September 8, 2024
Book Review Prashant Bhandare of Kavdsa
Home » नियतीच्या अंधारात नीतीचा किरण : कवडसा
मुक्त संवाद

नियतीच्या अंधारात नीतीचा किरण : कवडसा

काव्यातील वास्तवाचे अंकुर फुलविणारा मर्मबंध वेगळ्या धाटणीचा आहे. दोष देत आकांडतांडव करण्यापेक्षा स्वतःचा आढावा घेणारी प्रतिभा; विज्ञानवादी कवी म्हणून प्रशांत भंडारे यांची ओळख निर्माण करते.

लक्ष्मण खोब्रागडे

जुनासुर्ला , ता. मूल , जि. चंद्रपूर

शब्दांची ती काया बनविली
भावफुलांनी सजीव केली
अर्थाचा मग आत्मा ओतला
कविता माझी जन्मा आली
अनुभवविश्वाला जिवंतपणा देत शब्दातून व्यक्त होणे, साधे काम नाही. मनात उठणाऱ्या भावतरंगाला गुंफणसंजीवनी द्यावी लागते. हीच संजीवनी अर्थाच्या सामर्थ्याने विचाराला गती देत जाते. अशीच गती आपल्या प्रतिभापंखात भरून काव्यभरारीची झेप घेणारा कवी प्रशांत भंडारे. नियतीच्या अंधारात ठेचाळून रक्ताळलेल्या पाऊलवाटा आधाराचे अंकुर मजबूत करतात. बळकट अंकुरातून नीतीचा वटवृक्ष तयार करण्यासाठी, कवडसारुपी किरणातून परिवर्तनाचे प्रकाश संश्लेषण घडवून आणण्यात कवी प्रशांत भंडारे यशस्वी झाला आहे.

भूपाळीच्या मधुर स्वरांनी
प्रभा हासरी नाचत आली
पूर्व दिशेला मित्र प्रगटता
सोनकोवळी पहाट झाली
प्रगट भावनांना अगदी साजेसा शीर्षक कवडसा काव्यसंग्रहातील उमेदीचा किरण आहे. कवीच्या अंतरंगात खोल रुजलेली मूल्यबीजे काव्यातून प्रसन्न पहाटेची चाहूल देतात. समाजजीवनाच्या निर्ढावलेल्या कोलाहलात मानवी सौख्य शोधणारा कवी ; अरुण झगडकर यांनी आपल्या प्रस्तावनेतून अधिक स्पष्ट केलेला आहे. गजलकार दिलीप पाटील यांनी कवीच्या लेखनगर्भाचा पिंड प्रतिबिंबित करून रसग्रहण करण्यात सुलभता भरलेली दिसते. लखनसिंग कटरे यांनी काव्यसंग्रहाच्या प्रत्यंगाची ओळख करीत मलपृष्ठावर कवीचा सामर्थ्यतेज दाखवून, काव्यकृतीचा गाभा स्पष्ट केलेला आहे.

दिवस निर्मात्या गोल फळाला करालदंती काळ ग्रासतो
सदेह जातो लयास भानू गोरजसमयी रजनीश हासतो
खेळ चालतो तम तेजाचा अंत कुणाचा उदयावरती
तेजोवलयी मुनी तपस्वी मावळतीला क्षितिजावरती
मनातील काहूर व्यक्त करीत कवी सृजनाची वाट शोधतो. संपल्यावर सुरुवात करायची असते, या आशयपूर्ण गहणतेत शब्दभांडाराची उधळण कवीचा वेगळा ठसा उमटवते. ग्रामीण जीवनाचे चटके सोसत परिपक्व झालेली कवीची निरीक्षणशक्ती, प्रत्येक घटनेतून संदर्भ शोधते. साहित्याला नवा अध्याय जोडणारा कवीकडे असलेला असा दुवा क्वचितच पहायला मिळते. जगरहाटीतील दोगलेपणा अनुभवायला मिळाल्याने, त्यात वैचारिक पोक्त झालेला कवी; कधी कठोर तर कधी आठवणीत हळवा होताना दिसतो. असे मिश्रण साहित्याचा कळस चढविण्यात पोषक ठरते.

आता निव्वळ आठवणीचे
मनात आहे सुरेख गोंदण
बालपणीचे दिवस सुखाचे
आयुष्याचे सुवर्ण कोंदण
बालपणापासून चिकित्सक ज्ञानदिपाचा प्रकाश बघितल्याने, कवी शब्दाच्या धारेतून विवेकबुद्धी, सत्कर्म व परिश्रमाची मशागत करताना दिसतो. नवनिर्मितीची ही पेरणी कवीच्या प्रगल्भतेची साक्ष देते. आशयसरीने चिंब मेंदूत फिनिक्स पक्ष्याची भरारी भरण्याचे बळ काव्यासंग्रहातून बहरत जाते. यातून निष्पर्ण झाडाला पालविचा तजेला देणाऱ्या झऱ्याचा प्रत्यय येतो. संकटाचे वरकरणी परिणाम सांगता येतात, पण मुळातून रुजल्याशिवाय दूरगामी प्रभावापासून वाचता येत नाही. नेमका हाच धागा अवगत करून कवी काव्यसचोटीला उतरला आहे.

मित्र जवळचे भेटत नाही
भेटत नाही गावे
घरट्यांमध्ये कोंबून बसले
भिरभिरणारे रावे
पोटासाठी करावा लागणारा आटापिटा, त्यातून निर्माण होणारा स्वैराचार व घसरलेली नितीमत्ता कवीने समाजाच्या बदलत्या प्रारूपात चपखल मांडली आहे. कवीने विकसित केलेली रचनेची स्वतंत्र शैली, काव्याचे विविध प्रकार लीलया पेलताना दिसते. भूतकाळाची जळमटे काढून आठवणींचा गुंता सोडविताना, शब्दगारव्याची झुळूक वाहत जाते. मनातून रडणारा बाप बनून कवी नात्यागोत्यातील माया ताकतीने मांडतो. कवीची स्वतंत्र प्रतिभा झोपडीतला दिवा बनून शब्दप्रकाशाने अनिष्ट अजागळ दूर सारत, ज्ञानाचा उजेड भरताना दिसते.

बरेच झाले लिहून आता
प्रित प्रणय अन पिंपळपान
कवितेमधून उमटत जावे
जाण ठेवुनी समाजभान
मराठी भाषेचा गर्व बाळगत, तिला वेगळा आयाम देण्यासाठी कवीची लेखणी सक्षमच म्हणावी लागेल. अनिष्ट रुढींवर प्रहार करतांना वज्रहून कठोर कवी ; कृतज्ञतेत लिन बघताना, महाराष्ट्र संस्कृती अधिक प्रखर झालेली दिसते. काव्यातील हा नावीन्य साहित्यात सांजगारवा भरणारा आहे. काव्यातील वास्तवाचे अंकुर फुलविणारा मर्मबंध वेगळ्या धाटणीचा आहे. दोष देत आकांडतांडव करण्यापेक्षा स्वतःचा आढावा घेणारी प्रतिभा; विज्ञानवादी कवी म्हणून प्रशांत भंडारे यांची ओळख निर्माण करते.

मी पायत असतो
हातात विज्ञानाचा पुस्तक घेऊन
शेरणीची वाट…
उद्याचा पेपर साजरा जावा म्हणून
जगल्याशिवाय जागवता येत नाही. जागवत जागवत जगवण्याचे कौशल्य कवीच्या काव्यमांडणीत दिसून येते. चुकलेल्या वाटेतून पुनःप्रवासाची झेप सर्जनाशिवाय शक्य नाही. कवडसा या काव्यसंग्रहाचा आत्मा सर्जन असल्याने, निदानाची धार प्रत्येक शब्दातून प्रतीत होते. समाजातील शोषणापासून पोषण करणाऱ्या शेतकऱ्यापर्यंत मांडलेल्या रचना कवीच्या पाझरणाऱ्या हृदयाची साक्ष ठरतात.

