उत्साहासाठी उत्सव असावा. मनाला त्यातून समाधान मिळावे. पुन्हा नव्या जोमाने उभे राहण्याची ऊर्मी त्यातून मिळायला हवी, पण सध्याचे उत्सव हे चंगळवादी संस्कृतीची परंपरा जोपासत आहेत. यातून शेवटी काय साधले जाते. उत्सव कशासाठी असतो, त्याचे महत्त्व काय हे जाणून घेणे गरजेचे आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
तेविं विषयांचे जे सुख । ते केवळ परमदुःख ।
परि काय कीजे मूर्ख । न सेवितां न सरे ।।४९९।। ज्ञानेश्वरी अध्याय ९ वा
ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें विषयांमध्ये जे सुख आहे, ते निव्वळ कडेलोटींचे दुःखच आहे. परंतु काय करावे ? लोक मुर्ख आहेत. विषयांचे सेवन केल्यावाचूंन त्यांचे चालतच नाही.
हे माझे, हे माझे असे करत मनुष्य सतत विषयांच्या, वासनेच्या मागे धावत असतो. भोगाकडे त्यांचा कल अधिक असतो. त्या शिवाय त्याला तृप्त झाल्यासारखे वाटत नाही; पण हे सुख क्षणिक असते. ते त्याच्या कधीही लक्षात येत नाही. तेवढ्यापुरतीच ही तृप्ती असते. या क्षणिक सुखाच्या मागे मूर्खासारखे तो सतत धावत असतो. स्पर्धेच्या युगात स्पर्धा कशाची करायची, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. सुख मिळते म्हणून धामडधिंगा घालायचा, हा चंगळवाद आहे. पाश्चिमात्यांचे अनुकरण करत आपल्याकडे सध्या वाट्टेल त्या स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. याचा परिणाम येथील पारंपरिक उत्सवावरही झाला आहे.
सण, उत्सव हे आज मनोरंजनाचे अड्डे झाले आहेत. आध्यात्मिकपणा त्यामध्ये राहिलाच नाही. चित्रपट संगीताच्या तालावर नाचगाणी म्हणजे गणेशाची आराधना नव्हे. यातही स्पर्धा सुरू असते. नव्या पिढीमध्ये देखावे, कला प्रकट करण्याचे साधन म्हणजे उत्सव, असाच अर्थ रुजला आहे. गोकुळ अष्टमीच्या निमित्ताने दहीहंडीचा पारंपरिक उत्सव साजरा केला जातो, पण सध्या या उत्सवात स्पर्धाच अधिक वाढली आहे. दहीहंडीला आता राजकीय पाठबळाबरोबरच कॉर्पोरेट कवचही मिळाले आहे. हा कार्यक्रम आता बाळगोपाळांचा, व्यायामशाळांच्या उत्साहाचा, भावभक्तीचा राहिला नाही. हंडी फोडण्यासाठी किती मोठा थर उभा केला, याची स्पर्धा यात आता लागलेली आहे. उंचीच्या या स्पर्धेत अनेकदा गोविंदा जखमी झाले. यातील काही जणांना आपला जीवही गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. अशा या उत्सवाच्या स्पर्धेतून शेवटी दुःखच पदरात पडत आहे.
उत्साहासाठी उत्सव असावा. मनाला त्यातून समाधान मिळावे. पुन्हा नव्या जोमाने उभे राहण्याची ऊर्मी त्यातून मिळायला हवी, पण सध्याचे उत्सव हे चंगळवादी संस्कृतीची परंपरा जोपासत आहेत. यातून शेवटी काय साधले जाते. उत्सव कशासाठी असतो, त्याचे महत्त्व काय हे जाणून घेणे गरजेचे आहे. धार्मिक उत्सवात सध्या भावभक्तीचा उल्लेखही होत नाही. मग खऱ्या ज्ञानाच्या, सुखाच्या प्राप्ती यातून कशी होणार? यातून केवळ परमदुःखच हाती लागणार.
आपण आपल्या सणसमारंभातून एक असा आदर्श निर्माण करायला हवा जो जगाला प्रेरणा देत राहील. यातून घेण्यासारखे खूप काही असेल. तेव्हाच आपण आपल्या सण-उत्सवांचे संवर्धन केल्याचा आनंद मिळेल. सण करायचे म्हणून करून काहीच हाती लागत नाही. देवाची पुजा करायची असते म्हणून करून देव कधीच पावत नाही. देवाची पुजा का करायची याचा विचार करून तशा पद्धतीने देवाची पुजा केल्यास योग्य फलप्राप्ती निश्चित होते. मनाच्या शुद्धतेसाठी पुजा असते. मग तशा पद्धतीने पुजा करून मन शुद्ध करून घ्यायला हवे. विषयांच्या विचारातून पुजा केल्यास मन शुद्ध कसे होणार ? मन विषयात गुरफटून पदरी दुःखच येणार हे लक्षात घ्यायला हवे आणि तसे आचरण करायला हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.