September 9, 2024
Dr Rajendra Das Tukoba Book review by Suhas Pandit
Home » तुकोबा….जसे दिसले तसे
मुक्त संवाद

तुकोबा….जसे दिसले तसे

लेकरांनी आईच्या मागे जावे तसे शब्द तुकोबांच्या मागे मागे जातात असे कवी म्हणतो तेव्हा कविच्या शब्दाचे सामर्थ्यही तितक्याच ताकदीचे आहे हे आपल्या लक्षात येते. शब्दचि आमुच्या जीवीचे जीवन ‘ असे म्हणणाऱ्या तुकोबांना पुन्हा एकदा बोलावून मराठीला झळाळी आणण्यासाठी तुकोबांच्या शब्दांचीच शस्त्रे परजावी लागतील असे कवीचे ठाम मत झाले आहे.

” प्रा.राजेंद्र दास यांचे “तुकोबा” हे पुस्तक मी अजून वाचलेले नाही. आज आ. श्री. केतकर यांनी त्यावर लिहीलेले परिक्षण वाचले आणि स्वतःला एक प्रश्न विचारला,” हे पुस्तक, या कविता मी अजून का वाचल्या नाहीत ?”
संपूर्ण परिक्षण वाचून झाल्याशिवाय थांबलो नाही. कविता वाचतानाही असेच होणार हे ही समजून चुकले. पर्याय एकच…..या कविता वाचणे.”

श्री.केतकर यांच्या लेखावर अशी प्रतिक्रिया मी दिली होती. त्यालाही बरेच महिने होऊन गेले. मी अजूनही कविता वाचलेल्या नाहीत. कशा वाचणार ? शालेय जीवनात अभ्यास क्रमातील संत साहित्याच्या निमित्ताने तुकोबा भेटले होते. तेव्हा किती आणि काय समजले हे अजूनही समजलेले नाही. त्यानंतर तुकोबांना भेटण्याचा प्रयत्न झाला नाही. मग आता तुकोबांवरील कविता वाचून आपल्याला काय आकलन होणार आहे ? या विचाराने तुकोबांना काचेच्या कपाटात बंदिस्त करुन ठेवले होते. पण नजर तिकडे गेली की ते खुणवायचे. शेवटी एक दिवस कवितासंग्रह हातात घेतलाच आणि प्रस्तावना तरी वाचूया असे ठरवले.

श्री आ. ह. साळुंखे यांची प्रस्तावना या कवितासंग्रहाला लाभली आहे. हे कवीचे व वाचकांचे भाग्यच म्हटले पाहिजे. कारण एकप्रकारे कवीला कौतुकाची व शाबासकीची थापच मिळाली आहे. वाचकाच्या दृष्टीने विचार केला तर कविची भूमिका व कविता समजून घेण्यासाठी प्रस्तावना मदत करते हे नक्की.

सरांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे , तुकोबांची विश्वात्मक विचारसरणी समजून घेऊन प्रा. दास यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर कवितेच्या माध्यमातून ती अभिव्यक्त केली आहे. प्रदीर्घ काळाच्या अभ्यासाने तुकोबांच्या विचारसरणीला समजून घेऊन ते तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी थेट तुकोबांशी संवाद साधत प्रा. दास यांनी जणू काही आपली आणि तुकोबांची भेटच घडवून आणली आहे. आपले मन निःसंकोचपणे तुकोबांसमोर उघडे करुन सामान्य जनांच्या मनातील प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न कवीने केला असल्यामुळेच या कविता आपल्याला आपल्या वाटतात. शाश्वत दुःखाचे शाश्वत सत्य जाणूनही त्याला हद्दपार करण्यासाठी तुकोबांनी आयुष्यभर केलेल्या धडपडीचा प्रामाणिकपणे शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे या कविता. मग हा शोध घेताना कवी तुकोबांना प्रश्न विचारतो, शंका विचारतो, प्रसंगी भांडतोही.

आपल्यालाच पडलेल्या प्रश्नांची आपणच शोधलेली उत्तरे; तर कधी अनुत्तरीत प्रश्न म्हणजे या कविता. तुकोबांना समजून घेताना आवलीलाही बाजूला करता येणार नाही. तिचा वरवर दिसणारा त्रागा हा तुकोबांच्या शब्दांतील सुप्त उर्जाच होती हे कवीने ओळखले असल्यामुळेच कवीने आवलीलाही दुर्लक्षित केलेले नाही. तुकोबांशी जवळीक साधत, त्यांच्या स्थितप्रज्ञतेबद्दल आश्चर्य व्यक्त करत असतानाच कविला कुठेतरी अंधार संपत आल्याची जाणीव होते आणि तुकोबांना समजून घेण्यानेच काळोखाची सरहद्द ओलांडून प्रकाशावाटेने प्रवास सुरू होईल असा विश्वास वाटतो.