आता कोठे कविता माझी कळू लागली
गोड कुणाला आणि कुणाला कडू लागली
अन्यायाप्रति आक्रोश करणारी शब्दमालिका मृगजळ नसून विसंगतीवर वज्रघात आहे. विद्रोहाची मशाल हातात घेऊन कवी, साहित्यवाटेचा पांथस्थ बनून जुने करार मोडीत काढताना दिसतो. समाजस्वास्थ्य खिळखिळे करणाऱ्या व्यसनावर शांतपणे प्रहार करणारी कवीची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. दोषात गुरफटून झुरण्यापेक्षा सुखी चेहऱ्याचे भाग्य उजळण्यासाठी कवी आग्रही दिसतो. त्यासाठी वापरलेले शब्दांचे वेगवेगळे पैलू काव्यसंग्रहाचे अलंकारच. ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देणारी विकृती मोडीत निघाली पाहिजे, यासाठी कवी निधड्या छातीने सवाल उठवताना दिसतो. असे अमूल्य कसब कवीला अवगत असल्याचे काव्यसंग्रहातुन स्पष्ट होते.

काळ हा बिकट आता जगात माजली दुही
युद्ध थांबवेल काय देव मंदीरातले
केंद्रीकरण करून भावनांचा स्फोट न करता, विकेंद्रीकरणातुन विविध अनुभवाच्या कसोटीवर खरा उतरणारा काव्यसंग्रह म्हणून कवडसाचे रसग्रहण करावे लागेल. वृत्तबद्ध कवितेतील तंत्राची जाण, गजलेचा शास्त्रशुध्दपणा आणि मुक्तछंदातील गेयतेचा सुरेल संगम म्हणजे कवडसा. शास्त्र आणि तंत्राचे भान ठेवून सृजनाची निर्मिती करीत, समाजमन सुपीक करण्याची कला प्रत्येकालाच जमते असे नाही. त्यासाठी सरावाच्या कातळावर घासून झिजावे लागते. कवी हाताच्या रेषेवर विश्वास न ठेवता कर्माने भाग्य उजळण्याची किमया साधत आहे. किती सोसले आणि किती शोषले याचा हिशोब न मागता कवी, मूल्यमापनासाठी कवडसा वाचकांच्या हाती सोपवला असल्याची प्रांजळ कबुली देतो. प्रामाणिक प्रयत्न असल्याने अभिव्यक्त मूल्यांपासून कवी माघार घेत नाही, हीच धमक काव्यसंग्रहाची उंची वाढवते.

डोहात फेकला मी तरण्यास ग्रंथ माझा
पाणी अशुद्ध होते पुस्तक बुडून गेले
तिरडी सजून होती दारासमोर माझी
मारेकरी खरे पण खोटे रडून गेले
कवीचे खयाल पाहून कोणी दाद देतील, तर कोणाला बोचेल. पण मूल्यांचे नवे कोंब कोमेजणार नाही. मारेकऱ्यांची भिडमुर्वत न ठेवणारा काव्यसंग्रह कवडसा साहित्याच्या मंदियाळीतील नवा पर्व म्हणावा लागेल. कवी प्रशांत भंडारेने वाचकांच्या मनाचा ठाव घेऊन, परिवर्तनाच्या रथाचा चाक बनून प्रसवलेला काव्यसंग्रह म्हणून कवडसा सिद्ध होतो.

काव्यसंग्रह :- कवडसा
कवी :- प्रशांत भंडारे
प्रकाशक :- समीक्षा पब्लिकेशन, पंढरपूर
किंमत :- १५० रुपये


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

डी.बी.जे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्रयोग भूमीत भात लावण

पिंपळाचे झाड अन् शेतातील पिकांचे कीड नियंत्रण !

ओव्याची पानं खाण्याचे फायदे

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading