ग्रामीण आणि शहरी संस्कृती बरोबरच कृषी संस्कृतीचा परिचय करून देत जीवनावर मार्मिक भाष्य करणाऱ्या कविता कवी अ. म. पठाण यांनी आईचा हात या बालकुमार कविता संग्रहात लिहिलेली आहे.
प्रा. रामदास केदार
उदगीर
मोबाईल – ९८५०३६७१८५
कवी अ. म. पठाण हे पैठण तालुक्यातील लोहगाव येथील असून व्यवसायाने ते शिक्षक आहेत. जिव्हाळा, वाजंत्री, अनाथ, मला शाळंत जायचं, पाणपोई, आईचा हात, हे कवितासंग्रह. गोदाकाठचे गावकुस हे ललित संग्रह. तर झुमरी, पाणक्या हे कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.
आईवडिलांचा सन्मान तर गुरुजनांचा आदर कसा करावा ? शेती, माती आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून आपुलकीचे नाते कसे निर्माण करावे ? हे बालकुमारांना कवी कवितेतून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. दगडाला देव समजून पुजा करण्यापेक्षा माणसांने माणसात देव शोधावा. गाडगेबाबांचे विचार जसे आहेत तेच विचार आपल्या कवितेतून उभा करतो आहे. आईचा हात म्हणजे संकटकाळी पाठीवरती धीर देणारी सावली आहे. आईचा हात म्हणजे ममतेचा झरा आणि माणूसकीचा धर्म आहे.
आईचा हात
शिकवी भक्ती
दुःख निवारण्या
देई सदा शक्ती
आईचा हात
राबे दिनरात
अंधाराला दूर करी
समईची वात
कवी गुरुला महत्त्वाचे स्थान देतो. गुरूकडून आपल्याला खरे ज्ञान प्राप्त होते. तो नित्याने आदर्श पिढी घडवितो. तिमिरातूनी तेजाकडे वाटचाल करण्यासाठी गुरुंची धडपड एखाद्या देवदूतासारखी असते असे कविला वाटते. तर निसर्गावरही जीवतोडून अपार प्रेम करतो. हे निसर्गाचे वैभव पाहून ह्रदय माझे उमलून, भरुन येते असे कवी निसर्गाची ओळख करून देतो.
आभाळ मजला हाक देई
ढोल ढगांचा वाजत राही
मेघ वा-यासंगे धावून येई
मातीची तहान तृप्त होई
रानातल्या मळ्यावर लळा लावणारा हा कवी झाड फुलांशी नाते सांगत पशू पक्षांशी बोलतो आहे. ग्रामसंस्कृतीचे विलोभनीय दर्शन कवी पहाटेचे वर्णन करताना करतो. गावाकडची सोनेरी सकाळ माणसांच्या मनाला कशी वेड लावणारी असते हे कवी लिहितो.
झाडावर पक्षी किती
करती किलबिलाट
सूर्याच्या उगवण्याची
सारे बघतात वाट
गावच्या नदीवरून
माय आणायाची पाणी
भरभर चालण्याचा
आवाज पडतो कानी
ही सकाळ म्हणजे कळ्या उमलण्याची आणि फुले मुक्या मनी हसण्याची वेळ आहे. जीवनाची मधूर गोड गाणी पक्षी गाऊ लागतात. तरुवर वेली वा-यासंगे झोका खेळू लागतात. अशा सुंदर प्रहरी बाप कष्ट करण्यासाठी जातो. हा माझा बाप जगाचा पोशिंदा आहे असे कवी म्हणतो.
पेरतांना बी मातीत जाऊन रुते
हात जोडून मातीतून कोंब फुटे
पावसाने मोप पीक येईल यंदा
बाप आहे हा उभ्या जगाचा पोशिंदा
धुंवाधार पाऊस काळ्या काळ्या रानात झिम्मा फुगडी खेळत कसा खेळतो आणि त्याच्या येण्याने मातीचा गर्भ वाढू लागतो. पाऊस कवितेत कवी वर्णन करतो. पर्वतांचे वर्णन करत त्याला प्रश्न विचारतो. तुम्हाला वारे कसे धडकतात ? तुमच्या अंगावर झाडे कशी ताठ उभे राहतात ? कवी लिहितो.
पर्वतदादा पर्वतदादा
असतात तुमच्या रांगा
अंगावर झाडे किती
आम्हाला सांगा
आनंदी जीवनाची खरी ओळख कवी करुन देतो. जीवनातील तत्वे पाळायला शिकले पाहिजे. स्वाभिमान, देशाभिमान बाळगायला शिकले पाहिजे. दुबळ्यांची सेवा करावी. व्यथा वेदनाना जाळायला शिकले पाहिजे. जीवनाचे सुंदर गाणे कवी गातो आहे.
स्वाभिमान बाळगावा
देशाभिमान वाढवावा
घरचा दिवाळी सण आपण अनेकदा साजरा करतो. पण रानतली दिवाळी कवी साजरी करतो आहे.
दाटलेलेल्या नभाचा रानवारा होई मुऱ्हाळी
आनंदाने साजरी होई रानातली दिवाळी
रानमेवा, मामाच्या मळ्यात, नागपंचमी, मायमराठी, रानपाखरे, कळ्याफुले, विदूषक, रानमळा, आजोळची वाट, रानफुला इत्यादी कविता वाचनिय आहेत. आमराई म्हणलं की मुलांच्या तोंडाला पाणी येणारच! हिरव्या कैऱ्या पाडून खातांनाचा आनंद वेगळाच असतो. पाडाला आंबे आले की माकडासारखी झोंबणारी मुलं झाडांच्या खांद्यावर चढतात. हे आमराईचे वर्णन कवी करतो आहे. मातृभूमी आणि मातृभाषा हे आपल्यासाठी खूप प्रिय आहेत. मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सैनिक अहोरात्र सीमेवर लढा देत आहेत. आपण त्या सैनिकांना बळ देऊ या. उभारीचे पंख देऊया असे कवी म्हणतो.
जलक्रांती कवितेतून कवी पाण्याचे किती महत्त्व आहे तो कवी सांगतो. पाणी म्हणजे जीवन आहे. जपलं पाहिजे. पाणी टिकवून ठेवले पाहिजे. जल पुनर्भरण केले पाहिजे असे कवीला वाटते.
थेंब थेंब पावसाने
जल पुनर्भरण करुया
होणारी पाणी टंचाई
कायमची दूर करुया
झाडे लावली पाहिजे ती जगवली पाहीजे. फळे, फुले आणि सावली या बरोबरच पाऊस घेऊन येतात. पर्यावरणाचा दृष्टिकोन मुलांसमोर कवी ठेवतो. पाऊस पडला तर नदी माऊली काठ भरुन वाहत जाईल आणि वसुंधरेला आनंद होईल. रानमळे फुलायला लागतील. सुगी पिकल्या शिवाराला उधान येईल, शेतकरी आनंदी होईल .हा श्रावण हसायला लागेल असे कवी म्हणतो.
उन्ह पावसाचा खेळ
रानीवनी सुरु झाला
असा साजरा हसरा
महिना श्रावण आला
रिमझिम बरसत
हिरवा डोंगर न्हाला
शीतल वारा पिऊन
महिना श्रावण आला
नदी नाले, ओहळा माळातून, डोंगरदऱ्यातून प्रवास करत कवींची कविता मानवी मनाबरोबरच बालमनाला आनंद आणि प्रेरणा देणारी नक्कीच आहे. कवींची कवितेला एक लय आहे, गोडवा आहे, मधुरता आहे. रानमळ्यात बहरणारी, झाडफुलांत बहरणारी, पीक पाण्यात, कणसात बहरणारी कविता ही मुलांच्या मनात बहरत राहणारी आहे. ग्रामसंस्कृती, कृषी संस्कृतीची ओळख करून देत मुलांना नवचैतन्याचा धडा देणारी आहे. आतील चित्रे व मुखपृष्ठ सरदार यांनी रेखाटले आहेत. संजय खाडे, श्रीकांत पाटील, ल. म. कडू, इंद्रजित भालेराव अनिल कांबळी यांनी सुंदर अभिप्राय दिला आहे. तर उत्तम कोळगावकर यांची कवितेला व कवी भावनेचा आशय समजून आशयात्मक अशी पाठराखण लिहिलेली आहे.
पुस्तकाचे नाव – आईचा हात (बालकुमार कविता)
कवी – अ. म. पठाण
प्रकाशन – गाव पब्लिकेशन्स, औरंगाबाद
पृष्ठे – ८० , किंमत – १००
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.