November 14, 2024
book review of mahaveer akkole book
Home » संत महात्म्यांचे यथार्थ दर्शन…
मुक्त संवाद

संत महात्म्यांचे यथार्थ दर्शन…

संतांच्या कामगिरींचा आस्वाद घेतांना,आणखी एक शोध त्यांनी पूर्ण केल्याचे आहे. तो म्हणजे कोणकोणत्या संतांनी आपल्या काव्यरचनेतून शेतकरी जीवनाचा कैवार घेतलेला आहे. कोणी कोणी शेतकरी जीवनाचा कळवळा जपला आहे. हे त्यांनी आवर्जून पाहिले आहे.

प्रा. अनिलकुमार पाटील, जयसिंगपूर 

“संताचा तो संग नव्हे भलतैसा ” या ग्रंथ लेखनातून जवळ जवळ २७ संत महात्म्यांच्यावर व तीन महापुरुषावर संशोधक वृत्तीने डॉ. महावीर अक्कोळे यांनी लेखन केलेले आहे. डॉ. अक्कोळे हे जयसिंगपूर आणि परिसरात सुप्रसिद्ध धन्वंतरी म्हणून प्रसिद्ध आहेत. संवेदनशील कवी आहेत. माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेचे महत्वाचे कार्यकर्ते आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेचे सक्रीय मार्गदर्शक आहेत. परिसरातील विविध शैक्षणिक संस्थाचे ते पदाधिकारी व संचालक आहेत. आणि विविध मासिकांच्या व दिवाळी अंकाच्या संपादनात त्यांचा सहभाग मोठा असतो. एवढ्या जबाबदाऱ्या पार पाडीत त्यांनी “भवताल” आणि “संताचा तो संग नव्हे भलतैसा ” या पुस्तकांचे लेखन केलेले आहे.” भवताल “मधून त्यांनी आवतीभोवतीच्या सर्वसामान्य माणसांच्या मदतीने आणि संस्कारांनी आपले आयुष्य कसे संपन्न झाले. हे ललितगम्य शैलीत सुरेखपणे चित्रीत केले आहे. डॉ. अक्कोळे हे साहित्य, समाज आणि शिक्षण या क्षेत्रात कसे सक्रिय झाले ते भवताल वाचल्यावर कळून येते. 

ज्ञानयोगी प्राचार्य सुभाषचंद्र अक्कोळे हे डॉक्टरांचे वडील. त्यांनी मराठी जैन साहित्यात मोठी मुलुखगिरी केली. मराठी जैन साहित्याला समाजमान्यतेच्या पटलावर आणण्यात त्यांचा वाटा सिंहाचा आहे. ज्ञानयोगीनी मराठी संत साहित्यावरही विपुल लेखन केलेले आहे. घरी झडणाऱ्या साहित्य व तत्वज्ञानाच्या चर्चेने डॉक्टरसाहेब लहानपणापासूनच संत साहित्याकडे आकर्षित झालेले होते. परंतु अंधश्रदा निर्मूलन समितीत सक्रीय असणारे डॉक्टसाहेब संत ज्ञानदेव नामदेव, तुकाराम इत्यादी संताच्या जीवनातील चमत्काराकडे कसे पहातात हा माझ्या औत्सुक्याचा विषय होता. परंतु चमत्कारापेक्षा मानवतेच्या कार्याला अधिक प्राधान्य देऊन सत्व शोधण्याचा डॉक्टरांचा प्रयत्न खूप हृदयगम्य झाला आहे. पिंडधर्माला साक्षी ठेवून केलेले लेखन वैचारिक फारकतीपासून सुरक्षित रहाते. हे इथे मनोमन जाणवते. 

संत जनाबाई संतस्तुती गाताना म्हणतात 

संताचा तो संग नव्हे भलतैसा । पालटावी दशा तात्कालिक || 

चंदनाचे संगे पालटती झाडे । दुर्बल लाकडे देवमाथा ।। 

संताची संगत हीच मोठी उपलब्धी आहे. संताच्या संगतीने जीवनाचा कायापालट होतो. हे सांगताना चंदनाचा दाखला देऊन संतांच्या कामगिरीला मोठी उंचीवर घेऊन जाणार्या या रचनेतील पहिली ओळ डॉक्टरांनी आपल्या पुस्तकाच्या नावासाठी वापरुन वाचकाला हटके टायटलचा धक्का दिला आहे. पुस्तकातील आशयाला शीर्षस्थानी आणणारे असे हे समर्पक शिर्षक आहे. लेखकाचे मनोगत आणि जेष्ठ विचारवंत प्राचार्य राजेंद्र कुंभार यांच्या प्रस्तावनेमुळे पुस्तकाला भरीवपणाचा सुंदर साज चढला आहे. प्राचार्य कुंभार प्रस्तावनेत म्हणतात “या लिखाणामध्ये बुद्धीवाद्यांची तर्ककर्कश कोरडी मांडणी नाही किंवा अध्यात्मिक भोळसटपणाही येत नाही.” अशा विचारातून नोंदवलेला अभिप्राय. प्रकाशक आणि लेखक यांच्या कष्टमय प्रयत्नांना बळ देणारा आहे. 