पहिल्याच कवितेत कविने दुःखाविषयी काढलेले उद्गार हे मनाला थेट जाऊन भिडणारे आहेत. कवी म्हणतो,

“दुःखाचे असेच असते बाबा
ते पेरले तरी उगवते
नाही पेरले तरी उगवते”

इतक्या सोप्या भाषेतील तत्वज्ञान कुठे वाचले आहे काय ? पण या दुःखाची पर्वा न करता स्वतः ताठ राहून हजारो मोडक्यांना उभे करण्यासाठी तुकोबांनी दिलेली झुंज कवीला आठवते आणि भक्तीची पेठ उभी करणा-या तुकोबांच्या पायी माथा टेकवून कवी आपल्यातली हीनता झाकण्याचा प्रयत्न करतो.

तुकोबा आणि कवी आपल्यासमोर बसले आहेत आणि त्यांच्यातील संवाद आपण ऐकत आहोत असे या कविता वाचताना वाटते. का बरे ? मग लक्षात येते की तुकोबा जरी तीन शतकांपूर्वीचे असले तरी कवीने त्यांना आजच्या युगात आणून ठेवले आहे.त्यांच्यापासून काहीही लपवलेले नाही.अगदी त्यांच्या अभंगांची अभ्यासक्रमात, विद्यापीठांत होणारी हेळसांड, असमानता किंवा जातीयवाद,

बुवाबाजी, ढोंगीपणा, पर्यावरणाचा ऱ्हास सगळं सगळं त्यांना सांगून टाकलं आहे. आपले सगळे प्रश्न घरातल्या वडिलधाऱ्यांना सांगावेत तसे.

कवी म्हणतो
“मुखवटे तुझे | फेकूनी डोहात
अजून मंबाजी | रुबाबात “

किंवा

” केक कापावा तसे कापून टाकले
आहेत डोंगर त्यांनी “

तुकोबांना कुठला केक माहिती असायला ? पण तुम्ही आम्ही जितक्या सहजपणे केक कापतो
तितक्याच सहजपणे डोंगरही कापत आहोत याची तक्रार तुकोंबाकडे केली आहे. एवढेच नव्हे तर टॅंकरचे खोटे हिशोब आणि कागदावरची शेततळी, सडका ; ख-या हिशोबाच्या वह्या बुडवून टाकणाऱ्या तुकोंबाच्या कानावर घालण्याचे कामही कवीने केले आहे. त्यामुळेच कवी निराशेने म्हणतो,
” कशानेही उजळणार नाही
असा काळामिट्ट काळोख
शिगोशिग भरून आहे भोवती”

पण यातही आशेचा एकच किरण आहे.म्हणून पुढे लिहीले जाते ,
” फक्त तुमच्या अभंगांच्या
प्रकाशाचाच काय तो आधार !”

अशा या अंधारातच कविला प्रश्न पडतो,

‘ कळवळा वाटावा तर
कुणाकुणाबद्दल ?
सारेच गटांगळ्या खात आहेत
व्देषाच्या विषारी जगात .’

करी लाभाविण प्रीती हे तर केव्हाच संपून गेले आहे.कवी लिहीतो,

‘ आता कळवळ्याची जाती संपून
गेली तुमच्याबरोबर
जातीच्या कळवळ्याचे भयाण
दिवस आलेत सध्या
प्रीतीचा तर रोजच गळा घोटाला
जातो..कुठेही…रस्त्यात..
भररस्त्यात ‘

कारुण्याचे तळे आटून गेल्याची खंत कवी तुकोबांसमोर बोलून दाखवत आहे .
आणि तरीही

‘ तुमचे ठीकच होते
एक विठोबा होता तुमच्या
हाताशी
आम्ही कुणाला हाक मारावी ? ‘
हा प्रश्न कविला पडतोच.

मार्केटिंगच्या जमान्याचे चित्र रेखाटताना कविची लेखणी धारदार बनते तर आपलेपणाच्या व्याख्या बदलून आपमतलबीपणात मश्गुल असणाऱ्या आपल्यासारख्यांची अवस्था दाखवून देताना कवीच्या लेखणीतून ओशाळलेपणाची शाई ओघळते. डिस्कव्हरी चॅनेलवरची वृक्षवल्ली आणि रिंगटोनमधून गाणाऱ्या पक्ष्यांचे सुस्वर ऐकत पर्यावरणाची चर्चा करणारे आपण, इंद्रायणीच्या तापत्या वाळूत उभे राहून टाहो फोडून उभे राहणे एवढेच आपल्या नशिबी येणार आहे का ?

