अध्यात्म हे अनुभव शास्त्र आहे. योग्यवेळी व योग्य परिस्थितीतच, योग्य मानसिकतेमध्येच हे शास्त्र समजू शकते. अन्यथा हे शास्त्र म्हणजे थोतांड आहे असे वाटते. अनुभवातून हे शास्त्र समजून घ्यायचे आहे. शास्त्र आहे तेच आहे फक्त बदलत्या परिस्थितीनुसार त्याचा वापर हा करावयाचा आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – ९०११०८७४०६
तया अध्यात्मशास्त्रांसी । जै साचपणाची ये पुसी ।
तै येइजे जया हायासी । ते हे गीता ।। १२३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – त्या तत्वज्ञान प्रतिपादक शास्त्रांना जेंव्हा त्यांच्या खरेपणाविषयीचा प्रश्न येतो तेंव्हा त्यांना आपला खरेपणा सिद्ध करण्यास ज्या ठिकाणास यावे लागते, ते ठिकाण हे गीताशास्त्र होय.
रिसर्च म्हणजे मराठीत संशोधन. जे शोधलेले आहे ते पुन्हा नव्याने शोधणे. पुन्हा पुन्हा ते शास्त्र अभ्यासणे. ठिबक सिंचन पूर्वीच्या काळीही होते. काळाच्या ओघात त्यात बदल होत गेले. पण ठिबक सिंचनाचे शास्त्र आहे तेच आहे. झाडाची जोमदार वाढ होण्यासाठी झाडाच्या मुळाशी आवश्यक त्या प्रमाणात पाणी घालणे. हे शास्त्र आहे. हा त्या प्रयोगाचा निष्कर्ष आहे. इतर ठिकाणी पाणी घातले तर वाया जाते. ते झाडाच्या वाढीसाठी उपयोगी ठरत नाही. हे शास्त्र पूर्वीच्या लोकांनाही माहीत होते. त्याचा वापरही केला जाता होता. मडक्याला भोक पाडून झाडाच्या मुळाशी ते गाडले जात असे. त्या मडक्यात पाणी भरल्यानंतर त्यातून ते पाणी झिरपून झाडाच्या मुळांना मिळत असे. यात पाण्याची बचत अन् वाया जाणारे श्रमही वाचत असत.
योग्य ठिकाणी योग्य प्रमाणात पाणी दिल्याने झाडाची वाढ जोमदार होते. आता या शास्त्रात नव्याने काय शोधले ? बदलत्या काळानुसात तंत्रज्ञानात बदल झाला आहे. नव्या तंत्राने आता त्यात मोठे बदल झाले आहेत. ठराविक मर्यादित झाडांनाच अशा पद्धतीने पाणी देणे शक्य होते. पण आता या नव्या तंत्रज्ञानानुसार विविध पिकात, विविध वृक्षवेलींसह मोठ्या प्रमाणावरही या शास्त्राचा वापर केला जात आहे. पाणी देण्याचे शास्त्र तेच आहे, फक्त नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. म्हणूनच पुन्हा पुन्हा नव्याने त्याचा शोध घेतला जात आहे.
बदलत्या परिस्थितीनुसार तंत्रज्ञानात बदल होत आहेत, शास्त्र मात्र आहे तेच आहे. पूर्वीच्या काळी युद्धाची शस्त्रे वेगळी होती. आता युद्धाची शस्त्रे वेगळी आहेत. शास्त्र आहे तेच आहे. फक्त ते परिस्थितीनुसार पुन्हा पुन्हा नव्याने ते शोधायाचे आहे आणि वापरायचे आहे. हेच गीतेचे तत्त्वज्ञान आहे. त्यातील सत्यता पडताळून घेऊन त्याचा वापर करायचा आहे. पूर्वी लोकांना फावला वेळ खूप होता त्यामुळे त्यांनी वेळ घालवण्यासाठी अशी शास्त्रे लिहीली असे म्हटले जाते. पण हे चुकीचे आहे. हे शास्त्र अभ्यासल्याशिवाय अनुभवल्याशिवाय यावर बोलणे चुकीचे आहे. पूर्वीच्या लोकांनाही पोटासाठी खूप कष्ट करावे लागत असत. त्यामुळे त्यांना फावला वेळ खूपच कमी होता. जेवण तयार करण्यासाठी रोज लागणाऱ्या इंधनापासून सर्व साहित्य गोळा करावे लागत असे. अन्यथा उपाशी राहावे लागत असे. पोटभर अन्नासाठी खूप कष्ट करावे लागत होते. आत्ताही तिच परिस्थिती आहे पोटभर अन्नासाठीच ही धडपड सुरू असते.
अध्यात्म हे अनुभव शास्त्र आहे. योग्यवेळी व योग्य परिस्थितीतच, योग्य मानसिकतेमध्येच हे शास्त्र समजू शकते. अन्यथा हे शास्त्र म्हणजे थोतांड आहे असे वाटते. अनुभवातून हे शास्त्र समजून घ्यायचे आहे. शास्त्र आहे तेच आहे फक्त बदलत्या परिस्थितीनुसार त्याचा वापर हा करावयाचा आहे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसाला सुख अन् शांतीसाठी हे शास्त्र अभ्यासावे असे वाटते. यामुळेच मनुष्य अध्यात्माकडे ओढला जात आहे. आत्मज्ञानाची ओढ त्याला लागली आहे. हे शास्त्र केवळ गीतेतच सांगितले आहे. यासाठी गीतेचा अभ्यास करायला हवा. त्यावर संशोधन हे करायला हवे. शाश्वत सुखासाठी भक्तीची ही पद्धत नव्याने जीवनशैलीत मांडायला हवी. जीवनातील सत्याचा खरेपणा केवळ गीताशास्त्रातूनच समजू शकतो, हे लक्षात घ्यायला हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.