संतमहात्म्यांच्या विचारांची कास यासाठीच धरायला हवी. जागतिकीकरणात टिकायचे असेल, तर हा विचार आत्मसात करायला हवा. ‘विश्वची माझे घर’ समजूनच विकास साधायला हवा. विश्वभारतीची संकल्पना मांडून भारत देशाच्या विचाराची, वैश्विक विचाराची पिढी घडवायला हवी.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
हे विश्वची माझे घर । ऐसी मती जयाची स्थिर ।
किंबहुना चराचर । आपण जाहला ।। २१३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा
ओवीचा अर्थ – हे विश्वच माझे घर आहे, असा ज्याचा दृढनिश्चय झालेला असतो, फार काय सांगावे ! सर्व स्थावरजंगमात्मक जग जो अनुभवाच्या अंगाने आपणच बनला आहे.
जुन्या पिढीतील लोक व्यापक विचारसरणीचे होते. त्यांच्या विचारावर अध्यात्माचा पगडा होता. त्यामुळे त्यांच्या आचार-विचारात दूरदृष्टीपणा, व्यापकता होती. सध्याच्या पिढीत इतकी व्यापकता दिसून येत नाही. संकुचित विचारसरणी सध्या वाढीस लागली आहे, पण त्यामुळे प्रगतीही संकुचित होत आहे, हे लक्षात घ्यायला हवे. सध्या जागतिकीकरणाचे वारे आहे. याचा लाभ आपण उठवायला हवा. विचार संकुचित न ठेवता त्यामध्ये व्यापकता आणायला हवी.
इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आहे. हे विश्व महाकाय आहे, असे वाटत नाहीये. जुन्या पिढीतील लोकांनी ‘विश्वची माझे घर’ असे समजून विकास घडवला. फक्त स्वतःपुरता विचार त्यांनी केला नाही. संपूर्ण समाजाचा, भागाचा, प्रांताचा विकास करायचा, या ध्येयाने त्यांनी काम केले. त्यामुळे कोणी महात्मा झाले, तर कोणी कर्मवीर झाले, तर कोणी शिक्षण महर्षी झाले, तर कोणी सहकार महर्षी झाले. नव्या पिढीने त्यांची ही विचारसरणी आत्मसात करायला हवी.
‘एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ’ असा विचार ठेवून त्यांनी सहकार क्षेत्र उभे केले. ते स्वतः कारखाना उभा करून मोठे कारखानदार होऊ शकत होते, पण त्यांनी स्वतःपुरते कधी पाहिले नाही. इतरांचाही विकास त्यांनी पाहिला. अनेक उद्योग, कारखाने सहकारातून उभे राहिले; पण सध्या या संस्थांमध्ये संकुचित विचारसरणीच्या लोकांचा प्रभाव वाढला आहे. त्यांनी स्वतःचा विकास सुरू केला आहे. यामुळे हे उद्योग अडचणीत आले आहेत. केवळ स्वतःचा
फायदा पाहणाऱ्या या लोकांमुळेच सहकाराचा स्वाहाकार झाला आहे. यासाठी ही विचारसरणी बदलायला हवी. सर्वांचा विकास साधणारे विचार जोपासायला हवेत.
संतमहात्म्यांच्या विचारांची कास यासाठीच धरायला हवी. जागतिकीकरणात टिकायचे असेल, तर हा विचार आत्मसात करायला हवा. ‘विश्वची माझे घर’ समजूनच विकास साधायला हवा. विश्वभारतीची संकल्पना मांडून भारत देशाच्या विचाराची, वैश्विक विचाराची पिढी घडवायला हवी. सर्व भाषा, प्रांत यांना एकत्र जोडणारा साहित्याचा धागा पकडून, एकात्मतेचा विचार मांडून ऐक्यातून भारतीय विचार वैश्विक करायला हवा. हा वैश्विक विचार शांतीचा, समृद्धीचा, विकासाचा पण तोही पर्यावरणपूरक विचारधारेचा, एकंदरीत वसुंधरा संवर्धनाचा विचार मांडायला हवा. यातूनच भारताला महासत्ताक राष्ट्र करायला हवे.
विश्वाच्या विकासाच्या कल्पनेची सुरुवात मात्र स्वतःपासून होते हे लक्षात घ्यायला हवे. यासाठी स्वतःला विकसित करायला हवे. तरच सर्व विश्व आपण विकसित करू शकू. त्या विचाराने भरू शकू हे लक्षात घ्यायला हवे. स्वतःचा विकास म्हणजे स्वःचा विकास, सोहमचा विकास म्हणजेच आत्मज्ञानाचा विकास हा विकास अनुभुतीतून येतो. या अनुभुतीतच विश्वाच्या विकासाची अनुभुती आहे. स्वतःच्या देहरुपी घराचा विकास साधता आला तर विश्वरुपी घराचा विकास करता येऊ शकेल. यासाठी देहरुपी घराला आत्मरुपी अनुभूतीतून विकसित करायला हवे.