फेसाटी या पहिल्या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक नवनाथ गोरे यांची बंधाटी ही दुसरी कादंबरी आनंद प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केली आहे. चित्रकार सरदार जाधव यांच्या कल्पक नजरेतून साकारलेलं प्रामाणिक गाव गाड्याला चापून आवळणारं विषारी सापाचा तिढा घातलेलं मुखपृष्ठ वाचकाला बांधून ठेवत मलपृष्ठापर्यंत घेऊन जातं ते प्रा. रणधीर शिंदे यांच्या भरीव प्रस्तावनेपर्यंत. लेखकांन ही कादंबरी अत्यंत तळमळीनं बांध टोकरून जगण्याचं कुरूप झालेल्या शेतकऱ्यांना अर्पण केली आहे.
रवींद्र शिवाजी गुरव
98 22 25 40 47
ही कादंबरी मोजक्या शब्दांत, कमी पानांमध्ये आणि ओघवत्या प्रवाही अशा मायबोलीसह सीमावर्ती भागातील बोली भाषेत गावातल्या शेतीभातीसह पाचवीला पुजलेल्या समस्यांचा दुष्काळ आणि आशेचा सुकाळ येंगते. मातृभाषेसह कानडी बोली वाचकाला समजण्यास जड वाटली तरी ती कादंबरीची गरज आहे. भविष्यात ही बोलीची सूची घेऊन पुढची आवृत्ती येईल अशी आशा आहे. हिच्यात माणसा-कानसांचं दुखणं भरलं आहे. आबासारख्या तमाम गावकऱ्यांच्या इमानदार गावाभोवती गाव गुंडांचा विषारी विळखा बंधाटीतून ठळक होतो. इमानी गावशिवाराला चापून घातलेलं विषारी गावगुंडांचं येटुळंच म्हणजे ही बंधाटी.
सांगली जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा म्हणजे जत. त्याच्या पूर्वेस कर्नाटक. इथंच सीमावर्ती भागात अंधश्रद्धेच्या प्रभावानं चिरडलेलं खिलारवाडी गाव. त्याचं हे दाहक चित्र…. सुरुवातीलाच डोळ्यांपुढं उभं ठाकणारं. जीव ओतून इथून वाचकाला आत ओढणारं.
पाचवीला पुजलेल्या दुष्काळात एकदा भिकाच्या बान आणि आबाच्या बान दोघांनी पाटलाच्या घरावर दरोडा घातला. सोनं – नाणं, पैसा -अडका घेऊन त्यांनी विजापूर गाठलं. आबाच्या बान भिकाच्या बाला नरडं आवळून मारलं. जेल भोगून आबाचा बाप परतला तेव्हापासून या दोन कुटुंबात वादाची ठिणगी पडली ती कायमचीच. आबान तंगव्याचं दोन एकर रान खंडून केलेलं. स्वतःचंही रान खंडीभर जुंधळा पिकवणारं. त्यामुळं आबा गावकी – भावकीच्या डोळ्यात खूपणारा. भिकाचा या रानावर डोळा. आबा हे रान पाडून मागू लागला आणि भिकानं दुप्पट किमतीत ते घेतलं. तेव्हापासून या दोघांमधली दरी वाढत गेली. जंगमानं रान विकाय काढलं त्यासाठी या दोघात पुन्हा चढाओढ. रानडुकरागत फिरणाऱ्या भिकानच ते घेतलं. दोघांच्या रानांमधून गाडी वाट. ही वाट भिकान बंद केली. भांडणाची लाट उसळली ती जीवघेणी अशीच. ती कोर्टकचेऱ्या, हाणामारी यांना पुरून उरणारी. मोजणी आली तरीही हाणामारी मिटलीच नाही.
