अनुभवातूनच, अनुभूतीतूनच शिष्यामध्ये हळूहळू बदल घडत असतो. त्याच्या वागण्यात, चालण्यात, बोलण्यात हा बदल जाणवायलाही लागतो. या बदलाने शरीरात होणारा उत्कर्ष म्हणजेच शारीरिक तप भरास आले असे समजावे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
ऐसैसी जैं शरीरीं । राहाटीची पडे उजरी ।
तैं शारीर तप घुमरी । आलें जाण ।। २१३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १७ वा
ओवीचा अर्थ – अशा प्रकारच्या वागण्याचा जेंव्हा शरीरांत उत्कर्ष होतो, तेंव्हा शारीरिक तप भरास आलें, असे समज.
सद्गुरु शिष्याला नित्य अनुभव देत असतात. शिष्यामध्ये बदल व्हावा यासाठीच त्यांचा प्रयत्न सुरू असतो. आत्मज्ञानाची अनुभूती सद्गुरु सातत्याने देत असल्याने शिष्याच्या वागण्यामध्ये बदल होत राहातो. रागीट, तापट स्वभाव मऊ, मवाळ होतो. हे बदल शिष्यामध्ये पटकण होतातच असे नाही. हा बदल घडायला कित्येक वर्षेही लागतात. शिष्याचे अवधान कसे आहे यावर हे सर्व अवलंबून आहे. अवधान असेल तर शिष्याची प्रगती पटकणही होऊ शकते. सद्गुरु मात्र शिष्यामध्ये बदल घडावा यासाठी सातत्याने अनुभव हे देत राहातात. शिष्य आत्मज्ञानी व्हावा, यासाठीच त्यांचा हा प्रयत्न सुरु असतो.
सद्गुरुंचा सहवास नित्य हवा असे आपणास वाटत असते. पण अनुग्रह घेतल्यानंतर सद्गुरु हे नित्य आपल्या सहवासातच असतात. फक्त त्यांचा सहवास जाणून घेण्यासाठी शिष्याचे अवधान हे असायला हवे. प्रत्येक भुतमात्रात त्यांचा वास आहे. ही अनुभूती ते शिष्याला नित्य देत असतात. पण शिष्याचे अवधान नसेल तर ती अनुभूती येणार नाही. प्रत्येक गोष्टीत ते शिष्यासोबत असतात अन् सातत्याने ते त्याला मार्गदर्शन करत असतात. घडलेल्या घटनेतून त्यांना काही नाकाही तरी अनुभूती द्यायची असते. शिष्याला सावध करायचे असते. यातून शिष्याची आध्यात्मिक, भौतिकसह सर्वांगिण प्रगती त्यांना साधायची असते. कदाचित आलेला अनुभव कित्येक वर्षांनी शिष्याच्या लक्षात येईल, पण त्यानंतर शिष्याने त्यानुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यास सकारात्मक असायला हवे. कधीकधी हे अनुभव दुःखदही असू शकतात, पण त्यातूनच खरे सुख प्राप्त होते. याची अनुभूती शिष्याला येते. हे अनुभव शिष्याच्या प्रगतीस मदतगार ठरतात.
अनुभवातूनच, अनुभूतीतूनच शिष्यामध्ये हळूहळू बदल घडत असतो. त्याच्या वागण्यात, चालण्यात, बोलण्यात हा बदल जाणवायलाही लागतो. या बदलाने शरीरात होणारा उत्कर्ष म्हणजेच शारीरिक तप भरास आले असे समजावे. परागीभवनानंतर फळाची निर्मिती सुरु होते. सुरूवातील हे फळ फुलाच्या देठाला असते. हळूहळू ते मोठे होईल तसे फुल नष्ट होते. अपक्व असणारे हे फळ हिरवेगार अन् बेचव असते. पण जसजसे हे फळ आकार घ्यायला लागते तसे त्याचा रंगही बदलायला लागतो. हळूहळू ते फळ पक्व व्हायला लागते तेंव्हा त्याचा रंग पिवळसर होतो अन् त्याच्यात गोडीही भरते. सद्गुरु शिष्याला अनुग्रह देतात हे एकप्रकारे परागीभवनच आहे. शिष्यात आत्मज्ञानाच्या फळाची निर्मिती या परागीभवनानंतरच सुरू होते. हळूहळू हे फळ पक्वतेला येते, तेंव्हा शिष्याच्या शरीरातही तसे बदल होतात. पक्व झालेल्या या फळात, मग गोडीच गोडी असते. शिष्याच्या शरीरातून ही गोडी, ही मधुरता ओसंडून व्हायला लागते. आत्मज्ञानाच्या या फळाची गोडी निश्चितच सद्गुरुंच्याकृपेने शिष्याच्या वाट्याला येते. हे तप निश्चितच फळाला लागते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.