या संग्रहातील प्रत्येक पान ‘ तुकोबा ‘ या हाकेने सुरू होते. त्यामुळे तुकोबा आले आहेत, ते आता ‘ ओ ‘ देतील असे समजूनच पुढची कविता वाचली जाते. हा जिवंतपणा ही कविच्या शब्दांची किमया आहे.

संत साहित्याने मराठी भाषेचे सामर्थ्य वाढवले असले तरी आज पुन्हा मराठी भाषेला आलेली मरगळ कविच्या नजरेतून सुटत नाही. म्हणून तर ‘मायमराठीचे दिगंतपण दुमदुमत ठेवण्यासाठी ‘ तुकोबांनी ‘शतकांच्या दारावर लावलेल्या शब्दांच्या तोरणांची’ नोंद घेतल्या शिवाय कवी पुढे जाऊ शकत नाही.

लेकरांनी आईच्या मागे जावे तसे शब्द तुकोबांच्या मागे मागे जातात असे कवी म्हणतो तेव्हा कविच्या शब्दाचे सामर्थ्यही तितक्याच ताकदीचे आहे हे आपल्या लक्षात येते.’शब्दचि
आमुच्या जीवीचे जीवन ‘ असे म्हणणा-या तुकोबांना पुन्हा एकदा बोलावून मराठीला झळाळी आणण्यासाठी तुकोबांच्या शब्दांचीच शस्त्रे परजावी लागतील असे कवीचे ठाम मत झाले आहे.

या कवितांतील काही शब्दही वैशिष्ट्यपूर्ण वाटतात.भिजटभोर, गदळ, कुट्टावले आभाळ, भुकेची भेंडोळी यासारखे शब्द असोत किंवा कवीने रचलेल्या अभंगसदृश रचना असोत, त्यातील वेगळेपण लक्षणीय आहे.

आजच्या जमान्यातील कवी असो किंवा संतकवी असोत, संसार कुणाला सुटला आहे ? आणि या संसाराचा भार वाहणार कोण ? पण तुकोबांच्या पाठीशी आवली खंबीरपणे उभी होती म्हणूनच तुकोबा विठ्ठलमय होऊ शकले आणि त्यांची लेखणी समर्थपणे पाझरु शकली. याची जाणीव ठेवूनच कवी म्हणतो, ‘बाईल कर्कशा’ म्हणत असलात तरी
‘त्याचवेळी भिंतीवर पडलेली
तिची सावली तुमच्याहून कितीतरी मोठी होती
हे विसरु नका तुम्ही
कधीही….’
अशा किती काव्यपंक्ती उद्घृत कराव्यात की ज्यामुळे वाचकाला कविचे वेगळेपण लक्षात येईल ? म्हणूनच आग्रहपूर्वक सांगावेसे वाटते की प्रा.राजेंद्र दास यांच्या या कविता मनापासून वाचणे आणि दोन भिन्न काळाना संवादाच्या सेतूने जवळ आणून वास्तवाच्या केलेल्या सुंदर चित्रणाचा आस्वाद घेणे याला पर्याय नाही.
इतके सारे रचून झाल्यावरही प्रा.दास अस्वस्थ आहेत. कारण तुकोबांचे नेमके चित्रण अजून कुठे पहायला मिळालेच नाही ही त्यांची खंत आहे.हा अपुरेपणा त्यांची अस्वस्थता वाढवत राहो आणि त्यांच्या हातूनच त्यांच्या दृष्टीतील परिपूर्ण तुकोबा रेखाटले जावोत अशी अपेक्षा !

काव्यसंग्रह : तुकोबा
कवी : प्रा.राजेंद्र दास ( संपर्क क्रमांक – 9881426429 )
प्रकाशक : अक्षरवाड्मय प्रकाशन, पुणे.
मूल्य : रु.150/_


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मान्सून हर्णाई बारामती पर्यन्त

उपेक्षित, वंचित, गरजू मुलांना मुख्य प्रवाहात आणणारी विनया

Video : महिला दिनानिमित्त वाळूशिल्प

1 comment

सुहास रघुनाथ पंडित. सांगली. August 14, 2024 at 11:37 AM

अभिनंदन 💐

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading