March 28, 2024
Book Review of Mazhi Maay by Bandopant Bodhekar
Home » माझी माय मध्ये स्त्री जीवनाच्या सुधारणेचा पुरस्कार
मुक्त संवाद

माझी माय मध्ये स्त्री जीवनाच्या सुधारणेचा पुरस्कार

‌ स्त्रियांच्या कर्तृत्वाचे वर्तुळ विस्तारले गेले पाहिजे, चार भिंतीच्या बाहेरील जग तिला अनुभवता यावे, ही प्रभा चौथाले यांच्या आईची भावना या पुस्तकाद्वारे शब्दबध्द झालीत. झाडीपट्टीची झाडीबोली , येथील शेती व्यवसाय, प्रथा परंपरा, नातेसंबंध यावरही नकळत प्रकाश टाकण्याचे काम प्रस्तुत लेखिकेने केलेले आहे. म्हणूनच हे आत्मकथन वाचनीय झाले आहे.

ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर

गडचिरोली

मुल (जि.चंद्रपूर) येथील प्रभा सुखदेव चौथाले यांचे पहिलेच पुस्तक माझी माय राका पळसगाव ( जि. गोंदिया ) येथे झालेल्या राज्यस्तरीय राष्ट्रसंत साहित्य विचारकृती संमेलनात प्रकाशित झाले. त्या मुल झाडीबोली साहित्य मंडळाच्या महिला शाखेच्या पदाधिकारी आहेत. त्यांचे पती सुखदेव चौथाले हे साहित्य मंडळाच्या कार्यात गेल्या अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. त्यांच्या मार्गदर्शनात प्रभाताई यांनी केलेली अक्षर साधना कौतुकास्पद आहे. नगरसेविका म्हणून त्या सक्रिय आहे. व्यस्ततेतून वेळ काढून आपल्या मातेसंबंधी आत्मियतेने पुर्वानुभव लिहून काढणे, ही बाब इतर भगिनींना निश्चितच प्रेरणा देणारी आहे. कोणताही लेखनातून स्वतः ला व्यक्त करीत असतो. त्यात आपले जगणे कमी अधिक प्रमाणात सांगत असतो. या गुणविकसन प्रक्रियेत लेखन कौशल्य आकार घेत असते.

आपल्या देशाची प्राचीन संस्कृती आहे. स्त्रियांपुढे असणाऱ्या आदर्शात मातृत्वाचा आदर्श आणि तिची शिकवण सर्वश्रेष्ठ आहे. कारण सर्वांनी टाकून दिले तरी मातेचे प्रेम मात्र तशाही परिस्थितीत अखंड कायम असते. ऱ्हासं – वृद्धी मातृप्रेमाला माहीत नसते. देवाण – घेवाण भाषा, व्यवहार तिला सहन होत नाही. त्यामुळेच जगात मातृपद श्रेष्ठ पद मानले जाते. कारण येथे निःस्वार्थपणे कार्य करण्याची, भावभावनांना व्यक्त करण्याची संधी असते. प्रथम अपत्यचिंता आणि नंतरच स्वतः चा विचार हेच प्रत्येक मातेचे कर्तव्य दिसून येते. जननी हे मातृशक्तीचे विकसित रूप आहे. या भूमित जनकापेक्षा जननीलाच श्रेष्ठ गणले गेले आहे, हे यामुळेच. या शक्तीशिवाय जगाचा उध्दार होणे नाही.

प्रभाताई चौथाले यांनी या पुस्तकातून आपला संघर्षमय शिक्षण प्रवास सोप्या भाषेत मांडला. लेखनाचा विशेष अनुभव नसल्याने काही त्रृटी राहुन गेल्या असल्यातरी त्यांची भावना लक्षात येते. नोकरीत आलेले अनेक चढउतार त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले. आईच्या संस्काराने त्या संसारात बहरल्या, समाजकारणात रूजल्या. राजकारणातही त्या बऱ्यापैकी यशस्वी झाल्यात. सोबतच त्यांनी गीत गायनाची आवड जोपासली आहे.

शेतकरी कुटूंबात जन्माला येणाऱ्या बहुतेकांच्या जीवनात व्यवस्थेने दारिद्रय बांधून ठेवले असते. “सौ का साठ करना – बाप का नाम चलाना” या अवस्थेत भारतीय शेतकरी जगत असतो. भ्रष्ट व्यवस्थेचे परिणाम त्याच्या अपत्यांना भोगावे लागते. शिक्षण हा त्यावर एकमेव उपाय आहे. ज्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले, ते जीवनप्रवासात यशस्वी होतात. हे चिंतनशील स्वभावाच्या सौ. चौथाले यांनी ओळखले. त्यामुळेच आजच्या जागतिकीकरणाच्या काळात त्या भक्कमपणे परिवाराच्या सदस्याच्या शैक्षणिक विकासाकरीता झटत आहे.

राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज आपल्या ग्रामगीता ग्रंथात इतर विचारवंतांपेक्षा पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांच्या क्षमतेचा अधिक विचार केला आहे. ते ग्रामगीता ग्रंथात लिहितात, ” अरे, तुझ्याहुनि ती उत्तम वागते ! समाजी उत्तम भाषण देते ! तुलाहि शहाणपण शिकवू जाणते ! मग ती मागे कशाने !!” एकदंरीत स्त्री जीवनाच्या सुधारणेचा त्यांनी सतत पुरस्कार केलेला आहे.

स्त्रियांच्या कर्तृत्वाचे वर्तुळ विस्तारले गेले पाहिजे, चार भिंतीच्या बाहेरील जगतीला अनुभवता यावे, ही प्रभा चौथाले यांच्या आईची भावना या पुस्तकाद्वारे शब्दबध्द झालीत. झाडीपट्टीची झाडीबोली , येथील शेती व्यवसाय, प्रथा परंपरा, नातेसंबंध यावरही नकळत प्रकाश टाकण्याचे काम प्रस्तुत लेखिकेने केलेले आहे. म्हणूनच हे आत्मकथन वाचनीय झाले आहे.

पुस्तकाचे नांव – माझी माय
लेखिका – सौ. प्रभा सु. चौथाले
प्रकाशक – झाडी बोली साहित्य मंडळ, मुल जि. चंद्रपूर
मूल्य – १०० रूपये
पुस्तकासाठी संपर्क – 99213 2082

Related posts

भारत बनतोय “इंटरनेट” धारकांची उपराजधानी !

सद्गुरुभाव रुपात भक्ती हीच खरी भक्ती

मोठी स्वप्नेच आयुष्य घडवितात…

Leave a Comment