आबाची बायको भामा पोरगा शंकर… शाळा शिकणारा…भिकाची बायको पिर्ता…… भिकाचा भाचा मास्तर…. पंधरावी पर्यंत शिकलेला म्हणून त्याला गाव उगीचच मास्तर म्हणायचं; पण कट कारस्थान आणि भानगडीखोर असा वासनांध नराधमच तो. गावातल्या बाया, पोरीबाळीनांही वाईट वंगाळ बोलून इज्जत लुटणारा…. रात्री -अपरात्री घरातून उचलून आणणारा ….. गावातली मुलींची लग्नं मोडणारा…. यामुळंच ‘आया पुरशीनला पदराखाली झाकाय लागल्या जशी कुंबडी पिलाशिनला झाक त्याई तसं…..’ दार लावून बसणारं गाव….. सगळ्या गावच्या मोडक्या कुपाचा धनी हा भिक्याचा भाचाच…..आबाच्या घराची नासाडी करण्यासाठी त्याला जंगमाची पट्टी मिळणार होती, त्यासाठी तो विजापुरावरून गुंड आणून आबावर हल्ला करण्याची संधी शोधणारा. गावचा पोलिस पाटील आणि सरपंच त्याचीच री ओढणारी.
बिरोबाला कौल लावून गाव जेवण घालून भिकान आबावर डाव साधलेला. अंधश्रद्धा टोकाला पोहोचलेली एखादी देव – देवरशीन त्यात खत पाणी घालणारी. दोघांच्यातली आग भडकणारी. भिकाचं एक पोर साप चावून मेलं, रेडकू मेलं… घरात साप यायला लागले….. त्याची बायको येड्यागत करायला लागली…. ती स्वांग करत असल्याचं पुढं निष्पन्न होऊ लागलं… त्याचा आळ आबावरच…. त्यानंच करणी केल्याचा. भिक्याच्या बजान आबाच्या शंकरालाही मारलं….. आबालाही घाव बसले… करणी केली म्हणून आगीत तेल ओतणारी सणगराची म्हातारी… देव देवसकी करणारी…. मसणात निवद ठेवायला लावणारी….गाभण मेंढी कापायला लावणारी…. अघोरी करणीचा सारा प्रकार…. अंधश्रद्धेला खतपाणीच…..
बाळाबाईच्या पोरीला कमळाबाईला उचलून नेल्यावर मास्तरला आबानच बदडला. अखेर आबाच्या घराला आग लावून इमानदारपणाच संपवून मास्तर न डाव साधला …. आबा गतप्राण झाला……..
यात जीवन गीतेचं सार सांगणारा आधुनिक श्रीकृष्ण म्हणजे निंगाप्पा… अधून मधून जीत मरण सांगतोय… गातोय… त्याचीही चार-पाच एकर जमीन भिकान हिसकून घेतली… त्याच्या आई बाला गाव सोडावं लागलं आणि निंगाप्पा भिकारी झाला.
‘बांधावर झिरपलंय नुसतं इष
रगत मागणारी वाढली धूसफूस…’
असं काय बाय…. बारा बचाक… गात सुटलाय
शिवार जगवायला पायजी म्हणत…
ही कादंबरी गरतीचा आव आणि भिकारणीचा डाव, कशाचं काय नं धरणीला पाय, हंडग्यापाशी व्हांडग गेलनं थंडीन कडकडून मेलं अशा म्हणीं पेरते….. परसाकडला, पतणी, मातीआड वस बुडवं, येटवाण, कुंबडी, ठाण्या, सरडानी, थानाला, पानठळ्ळ, आग्या म्हवाच्या….. अशा अस्सल ग्रामीण बोलीतील शब्दसंग्रहासह…. हुता, हुती…. क्रियापदांसह मिरवते….. साखळी पडली, हारकत घेतली, फुणगी पडली अशा वाक्प्रचारांसह दुष्काळी व्यथा पदोपदी सांगते. आलुतेदार, बलुतेदार प्रसंगानुरूप येत राहातात तर मोजक्याच पात्रानीशी प्रसंग सजीव करतात. यातील ईमानी राबत्या माणसांसह गाई गुरं, म्हशी, बैल, शेळ्या-मेंढ्यांच्या कष्टाचंही मोल जाणते.
