शिक्षणातून शिक्षण’ हरवत चाललेल्या या काळात भरकटलेल्या या शैक्षणिक जगताला दिशा देण्याचे काम ‘शोध काटेमुंढरीचा’ पुस्तक करते. शिक्षकांतील ‘शिक्षक’ जागविण्याचे काम करत त्याला नवी उर्जितावस्था देऊन प्रेरित करते.
प्रा. एम. के. आत्तार
हिंदी विभाग प्रमुख
भाईस कॉमर्स कॉलेज नागठाणे ता.जि.सातारा.महाराष्ट्र) पिन-415519
मोबाईल 8806527758
प्रा.डॉ नंदकुमार मोरे यांनी गो. ना. मुनघाटे यांच्या ‘माझी काटेमुंढरीची शाळा’ या कादंबरीचा विविधांगी धांडोळा घेणारे ‘शोध काटेमुंढरीचा’ हे पुस्तक संपादित केलेले आहे. यात शिक्षणतज्ज्ञ कुलगुरू, शिक्षणाधिकारी, प्राध्यापकांनी कादंबरीची विभिन्न दृष्टीकोणातून मीमांसा केलेली आहे. वर्तमान शिक्षण क्षेत्रातील वास्तवावर प्रकाश टाकत तसेच हरवलेल्या शिक्षणाची जाणीव करून देणारी प्रा. डॉ. मोरे यांची प्रस्तावना चिंतनीय आहे. पुस्तकाच्या अंतरंगामध्ये कुठे आहे ती काटेमुंदरी’,’ काटेमुंढरीचा मास्तर, काटेमुंढरीचा शोध, काटेमुंढरीचे शिक्षण’, ‘काटेमुंढरीच्या पारंब्या’ आणि ‘- हद् गत असे एकूण सहा विभाग आहेत.
पहिल्या विभागात कादंबरीलेखक गो. ना. मुनघाटे व त्यांच्या दोन चिरंजीवांचे या कादंबरी संदर्भातील विचार आहेत. गो. ना. मुनघाटे यांनी ‘कुठे आहे ती काटेमुंदरी या लेखात कादंबरीची निर्मिती, लाभलेले सहकार्य व प्रकाशनोत्तर वाचक प्रतिक्रिया व प्रतिसादाची थोडक्यात मांडणी केली आहे. आयुष्यात सर्वात जास्त समाधान या कादंबरीने दिल्याचे त्यांनी म्हटले आहे. ‘काटेमुंढरीचा सख्खा भाऊ असलेल्या गावांची गोष्ट’ या लेखात लेखकांचे ज्येष्ठ चिरंजीव अनिल मुनघाटे यांनी कादंबरी लेखन प्रक्रियेदरम्यानच्या गोष्टी विशद केल्या आहेत. तसेच गो. ना. मुनघाटे यांनी बहुजनांच्या शिक्षणासाठी शाळा स्थापण्याचे मूळ कारण, त्यांची तळमळ, जिद्द विशद केली आहे. त्याच बरोबर आदिवासी भागात शाळा स्थापण्यासाठी तसेच स्थापल्यानंतर येणाऱ्या अडचणींचे, त्याचर परिवाराच्या हाल अपेष्टा सहन करीत त्यावर मात केल्याचे विवेचन केले आहे.
कुठे आहे ती काटेमुंढरी ?’ या शीर्षकाच्या लेखात कनिष्ठ चिरंजीव प्रमोद मुनघाटे यांनी कादंबरीची निर्मिती संदर्भातील घटना, पार्श्वभूमी तसेच गिरोला गावातील अनुभवांवर आधारित हे कादंबरी लेखन असल्याचे संगितले असून गो. ना. मुनघाटे यांनी शिक्षक म्हणून भोगलेल्या व्यथा, वेदनांचे कथात्मक दस्तावेज म्हणजे ही कादंबरी असल्याचे म्हटले आहे.
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना ही कादंबरी ही राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी सुसंगत आहे असे वाटते. मातृभाषा, स्थानिक भाषांना महत्त्वपूर्ण स्थान देत पर्यावरण शिक्षण, समर्पणाची भावना शिकविते आणि द्विमार्गी शिक्षणाचे महत्व अधोरेखित करते. शिक्षकांच्या योगदानाचा दूरगामी परिणामाचे महत्व सांगणारी ही कलाकृती शिक्षक, विद्यार्थी, समाजाला कर्तव्यभावनेचा वस्तुपाठ देणारी वाटते.
रमेश बरखेडे यांनी दुर्गम भागातील शिक्षणाचा प्रयोग या लेखात आजच्या शिक्षकांनी आणि संस्थाचालकांनी ही कादंबरी वाचून चिंतन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. सदर कलाकृतीचे ही आदिवासींच्या दुर्गम भागातील शिक्षणाचा प्रयोग निष्पाप, प्रांजल सुखद आणि रमणीय असल्याचे नमूद करतात. शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी नैराश्य झटकायला लावणारा अनुभव या लेखात अतिशय अभ्यासपूर्ण आणि अनुभवाधारित विचार व्यक्त केले आहेत. शिक्षणाची विशेषतः प्राथमिक शिक्षणाच्या वर्तमान स्थितीचे विवेचन करून बदलत्या शैक्षणिक परिस्थितीचा नेमकेपणाने आढावा घेतला आहे. त्यांच्या मते शिक्षकांची बांधिलकी, आदिवासींची संस्कृती, आदिवासी भागातील शैक्षणिक प्रश्न यांचा एकत्रित परिचय करूण देणारी ही कादंबरी आहे.
‘शोध काटेमुंढरीचा’ या दीर्घ लेखात डॉ नंदकुमार मोरे यांनी कादंबरीचा रूपबंध, गुरुजी आणि काटेमुंदरी गुरुजींची बांधिलकी, माडिया गोंड आणि मास्तरजी गुरुजी आणि त्यांचे विद्यार्थी या मुद्द्यांच्या आधारे चिकित्सा केली आहे. त्यांच्या मते गो. ना. मुनघाटे यांनी ही कादंबरी लिहून एकाच वेळी साहित्याच्या अभ्यासकांना, शिक्षणतज्ज्ञांना आणि समाजशात्रज्ञांना उपकृत केले आहे. एका शिक्षकाने घेतलेला मानवी कल्याणासाठीच्या कर्तव्याचा शोध आहे. समाजाच्या उभारणीत निष्ठा. कर्तव्य या गोष्टींना काय स्थान असते ही सांगणारी ही कादंबरी आहे. तसेच ती अंधारात चाचपडणाऱ्या समाजाला नवा प्रकाश दाखविणारी सेवेचा संस्कार देणारी व नवी पिढी घडविण्याची प्रेरणा देणारी कादंबरी आहे असे म्हटले आहे.
डॉ. मोरे यांनी बनगरवाडी ते काटेमुंदरी’ या लेखात ‘बनगरवाडी’ आणि ‘माझी काटेमुंढरीची शाळा’ या दोन कादंबरीची वेगवेगळ्या पातळीवर तुलना करून दोन्ही कादंबऱ्यांची वैशिष्ट्ये अधोरेखित केलेली आहेत. ते म्हणतात, ‘बनगरवाडी उत्तम कलाकृती आहेच. परंतु माझी काटेमुंढरीची शाळा कलाकृती बरोबर एक सामाजिक कृती देखील ठरली आहे.
शहाणपणाचे आदिम तत्वज्ञान’ या लेखात डॉ. तेजस चव्हाण यांनी विस्ताराने या कलाकृतीची चिकित्सा केलेली आहे. त्यांच्या मतानुसार ‘समूहभाव, महानुभाव, कर्तव्य, निष्ठा, समर्पणवृत्ती, निस्पृहता आदी जीवनमूल्यांचा पुनर्विचार करून नैतिकदृष्ट्या पारदर्शी जीवन व्यवहार कसा करावा याचे सुज्ञ पण ही कादंबरी आपणास शिकविते. ‘
शिक्षणाधिकारी नामदेव माळी यांनी शिक्षणाची वाट सुकर करण्याचं आशास्थान’ या लेखात शिक्षकाचे स्थान अधोरेखित करत ‘जिद्दी, निष्ठावंत शिक्षक खूप काही करू शकतो हा आशावाद व्यक्त केला आहे. ते म्हणतात, प्रचलित शिक्षण व्यवस्थेवर सौम्यपणे प्रहार करत, चुकीच्या गोष्टींवर नेमके बोट ठेवत सगळे काही वाईट नाही. हे सूचित करणारी ही साहित्यकृती आजच्या शिक्षकांना दिशादर्शक ठरावी, अशी आहे.
शिक्षण विस्तार अधिकारी विश्वास सुतार यांनी कादंबरीचा रूपबंध, कादंबरीचे आशय द्रव्य, पात्रचित्रण, भाषाशैली व निवेदन, प्रादेशिक समाज संस्कृतीचे चित्रण, कादंबरीची मूल्ययुक्तता, मर्यादा यांच्या आधारे विवेचन केले आहे.
दीपक मेंगाणे यांनी काटेमुंढरी: समर्पणाची प्रेरणा देणारी कादंबरी या लेखात शिक्षकपणाचे संस्कार होण्यासाठी डी. एड. बी. एड.च्या अभ्यासक्रमात ही कादंबरी असायला हवी होती हे नमूद करत या साहित्यकृतीने त्यांना आत्मपरीक्षण करण्यास प्रवृत्त केल्याचे सांगितले आहे. त्यांनी वर्तमानाचे शैक्षणिक कटू वास्तव मांडून या कादंबरीचे महात्म्य अभिव्यक्त केले आहे. शिक्षकाच्या पाठीशी वरिष्ठ अधिकारी, विद्यार्थी, पालक, समाज या सर्वांनी सकारात्मकतेनं, विधायक मेनन, प्रगल्भतेने उभे राहिल्यास शिक्षक कार्याची उंची नक्की वाढते असे नमूद केले आहे.
‘महात्मा गांधी, रविंद्रनाथ टागोर आणि जे. पी. नाईक या जागतिक किर्तीच्या शिक्षणतज्ज्ञांना अपेक्षित असणारे शिक्षण काटेमुंढरीतील शिक्षकांच्या कृतीत पाहता येते असे सांगत डॉ. अनिल गवळी यांनी उत्तम संस्कारशील पुस्तक म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात कादंबरी लावल्याचे सांगितले.
प्रा. एकनाथ आळवेकर यांनी काटेमुंढरी आपल्याला काय देते?” या लेखात ध्येयवेडा शिक्षक, आदिवासींचे जीवन आणि संस्कृती, आदिवासी मुलांसाठी व पारंपरिक ज्ञान, सामाजिक बांधिलकी आणि मडगू पाटील, आदर्श विद्यार्थी बिंदू सेवाभावी वृत्तीचे नागोसे गुरूजी इ. मुद्यांच्या माध्यमातून विश्लेषण केले आहे. या कादंबरीतून एक ध्येयवेडा शिक्षकाचा ध्येयवाद, निष्ठा, दयाबुध्दी, निसर्गप्रेम, अहिंसावादी विचार दृष्टी तसेच आदिवासींच्या प्रथा, परंपरेबरोबर त्यांची उच्च जीवनमूल्ये समजून घेता येत असल्याचे म्हटले आहे. शेवटी – हदगत या भागात नीला उपाध्ये आणि हेरंब कुलकर्णी यांचे कादंबरी संदर्भातील विचार थोडक्यात दिलेले आहेत.
एकूणच हे ‘शोध काटेमुंढरीचा’ पुस्तक शिक्षण, शिक्षक, समाज इत्यादींना अंतर्मुख करते. रूढार्थानि समीक्षा नसली तरी विभिन्न तज्ज्ञांनी केलेली साहित्यकृतीची विश्लेषणात्मक चिकित्सा, मीमांसा वाचकांना शिक्षणाकडे बघण्याची नवी दृष्टी देते. शिक्षकांना सेवाधर्म आणि समर्पणाची प्रेरणा देते. कादंबरीचा उद्देश. भूमिका समजून घ्यायला मदत करते. विविध पात्रांच्या कृतीशीलतेतून आपणास धडा देते. शिकविते. हे पुस्तक शिक्षक, विद्यार्थी, संस्थाचालक, समाज, प्रशासन इ.नी वाचून चिंतन करायला हवे.
पुस्तकाची आशयघन शब्दांत नेमकेपणाने भूमिका मांडणारा ब्लर्ज डॉ. अभय बंग यांनी लिहिलेला आहे. राजेंद्र क्षीरसागर यांनी हातात पुस्तके, गळ्यात शबनम बॅग आणि चेहऱ्यावर हास्य असलेले गुरूजी आणि मागे निसर्गाच्या कुशीत बसलेले गांव असे आकर्षक मुखपृष्ठ रेखाटले आहे. प्रत्येक लेखाच्या अगोदरच्या पृष्ठावर कादंबरीतील निवडक ओळी दिलेल्या आहेत. शांतिनिकेतन’ आणि नयी तालीम या शिक्षण संकल्पनांना अर्पण केलेल्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या आतील बाजूस लेखक गो.ना.मुनघाटे यांचा थोडक्यात परिचय फोटोसह दिलेला आहे.
शिक्षणातून शिक्षण’ हरवत चाललेल्या या काळात भरकटलेल्या या शैक्षणिक जगताला दिशा देण्याचे काम ‘शोध काटेमुंढरीचा’ पुस्तक करते. शिक्षकांतील ‘शिक्षक’ जागविण्याचे काम करत त्याला नवी उर्जितावस्था देऊन प्रेरित करते. डॉ. नंदकुमार मोरे यांनी सांगितल्याप्रमाणे हे पुस्तक नक्कीच शिक्षक, विद्यार्थी, संस्थाचालक, प्रशासक, समाज इत्यादींना अनेक अर्थानि ‘शोध’ घ्यायला प्रवृत्त देखील करते.
पुस्तकाचे नांव : शोध काटेमुंढरीचा
संपादक :- डॉ.नंदकुमार मोरे
प्रकाशन :-स्वच्छंद प्रकाशन, कोल्हापूर
पृष्ठसंख्या : 184 मूल्य :-250/-
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.