April 1, 2023
Durganchya Deshatun reference book Dipawali Publication
Home » “दुर्गांच्या देशातून : वैविध्याने नटलेला दिवाळी अंक नव्हे, संदर्भ ग्रंथ”
पर्यटन

“दुर्गांच्या देशातून : वैविध्याने नटलेला दिवाळी अंक नव्हे, संदर्भ ग्रंथ”

संपादक संदीप तापकीर यांनी अत्यंत जागृतपणे आणि जाणीवपूर्वक या युवा पिढीची दुर्ग संवर्धनाची जाणीव शब्दबद्ध करून, त्याला प्रसिद्धी दिली आहे. हे काम निश्चितच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. यावर्षीचा हा अंक उत्तमोत्तम आहे, यात वादच नाही.

अरुण बोऱ्हाडे

“दुर्गांच्या देशातून” हा ट्रेकिंगवरील पहिला दिवाळी अंक (२०२२) मुखपृष्ठापासूनच वाचकांना जिंकत जातो. मुखपृष्ठावर असलेले हरिश्चंद्र गडाचे इतके विलोभनीय दृश्य सहसा कुठल्याही कॅमेरात कैद होत नाही. परंतु ओंकार ओक यांना हे साध्य झाले आहे.

अंक वाचायला सुरुवात झाल्यानंतर ‘संपादकीय’ मध्ये संपूर्ण अंकाची ओळख होतेच, त्यामुळे वाचनाची उत्कंठा वाढत जाते. पुढे एक एक लेख वाचत गेल्यानंतर हा अंक हातावेगळा करावास वाटतच नाही. या अंकातील पहिलाच षटकार अरविंद दीक्षित यांनी मारलाय ! ‘किल्ले भटकंतीचा शतकी पराक्रम’ ऐकून तर थक्क झालो. ८० व्या वर्षी ऐंशी किल्ले करणाऱ्या दिक्षितांबरोबर ८१ वा किल्ला ‘रायगड’ चढण्याची प्रेरणा माझ्यासह अनेकांच्या मनात आली असेल.

ऐतिहासिक कादंबऱ्यांचे ताकदवर लेखक विश्वास पाटील यांनी आरमार मोहिमेचे केलेले वर्णन, पाटलांच्या कादंबऱ्या वाचणारास अपुरे वाटते ! त्या पुढील लेखातील शिवछत्रपतींच्या शिलेदारांचे साल्हेर, पन्हाळगड, संग्रामदुर्ग, विशाळगड, पुरंदर येथील बाजीप्रभूंसह इतर शूरवीरांच्या शौर्यकथा वाचताना नजर आणि मनही हटत नाही.
‘इथेच पडला बांध खिंडीला, बाजीप्रभूच्या छातीचा l
इथेच फुटली छाती l परि ना दिमाख हरला जातीचा ll
या ओळींसह शौर्यगाथा वाचताना आपण इतिहासात हरवून जातो. डॉ. सुनील पुरी यांनी कंधारच्या किल्ल्याची दिलेली माहिती माझ्यासाठी तर खूपच नवीन आहे. त्यासाठी त्यांनी दिलेले संदर्भ ग्रंथ पाहिल्यानंतरच डॉक्टर पुरी यांच्या अभ्यासू वृत्तीची कल्पना येते. डॉ. विनय मडगावकरांनी गोव्याच्या इतिहासातील अनेक बारकावे संदर्भासह सांगितले आहेत.

कोलवाळच्या किल्ल्याचा पराक्रम आणि पोर्तुगीजांसंदर्भात आपल्याला मिळते. गोटू देशपांडे यांनी संतोषगड वारूगडची वैशिष्ट्ये सांगतानाच वाठार निंबाळकर मधील नऊ वाड्यांची थोडीशी माहिती आणि जबरेश्वर मंदिराची माहिती वाचनीय आहे. तळबीडच्या वसंत गडाविषयी खुद्द मोहिते वंशातीलच विक्रमसिंह मोहिते यांनी दिलेला लेख माहितीपूर्ण आहे. खरंतर आणखी विस्तृत असायला हवा होता, असे मला वाटते.

या अंकात इतिहासाची सफर करतानाच वसंत वसंत लिमये हे आपल्याला हिमालयात घेऊन जातात. पाँवली कांटा आणि कांचन जुंगाची भ्रमंती करताना खूप माहिती नव्यानेच वाचायला मिळाली. अभिषेक जाधव यांच्या लेखात ‘जाणता राजा’विषयी काही बारकावे माहिती झाले. प्रवीण हरपळेंनी लातूरच्या गढींची केलेली भटकंती ही तशी खूप सुंदर आहे. गढ्यांविषयी अभ्यास करण्याची वृत्ती त्यामुळे बळावते. डॉ. लता पाडेकर यांनी तर संपूर्ण अंकाला वेगळ्या उंचीवरती आणि वेगळ्या विश्वात नेऊन ठेवले आहे. दुर्गांचा इतिहास हा केवळ इतिहास न राहता वर्तमान व्हायला हवा, हे दुर्ग म्हणजेच गडकोट, आपला अभिमान आहे. असे सांगताना त्यांनी ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी मधील दुर्गविषयक ओव्यांची विस्ताराने केलेली मांडणी म्हणजे लेखिकेच्या आणि संपादकांच्या कल्पनाशक्तीचे ‘शिखर’ आहे.

हे ध्येयदुर्गीचे धोंड l इंद्रियग्रामींचे कोंड l
यांचे व्यामोहादिक बंड l जगावरी ll
किती मौलिक आणि अर्थपूर्ण ओवी आहे ही. ज्ञानेश्वरीतील ही वर्णने ऐकताना आपण भान हरपून जातो.

ओंकार ओक यांचाही लेख खूप तांत्रिक ज्ञान देऊन जातो. यातील अनेक शब्द जे ट्रेकिंगशी संबंधित आहेत, त्यांना समजतील. सह्याद्रीपुत्र साई कवडे यांचा लेख शालेय विद्यार्थ्यांना ट्रेकिंगची आवड निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहे. साईने इतक्या कमी वयात केलेली गिरीभ्रमंती, गिर्यारोहण निश्चितच कौतुकास्पद आहे. रायगडावरती भ्रमंती करताना आपण हिरोजी इंदुलकर यांचेविषयीचे दोन शिलालेख वाचतो. स्थापत्यविशारद इंदलकरांच्या विषयी अतिशय अभिमान वाटतो. खरेतर त्यांच्याच वंशातील अशोक इंदलकर यांच्याकडून अधिक माहितीची अपेक्षा ठेवायला हवी. कृष्णा घाडगे यांचा बालेकिल्ला.. हा लेख आपल्याला वेगळ्याच मुलखात घेऊन जातो. कोकणातील घाटवाटा, व्यापारीमार्ग इ. खूप वेगळ्या दृष्टीतून या लेखांमध्ये माहिती दिलेली आहे. वाचकांना ज्ञानवर्धनासाठी आणि इतिहासाची पाने चाळताना वेगळ्या वाटेने ते आपल्याला घेऊन जातात, हेच या अंकाचे वैशिष्ट्य आहे.

दुर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या काही संस्थांची माहिती या अंकामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरे तर मला आजच्या युवा पिढीचे खूप कौतुक वाटते. आजची युवा पिढी छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमी इतिहास जतन करताना, वेळ काढून श्रमदान करून छत्रपती शिवरायांचे किल्ले जतन करण्याचे फार मोठे पवित्र कार्य आजच्या पिढीने चालविलेले आहे. ही जागृती अधिक प्रमाणात होईल अशी आशा वाटते. सह्याद्री प्रतिष्ठानच्या शिलेदारांनी जवळपास वीसेक ठिकाणी केलेली दुर्ग संवर्धनाची कामे निश्चितच गौरवास्पद आहेत. तसाच बा रायगड परिवाराची वाटचाल सुद्धा आदर्शवत आहे. हडसरच्या किल्ल्याविषयी आणि तेथील दुर्ग संवर्धन कार्याविषयी दिलेली माहिती आणि केलेले कार्य दोन्हीही कौतुकास्पद आहे. गडमाची ट्रेकर्सची यशोगाथा ही सुद्धा अभिमानास्पद आहे.

संपादक संदीप तापकीर यांनी अत्यंत जागृतपणे आणि जाणीवपूर्वक या युवा पिढीची दुर्ग संवर्धनाची जाणीव शब्दबद्ध करून, त्याला प्रसिद्धी दिली आहे. हे काम निश्चितच प्रेरणादायी आणि अभिमानास्पद आहे. यावर्षीचा हा अंक उत्तमोत्तम आहे, यात वादच नाही. विद्या केसकर यांनी तापकीर यांच्या ‘दुर्ग पंढरी महाराष्ट्राची’ या पुस्तकाचे दिलेले वर्णन देखील वाचनीय आहे. गेली अकरा वर्षे चालत आलेला ‘दुर्गांच्या देशातून’ या अंकातील यावर्षीचा हा अंक उत्तमोत्तम आणि सुंदर लेखांनी, विस्तृत माहितीने भरलेला आहे. हा दिवाळी अंक नव्हे, तर प्रत्येकाने संदर्भ ग्रंथ म्हणून ठेवण्याच्या योग्यतेचा आहे.

दुर्गांच्या देशातून… दिवाळी अंक २०२२
संपादक : संदीप भानुदास तापकीर
संपर्क क्रमांक : ९८५०१७९४२१/९९२१९४८५४१
मूल्य : ३००/- रुपये

Related posts

हिरव्यागार डोंगरांनी नटलेला फोंडा घाट…

सह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…

बीदरचा किल्ला…

Leave a Comment