इमानदारपणा वाचेल, जिंकेल म्हणताना आबासंगं इमानदारीलाच घेऊन जाते आणि टिपं गाळायला भाग पडते…..
चाकोरं मोडीत आपली अशी नवी वाट मळवीत फापटपसारा, पाल्हाळ न लावता ही हृदयस्पर्शी अशी दांडगी गोष्ट इवलीशी करून सांगण्यात लेखक यशस्वी झाला आहे; तेच लेखकासवे कादंबरीचंही चीज करते आणि अशा दमदार लेखनास आभाळभर शुभेच्छा कमाई करत गाव शिवारांच्या वाटा तुडवत पुढं होते.
'फेसाटी' या बहुचर्चित कादंबरीने प्रकाशझोतात आलेले नवनाथ गोरे यांची 'बंधाटी ही दुसरी कादंबरी. गावगाडे सकृतदर्शनी प्रेमळ वाटतात. परंतु ते आतून पोखरलेली आहेत, या वास्तवाचा उच्चार 'बंधाटी'मध्ये आहे. शेतजमीनीच्या मोजणी वादातून उद्भवलेल्या जीवघेण्या सूडाची ही कहाणी आहे. या वादातील स्फोटक तणावाचे बहुमिती चित्रण कादंबरीत आहे. ते तीन पातळ्यावर खेळवत आणि खिळवत ठेवले आहेत.
खेड्यातील परस्परविरोधी पात्रे रचून एकमेकांसमोर उभा राहिलेल्या टकरावाचे चित्र कादंबरीत आहे. या पात्रांच्या चकवा चित्रणात एका प्रदेशाच्या घडवणुकीचे चित्र आहे. महाराष्ट्राच्या सीमाभागातील एका प्रदेशातील अंधश्रद्धा, संशय, वैरभावाचे हे चित्र आहे. शेतीच्या शिवेसाठीचा संघर्ष आणि प्रश्न कादंबरीत केंद्रवर्ती आहे. या सूडनाट्यास गावातील राजकारण आणि स्त्री अत्याचाराचे संदर्भ आहेत. तसेच पारंपरिक समाज आणि बदल काळातील घडवणुकीचा संदर्भ आहे. नव्या कुनीतीचा आणि 'मातीचा मेळ न बसणाऱ्या, नियत नासायला लागणाऱ्या काळाचे चित्र द्वैती नजरेने पाहिले आहे. त्यामुळे 'काळ्या मातीत रूतलेल्या काचेच्या' पार्श्वभूमीवर 'शिवार जगवाय पायजी' या मूल्यदृष्टीचा जागर कादंबरीभर आहे.
एखाद्या प्रदेशात एकाच काळात चित्रविचित्र गोष्टी नांदत- आहेत. त्यामुळे या प्रदेशातील लोकसमजुती, लोकश्रद्धा आणि अंधश्रद्धांचे चित्रही त्यात आहे. नाग-नागिणीच्या भयकारी वेटोळ्याचे सावट कादंबरीभर आहे. हे भयसावट मानवी सूडनाट्याला गती देणारे आहे. एका अर्थाने विश्वास हरवलेल्या काळाचे हे कथन आहे. 'बंधाटी'तील कथन हे प्रादेशिक बोलीकथन आहे. मराठी-कानडी मुलखातील शब्दसरवा या गद्यशैलीत आहे. शैलीत सचित्रता आहे. आत आत खेचून घेणारे हे अल्पाक्षरी गद्य लयबद्ध व्याकूळ करूणाकथन आहे. तसेच समाज, संस्कृतिदृष्ट्या महत्त्वाच्या अशा या दणकट धनगरी कथनास मायाळूकथनाचा स्वर प्राप्त झाला आहे.
- प्रा. रणधीर शिंदे
पुस्तकाचे नाव – बंधाटी ( कादंबरी )
लेखक – नवनाथ गोरे
प्रकाशन – आनंद प्रकाशन, पुणे.
पृष्ठे – १२८
किंमत – ३०० ₹
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.