्‍या संशोधन महर्षीचा थक्क करणारा प्रवास – हरिश्चंद्राची फॅक्टरी
मुक्त संवाद

झाडीबोली पुर्नजीवीत करणार्‍या संशोधन महर्षीचा थक्क करणारा प्रवास – हरिश्चंद्राची फॅक्टरी

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सृजन चंद्रपूर या संस्थेच्या वतीने एका प्रथितयश व्यक्तीची मुलाखत घेण्याच्या उपक्रमांमध्ये ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी झाडीबोली साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. हरिश्चंद्र बोरकर यांची घेतलेली मुलाखत ‘ हरिश्चंद्राची फॅक्टरी ‘ या नावाने पुस्तकरुपाने प्रकाशित झालेली आहे.

✍🏻 राजू गरमडे, उर्जानगर,चंद्रपूर.

काही व्यक्ती असामान्य असतात. तर काही सामान्य असतात. सामान्य व्यक्तीचं जीवन एका मर्यादेच्या क्षेञामध्येच बंदिस्त असतात.आपल घर,काम आणि आपण यांच्यामध्येच त्यांच जीवन व्यक्तीत होत असतं. असे व्यक्ती कधी जन्माला येतात आणि कधी हे जग सोडून जातात हे कुणालाही माहीत होत नाही. समाजही अशा व्यक्तीची दखल घ्यायलाही ऊत्सुक नसतात.
पण,काही व्यक्ती माञ आपल्या कार्याने सर्वांच्या परिचयाचे होऊन जातात.त्यासाठी त्यांना ना कष्टाची पर्वा नसते ना आपल्या कुटुंबाची. ते अस काही कार्य करुन जातात की,पुढे कित्येक पिढ्या त्यांच्या कार्याचा आदराने गौरव करीत असतात. अशाच एका ऋषितुल्य,असामान्य व्यक्तीमत्वाची ओळख करून देत आहे. त्याचं कार्य इतकं मोठं आहे की,वाचकही त्यांच्या कार्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांची आयुष्यात एकदा तरी भेट घ्यावी ही भावना नक्कीच निर्माण होईल.

डाॅ. हरिश्चंद्र बोरकर
रेंगेपार { कोहळी } जि.भंडारा.
{ झाडीबोलीसहित्याचे गाढे अभ्यासक }

झाडीबोली साहित्य मंडळाचे आधारस्तंभ, लुप्त होत चाललेल्या कलाप्रकाराना पुर्नजीवीत करणारे, झाडीपट्टी मधील रंगभूमी, लोकनाट्य, दंडार, खडी गंमत यासारख्या अनेक कलाअविष्कारांना समाजासमोर आणणारे कलामहर्षी आणि अनेक नवोदित कवी, लेखकाचे प्रेरणास्थान.
बारा नाटके, १४ एकाकिंका, ३ संगीतिका आणि २ लोकनाट्ये आणि अनेक अप्रकाशित साहित्य इतकी अफाट ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. शिवाय त्यांचे एकुण १०० पुस्तके प्रकाशित झालेली असून त्यांनी आजपर्यत २०० पुस्तकांना प्रस्तावना दिलेल्या आहेत.

अशा थोरतपस्वी, कलेचे अध्वर्यू डाॅ. हरिश्चद्र बोरकर यांचेविषयी लिहिण्याचं भाग्य माझ्या पदरात टाकणारे माझे मित्र , राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या साहित्याचे गाढे अभ्यासक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे मनापासून आभार मानतो.

दादासाहेब फाळके यांचे नांव सगळ्यांनाच माहित आहे. भारतीय चिञपटसृष्टीचा पाया त्यांनी रचलेला होता आणि ‘ हरिश्चंद्राची फॅक्टरी ‘ या नावाचा चिञपटाची निर्मिती सुद्धा त्यांनी केलेली होती. आज आपणास या चिञपटाबाबत सांगणार नसून विदर्भामध्ये असलेल्या भंडारा जिल्ह्यामध्ये रेंगेपार { कोहळी } या छोट्याशा गावी जन्मलेल्या आणि आपल्या झाडीबोली भाषेला, लोककलेला, रंगभूमीला पुर्नजीवीत करणार्‍या आणि पुर्वापार पासून चालत आलेल्या प्रथा, परंपरा, चालीरीती, लोकगीते या कला पुढील पीढीपर्यंत पोहोचल्या पाहीजे यासाठी प्रामाणिक प्रयन्न करणार्‍या डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांचेविषयी.

दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सृजन चंद्रपूर या संस्थेच्या वतीने एका प्रथितयश व्यक्तीची मुलाखत घेण्याच्या उपक्रमांमध्ये ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी झाडीबोली साहित्याचे गाढे अभ्यासक डाॅ. हरिश्चंद्र बोरकर यांची घेतलेली मुलाखत ‘ हरिश्चंद्राची फॅक्टरी ‘ या नावाने पुस्तकरुपाने प्रकाशित झालेली आहे.

डाॅ.हरिश्चंद्र बोरकर सर हे रेंगेपार { कोहळी } सारख्या लहानशा खेड्यात राहतात यावर अनेकांचा मुळीच विश्वास बसणार नाहीच. या लहानशा खेड्यामधूनच त्यांनी झाडीबोलीभाषेला, रंगभूमीला, नष्ट होत चाललेल्या कलेला पुर्नजीवीत करण्याचे महत्तकार्य त्यांनी केलेले आहे.

मुलाखतकार लिहितो,
‘ डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांचे गाव म्हणजे सर्वच शासकीय योजनाना भक्कम प्रतिसाद देणारे आणि सर्वच शासकीय पुरस्कार पटकाविणारे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. ‘ आणि यामध्ये हरिश्चंद्रजी बोरकर यांचा मोठा वाटा आहे हे सांगायला नकोच. झाडीबोली भाषेचा उगम किती प्राचीन काळापासुन आहे आणि हे आपल्या संशोधनातून सप्रमाण त्यांनी सिद्ध केलेले आहे.

झाडीबोलीभाषा ही ‘ लीळाचरित्र ‘ या मराठीच्या आद्य ग्रंथात आढळून येते. तसेच ती आद्यकवी मुकुंदराज यांच्या ‘ विवेकसिंधू ‘ या ग्रंथामध्येही अंर्तभूत झालेली आहे. झाडीपट्टीमधील ‘ दंडार ‘ ही इतकी प्राचीन आहे की,सीतास्वयंवर या पहिल्या नाटकातही ती दाखविण्यात आलेली आहे.
आणि ‘ खडीगंमत ‘ तर ११ व्या शतकापासून ती डफगानच्या रुपात ती आजही अस्तित्वात आहे.

झाडीबोली भाषेला उर्जितावस्था आणणारे डाॅ. बोरकर यांचे कार्य इतक प्रचंड आहे की,कवी सुद्धा आपली एक तरी कविता आईवर आणि दुसरी डॉ. बोरकर यांचेवर केल्याशिवाय राहात नाही.
मानेगावचे कवी मिलींद रंगारी यांनी तर ‘ झाडीचा राजा हरिश्चंद्र ‘ या नावाने त्यांच्यावर केलेल्या कवितांचा प्रातिनिधीक काव्यसंग्रह सुद्धा काढलेला आहे.

रेंगेपार { कोहळी } जि.भंडारा या लहानशा खेड्यामध्ये बोरकर वंशामध्ये त्यांचा जन्म झाला.
लहानपणापासूनच त्यांचा ओढा हा धार्मिक ग्रंथ वाचनाकडे होता. वडिल आणि काका यांची दंडारीची तालीम पाहता पाहता ते मोठे होत गेले.त्यांचे काकांना नाटकाचे वेड असल्यामुळे ते वेड यांच्यामध्ये आले असावे. पुढचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण अंदाजे ११ वर्ष त्यांचे भंडारा येथे झाले. नंतर साकोली येथे त्यांना शिक्षकांची नोकरी लागल्यानंतर रात्री ते तालमीकरीता आपल्या गावी जात.यावरुन त्यांचं दंडारवरील प्रेम अधोरेखित होते.

त्यांचा पिंड हा एका कवीचा असल्यामुळे पहिल्या झाडीबोली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने त्यांनी रचलेली रचना आजही ग्रामपंचायतीच्या भिंतीवर वाचायला मिळते.

त्यांनी रचलेली रचना :-
प्रातःकाळी सृष्टी – सतीला स्वप्न पडे साकार,
खेडे रेंगेपार,माझे खेडे रेंगेपार ।

नागपूर आकाशवानी वरुन त्यांच्या एकाकिंका, श्रुतिका प्रसारित व्हायला लागल्या. इयत्ता ९ वी मध्ये त्यांनी ‘ दी ब्लाइंड बाॅय ‘ नावाच्या इंग्रजी कवितेचा अनुवाद ‘ अंध मूल ‘ या शिर्षकाने मराठीमध्ये केला. इंग्रजी शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी त्यांचे भरभरुन कौतुक केले. अशा प्रकारे इयत्ता १० वी आणि ११ मध्ये त्यांनी एकुन १६ इंग्रजी कवितेचा मराठी अनुवाद केला.

शिक्षक म्हणून अध्यापनाचे कार्य करीत असताना त्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने राष्ट्रीय गीतेही लिहिली. त्यामुळे त्यांचे नाव सर्वामुखी झाले. तसेच शालेय विद्यार्थ्यामध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागावी म्हणून ‘ या रे यारे गाऊ या ‘ या नावाने राष्ट्रीय कवितेचा आणि बडबडगीताचा संग्रह प्रकाशित झाला. तसेच ‘ कानात सांग ‘ या शिर्षक दिलेल्या कवितासंग्रहामध्ये त्यांच्या झाडीबोलीभाषेत लिहिलेल्या सर्वच कविता प्रकाशित झालेल्या आहेत.

मुलाखतकाराने त्यांच्या कथालेखनाचा प्रवास उलगडविण्याविषयी त्यांना प्रश्न केला.कारण त्यांची तब्बल ९ कथालेखनाची पुस्तके एकाच वर्षी पुण्याच्या प्रकाशनाने प्रकाशित केलेली आहे.
आपला कथालेखनाचा प्रवास उलगडताना त्यांनी कथा लिहिण्यामागची भुमिकाही विषद केली.

कथालेखन या प्रकारामध्ये विचार करावयाचा झाल्यास त्यांचे एकाच वर्षी तब्बल ९ कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. कथेचा वारसा त्यांना आजीकडून लाभलेला आहे हे ते आवर्जून सांगतात.
त्यांच्या बर्‍याच गाजलेल्या कथा या नागपूर आकाशवाणीने प्रसारित केलेल्या आहेत. तसेच काही कथा वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकामध्येही प्रकाशित झालेल्या आहेत. त्यांचा कथा लिहिण्यामागचा मुळ उद्देश हाच की, कथेच्या माध्यमातून झाडीबोलीभाषा आणि लोककलेचे प्रदर्शन इतरांपर्यत पोहोचविणे. हा एक प्रकारे झाडीबोलीभाषेचा सांस्कृतीक असा मौलीक ठेवा पुढच्या पीढीला द्यावा हा एक उद्देश लिहिण्यामागचा आहे.

झाडीबोलीविषयीच्या लुप्त होत चाललेल्या सर्वच साहित्यप्रकार, दंडार, लोकगीत, बोलीभाषा यावर त्यांनी केलेलं संशोधन पुढील पीढीसाठी एक मौलीक ठेवा म्हणून सिद्ध होईलच.

संशोधनाच्या क्षेत्रांमध्ये त्यांनी केलेली भरीव कामगिरी खरोखरच कौतुकास्पद आणि इतरांना प्रेरणा देणारी आहे. त्यांनी आजपर्यंत पुस्तक लेखनाचे शतक तर पुर्ण केलेलेच आहे शिवाय दोनशेच्या वर पुस्तकांना प्रस्तावनाही दिलेल्या आहेत. त्यांच्या साहित्यावर कुरखेडा येथील प्रा. नरेंद्र आरेकरांनी पीएच.डी.सुद्धा मिळविलेली आहे. तसेच त्यांनी आपले सहकारी एड. मनराज पटले सोबत ‘ पवनपर्व ‘नावाचे साप्ताहिक सुद्धा सुरु केले.

त्यांनी ‘ कोहळी ‘ जातीवर संशोधन करण्यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा पिंजून काढला.
झाडीबोलीभाषेवर संशोधन करणारा ‘ झाडीबोली : भाषा आणि अभ्यास ‘ हा ग्रंथही प्रकाशित झाला.
झाडीबोलीभाषेचा अमुल्य ठेवा म्हणून या ग्रंथाकडे बघितल्या जाते. झाडीबोलीभाषेतील कवी,लेखकांना साहित्य निर्मितीसाठी योग्य शब्दांची निवड करता यावी म्हणून त्यांनी
‘ झाडीबोली मराठी शब्दकोष ‘ या नावाचा ग्रंथ प्रकाशित सुद्धा केला.

‘ भंडारा जिल्ह्यातील ग्रामनामे : एक अभ्यास ‘ हा त्यांचा लेख ‘ पवनपर्व ‘ साप्ताहिक मध्ये प्रकाशित झाला.विविध मासिकांमध्ये प्रकाशित झालेल्या अशा अनेक लेखाचा संग्रह ‘ भाषिक भ्रमंती ‘ या नावाने प्रकाशित झालेला आहे. या संशोधनपर ग्रंथाला अनेक मानाचे,सन्मानाचे पुरस्कारही लाभलेले आहे.

दै.सकाळ वृत्तपत्रांमध्ये झाडीबोलीसंदर्भात चालविलेल्या लेखमालेमध्ये झाडीबोली शब्दांचे स्पष्टीकरण लेखमालेमध्ये त्यांनी केले.या स्पष्टीकरणाचा इतरांनाही उपयोग व्हावा हा एक उद्देश सुद्धा होता. या सर्वच लेखाचे संकलन ‘ अर्थपंचमी ‘ या नावाने प्रकाशित झाला.

डाॅ.बोरकर यांनी काही व्यक्तींचे चरित्र सुद्धा लिहिलेले आहे. त्यांच्या गावाजवळ वटेश्वर या देवस्थानाची निर्मिती करणारे संत किसन महाराज यांच्या निधनानंतर त्यांनी त्यांचे चरित्र लिहिले.त्यासाठी त्यांनी गावाकडे जाऊन चौकशी केली.तसेच नातेवाईकाडे जाऊनही माहिती मिळविली. आणि त्यांचे चरिञ ‘ चेतनाचिंतामणीचे गाव ‘ हे चरित्र आकाराला आले. तसेच लाखनी येथील राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आ.बापुसाहेब लाखनीकर यांचेही चरित्र त्यांनी त्यांच्या हयातीच लिहून काढले. शिवाय ते ज्या शाळेत शिक्षक होते त्या शाळेचे सचिव आणि मुख्याध्यापक नंदलाल पाटील कापगते यांचे चरित्रही त्यांनी त्यांच्या वारसदाराच्या विनंतीवरुन लिहिले.

झाडीपट्टीमधील ‘ दंडार ‘ याविषयी त्यांच्या मनात आदराची भावना होती. दंडारीविषयी सर्वसामान्याच्या मनात असलेल्या शंका दुर व्हाव्यात आणि विविध भाव सविस्तरपणे स्पष्ट व्हावे म्हणून त्यांनी ” दंडारीची लोकसंपदा ” हा ग्रंथ त्यांनी संपादित केला. तसेच झाडीबोलीतील लोकनाट्याचे संशोधन करताना त्यांनी अनेक पुरावे जमा करुन ” खडी गंमत: विदर्भाचे लोकलेणे ” या नावाने सुद्धा त्यांनी ग्रंथ प्रकाशित केला. शिवाय त्यांनी विवाहगीते आणि लग्नसोहळ्याप्रसंगी म्हटले जाणारे मंगलाष्टके सुद्धा त्यांनी लिहिली. तसेच झाडीबोलीभाषेच्या रंगभूमीच्या संदर्भात लिहिलेले लेखन ” झाडीपट्टीची लोकरंगभूमी ” या नावाने प्रकाशित झाली.

गावोगावी फिरुन वयोवृद्ध मंडळीकडून माहिती घेऊन अनेक लोकगीते त्यांनी गोळा केली आणि
” झाडीपट्टीची लोकगीते ” या नावाने प्रसिद्ध सुद्धा केलेली आहे. त्यांनी सुरु केलेले झाडीबोली साहित्य संमेलन आजही तितक्याच उत्साहाने सुरु आहेत.

ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी विचारलेल्या प्रश्नांतून झाडीबोली भाषेचा महत्वाचा सांस्कृतिक ठेवा जनतेसमोर आलेला आहे. झाडीपट्टीमधील दंडार, खडीगंमत, डाहका, लोककला, दंडीगान आता सर्वांनाच माहीत झालेल्या आहेत. आणि याचे श्रेय पुर्णतः संशोधन महर्षी डाॅ. हरिश्चंद्र बोरकर यांच्याकडे जाते.

पुस्तकाचे नाव :- हरिश्चंद्राची फॅक्टरी { मुलाखत }
लेखक : बंडोपंत बोढेकर
ग्रंथसंपर्क : ९९७५३२१६८२
प्रकाशक : तारा प्रकाशन, साकोली.
मूल्य : ₹ २५०/-

Related posts

छत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार

अर्थसंकल्प 2022-23 : कृषी क्षेत्राच्या अपेक्षा

चैत : पालवी आणि पाचाेळा…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More