जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।
मीरा उत्पात-ताशी, कोल्हापूर
संत भानुदास महाराजांनी अनागोंदी म्हणजे हंपी वरून राजा कृष्णदेवराय यांच्या कडून भक्तिबळावर आणलेली विठ्ठल मूर्ती वारकऱ्यांनी वाजत गाजत मंदिरात नेली व परत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या विजयाचे स्मारक म्हणून इथे या काळ्या मारुतीची स्थापना केली.
9403554167
संत नामदेवांना पंढरपूरचा फार अभिमान होता. ते म्हणतात
जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।
जेव्हा चराचर सृष्टी निर्माण झाली नव्हती तेव्हा सुद्धा पंढरपूर होते!!
दुसऱ्या एका अभंगात ते म्हणतात
ऐका पंढरीचे महिमान। राऊळ तितुके प्रमाण।
तेथील तृण आणि पाषाण। तेही देव जाणावे।।
पंढरपूर इतके पवित्र तीर्थक्षेत्र आहे की तेथील तृर्णांकुरात आणि पाषाणातही देवत्व भरलेले आहे. पंढरपुरात देवळात श्रीविठ्ठल रूक्मिणी या मुख्य देवतांबरोबर अनेक परिवार देवता आहेत. तसेच संपूर्ण पंढरपूर नगरीत आणि पंचक्रोशीत अनेक तीर्थस्थाने आहेत. या तीर्थस्थानातून सुद्धा पंढरपूर नगरीचे प्राचीनत्व सिद्ध होते.
यातील काही प्रमुख म्हणजे गोपाळकृष्ण मंदिर, ताकपिठे विठोबा मंदिर, काळा मारुती मंदिर, पद्मावती मंदिर, लखुबाई मंदिर,अंबाबाई मंदिर अशी आहेत. एसटी स्टँड कडून मंदिराकडे येताना चौफाळा नावाने ओळखला जाणारा पंढरपुरातील एक मुख्य चौक लागतो. या चौफाळ्यात दगडी बांधकाम केलेले पुरातन गोपाळ कृष्ण मंदिर आहे. हे मंदिर विठ्ठल मंदिराच्या पश्चिमेस आहे. येथील देहुडा चरण गोपाळ कृष्णाची मूर्ती अतिशय सुरेख आहे. इथून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या कळसाचे दर्शन होते. या मंदिरात गोकुळ अष्टमीचा मोठा उत्सव होतो. दहीहंडीचा कार्यक्रम होतो. यात्रा काळात नगर प्रदक्षिणेला जाणाऱ्या सर्व दिंड्या, पालख्यांनी इथे थांबून, गोपाळकृष्णाचे दर्शन घेऊन अभंग म्हणूनच पुढे जायचे असा पूर्वापार चालत आलेला शिरस्ता आहे.
इथून जवळच ताकपिठे विठोबा मंदिर आहे. हे विठ्ठल मंदिरापासून अगदी जवळ आहे. हे ही मंदिर प्राचीन आहे. महाजन बडवे यांच्या कुळातील रमाबाई या विठ्ठलाच्या निस्सीम उपासक होत्या. त्या रोज ताक आणि लाह्याचे पीठ एकत्र करून श्री विठ्ठलाला नैवेद्य दाखवत असत. एकदा त्या आजारी पडल्या. त्यामुळे त्यांना देवळात जाता आले नाही. तेव्हा स्वतः श्री विठ्ठल आपल्या भक्ताच्या ओढीने त्यांच्याकडे ताकपीठ खायला आला. आणि तिथेच राहिला. म्हणून त्याला ताकपिठे विठोबा हे नामाभिधान मिळाले. अशी या ताकपिठे विठोबाची कथा आहे. या मंदिरातील मूर्तीमध्ये आणि मुख्य मंदिरातील मूर्तीमध्ये भरपूर साम्य आहे. यात्रा काळात गर्दीमुळे मुख्य मंदिरातील विठ्ठलाचे दर्शन झाले नाही तर भाविक इथे येऊन या ताकपिठे विठ्ठलाचे दर्शन घेतात.
प्रदक्षिणा मार्गावर श्री विठ्ठल मंदिराच्या दक्षिणेस काळ्या मारुतीचं भक्कम दगडी बांधकाम असलेले मंदिर आहे. चार खांबावर बांधलेला सभामंडप आणि गर्भगृह असे या मंदिराचे दोन भाग आहेत. इथे हनुमान जयंतीला मोठा उत्सव होतो. या मंदिराचे महत्व म्हणजे, संत भानुदास महाराजांनी अनागोंदी म्हणजे हंपी वरून राजा कृष्णदेवराय यांच्या कडून भक्तिबळावर आणलेली विठ्ठल मूर्ती वारकऱ्यांनी वाजत गाजत मंदिरात नेली व परत मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. या विजयाचे स्मारक म्हणून इथे या काळ्या मारुतीची स्थापना केली. नगर प्रदक्षिणा करताना इथे थांबून विजयाचा अभंग गाण्याची प्रथा आहे.
अशा या भूवैकुंठी अगदी पावलोपावली निरनिराळ्या देवता विशिष्ट प्रयोजनाने नित्य वास करत आहेत. येथील तृण आणि पाषाणातही देवत्व आहे!!
अनुपम्य नगर पंढरपूर। भीमा मनोहर संतांचे माहेर।
पंढरपूर क्षेत्री श्री विठ्ठल तीन रूपात वास करतो. एक म्हणजे क्षेत्र रूपाने. दुसरे चंद्रभागेत तीर्थ रूपाने आणि तिसरे देवळात मूर्ती रूपाने. अशा प्रकारे पुंडलिकाने विनवल्यामुळे परमात्मा विठ्ठल तीन रूपात पंढरपुरात वास्तव्याला आहे.
नामदेव महाराज म्हणतात
पंढरीचा वास चंद्रभागे स्नाना।
आणिक दर्शन विठोबाचे।
माणसाच्या जीवनाची इति कर्तव्यता केवळ या तीन गोष्टींमध्ये सामावलेली आहे. क्षेत्राचे महत्त्व आपण जाणून घेतले आहे. जिच्या तीरावर अठ्ठावीस युगे विठ्ठल उभा आहे त्या भीमेची, चंद्रभागेची ख्याती वर्णनातीत आहे.
ही पुण्यसलिला भीमा पंढरपुरात प्रवेश करताना चंद्रभागा होते. ही भीमा नदी कशी उगम पावली याचाही रोचक कथाभाग आहे.
पुराण काळात त्रिपुरासुर नावाचा राक्षस सर्व लोकांना फार पीडा देत असे. त्याच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी त्यांनी शंकराची प्रार्थना केली. प्रार्थनेने प्रसन्न होऊन आशुतोष शंकराने त्रिपुरासुराशी भयंकर युद्ध केले. त्या युद्धाच्या वेळी श्रमाने शंकरास घाम आला. तो घाम म्हणजे भीमा नदी होय. ही भीमा रौद्र आवाज करत पुढे पंढरी क्षेत्राजवळ आली असता, तिच्या भयंकर आवाजाने इथल्या क्षेत्रातील लोक भयभीत झाले आणि आपला क्षेत्रपाल भैरवास शरण गेले. नमस्कार करून म्हणाले ‘हे भैरवा आपल्या क्षेत्रात मेघगर्जने प्रमाणे आवाज करत काहीतरी अरिष्ट आले आहे. या विघ्नापासून आम्हाला सांभाळ’.
तेव्हा भैरवाने लोकांना अभय दिले आणि हातामध्ये दंड घेऊन तो नदीपाशी आला. भैरवाची अक्राळविक्राळ रौद्रमूर्ती पाहून भीमा नदी भयभीत झाली आणि थरथर कापू लागली. ती श्री विठ्ठलाला स्तुती करून विनवू लागली
‘हे विठ्ठला!! हे जगन्नियंत्या, तुम्ही जसे गजेंद्राला नक्रा पासून वाचवले, तसे मला या क्षेत्रपाला पासून वाचवावे’. तिची प्रार्थना ऐकून श्री विठ्ठल कृपावंत होऊन म्हणाले ‘हे भीमे, तू भिऊ नकोस. माझ्या कृपेने तुला काहीही भय होणार नाही. परंतु माझ्या आज्ञेने या क्षेत्रभागामध्ये जराही आवाज न करता शांतपणाने वाहत जावे. जे पातकी लोक येतील त्यांची पातके केवळ दर्शन मात्रे नाहीशी करावीत.’
त्यावेळी भीमेने तसे कबूल केले आणि तेव्हा पासून ती या क्षेत्रभागामध्ये विठ्ठलाच्या आज्ञेप्रमाणे शब्दही न करता शांतपणाने अद्याप वाहते आहे. ही नदी भागीरथी पेक्षा सुद्धा श्रेष्ठ आहे. कारण पुंडलिकाने प्रार्थना केल्यामुळे पांडुरंग नदी रूपाने राहू लागले.. त्यामुळे या नदीच्या केवळ दर्शनाने सुद्धा सर्व पापे दूर होतात.
सकळही तीर्थे घडती एक वेळा।
चंद्रभागा डोळा देखलिया।
भटुंबरे गावाजवळील मांडव खडकी पासून विष्णुपदापर्यंत या भीमा नदीस चंद्रकोरीचे वळण मिळाले आहे. म्हणून तिला चंद्रभागा असे नामाभिधान मिळाले.
या चंद्रभागा या नावाविषयी अजूनही एक कथा आहे. देवांचे गुरु बृहस्पति यांची पत्नी तारा हिचे चंद्राने अपहरण केले. त्यावेळी रागावून त्यांनी चंद्राला ‘तू महापाप केले आहेस!! त्यामुळे तू क्षयरोगी होशील’ असा शाप दिला. त्यावेळी चंद्राने आपल्याला क्षमा करावी अशी विनंती बृहस्पतींना केल्यावर त्यांनी त्यास सांगितले ‘माझा शाप खोटा होणार नाही. पण दिंडीरवनातील सूर्यतीर्थात स्नान करून, विठ्ठलाचे दर्शन घेऊन सूर्याची आराधना केल्यास तुझे पाप नाहीसे होईल.’
चंद्राने विठ्ठलाचे दर्शन घेऊन सूर्याची आराधना केली. त्याचे पाप नाहीसे झाले. सूर्याने प्रसन्न होऊन त्याला पौर्णिमेपर्यंत वृद्धी पावणारी कला दिली. या ठिकाणी चंद्राचा दोष जाऊन कलारूप भाग मिळाला. याची साक्ष म्हणून भीमा चंद्राकार झाली.
अशा प्रकारे या पवित्र तीर्थात स्नान केल्याने महापातकांचा देखील नाश होतो.
माझी बहीण चंद्रभागा।
करीतसे पापभंगा।
मीरा उत्पात-ताशी, कोल्हापूर
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.