अध्यात्माची आवड म्हणून अनेकजण पारायणे करतात. पण त्याचा मुख्य उद्देश काय ? हेच विचारात घेतले जात नाही. पारायणे कशासाठी करायची ? ज्ञानी होण्यासाठी पारायणे करायची. त्यातील ज्ञान आपणास आत्मसात व्हावे या उद्देशाने पारायणे करायची.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तैसा ज्ञानाचिया दिठी । जो मातें सेवा किरीटी ।
तो होय ब्रह्मतेचां मुकुटी । चूडारत्न ।। 400 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानाच्यादृष्टीने जो माझें सेवन करतो, तो ब्रह्मस्थितीच्या मुकुटावर अग्रभागी असणारे रत्न (मुकुटमनी) होतो.
सोहम साधना कशासाठी करायची ? कशी करायची ? का करायची हे प्रश्न साधकाला पडणे स्वाभाविक आहे. मुळात अध्यात्माकडे माणूस जबरदस्तीने कधीच ओढला जात नाही. आवड नसेल तर तो त्यात रमणारही नाही. उलट तो त्यावर टिका करत बसेल. हे सर्व थोतांड आहे असे म्हणेल. जबरदस्ती करून हे शास्त्र कधीच समजण्यासारखे नाही. शास्त्र तोंडपाठ असणे वेगळं आणि ते शास्त्र समजून घेऊन, अनुभव घेणे वेगळे. अनेक ठिकाणी धार्मिक पुस्तके वाचण्याची सक्ती केली जाते. हे सर्वथा चुकीचे आहे. अध्यात्म हे अनुभव घेऊन शिकण्याचे शास्त्र आहे. ही गोष्ट विचारात घ्यायला हवी. सतसंग जरूर असावा. पण जबरदस्तीने किंवा फसवून कोणाला सतसंगामध्ये ओढायचा प्रयत्न करू नये. कारण हे शास्त्र ठराविक मानसिक स्थितीतच समजू शकते. उमजू शकते. पेरणीसाठी घात असावी लागते. सुक्षेत्र असावे लागते. तसे अध्यात्माच्या ज्ञानाचे बीज रोवण्यासाठीही योग्य स्थिती असावी लागते. तरच ते बीज रूजते, हे विचारात घ्यायला हवे.
भारतात अनेक देवधर्मांची देवाची मंदीरे आहेत. सर्वच मंदिरात गर्दी होते असे नाही. इतकेच काय अनेक कलाकृतींनी सज्ज अशी मंदिरे ओस पडल्याचेही पाहायला मिळते. म्हणजे तेथे ज्ञान नाही असा होत नाही. याची कारणेही वेगवेगळी असू शकतात. पण ज्ञानाला परंपरा असते. ही ज्ञान दानाची परंपरा तेथे असेल तर ती ठिकाणे निश्चितच प्रगतीची आहेत. मग तेथे गर्दी असो वा नसो. ज्ञानाचे संवर्धन, परंपरेचे संवर्धन होणारी अशी अध्यात्मिक ठिकाणे नित्य जागृत असतात. अशा ठिकाणांची ओढ असेल तरच ते ज्ञान समजू शकते. म्हणूनच माऊलीची ऐसे ईश्वराकडे निज । धावें आपसया सहज । तया नावे तेज । आध्यात्मिक तें ।। ही ओवी खूप काही सांगून जाते. आपले मन आपोआप देवाकडे आकर्षित व्हायला हवे. तेव्हाच अध्यात्माची अनुभुती येते.
घरातील प्रत्येक व्यक्तीची आवड सारखीच असेल असे नाही. कोणाला दुध आवडते, तर कोणाला दही, तर कोणाला ताक, तर कोणाला तुप. पाहीले तर हे सर्व पदार्थ एकाच दुधापासून बनलेले आहेत पण प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. तसेच अध्यात्मात आहे. कोणाला पांडुरंग आवडतो, कोणाला कृष्ण आवडतो तर कोणाला राम. पाहीले तर ही सर्व एकच. सबका मालिक एक. घर एकच पण घरातील सर्वांची आवड मात्र वेगवेगळी. घरात ज्ञानेश्वरीची परंपरा असते पण घरातील सर्वचजण ज्ञानेश्वरीचे चाहते असतील असे होत नाही. सर्वच जणांना अध्यात्माची आवड असेल असेही होत नाही.
अध्यात्माची आवड म्हणून अनेकजण पारायणे करतात. पण त्याचा मुख्य उद्देश काय ? हेच विचारात घेतले जात नाही. पारायणे कशासाठी करायची ? ज्ञानी होण्यासाठी पारायणे करायची. त्यातील ज्ञान आपणास आत्मसात व्हावे या उद्देशाने पारायणे करायची. ज्ञानेश्वरी समजत नसली तरी ज्ञानेश्वरी वाचली जाते, पण उद्देश ज्ञानेश्वरीतील ज्ञान समजावे हा असावा म्हणजे त्याकडे आपण ओढलो जातो. हळूहळू आपली प्रगती होऊन आपण आत्मज्ञानी होतो. स्व ची ओळख करून घेण्यासाठीच अध्यात्माचा अभ्यास करावा. स्व च्या ज्ञानातच सर्वज्ञान सामावलेले आहे. यासाठीच भगवंताकडे, सदगुरुंकडे ज्ञानाच्यादृष्टीने पाहावे. ज्ञानाच्यादृष्टीसाठीच त्यांची उपासना करावी.