सध्याचा काळ हा आंधळ्या अंधारातील बहिरी शांतता असलेला
कोनवडेत राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार प्रदान
कूर – सध्या समाजाचे चित्र नितीमूल्यासह बदलत आहे याचे चिंतन झाले पाहिजे. शिवाय जेंव्हा वर्तमानाचे प्रश्न सुटत नाहीत तेंव्हा इतिहासाचे ओझे डोक्यावर ठेवत लोकांचा स्मृतिभ्रंश केला जातो. पूर्वी राजेशाहीमध्ये लोकशाही राबविणारे लोक होते मात्र आता लोकशाहीमध्ये राजेशाही राबविणारे लोक आहेत. त्यामुळे सध्याचा काळ हा आंधळ्या अंधारातील बहिरी शांतता असणारा आहे , असे व्यवस्थेवर कोरडे ओढत लेखक हा लोकशाहीचा उपासक हवा शिवाय साहित्यिकांची लेखणी ही शांतता व लोकशाहीचे समर्थन करणारी असावी असे परखड मत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक प्रा.कृष्णात खोत यांनी व्यक्त केले.
कोनवडे (ता. भुदरगड) येथील राजश्री शाहू प्रबोधनीमध्ये मातोश्री रेखा दिनकर गुरव राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी साहित्यिक गोविंद पाटील होते तर साहित्यिक राजन कोनवडेकर व साहित्यिक चंद्रशेखर कांबळे प्रमुख उपस्थित होते.
पुरस्कार समितीचे सदस्य साहित्यिक रवींद्र रेखा गुरव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
यावेळी गोविंद पाटील, गजानन शिले व सुरेश शिंदे यांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी साहित्यव्रती पुरस्काराने सुरेश शिंदे (फलटण) यांना तसेच उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार – नांगरमुठी – लेखक पांडुरंग पाटील ( कोल्हापूर), उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार – थकीत एकूण गोषवारा – कवी गजानन शिले ( वाशिम),उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार – झुरळ आणि इतर काहीबाही – लेखक प्रमोदकुमार अणेराव , (भंडारा), विशेष पुरस्कार – सांजड (कथासंग्रह ) – लेखिका – सुचिता घोरपडे (पुणे) यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख दहा व पाच हजार रुपयें मान्यवरांच्या हस्ते देवून सन्मानित करण्यात आले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र गुरव, रेखा गुरव, सुभेदार विश्वास पाटील, शाळा समितीचे माजी अध्यक्ष संतोष पाटील, मुख्याध्यापक सदाशिव पाटील, स्नेहल पाटील, अनिल गुरव, तेजश्री गुरव, विलास पाटील, अशोक कांबळे, मंगल पाटील आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन साहित्यिक रविंद्र गुरव (पाचवडे) यांनी तर आभार समीर मुजावर यांनी मानले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.