April 24, 2024
Let good thoughts burst into the air for delicious fruits
Home » मधुर फळांसाठी हवेत चांगल्या विचारांचे फुटवे
विश्वाचे आर्त

मधुर फळांसाठी हवेत चांगल्या विचारांचे फुटवे

झाडाला जशी नवी पालवी फुटत असते, तसे नवे विचार हे मनात उत्पन्न होत असतात. हे नव्या विचारांचे फुटवे अमर्यादीत असतात. पण यातील योग्य व उपयुक्त विचारांचे फुटवे ठेवून बाकीचे फुटवे हे खुडावे लागतात. तरच आत्मज्ञानाचे मधुर फळ चाखता येऊ शकेल. यासाठी योग्य व अभ्यासपूर्ण छाटणी ही गरजेची आहे.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

तरी अवसांत आली माधवी । ते हेतु होय नवपल्लवी ।
पल्लव पुष्पपुंज दावी । पुष्प फळाते ।। ३५४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थः अकस्मात वसंत ऋतु आला तर तो वृक्षवेलींना नवीन पालवी उत्पन्न करण्यास कारण होतो. त्या नव्या फुटलेल्या पालवीतूनच पुष्पांचे गुच्छ दृष्टीत्पत्तीला येतात व ती फुलें, फलांची प्राप्ती करून देतात.

फळधारणा ही नेहमी नव्या पालवीवर होते. यासाठी नव्या पालवीला महत्त्व आहे. वसंतामध्ये नवी पालवी फुटते. त्या नव्या पालवीला फुले येतात, फळे येतात. वृक्ष कितीही जुना असला तरी फलधारणा ही नव्या पालवीवर होते. विशेषतः वसंतातील फुटव्यांना महत्त्व आहे, कारण त्यापासून मिळणारी फळे ही रसाळ, तजेलदार, मधूर असतात.

अधिक मधुर फळे मिळवण्यासाठी हा विचार शेतकरी अवलंबतो. नवी पालवी, फुटवे योग्य प्रमाणात ठेवून त्याचे नियोजनही अनेक शेतकरी करतात. जास्तीचे फुटवे खुडून टाकण्यात येतात. योग्य व चांगली वाढ होण्यासाठी व जास्तीत जास्त फळधारणेसाठी हा प्रयोग केला जातो. यामुळे अधिक चांगली व उत्तम दर्जाची फळे आपणास मिळतात. अशा बारीक-सारीक गोष्टींचा अभ्यास करून शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी पूर्वीच्या काळीही प्रयोग केले जात होते. आत्ताही असे प्रयोग केले जातात. भावी काळात शेतीमध्ये अशा प्रयोगांचीच गरज भासणार आहे. शेतीत प्रयोग करतच शेती ही शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. यासाठी शेतीचा सर्वार्थाने अभ्यास हा गरजेचा आहे, तरच शेतकरी शेतीत नफा मिळवू शकणार आहे.

प्रयोगशील शेतकरीच खऱ्या अर्थाने भावीकाळात शेती करू शकणार आहे. वाढता उत्पादन खर्च विचारात घेता आता उत्पन्न वाढीसाठीचे प्रयोगही शेतकऱ्यांना करावे लागत आहेत. केवळ खराब हवामानाचे आव्हान शेतकऱ्यांसमोर नाही, तर पावलोपावली शेतीमध्ये आता आव्हाने उभी राहीली आहेत. शेतीच्या मशागतीपासून ते शेतमालाच्या विक्रीपर्यंत सर्वच पातळ्यावर शेतकऱ्यासमोर आव्हाने उभी आहेत. या आव्हानांचा सामना करतच शेतीमध्ये प्रगती साधावी लागणार आहे.

अध्यात्मामध्येही असेच आहे. प्रत्येक पावलावर आव्हाने ही उभी आहेत. या आव्हानांचा सामना करतच ध्येय गाठावे लागते. अनेक विचार मनात घोळत असतात. झाडाला जशी नवी पालवी फुटत असते तसे नवे विचार हे मनात उत्पन्न होत असतात. हे नव्या विचारांचे फुटवे अमर्यादीत असतात. पण यातील योग्य व उपयुक्त विचारांचे फुटवे ठेवून बाकीचे फुटवे हे खुडावे लागतात. तरच आत्मज्ञानाचे मधुर फळ चाखता येऊ शकेल. यासाठी योग्य व अभ्यासपूर्ण छाटणी ही गरजेची आहे.

चांगल्या विचारांच्या प्रवाहातूनच, प्रभावातूनच नवी उत्तम फळे मिळू शकतात. अशा विचारावर कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो. झालाच तरी त्याच्याशी सामना करण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती किंवा तग धरून राहण्याची क्षमता या प्रभावी विचारात असते. त्यामुळे फळधारणेवर याचा परिणाम फारसा होत नाही. आत्मज्ञानाची मधुर फळे चाखण्यासाठी योग्य व चांगल्या विचारांचे फुटवे हे मनात वाढू द्यायला हवेत. सकारात्मक विचारांचा फुटवा योग्य असेल तर तो निश्चितच प्रतिकुल परिस्थितीवरही मात करू शकतो.

Related posts

प्रेम चिरंतन…

दाहक वैश्विक वास्तवाचा वेध घेणारी कादंबरी कडेलूट

श्रेष्ठ भक्त कोणास म्हणावे ?

Leave a Comment