संत नामदेव, संत ज्ञानदेव, संत कबीर, संत तुकाराम या लोकप्रिय संतमहात्म्यावरील लेखाबरोबर अनेक अपरिचित परंतु महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या संतांच्या व्यक्तीमत्वावर लिहिलेले लेखही अतिशय वाचनीय आहेत. प्रत्येक लेखाला दिलेले नाव हि दोन ओळींची कविता आहे. मुळातच डॉ. अक्कोळे ममत्वाला अधिष्ठान देणारे संवेदनाशील कवी आणि धन्वंतरी आहेत. संतावरील लेख मालिका लिहिताना डॉक्टरसाहेब व कै.वर्षाताईनी जवळ जवळ सर्वच संतांच्या जन्मभूमी आणि कर्मभूमीला भेटी दिलेल्या आहेत. त्यामुळे इथल्या मातीतून जे जे उगवलेले आहे. विस्तारलेले आहे. आणि मानवतेचा उदघोष करणारे आहे. ते ते आपले मानून केलेले हे भावनात्मक लेखन आहे. 

संत एकनाथ कालीन एकनाथ पंचकातील संत दासोपंताचा खूप सुंदर परिचय लेखातून वाचावयास मिळतो. डॉक्टरांची संशोधक वृत्ती अशा प्रकारच्या अनेक संताच्या व्यक्तीमत्वावरील व कामगिरीवरील लेखातून पदोपदी दिसून येते.दासोपंताची पासोडी ही मराठी वाडःमयातील अभूतपूर्व लेखन प्रपंच आहे. पासोडी म्हणजे खळयुक्त सुकवलेले जाडजूड कापड. अशा कापडावर शब्दाबरोबर वेलबुट्टी, कमानी, महिरिपी, अश्व, वृक्ष, दत्तमूर्ती इत्यादी चित्रांनी सजवलेली विपुल काव्यरचना दासोपंतांनी केलेली आहे. डॉ. अक्कोळे म्हणतात, “दासोपंत हे अभिजित चित्रकार असावेत, कृषी, वाणिज्य, उद्योग ,राजकारण, राष्ट्रधर्म, देशांतर्गत व परराष्ट्रीय धोरण इत्यादी विषयावर मार्मिक भाष्य केले असल्याने ते त्यावेळचे मोठे कृषीतज्ञ आणि राजनितीतज्ञही असले पाहिजेत .” डॉक्टसाहेबांनी नोंदवलेले हे मत त्यांच्या संशोधित वृत्तीचे आणि संत महात्म्यांचे यथार्थ दर्शन घडविणारे आहे. याच संशोधितवृत्तीने त्यांनी संतकवी अज्ञानसिध्द,महाकवी पुष्यदंत, फादर स्टीफन्स, उपेक्षित संतकवी मन्मथस्वामी,संतकवी मुक्तेश्वर यांच्या व्यक्तीमत्वाचा आणि त्यांच्या संत कामगिरीचा सुंदर शोध घेतलेला आहे. 

डॉ. अक्कोळे यांना शेतकरी आणि शेतकरी चळवळीविषयी कमालीचे ममत्व आहे. हे त्यांच्या विविध लेखातून आणि त्यांच्या शेतकरी चळवळीतील महत्वपूर्ण सहभागातून जाणवते. संतांच्या कामगिरींचा आस्वाद घेतांना,आणखी एक शोध त्यांनी पूर्ण केल्याचे आहे. तो म्हणजे कोणकोणत्या संतांनी आपल्या काव्यरचनेतून शेतकरी जीवनाचा कैवार घेतलेला आहे. कोणी कोणी शेतकरी जीवनाचा कळवळा जपला आहे. हे त्यांनी आवर्जून पाहिले आहे. आणि त्या काव्यरचनांना त्यांनी ठळकपणे समोर आणले आहे. अशा प्रकारच्या प्रयत्नातून ते तमीळ संत कवी तिरुवल्लुवर यांच्या व्यक्तीमत्वाकडे वळलेले आहेत. 

फक्त शेतकरी श्रमाची भाकर खातो 

बाकीचे सारे जग मिंधे आहे. किंवा 

जमीन कसून जे राहतात 

तेच खरोखर जगतात 

या विचार प्रभावातून त्यांनी तिरुवल्लुवर यांच्यावरील अप्रतिम लेख लिहिलेला आहे.शेतकऱ्यांचा मानसन्मान आणि दुःख वेदना हा डॉक्टरांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने त्यांनी आपली लेखणी विशेषत्वाने झिजवलेली आहे. 

संत नामदेव, ज्ञानदेव, तुकाराम, कबीर यांच्याबरोबरीने संत कवयत्रींच्यावरील लेख त्यांच्या कामगिरीचे अप्रूप जपणारे आहेत. पुस्तकातील अनेक लेख वाचकाला वैचारिक तृप्तीची ढेकर देतात. पुस्तक वाचताक्षणीच लेखकाच्या कष्टमय संशोधकवृत्तीला दाद द्यावी वाटते. आणि हेच या पुस्तकाचे मोठे यश आहे. 

तेजस प्रकाशनचे रावसाहेब पुजारी यांनी नेहमीप्रमाणे वाचकांना वैचारिक मेजवानी देणारे आणि संत चळवळीवर नवा प्रकाश टाकणारे पुस्तक वाचकांच्या हाती दिले आहे, त्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. 

पुस्तकाचे नाव ः संताचा तो संग नव्हे भलतैसा
लेखक – डॉ. महावीर अक्कोळे 
प्रकाशकः तेजस प्रकाशन कोल्हापूर. 
किंमत – १५५ रुपये. 


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading