साखरेचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला गोड प्रसाद खाण्याचा आग्रह केला जातो. देवाचा नैवद्य टाकून कसा चालेल म्हणून तोही श्रद्धे पोटी खातो अन् आजार बरा होण्याऐवजी बळावतो. अशा घटना बऱ्याचदा घडतात. अशा अंध भक्तांचे डोळे उघडण्याचे काम ज्ञानेश्वर माऊलीने या ओवीतून केले आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
अगा गोक्षीर जरी जाहलें । तरी पथ्यासि नाही म्हणितले ।
ऐसेनिहि विष होय सुदले । नवज्वरी देता ।। १८४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा
ओवीचा अर्थ – अरे, दुध जरी गायीचे असलें, तरी तें पथ्यास घेऊ नये, असे वैद्य शास्त्राने सांगितले असतानाही आग्रहाने नवज्वरास दिले तर ते विषवत (मारक) होते.
भावनेच्या आहारी जाऊन कोणतेही कार्य करू नये. हे सांगणारी ही ओवी आहे. शास्त्राचा अभ्यास का करायला हवा ? शास्त्राचे पालन का करायला हवे ? जीवनशैलीत विज्ञानाला का महत्त्व द्यायला हवे ? हे सर्व या ओवीतून समजून घ्यायला हवे. श्रद्धा अन् अंधश्रद्धा यात बऱ्याचदा शास्त्र बाजूला राहाते अन् यातून उचित फळ भेटत नाही. निराशाच पदरी पडते. श्रद्धा जरूर असावी, पण ती अंधश्रद्धा नसावी. श्रद्धा डोळस असावी. म्हणजे चुका होण्याची शक्यता कमी असते.
भारतीय संस्कृतीत गायीला देवता म्हटले आहे. याची कारणेही अनेक आहेत. देशी गायीच्या दुधात अन् गोमुत्रात अनेक औषधी गुणधर्म आहेत. अनेक असाध्य रोग बरे करण्याचे सामर्थ्य त्यात आहे. पर्यावरण शुद्ध करण्याचे गुणधर्मही देशी गायीच्या गोमुत्रात आहेत. यासाठीच ते घरात, परिसरात शिंपडले जाते. देवत्व प्रदान करताना यामागचे शास्त्र समजून घेणे गरजेचे आहे. कारण देवत्व सांगताना शास्त्राचा आधार असायला हवा. शास्त्राचे आचरण असायला हवे. तरच ते फलदायी ठरते. यासाठीच श्रद्धा ही डोळस असायला हवी.
आजारी माणसाला वैद्य काही पथ्ये सांगतात. ही पथ्ये पाळली जात नसल्याने आजार बळावतो. बऱ्याचदा श्रद्धा अन् भावनेच्या पोटी ही पथ्ये पाळली जात नाहीत. साखरेचा त्रास असणाऱ्या व्यक्तीला गोड प्रसाद खाण्याचा आग्रह केला जातो. देवाचा नैवद्य टाकून कसा चालेल म्हणून तोही श्रद्धे पोटी खातो अन् आजार बरा होण्याऐवजी बळावतो. अशा घटना बऱ्याचदा घडतात. अशा अंध भक्तांचे डोळे उघडण्याचे काम ज्ञानेश्वर माऊलीने या ओवीतून केले आहे.
गायीच्या दुधाचे सेवन वैद्यांनी वर्ज म्हणून सांगितले असेल तर त्याचे पालन रोग्याने करायलाच हवे. शास्त्राचे पालन केले तरच औषधाचे चांगले परिणाम दिसतील. अन्यथा औषधींचाही उपयोग होऊ शकत नाही. नको असलेल्या गोष्टीचे सेवन केले तर ते विषच ठरणार नाही का ? हे लक्षात घेऊन आचरण करायला हवे. गाय ही देवता जरूर आहे. यावर श्रद्धा जरूर असायला हवी. पण ती अंधश्रद्धा नको. विज्ञानाच्या आधारवर जीवन सुसह्य करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा. विज्ञानाचे, शास्त्राचे नियम हे यासाठीच पाळायला हवेत.
विज्ञानाने हा देह समजून घ्यायला हवा. पंचमहाभूतांचा हा देह समजून घेऊन जीवनशैली तयार करायला हवी. या देहात आलेल्या आत्म्याची ओळखही विज्ञानाने करून घ्यायला हवी. हे ज्ञान जेंव्हा होईल तेंव्हाच आपणास आत्मज्ञानी होता येईल. अन् आत्मज्ञानी राहाता येईल.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.