“एक भाकर तीन चुली”
देवा झिंजाड, ९८९०६९७०९८
नाळ तोडायच्या आधीपासून ते चीतेपर्यंत, बाळहंबरापासून ते हंबरड्यापर्यंत ज्या स्त्रियांचा जीवनप्रवास प्रचंड वेदनादायी अन संघर्षमय झाला अशा जगातल्या सगळ्याच जातीधर्माच्या असंख्य अनामिक स्त्रियांना अन माझ्या प्रिय आईला हि कादंबरी समर्पित करीत आहे.
२०१७ साली सुरु झालेली शरीर व मनाचीही प्रचंड दमवणूक करणारी हि लेखनप्रक्रिया आत्ताशी संपलीय. मागं वळून पाहताना आज थोडा जरी हा लेखनप्रवास आठवला तरी जे काही लिहिलंय त्याबद्दल समाधान वाटू लागतं. कारण बाह्यजगतातले सगळे दैनंदिन व्यवहार पार पाडून, नोकरी करून, आरोग्य सांभाळून, आर्थिक अडचणीवर मात करून हे सगळं लिहिण्यासाठी मनस्थिती तयार करत वेळ काढणं खरं तर फार जिकिरीचं काम होतं पण जे काही मनात साचलं होतं, जे अनेक वर्षे खदखदत होतं ते सगळं जगासमोर आणलंच पाहिजे हा माझा ठाम निर्धार होता म्हणून तर हि कादंबरी पूर्णत्वास नेता आली.
काळीज पिळवटून टाकणाऱ्या दु:खभोगाची हि गोष्ट लिहिताना माझी नुसती घालमेल होत होती पण मनाची केविलवाणी उलथापालथ संभाळूनही लिहितच राहिलो. मुळात आमच्या कित्येक पिढ्यांना लेखनाची परंपरा अजिबात नव्हती. माझी आईसुद्धा शिकलेली नव्हती.
ह्या कादंबरीसाठी दिलेला एकूण वेळ जर मोजला तर तो भरतो तब्बल साडे आठशे तास. दिवसभर काम करून संध्याकाळी घरी येवून शिणल्या देहानं वेळ मिळेल तसा दोन तास ते पाच तास बसून लिहिल्यानं कंबरेची मात्र पुर्ण वाट लागून जात होती. एखाद्या दिवशी तर जास्त वेळ लिहिल्यानं मांडी घालून जेवायला बसणंही मुश्कील होत होतं. कधीकधी तर वाटायचं कि नको हा त्रास पण हि संघर्षगाथा भूतकाळाच्या डोहातून बाहेर काढल्याशिवाय आपल्याला निवांत जगता येणार नाही म्हणून तर खुप निग्रहानं सगळा गाळ उपसत राहिलो. थोडं थोडं म्हणत खूप लिहून होत होतं. एवढ्या दीर्घ लेखनाची पहिलीच वेळ असल्यानं अनेक चुका घडत होत्या. कित्येकदा पुनर्लेखन करावं लागत होतं. आठ खर्डे करूनही मन समाधानी होत नव्हतं.
आदरणीय भालचंद्र नेमाडे ह्यांनी म्हटलं आहे कि, ‘कादंबरी हि दीर्घकाळ चालणाऱ्या युद्धासारखी, लेखकांना कागदाच्या ढीगाशी जखडून ठेवणारी भयस्वप्नासारखी आणि अमानुष अशी कृती असते.’ अन ह्याचा तंतोतंत अनुभव मला ह्या दीर्घलेखनप्रक्रियेच्या दरम्यान आला. मुळातच दीर्घ लेखनासाठी तितक्याच दीर्घ चिंतनाचीही गरज असते. त्यात खूप सातत्य लागतं. कथासूत्र टिकवून ठेवताना वाचकाच्या भूमिकेत शिरूनही आपल्याला कादंबरीकडे तटस्थपणे पहावं लागतं.
हे सगळं करताना प्रचंड दमछाक होत होती. संयम ठेवावा लागत होता. ह्या कादंबरीतले अनेक प्रसंग जसेच्या तसे उभे करताना जिथं जिथं काही प्रसंग घडले तिथला तो भवताल माहिती असणं गरजेचं तर असतंच अन लिखाण्याच्या द्रुष्टीने प्रसंग उभा करण्यासाठी फायद्याचंही ठरतं. म्हणूनच तर माझं अख्खं बालपण जरी खेड्यात गेलं असलं तरीसुद्धा जिथं जिथं काही महत्वाच्या घटना मी मांडल्या आहेत तिथल्या अनेक ठिकाणी अनवाणी पायांनी कडक उन्हात बऱ्याचदा शेकडो किलोमीटर पायपीटसुद्धा करून आलो. तिथला भूगोल नव्यानं समजून घेतला. विहिरी, बारवा, रानातले काट्याकुट्याचे आडरस्ते, ओढे, गावं, डोंगर आणि खळीसुद्धा पायांना पुन्हा एकदा जवळून दाखवली. पायाला फोड येऊन ते फुटलेही. अनेकदा डोळेही हृदयाला शरण गेले. सगळं ऐकून, पाहून काळजात गलबलून आलं. हाताच्या मुठी कधीकधी आपोआप वळल्या गेल्या. धीर धरून सगळं समजून उमजून घेतलं. सहन केलं. वेगवगेळ्या गावातल्या जुन्या खोडांशी हितगुज केलं. त्यांचे खरबुडे हात हातात घेवून घेवून एक एक प्रसंग जिवंत करत करत पुढं जात राहीलो. त्यातूनच ग्रामीण सामाजिक वास्तवाचा अन सामाजिक जाणीवेचा अतिशय गंभीरपणे वेध घेणारा तीन पिढ्यांचा विशाल पट मला मांडता आला.
आता हि ४२४ पानांची कादंबरी प्रचंड भारावल्या मनानं अन अतिशय आदरपूर्वक आपल्या हवाली करत आहे. ह्या कादंबरीच्या रुपानं तुमच्या आयुष्यात कधी ना कधी अन कुठे ना कुठे घडलेल्या जिवंत अनुभवांना नक्कीच भिडता येईल एवढं मात्र खात्रीशीरपणे सांगतो. अगदी भयाण वास्तव वाटेल असा विशाल पट उभा करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. आता इथूनपुढं सर्व गुणदोषांसकट माझ्या लिखाणावर व्यक्त होण्याची विनंती मी आपल्याला करत आहे. वाचक म्हणून आपला तेवढा अधिकार आहेच. थांबतो.
कादंबरी : एक भाकर तीन चुली
लेखक : देवा झिंजाड
पृष्ठसंख्या : ४२४
किंमत : ४५० रुपये
प्रस्तावना : डॉ. आ. ह. साळुंखे
मुखपृष्ठ व रेखाटने : सुनील यावलीकर
सुलेखन : अनिल गोवळकर, स्वप्नील भालेराव
मांडणी – सारड मजकूर
प्रकाशक : न्यू ईरा पब्लिशिंग हाऊस पुणे.
पुस्तकासाठी संपर्क – Deva – 9890697098, Publisher – 88308 60267,
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.