April 17, 2024
Book review of Jameen aanee aakash by Madhavi Kunte
Home » समाजाचे सत्यदर्शन घडविणारा कथासंग्रह
मुक्त संवाद

समाजाचे सत्यदर्शन घडविणारा कथासंग्रह

न्यूज चॅनेलमधील महिलांसाठी असुरक्षित जग, टीव्ही सिरीयलमधील हेवेदावे, मठामधील साधनेच्या नावाखाली चाललेले हिडीस वातावरण, गुरूकुलचे वेगळे जग, आजकाल सगळीकडे पसरलेले सहजीवनाचे फॅड, ड्रगच्या आहारी गेलेले तरूण-तरुणी, प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांवर राजकारणी आणित असलेले बाळंट असे ज्वलंत विषय सात कथांमधून आले आहेत.

अशोक बेंडखळे

जगाकडे वेगळ्या दृष्टीने पाहता आले, वेगवेगळे अनुभव घेता आले की, कथा लेखकाला अनेक कथाबिजे मिळतात. याचा प्रत्यय अनेक वर्षे कथा लिहित असलेल्या माधवी कुंटे यांच्या ‘जमीन आणि आकाश’ या नवीन कथा संग्रहातील कथा वाचल्यानंतर मिळतो. सर्व साधाणरपणे स्त्री लेखिका म्हटलं की, त्या प्रेमकथा वा कौटुंबिक कथाच लिहिणार असा संकेत ठरून गेला आहे. मात्र या संग्रहातील बारा कथा वाचल्यानंतर लक्षात येते की, लेखिकेनं वेगळे विषय अनेक कथांमधून मांडले आहेत. विशेष म्हणजे अशा घटनांचा वेध घेतला आहे, ज्या आपण आजकाल आपल्या आजूबाजूला घडताना सतत पाहत असतो. त्यामुळे या संग्रहातील कथा वाचताना वाचन आनंद देण्याबरोबर वेगळा विचार देतात.

या कथांमध्ये न्यूज चॅनेलमधील महिलांसाठी असुरक्षित जग, टीव्ही सिरीयलमधील हेवेदावे, मठामधील साधनेच्या नावाखाली चाललेले हिडीस वातावरण, गुरूकुलचे वेगळे जग, आजकाल सगळीकडे पसरलेले सहजीवनाचे फॅड, ड्रगच्या आहारी गेलेले तरूण-तरुणी, प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांवर राजकारणी आणित असलेले बाळंट असे ज्वलंत विषय सात कथांमधून आले आहेत. चार कथा कुटुंबातले पेचप्रसंग सांगणार्‍या असून प्रेमकथेच्या अंगाने जाणार्‍या आहेत आणि एक कथा प्रेमकथेचा वेगळा आविष्कार दाखवणारी आहे.

पहिली कथा ‘ब्रेकिंग न्यूज’ न्यूज चॅनेलचं विदारक जग दाखवणारी आहे. निर्झरा एका न्यूज चॅनेलची धडाडीची पत्रकार. एक नराधम एका मुलीवर बलात्कार करतो, त्याची ती न्यूज करते. त्याचा बदला तो घरी येऊन तिला आणि तिच्या वृद्ध आजीला जखमी करून घेतो. आजीचं हॉस्पिटलमध्ये नयन मावशी येऊन तिची शुश्रुषा करते. मावशीचे पती निवृत्त एसीपी असतात. तेही मदत करतात. इन्स्पेक्टर गुन्हेगाराचे स्केच काढून तिला दाखवतात. तपासानंतर गुन्हेगार सापडतो आणि तो नयन मावशीचा मनोरूग्ण असलेला मुलगा निघतो. माणसांची वेगळी रुपं इथं समोर येतात. तसेच न्यूज चॅनेलमधील हेवेदावेसुद्धा.

पुस्तकाला शीर्षक लाभलेली ‘जमीन आणि आकाश’ ही कथा टीव्ही सिरीयलमध्ये लोकप्रिय असलेल्या स्वरा या अभिनेत्रीची कर्मकहाणी सांगणारी आहे. सोहम तिचा मित्र असतो. मॉडेलिंगची कामे करणारा. त्यानं स्वराला वापरून घेतलं आणि तिची मैत्रिण इशाशी अफेअर केलं. त्याला तिनं हाकलून दिलं आणि रिहानबरोबर ती रिलेशनशीपमध्ये एकत्र राहू लागली. रिहानचाही तिच्या पैशावर डोळा असतो. तिनं जेव्हा लग्नाचं विचारलं, त्यानं रूद्रावतार धारण केला. तिनं रागाच्या भरात झोपेच्या गोळ्या घेतल्या. तिचे आई-वडील धावून येतात आणि वडील तिला जगण्याची जाणीव करून देतात. टीव्ही सिरीयलमधील तकदालू जग ही कथा सांगते.

मठामध्ये पंथाच्या नावाखाली चाललेल्या साधना, तिथले हिडीस प्रकार ‘बंधमुक्त’ कथेत येतात. संयुक्ताचे आई-बाबा पंथात जात असतात आणि ते मुलीला पंथात जाऊन मठात रहावं, तिथली जनसंपर्क व्यवस्था सांभाळावी अशी गळ घालतात. पंथाची माणसं किती घातक आहेत, त्याची तिला कल्पना देतात. आई-बाबांना काही इजा होऊ नये म्हणून नाईलाजाने संयुक्ता मठात जायला तयार होते. एकदा तिला मठात तिचा कौमार्यभंग श्रीमद्गुरूंनीच केल्याचे लक्षात येते आणि मग ललिता नावाच्या बाई आणि मठात येणारा डॉ. चंद्रशेखर तिची या नरकातून सुटका करतात. उपचार करण्याच्या बहाण्याने डॉक्टर तिला घेऊन परदेशात जातात आणि ती बंधमुक्त होते.

आश्रम असलेल्या गुरूकुलमधील पवित्र वातावरण कथन करणारी ‘मुमुक्षू’ ही कथा आहे. आचार्य निवृत्तीनाथांनी घनदाट अरण्यात आश्रम स्थापन केला होता आणि इथे बुद्धीमान मुलांकडून भौतिकातून सूक्ष्माकडे जाण्याची, चिरंतन सत्य जाणून घेण्याची साधना केली जात होती. विजयेंद्र आणि सत्येंद्र या दोन तल्लख शिष्यांची ही कथा आहे. निवृत्तीनाथ दोघांना भ्रमण करण्याचा सल्ला देतात. विजयेंद्र लोकांमध्ये राहायचे ठरवतो. तर सत्येंद्र हिमालयात जातो. शेवटी दोघे गुरू विश्‍वनाथांकडे येतात. ते दोघांना शुद्ध जाणिवेची नीरव अवस्था साधण्याचा आणि त्यातून ज्ञानप्राप्ती करण्याचा सल्ला देतात. गूढ वातावरणातील ही कथा आहे.

एका खासगी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करणारी किशोरी आणि फिल्मी दुनियेचा लाडका फोटोग्राफर प्रसाद यांच्या सहजीवनाची ‘रितसर’ ही कथा. कंपनीच्या एका जाहिरातीच्या कामानिमित्ताने दोघे एकत्र येतात. बहिणीचा डायव्होर्स हा हिंसक प्रकार तिनं पाहिलेला होता. म्हणून लग्न न करता प्रसादबरोबर एकत्र राहण्याचा निर्णय ती घेते. दोन-तीन वर्षे एकत्र राहिल्यामुळे सगळीजण त्यांना नवरा-बायको समजू लागले. आई तिला रितसर लग्न करण्याचा सल्ला देते. आईचं म्हणणं तिला पटतं आणि शेवटी ती रितसर नोंदणी कचेरीत नोटीस देऊन लग्नाचा निर्णय घेते.

ड्रगच्या व्यवसनाचे दुष्परिणाम दाखवणारी ‘वाहक’ ही कथा आहे. देवकी आता ड्रगचं व्यसन जडलेल्या रूग्णांवर काम करते. मात्र तिला कॉलेजमध्ये असताना सैफ नावाच्या मित्रामुळे थाबा या मादक द्रव्याचं व्यसन जडते. त्यातून ती थायलंडला जाते. वेगळा अनुभव घेते. तिथून येताना एक कॅप्सुल पोटात फुटून बरोबरीची मैत्रीण मरते आणि ती कोलमडून जाते. घरच्या सर्वांना खरे सांगते आणि डॉक्टरांच्या ट्रिटमेंटने ती या व्यसनातून कशी बाहेर पडते ते कथेत आले आहे. अशा गोष्टी आपण वृत्तपत्रांमधून नेहमी वाचत असतो. ते सांगणारी ही कथा, आजच्या तरुणांचे वेगळे विश्‍व उभं करते.

‘पेच’ म्हणजे आजच्या राजकारण्यांचं विदारक रुप समोर आणणारी कथा. श्रेयस बँकेत काम करणारा प्रामाणिक तरुण. एका भ्रष्टाचारी नगरसेवकाविरूद्ध त्याने सोशल मीडियावर मोहिम उभारली आणि त्या नगरसेवकाने खोट्या आरोपाखाली श्रेयसला पोलीस कोठडीची हवा खाण्यास भाग पाडले. एका क्षणी निराश होऊन तो आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. त्यातून त्याला चांगल्या मनाचा गुंडादादा वाचवतो. श्रेयसची केस ऍड. सतीश नावाचे वकील घेतात आणि श्रेयस व त्याच्या मित्रांना मदत करतात. गुन्हेगारांच्या वेगळ्या साखळीचा पेच समोर येतो आणि वकीलही त्याने भांबावून जातात. आजकाल सर्रास घडणारी ही कथा, आजचे समाजजीवनाचे सडलेले राजकारण दाखवणारी आहे.

राहिलेल्या चार कथांमध्ये कुटुंबातले पेचप्रसंग आले आहेत. ‘अनुत्तरित’ ही हिंदी लेखक परिमल, त्याची पत्नी मधुमिता आणि मैत्रीण जयंती यांची कथा आहे. परिमलला पत्नीकडून हवे ते प्रेम मिळत नाही आणि तो मैत्रीणीकडे ओढला जातो. आपल्या डॉमिनेट करणार्‍या स्वभावामुळे मैत्रिणीलाही हरवून बसतो. परिमलचा मित्र आभास त्याला मदत करतो. पुरूषाला स्त्रीचं मृदु हळवं, प्रेमळ रुप हवं असतं. ते नाही मिळालं की, त्याची अवस्था मनोरुग्णाकडे कशी वळते ते सांगणारी ही कथा तर ‘जनन’मध्ये रमाबाई-भास्करराव या सालस जोडप्याच्या वैदेही या मुलीची फसलेली प्रेमकथा आहे.

‘आधार’ या कथेत नवर्‍याचं अपघातात निधन झालेली वसुंधरा आयुष्यातील समस्यांना ज्या धैर्याने तोंड देते ते सांगणारी कथा. तिची डॉक्टर झालेली मुलगी श्‍वेता हिची लग्नानंतर फरफट होते. तरीही ती माणुसकी म्हणून नवर्‍याची रखेल सुनीता आणि तिची मुलगी यांना आधार देते. आईचा आधारही तिला आश्‍वस्त करतो. जादूगार राजशेखर, त्याची पत्नी पद्मा आणि मैत्रीण लता अशा प्रेमाचा त्रिकोण ‘सखे राधिके’ या कथेत आहे. शेवटी राजशेखरला कळते लताला त्याचे शरीर हवे असते तर पद्माला केवळ पैसा. त्याला जाणून घेणारी सखी भेटली नाही ही भावना कुरतडत राहते. अशीच हलकी फुलकी प्रेमकथा ‘प्रेमात आणि युद्धात’मध्ये आहे. अरुण आणि मीरा यांची मुलं आशा आणि रोहन यांना खेळामधून आपल्या आई-वडीलांची प्रेमकथा समजते आणि मुलं चकित होतात. पुस्तकातील अनेक मुद्रणदोष रसभंग करतात. आपल्या आजूबाजूला घडणार्‍या या कथा रंजक तसेच समाजाचे सत्यदर्शन घडविणार्‍या आहेत.

पुस्तकाचे नाव – जमीन आणि आकाश.
लेखिका : माधवी कुंटे
प्रकाशन – अक्षता प्रकाशन, पुणे संपर्क – 9850817685
मुखपृष्ठ : ल. म. कडू,
पृष्ठे : 199, मूल्य : 300 रूपये

Related posts

संक्रांतीपासून मान्सून बाहेर व थंडी आत

प्रचितीगडावर जाण्यासाठी उभारली शिडी !

सहिंस्नू….

Leave a Comment