September 8, 2024
Chandrababu King Maker in NDA
Home » चंद्राबाबूंचा नवा अवतार…
सत्ता संघर्ष

चंद्राबाबूंचा नवा अवतार…

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात आंध्र प्रदेशमधील कन्नूर येथे एका जाहीर सभेत तेलुगू देशमचे बॉस चंद्राबाबू नायडू म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत तेलुगू देशमला निवडून द्या, तरच राज्याचा विकास होऊ शकतो, अन्यथा माझी ही शेवटची निवडणूक असेल… चंद्राबाबू यांचे वय ७३ आहे, त्यांच्या भावनिक आवाहनाला आंध्र प्रदेशमधील जनतेने साद दिली. सहा महिन्यांनंतर म्हणजे मे २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मतदारांनी तेलुगू देशमला भरघोस मतदान करून राज्यात व केंद्रात सत्तेचा मार्ग मोकळा करून दिला.

तेलुगू देशमने विधानसभा निवडणुकीत १४४ जागा लढवल्या व १३६ जागांवर विजय मिळवला. वायएसआर काँग्रेसला अवघ्या बारा जागांवरच मतदारांनी रोखले. आंध्र प्रदेशच्या जनतेने चंद्राबाबूंच्या मस्तकावर चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाचा मुकुट चढवला. लोकसभा निवडणुकीत तेलुगू देशमचे १६ खासदार विजयी झाले. एनडीएमध्ये राष्ट्रीय पातळीवर भाजपनंतरचा दुसरा मोठा पक्ष म्हणून तेलुगू देशमला स्थान मिळाले आहे. म्हणूनच चंद्राबाबू नायडू यांचे दिल्लीच्या राजकारणात महत्त्व वाढले आहे. नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत चंद्राबाबूंना त्यांचे हात पकडून अक्षरश: ओढून आणले व आपल्या शेजारच्या खुर्चीवर सन्मानाने बसवले…

सन २०१९ मध्ये तेलुगू देशमला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागला होता, सत्तेवरून हा पक्ष दूर फेकला गेला. पण चंद्राबाबू खचले नाहीत. त्यांनी गेल्या पाच वर्षांत संघटना बांधणी व जनसंवाद यावर भर दिला. चंद्राबाबू व त्यांच्या पक्षाकडे दुर्लक्ष करून आंध्र प्रदेशात राजकारण करता येणार नाही, हाच संदेश वायएसआर काँग्रेस, काँग्रेस व अन्य राजकीय पक्षांना यंदाच्या २०२४ च्या निकालाने दिला आहे. २०१९ मध्येही तेलुगू देशमने ४० टक्के मते मिळवली होती. पक्षाला मिळालेली सव्वाकोटी मते जपून ठेवणे याला पक्षाने सर्वात महत्त्व दिले. मतदारांशी नियमित संपर्क, सभा व बैठकांच्या माध्यमातून थेट संवाद पाच वर्षे चालूच होता. पक्षाची केडर, पक्ष आणि पक्षाचे नेते यांच्यात समन्वय उत्तम राखला पाहिजे यावर चंद्राबाबूंनी सातत्याने भर दिला.

दि. ११ फेब्रुवारी २०१९. आंध्र प्रदेश. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेत बोलताना म्हणाले, चंद्राबाबू मला वारंवार आठवण करून देत आहेत की, ते माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत. यात वाद काय? पक्ष बदलण्यात ते वरिष्ठ आहेतच. आपल्या सासऱ्याच्या पाठीत वार करण्यात ते वरिष्ठ आहेतच…

दि. ३ एप्रिल २०१९. चंद्राबाबू नायडू एका सभेत म्हणाले, नरेंद्र मोदी हे दहशतवादी आहेत. २००२ गुजरातच्या दंगलीनंतर त्यांचा राजीनामा मागणारा मी पहिला माणूस होतो. तेव्हा बहुतांश देशांनी त्यांच्यावर बंदी घातली होती. आता पंतप्रधान झाल्यावर त्यांनी पुन्हा अल्पसंख्याकांना लक्ष्य केले आहे… मोदी आणि नायडू यांचे राजकारणातील संबंध कधी मित्र, तर कधी दुष्मन असे राहिलेले आहेत. आता नवीन एनडीए सरकार स्थापनेच्या निमित्ताने ते पुन्हा एकत्र आले आहेत.

पाच वर्षांपूर्वी सत्तेवरून पायउतार झाल्यानंतर चंद्राबाबूंनी संयम पाळला. गुंटूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या तीरावर ५० जुन्या इमारतींच्या क्लस्टर प्रकल्प पाडण्याचा आदेश तत्कालीन मुख्यमंत्री वायएसआर काँग्रेसचे नेते व मुख्यमंत्री जगनमोहन यांनी दिला. खरे तर चंद्राबाबूंनी ठरवले असते तर तेव्हाच वायएसआर सरकारच्या विरोधात रान पेटवले असते. फेब्रुवारी २०२३ मध्ये विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक झाली व चंद्राबाबूंनी चारही आमदार निवडून आणले तिथेच पक्षाला संजीवनी मिळाली. राज्यात जगनमोहन यांच्या कारकिर्दीत चंद्राबाबूंनी शो टाइम कन्सल्टन्सी हा उपक्रम सुरू केला. याच उपक्रमातून तेलुगू देशमने सत्ता गमावलेल्या सहा हजार पंचायतींच्या स्थानिक ग्रामीण नेत्यांना व कार्यकर्त्यांना उभारी दिली. जगनमोहन यांनी सत्ता मिळवताना जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत, त्या विरोधात चंद्राबाबूंनी जनआंदोलन सुरू केले. तेच वायएसआर काँग्रेसला लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारी पडले. राज्यात अपेक्षित गुंतवणूक नाही व बेरोजगारी प्रचंड वाढली. युवकांमध्ये असंतोष वाढला. हाच मुद्दा घेऊन तेलुगू देशमने वायएसआर काँग्रेसवर हल्ला चढवला. वायएसआर काँग्रेस विरुद्ध तेलुगू देशम असे नव्हे, तर जगनमोहन विरोधात आंध्र प्रदेशातील जनतेत असंतोष निर्माण करण्यात चंद्राबाबू यशस्वी झाले, त्याचा पुरेपूर लाभ तेलुगू देशमला झाला. युवकांना रोजगारासह सहा मुद्द्यांवर गॅरेंटी व महिलांना मोफत बस प्रवास तसेच बाबूंना भविष्याची हमी अशी आश्वासने चंद्राबाबूंनी निवडणुकीत दिल्यानंतर सारी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली.

गेल्या वर्षी ९ सप्टेंबर रोजी आंध्र प्रदेश स्किल डेव्हलपमेंट योजनेत घोटाळा झाल्याप्रकरणी जगनमोहन यांच्या कारकिर्दीत चंद्राबाबूंना अटक झाली व त्यांची जेलमध्ये रवानगी झाली. नायडू हे भ्रष्टाचारी आहेत, असे ठसविण्याचा वायएसआर काँग्रेसने भरपूर प्रयत्न केला. पण लोकांचा त्यावर विश्वास बसला नाही, उलट चंद्राबाबूंविषयी जनतेत सहानुभूती मोठी वाढली. तब्बल ५३ दिवसांनी चंद्राबाबूंची तुरुंगातून सुटका झाली. जेलमधून बाहेर येताच पक्षाला मोठी ऊर्जा मिळाली. पक्षाची केडर सर्वत्र सक्रिय झाली.

या पूर्वीही तेलुगू देशम पक्ष २०१४ मध्ये एनडीएमध्ये सहभागी झाला होता. भाजपाने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्यास नकार दिल्याने त्यांनी त्यांच्या पक्षाच्या दोन केंद्रीय मंत्र्यांना मोदी सरकारचा राजीनामा देण्यास सांगितले होते. तेव्हा मोदी सरकारच्या विरोधात त्यांनी अविश्वासाचा ठरावही लोकसभेत आणला होता, पण तो फेटाळला गेला. दहा वर्षांनंतर चंद्राबाबू नायडू पुन्हा एनडीएमध्ये सहभागी झाले आहेत, यावेळी त्याचा नवीन अवतार आहे.

वयाच्या २८व्या वर्षी चंद्राबाबू हे काँग्रेसच्या तिकिटावर १९७८ मध्ये प्रथम आमदार म्हणून निवडून आले होते. दरम्यान चंद्राबाबू व सिनेस्टार एन. टी. रामाराव यांची चांगली जवळीक निर्माण झाली व १९८१ मध्ये रामाराव यांच्या दुसऱ्या कन्येशी चंद्राबाबूंचा विवाह झाला. १९८२ मध्ये एन. टी. रामाराव यांनी तेलुगू देशम पक्षाची स्थापना केली व त्यांचे जावई चंद्राबाबू नायडू हे त्यांच्या पक्षात सामील झाले. १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत तेलुगू देशमने २२६ जागांवर विजय मिळवला व एन. टी. रामाराव हे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री झाले.

१९९९ च्या लोकसभा निवडणुकीत तेलुगू देशमने आंध्रमधील ४२ पैकी २९ जागा जिंकल्या. त्यावेळी वाजपेयी सरकारला पाठिंबा देणारा तेलुगू देशम हा सर्वात मोठा पक्ष ठरला. १९९९ मध्ये वाजपेयींनी त्यांना केंद्रात ८ मंत्रीपदे देऊ केली होती, पण चंद्राबाबूंनी एनडीए सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. २००४ मध्ये तेलुगू देशमने भाजपबरोबर युती करून लोकसभा व विधानसभा निवडणूक लढवली पण दोन्हींकडे त्यांचा पराभव झाला. २००४ मध्ये तेलुगू देशमला काँग्रेसच्या वायएस राजशेखर रेड्डींकडून पराभव पत्करावा लागला.

सन २०१४ मध्ये तेलुगू देशम एनडीएमध्ये सामील होता. मोदी सरकारमध्ये सहभागी होता. पण आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळत नसल्याने २०१८ मध्ये मोदी सरकारमधून तेलुगू देशमचे मंत्री बाहेर पडले. मोदी सरकारच्या विरोधात चंद्राबाबूंनी दिल्लीत धर्म पोरता दीक्षा या नावाचे उपोषणही केले.

२०१९ मध्ये तेलुगू देशमने स्वबळावर निवडणूक लढवली. विधानसभेत केवळ २३ आमदार, तर लोकसभेत २ खासदार विजयी झाले. जगनमोहन यांचे सरकार आल्यानंतर राज्यातील पंचायत, नगरपालिका, पोटनिवडणुकांसह सर्वत्र तेलुगू देशमचा पराभव झाला. भाजपाबरोबर युती सोडल्यानंतर पंतप्रधान मोदींनी नायडूंवर यू-टर्न बाबू अशी टीका केली होती. फेब्रुवारी २०१९ मध्ये तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, नायडूंसाठी एनडीएचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत… त्यांनीही नायडूंना यू-टर्न सीएम असे संबोधले होते.

नायडूसुद्धा एका सभेत म्हणाले, मोदी हे काही चांगले माणूस नाहीत. मी उपस्थित अल्पसंख्याक बांधवांना एकच विनंती करतो, मोदींना मत दिल्यास अनेक समस्या निर्माण होतील.

२०२४ मध्ये चंद्राबाबू पुन्हा एनडीएमध्ये सामील होऊन मोदी सरकारमध्ये सहभागी झाले व राज्यातही सत्ता मिळवली. नायडू यांच्या राजकीय प्रवासात अनेक चढ- उतार आले, त्यांनी भाजपाशी मैत्री केली व पंतप्रधानांशी पटले नाही म्हणून मैत्री तोडली. नायडूंची राजकीय कारकीर्द संपली, असे अनेकांना यंदाची निवडणूक होईपर्यंत वाटले होते. आंध्र प्रदेश व तेलंगणात त्यांना भविष्य नाही, असेही अनेकांनी भाकीत केले. सन २०२४ च्या निकालाने ते भाकीत खोटे ठरवले. राजकारणी व अभिनेते पवन कल्याण यांनीही मोदी व नायडू यांनी एकत्र यावेत म्हणून प्रयत्न केले. सन २०२४ च्या निवडणुकीच्या केवळ एक महिना अगोदर तेलुगू देशमचा पुन्हा एकदा एनडीएमध्ये प्रवेश झाला. भाजपशी कधी प्रेम तर कधी द्वेष असे नाते असणारे चंद्राबाबू नायडू यांची एनडीए सरकारचे किंग मेकर अशी प्रतिमा बनली आहे.

डॉ. सुकृत खांडेकर


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

रिझर्व्ह बँकेने ग्राहकाभिमुख संवाद कौशल्य धोरण राबवण्याची  गरज !

पेटीएम बँकेच्या ‘कर्मा’नेच त्यांना उध्वस्त केले !

वनस्पतीमधील लोह कमतरतेबाबत…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading