March 25, 2023
Home » साहित्य सोनियाचिया खाणी । उघडवी देशियेचिया आक्षोणी । विवेकवेलीची लावणी । हों देई सैंधा ।। (एकतरी ओवी अनुभवावी)
विश्वाचे आर्त

साहित्य सोनियाचिया खाणी । उघडवी देशियेचिया आक्षोणी । विवेकवेलीची लावणी । हों देई सैंधा ।। (एकतरी ओवी अनुभवावी)

सक्तीने कोणत्याही भाषेचा विकास होत नाही. मराठी भाषेचा विकास करायचा असेल तर मराठीला ज्ञानभाषा करायला हवे.  सध्या मराठीची सक्ती केली जात आहे. भाषा टिकवण्यासाठी हा उपाय योग्य नाही. खरंच सक्तीने मराठी भाषा टिकणार आहे का ?

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685 

साहित्य सोनियाचिया खाणी । उघडवी देशियेचिया आक्षोणी ।

विवेकवेलीची लावणी । हों देई सैंधा ।। 12 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 12 वा 

ओवीचा अर्थ – मराठी भाषारुपी पृथ्वीमध्ये अलंकाररुपी सोन्याच्या खाणी उघड आणि आत्मनात्मविचाररुपी वेलींची लावणी जिकडेतिकडे होऊ दे. 

मराठी भाषा अमर आहे. तिला ज्ञानेश्वरीमुळे अमरत्व प्राप्त झाले आहे. कारण यामध्ये सांगितलेले तत्वज्ञान हे अमर आहे. कोणतीही भाषा त्यातील साहित्याने अमरत्वाला पोहोचले. ज्ञानेश्वरीमुळे हे घडले आहे. साहित्यातून आपणास बोध मिळतो. वाचाल तर वाचाल असे थोरांनी सांगितले आहे हे याचसाठी. मग ते कोणतेही वाचन असो. यातून आपण जो बोध होतो त्यातून आपले स्वतःचे जीवन घडत असेत. तज्ज्ञांच्यामते सध्या जगातील अनेक भाषा लुप्त होऊ लागल्या आहेत. त्याची अनेक कारणे आहेत. 

भारतात विविध भाषा बोलल्या जातात पण त्यातीलही काही भाषा आता दुर्मिळ होऊ लागल्या आहेत. सध्याच्या युगात आता केवळ ज्ञान देणारीच भाषा तग धरू शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. ज्ञानदानामुळे त्या भाषेचा विकास होत राहातो. त्याच भाषा स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करतात. इंग्रजी भाषा सर्व जगभर पोहोचली कारण त्यातून ज्ञान दिले जात होते. सक्तीने करून तिचा विकास केला गेला नाही. ब्रिटीश राजवटीत कायदे इंग्रजीत होते.

दर्जेदार साहित्य निमिर्तीनेच भाषेचा विकास

साहजिकच कायद्याच्या ज्ञानासाठी ती भाषा शिकणे क्रमपात्र होते. सत्तेमुळे भाषा विस्तार झाला हेही खरे आहे. पण ज्ञान मिळवण्यासाठी ती शिकली गेली. याचाच अर्थ ज्ञान सांगणारी भाषा आपोआप विकसित होते. सक्तीने कोणत्याही भाषेचा विकास होत नाही. मराठी भाषेचा विकास करायचा असेल तर मराठीला ज्ञानभाषा करायला हवे.  सध्या मराठीची सक्ती केली जात आहे. भाषा टिकवण्यासाठी हा उपाय योग्य नाही. खरंच सक्तीने मराठी भाषा टिकणार आहे का ? तरणार आहे का ? असे तुम्हाला वाटते का. भाषेच्या विकासासाठी आवश्यक गोष्टी आपण केल्या नाहीत तर ती भाषा टिकणार नाही. त्या भाषेच्या विकासासाठी दर्जेदार साहित्य निर्मिती त्यामध्ये व्हायला हवी. 

दर्जेदार साहित्य त्या भाषेच्या विकासास कारणीभूत ठरू शकते. ज्ञान देणारी भाषा म्हणूनही त्या भाषेचा विकास करायला हवा. मराठीला अमरत्व प्राप्त झाले आहे असे म्हटले जाते. पण ही भाषा कशामुळे अमर झाली याचा विचार करायला हवा. आत्मज्ञान हे अमर आहे. हे आत्मज्ञान सांगणारे साहित्य मराठीत उदयास यायला हवे. तरच तिचे अमरत्व कायम राहील. ज्ञानेश्वरीच्या रुपाने हे अमर साहित्य, आत्मज्ञानाचे साहित्य मराठीत उदयाला आले आहे. 

ज्ञानेश्वरी बाराव्या शतकात सांगितली पण आज 21 व्या शतकातही ती तितक्याच आवडीने वाचली जाते. तिची पारायणे होतात. का व कशामुळे कारण त्यात सांगितले तत्वज्ञान. ज्ञानदान. नित्य वाचणातून अनेक गोष्टींचा बोध होतो. गीतेतील अमरत्वाचे ज्ञान, आत्मज्ञान संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रुपाने मराठीत आणले. या ज्ञानाने मराठीला अमरत्व प्राप्त झाले आहे. या ज्ञानाचा प्रसार प्रचार होत राहील तो पर्यंत मराठी भाषा टिकूण राहील. हे अमर ज्ञान आहे. त्यामुळे मराठीही अमर झाली आहे. 

। । ॐ श्री माधवनाथार्पणमस्तु ।।

Related posts

म्हणोनि यावया शांती । हाचि अनुक्रमु सुभद्रापती । (एकतरी ओवी अनुभवावी)

आध्यात्मिक तेज

विश्वच ब्रह्मज्ञानी करण्याचे माऊलीचे स्वप्न

Leave a Comment