माळशिरस तालुक्यात मी बारा लाख त्रेपन हजार रुपयांच्या पहिल्या मीलेट्स बेकरीची मुहर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवली आहे. हा उद्योग सुरु करताना मला अनेक अडचणी आल्या. पहिली अडचण म्हणजे भांडवल कसे उभे करायचे. कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नव्हती. बँकेचे हेलपाटे मारून तीन महिन्यात मी थकून गेले होते. पण….
रुपाली विकास पवार.
पवारवस्ती, माळीनगर, ता. माळशिरस. जि. सोलापूर.
95039 56830
लहानपापासूनच स्वतःच्या पायावर उभे राहण्याची एक जिद्द होती. इतरांपेक्षा काहीतरी वेगळं मला करून दाखवायचं होत. माहेरी एकत्र कुटंब, त्यामुळे पहिल्यापासूनच कष्ट करण्याची सवय होतीच. मला धरून पाच बहिणी.एकत्र कुटंबपद्धतीमध्ये मी लहानाची मोठी झालेली. पण आमच्या आई वडीलाची एक शिकवण होती. कितीही कठीण परिस्थती आली, तरी न डगमगता त्या परिस्थिशी दोन हात करण्याची धमक मुलींमध्ये पाहिजे. नंतर शिक्षण चालू असतानाच लग्न झाले. माळीनगर या गावात पवारांची सून म्हणून आले. मिस्टर एमएससीबीमध्ये नोकरी करतात. पण सासरी वातावरण वेगळच होते. इथे घरातील महिलांना जास्त बाहेर पडण्याची परवानगी नव्हती. फक्त त्यांनी घरचं सांभाळायचं बस एवढंच.
मला माझे ध्येय शांत बसू देत नव्हतं. मग ठरवले कि स्वतःचा असा काहीतरी उद्योग करायचा. त्यातच कोरोनामुळे सर्वच गोष्टी बंद होत्या फक्त खाण्याचीच दुकाने सुरु होती. तेव्हा सगळे जगच थांबलयं असे वाटायला लागले. अशा मानसिक स्थितीत सतत शेतातील कामे, मुलांचं शिक्षण याचून चिंता वाटू लागली. एक दिवस मला एक शारिरीक त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी सांगितले की कॅल्शियम कमी झाले आहे. त्यांनी गोळ्या दिल्या. पण त्या गोळ्यांनी खुप साईड इफेक्ट होत होता. एक दिवस मिलेट्स प्रक्रिया उद्योगतील भारतातील पहिले उद्योजक असणारे माझे मामा तात्यासाहेब फडतरे यांनी मला गोळ्या ऐवजी नाचणीची भाकरी, त्याची इडली, डोसा असे पदार्थ खा असे सांगितले आणि भेट म्हणूनही त्यांनी त्यांचे नाचणीचे सर्व पदार्थ दिले.
मामाच्या या कृतीतून मला प्रेरणा मिळाली. त्यांना मी हा उद्योग सुरू करण्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी खूप मोलाचा सल्ला दिला की असे पदार्थ जे की ग्रामीण भागात चालतील जे की नाचणीचे कुकीज, ब्रेड, पिठं तूच तयार कर. याशिवाय उद्योजक कसे बनायचे त्यांनी धडे दिले. खऱ्या अर्थाने इथून माझ्या उद्योगाचा श्रीगणेशा झाला.
मग ठरवले आपणच लोकापर्यंत पोहचायचे. म्हणून मग मी एक जुनी दगडी जात्यावरची पिठाची गिरणी फक्त पाच हजार रुपयामध्ये विकत घेतली. ही सुरुवात करताना व्यवसायाचा श्री गणेशा झाला आणि कामाला लागले. मग त्या गिरणीवर ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, हरभरा, अशा सर्व प्रकारची धान्य दळून त्याची पीठ लोकांना विकू लागले. या अशा कठीण परिस्थिती मध्ये माझ्या कुटुंबाने मला खूप साथ दिली. हळूहळू लोकांची पिठासाठी मागणी वाढू लागली. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली की कोरोना काळात लोकांनी बाहेरचे मैद्यापासुंचे बनलेले पदार्थ खाणे टाळले आणि जे पोष्टिक खाणे आहे ते पसंत केले, मग मी तेव्हा ठरवले की ,मी जे पीठ बनवते, ज्वारी, बाजरी, नाचणी, खपली गहू, या पासूनच आपण कुकीज तयार करायच्या. आधी पहिली कुकीजची रेसिपी मी घरीच तयार करून पाहिली. गॅसवर कढई मध्ये ज्वारी, बाजरी, नाचणीचे कुकीज साजूक तुपामध्ये तयार केली. येथूनच माझ्या उद्योगाला प्रारंभ झाला.
माळशिरस तालुक्यात मी बारा लाख त्रेपन हजार रुपयांच्या पहिल्या मीलेट्स बेकरीची मुहर्तमेढ खऱ्या अर्थाने रोवली आहे. हा उद्योग सुरु करताना मला अनेक अडचणी आल्या. पहिली अडचण म्हणजे भांडवल कसे उभे करायचे. कोणतीही बँक कर्ज द्यायला तयार नव्हती. बँकेचे हेलपाटे मारून तीन महिन्यात मी थकून गेले होते. पण बँक ऑफ बडोदाने मला धीर दिला आणि पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून त्यांनी मला नऊ लाख रुपयांचे कर्ज मंजूर केले. यासाठी मला केंद्र सरकारकडून चार लाख रुपयांचे अनुदानही भेटले. यातून हा माझा बेकरीचा उद्योग उभा राहीला.
आता माझे कुकीजचे मार्केटिंग पुणे, मुंबई , नगर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर अशा बऱ्याच ठिकाणी चालू आहे. शिवाय कुकीज मुंबईमध्ये मंत्रालयातील चार कॅन्टीनला पण जात आहे. मी आज मोठमोठ्या कंपन्या साठी करार पद्धतीने मोठया प्रमाणावर विक्री करते. तसेच माझे कुकीज चे नवीन बॉक्स पॅकिंगमध्ये दुबई, बरलिंग्टेन, इस्रायल या ठिकाणी ग्राहकांच्या पसंतीला उतरले आहेत. या गोष्टींचही मला खूप समाधान वाटत की गौरी सोहम गृह उद्योगाच मिलेटस कुकीज साता समुद्रापार जात आहेत या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय.
गौरी सोहम गृह उद्योगाचे स्थान आज जसे ग्राहकांच्या मनात आहे तसेच ते माझ्या आजूबाजूच्या शेतकरी बांधवांच्या मनात ही आदराने घेतले जाते. याला कारण आहे की मी उद्योगासाठी लागणारा कच्चा माल ज्वारी, बाजरी ही खरेदी थेट शेतकऱ्यांकडून करत आहे. शिवाय नाचणी कोल्हापूरआणि पुण्यातील काही शेतकऱ्यांकडून खरेदी करत आहे. नुकतीच आमची दोन कंपन्यांबरोबर बोलणी सुरू आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणावर ज्वारी, बाजरी, नाचणी सत्त्व यांची कुकीज लागणार आहेत. त्यासाठी नवीन मशिन खरेदी आणि जास्त शेतकरी यांचेबरोबर खरेदी करण्याचा प्रयत्न आहे.
माझा एक स्वानुभव आहे की कोणताही व्यवसाय सुरु करताना पैसे हे लागतात परंतू त्या पेक्षाही जास्त गरजेचे आहे कामावरील निष्ठा, प्रामाणिक कष्ट, आणि कायम सातत्य हवे. मग यश तुमच्या सोबत नेहमीच असते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.