September 8, 2024
Chance of good rain in Maharashtra for four days
Home » चार दिवस महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता
काय चाललयं अवतीभवती

चार दिवस महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता

१ – मान्सूनचा आस व पाऊस :

९०० मीटर उंचीचा मान्सूनचा मुख्य आस सरासरी जागेवर असल्यामुळे उद्या रविवार दि. १४ जुलै पासून पुढील चार दिवस म्हणजे बुधवार दि. १७ जुलै पर्यन्त महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वाढली आहे. आस दक्षिणेकडे सरकण्याची शक्यता असुन पावसासाठी अनुकूलता वाढेल

२ – ‘ऑफ शोर ट्रफ’ ची ताकद व पाऊस :

अरबी समुद्रातील ‘ऑफ शोर ट्रफ’ मजबूत आहे.  पण त्याची ऊर्जा मुंबईसह कोकणात व सह्याद्रीच्या घाट माथ्यावरील पावसासाठीच खर्ची होत आहे. त्यामुळे धरण क्षेत्रात अजूनही धिम्या गतीने का होईना पण पाण्याच्या आवकेत सातत्य जाणवत आहे.

३ – वर्षच्छायेच्या प्रदेश व पाऊस :

नंदुरबार, धुळे, जळगांव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांसाठी जोरदार पाऊस कोसळण्यास बळकटपणे ‘ऑफ शोर ट्रफ ‘ उभा आहे. उत्तर गुजरात व बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची वाऱ्याची स्थिती आहे. वर्षच्छायेच्या जिल्ह्यात १४ ते १७ जुलै दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते. खान्देश, नाशिक जिल्ह्यात तर आठवडाभर म्हणजे शनिवार दि. २० जुलै पर्यन्त मध्यम पावसाची शक्यता कायम आहे
        
४ – इतर राज्यातील पाऊस परिणामातून महाराष्ट्रातील पाऊस :

सध्या आसाम (पुर्वोत्तर) कडील ७ राज्यात व पूर्वेकडील (उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड) राज्यात कमी होणारा पावसाचा जोर, परंतु दक्षिणेकडील (केरळ, कर्नाटक, तामिळनाडू) राज्यात वाढणारा अधिक पावसाचा जोर अश्या एकमेकांशी निगडित अश्या वातावरणीय प्रणाल्या व तेथील पावसाच्या तीव्रता पाहता, महाराष्ट्रातही विशेषतः विदर्भातील ११ व सांगली कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर अश्या एकूण १६ जिल्ह्यात आजपासून पुढील ५ दिवस मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
        
५ – सहसा मान्सून सक्रियता व पाऊस :

जेंव्हा पूर्ण ताकदीने मान्सून सक्रिय होतो, तेंव्हा दिवसाच्या २४ तासात केंव्हाही म्हणजे मध्यरात्री, पहाटे, अथवा दिवसभर, किंवा रात्रभर अश्या कोणत्याही प्रहरात समुद्रसपाटीपासून दोन किमी. उंचीपर्यंतच्या ‘स्ट्रॅटस’, व ‘स्ट्रॅटोक्युमुलस’ प्रकारच्या  ढगातून पाऊस सलग पडत असतो.
           
सध्यावस्था :

परंतु मान्सूनच्या आगमनापासून महाराष्ट्रात मान्सून सक्रिय होतो न होतो तोच  पुन्हा कमकुवतेत जातो. आणि अश्या पुन्हा पुन्हा ‘सक्रिय व कमकुवत’ च्या हेलकाव्यातून ‘कधी येथे तर कधी तेथे’ अश्या मर्यादित एक – दोन चौ.किमी. परिसरात सायंकाळच्या ४ ते ८ प्रहरादरम्यानच ‘उष्णता संवहनी’ (कनवेक्टिव्ह) प्रक्रियेतून तयार झालेल्या ‘क्यूमुलोनिंबस’  प्रकारच्या ढगातून, वीजा व गडगडाटीसहित एखाद्या दिवशी एकाकी तीव्र पाऊस होतांना दिसत आहे. त्यामुळे पावसाच्या अपेक्षित समान वितरणाला धक्का पोहोचून पावसाळी दिवस कमी होत आहे. पावसाचे आकडे दिसतात पण शेतपिकांसाठी शेतकरी पाऊस नाही, ही ओरड झाली आहे. आणि हीच गेल्या महिनाभरातील महाराष्ट्रातील मान्सून च्या पावसाची शोकांतिका आहे.

माणिकराव खुळे


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

‘एका महामारीचा उत्तुंग दस्ताऐवज ठरणारी कादंबरी ‘लॉकडाऊन’

स्वयंपूर्ण झाल्यासच शेतीत अधिक फायदा

उरावर नाच

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading