November 22, 2024
Book Review of Mazha Mumbaicha Pravas by Gulab Bisen
Home » उत्कंठा, कुतुहल, उत्साह आणि सुक्ष्म निरीक्षणांनी भारलेले प्रवासवर्णन
मुक्त संवाद

उत्कंठा, कुतुहल, उत्साह आणि सुक्ष्म निरीक्षणांनी भारलेले प्रवासवर्णन

उत्कंठा, कुतुहल, उत्साह आणि सूक्ष्म निरीक्षणांनी भारलेला प्रवासवर्णन – माझा मुंबईचा प्रवास

भागर्व येळेकर या इयत्ता ६ वीत शिकणार्‍या विद्यार्थ्याने लिहिलेला “माझा मुंबईचा प्रवास” हा प्रवासवर्णन अलीकडेच प्रकाशित झाला. मराठी साहित्यात अनेक साहित्यिकांनी प्रवास वर्णने लिहिली आहेत. परंतू शालेय विद्यार्थ्याने लिहिलेला हा अशाप्रकारचा पहिलाच प्रवासवर्णन असावा.

✍🏼 गुलाब बिसेन

मो. नं. 9404235191

चंदेरी नगरी मुंबई आपल्या वेगळ्या वैशिष्ट्यांमुळे सर्वांनाच भूरळ घालते. गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, ताज हाॅटेल, आंतरराष्ट्रीय बंदर, बाॅलीवूड यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मुंबईचे आकर्षण असते. तसेच भार्गवलाही जिवाची मुंबई करण्याची इच्छा होती. त्याचे मामा मुंबईला राहत असल्याने मुंबई बघण्याची त्याची ओढ अधिकच तीव्र होती. अशातच प्राध्यापक असलेले भार्गवचे बाबा मुंबईला कामानिमित्त जाणार असल्याचे कळताच त्याच्या आशा पल्लवित होतात आणि सुरू होतो मुंबईला जाण्याचा प्रवास.

सहावीत शिकणारा बाल साहित्यिक भार्गव येळेकरने लिहिलेला हा प्रवासवर्णन मुंबईला जाण्याच्या योजनेपासून ते स्वगृही परतेपर्यंतच्या रोमांचकारी अनुभवांनी भरलेला आहे. हा प्रवासवर्णन वाचताना भार्गवच्या मनात असलेले मुंबईबद्दलचे कुतुहल, मुंबई बघण्याची उत्सुकता, प्रेक्षणिय स्थळे बघतानाचे त्याचे सूक्ष्म निरीक्षण करण्याची सवय याचे पानापानावर आपल्याला प्रत्यय येते. त्याचे लेखन हे बालसुलभ तर आहेत परंतु प्रवाहीही आहे.

प्रवास वर्णन वाचताना त्या ठिकाणाचे प्रत्यक्ष दृष्य वाचकाच्या नजरेसमोर उभे राहते.भार्गवच्या मुंबई प्रवासाची सुरूवात होते ती नागपूर-पुणे प्रवासाने. रेल्वेचे आरक्षण न मिळाल्याने ते मामाच्या सल्याने नागपूर- पुणे प्रवास ट्रव्हल्सने करतात. पुढे पुणे मुंबई प्रवास रेल्वेने करतात. पहिल्यांदाच एवढ्या लांब प्रवासाला निघालेल्या भार्गवच्या मनात प्रचंड उत्सुकता असते. तो तासनतास ट्रॅव्हल्सच्या खिडकीच्या काचेतून दिसणारी गावं, शेती, जंगल यांचे निरीक्षण करतो. या त्याच्या प्रवासात त्याचा लहान भाऊ शार्दुलही सावलीसारखा त्याच्यासोबत असतो.

पुण्याला पोचलेल्या भार्गवला पुणेकरांचे एकमेकांशी आपुलकीने बोलणे आणि मराठी भाषेचा पुण्यात बोलताना केला जाणारा अधिक वापरही त्याला भावतो.पुणेमार्गे मुंबईला पोचलेल्या भार्गवला मुंबईच्या लोकलची गर्दी मनात धडकी भरवते. लोकलमध्ये मुंबईत फिरणे नित्याचे आहे. नव्हे ती मुंबईची जीवनवाहिनी आहे. अशा लोकलमध्ये चढायसाठी उभे जरी राहिलात तरी मागची गर्दी आपोआप ढकलत तुम्हाला डब्यात नेऊन ठेवते. याचा प्रत्यक्ष अनुभव भार्गवने या प्रवासात पहिल्यांदा घेतला. या प्रवासात बालमनाला पडलेले अनेक प्रश्न तो आपल्या मामाजींना विचारत असतो. संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचे हे सूक्ष्म निरीक्षण आणि त्याला पडणारे प्रश्न, प्रश्नांच्या अनुसंगाने मिळणारी मुंबईची इत्यंभूत माहिती तो आपल्या मनात टिपताना दिसतो.

जोगेश्वरीला मामांकडे पोचल्यानंतर मामेबहिन निर्मयीला झालेला आनंद वाचताना बालमन किती निर्झर झर्‍यासारखे निर्मळ असते याचाच प्रत्यय येतो. पहिल्यांदा समुद्र बघताना इवल्याशा डोळ्यात काय साठवू आणि काय नाही असे त्याला होते. शेवटी जितके जमेल तितके आणि जसे जमेल तसे मी माझ्या डोळ्यांनी पाहून आनंदमय दश्यांचा आस्वाद घेत होतो असे तो लिहीतो. रोज या समुद्र किनार्‍याने ये जा करणारे मुंबईकर किती नशिबवान आहेत असेही बाल मनाला वाटते.

तारापोरवाला मत्सालयाला भेट दिल्यानंतर तिथे हाताच्या बोटाएवढे लहान जलचर ते विशालकाय कासव बघून त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. हे समुद्री जिव तो आयुष्यात पहिल्यांदाच बघत होता. मत्सालयातील विविध जलचर बघून सृष्टीचा निर्माता किती मोठा जादूगार आहे याची कल्पना येत असल्याचे तो नमूद करतो. मरीन ड्राईव्ह म्हणजे मुंबई फिरायला येणार्‍यांचे नंदनवनच. अथांग सागर, समुद्राच्या लाटा, किनार्‍यावरील वाळूतील चालणे हे सर्व भार्गवसाठी नविन होते. तो हे पहिल्यांदाच अनुभवत असल्याने त्याला झालेला आनंद हा तो यात व्यक्त करतो.

मरीन ड्राईव्हवरून दृष्टीस पडलेल्या राजभवनने राज्यपालांचे कार्यालय कसे असेल? असा प्रश्न त्याला पडतो. मुंबईच्या फुटपाथवरून फिरताना मुंबईच्या खाद्यसंस्कृतीचा मुकुटमणी असलेला “वडापाव” खाण्याचा आनंद तो घेतो. रात्रीच्या अंधारात चंदेरी नगरीचे घडलेले दर्शन, क्षणात थांबणारी आणि क्षणात फुर्र होणारी लोकल ट्रेन बघून भार्गवचे मन आनंदी आणि प्रफुल्लीत होते. गेट वे ऑफ इंडियाची ऐतीहासिक वास्तू बघताना तेथील अथांग अरबी समुद्र, ताज हाॅटेल, तेथे काढलेले फोटो, एलिफंटा गुंफा बघायला जाताना केलेला पहिला सागरी प्रवास, समुद्रात जवळून बघितलेला डबड डेकर जहाज, समुद्रात ऑईल फॅक्टरीचे झालेले दर्शन, बोटीवर आदळणार्‍या लाटा अशा या रोमांचकारी प्रवासाचे लेखकाने आपल्या बालसुलभ परंतु प्रवाही अशा भाषेत वर्णन केले आहे.घारापुरी बेटावरील भ्रमंती, डबलडेकर जहाजाचा प्रवास, गेट वे ऑफ इंडिया परीसरात कबुतरांशी केलेली मज्जा, शिवजयंती कार्यक्रमाचा घेतलेला आस्वाद, चर्चगेट मार्केटचा मारलेला फेरफटका, इस्माईल युसुफ महाविद्यालयाचा मारलेला फेरफटका, निर्मयी व दुर्वांशचे भांडण, वैभव दादासोबत घेतलेला सहभोजनाचा आनंद ते नागपूर परतीचा प्रवास सारेच बाल नजरेने वाचकासमोर दृश्य स्वरूपात उभे करण्याचा केलेला प्रयत्न बघून भार्गवच्या लेखनशैलीचे कौतुक वाटते.

साहित्यिक प्रा. डाॅ. प्रल्हाद हरिणखेडे यांनी या पुस्तकाला प्रस्तावना दिली असून प्रसिद्ध साहित्यिक डाॅ. सुरेश सावंत यानी पाठराखण केली आहे. प्रकाशक साहित्यिक चंद्रकांत निकाडे यांनी हे पुस्तक प्रकाशित करून बाल साहित्यिकांच्या लेखनीला बळ दिले आहे. वयाच्या बाराव्या वर्षी भार्गवने लिहिलेले हे प्रवासवर्णन त्याच्या भावी लेखन प्रवासाचा मार्ग अधिक विस्तीर्ण असेल याची साक्ष देणारा आहे. भार्गवचे हे प्रवासवर्णन बाल लेखकांना प्रवास वर्णन लेखनासाठी मार्गदर्शक ठरेल हे नक्की.

पुस्तकाचे नाव – माझा मुंबईचा प्रवास
पुस्तकाचे लेखक – भार्गव येळेकर
प्रकाशक – हृदय प्रकाशन, कोल्हापूर मोबाईल – 9922314564
मूल्य – १२५ ₹


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading