कर्म स्वतः करायचे आणि ते त्यांच्या कृपेने झाले असे म्हणायचे. आपण परिश्रम घ्यायचे आणि ते त्यांना अर्पण करायचे हे कसे शक्य आहे ? अशामुळेच अहंकार, मी पणा नव्या पिढीत वाढला आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
परि हें मिया केलें । कीं हे माझेनि जालें ।
ऐसे नाहीं ठेविलें । वासनेंमाजीं ।। ५२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १३ वा
ओवीचा अर्थ – परंतु हे कर्म मी केलें अथवा माझ्याने सिद्धीला गेले, असा अहंकार वासनेमध्ये ठेवलेला नाही.
कर्माचा त्याग करायचा म्हणजे नेमके काय करायचे, हेच अनेकांना समजत नाही. याचा अर्थ कर्मच करायचे नाही, असा चुकीचा लावतात. दिवस बदलले आहेत. काम केले नाही तर जगणेही मुश्कील होईल. अध्यात्मात कर्माचा त्याग म्हणजे नेमके काय, याचा खरा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. दैनंदिन जीवनात कर्म हे करावेच लागते. कर्माचा त्याग म्हणजे जे काही कर्म तुम्ही करता ते सद्गुरूंना, भगवंतांना अर्पण करणे. हे कर्म त्यांच्या कृपाशीर्वादाने झाले, असे मानणे. तसा भाव मनात प्रकट करणे. हाच कर्म त्याग आहे. यामध्ये स्वतःचा मी पणा, अहंकार नष्ट होतो. ही या मागची भूमिका आहे, हे जाणून घ्यायला हवे.
नव्या पिढीला हे विचार पटणे कठीण आहे. कर्म स्वतः करायचे आणि ते त्यांच्या कृपेने झाले असे म्हणायचे. आपण परिश्रम घ्यायचे आणि ते त्यांना अर्पण करायचे हे कसे शक्य आहे ? अशामुळेच अहंकार, मी पणा नव्या पिढीत वाढला आहे. पूर्वीचे लोक देवाच्या कृपेला महत्त्व देत.
देव कोपल्यानेच यंदा ओला दुष्काळ पडला व त्यामुळे शेतीचे नुकसान झाले, असे लोक म्हणत. एखाद्या वर्षी भरघोस उत्पन्न मिळाले तर ते त्याच्याच कृपेने मिळाले, असे म्हणत. तसे पाहता निसर्गावरच शेतकऱ्याचे जीवन अवलंबून असते त्यामुळे त्यांच्याबाबत हे विचार योग्य वाटतात. ही श्रद्धा योग्य वाटते, पण इतर व्यवहारांत ते शक्य वाटत नाही. मनाला पटत नाही. प्रत्यक्षात राबायचे आपण आणि ते देवाला अर्पण करायचे हे कसे काय शक्य होईल?
पण नेमके या मागचा हेतू जाणून घेणे गरजेचे आहे. यश मिळाले तर अहंकार वाढू नये व अपयश पदरी आले म्हणून नैराश्य येऊ नये, ही यामागची खरी भूमिका आहे. नैराश्यामुळे मन खचते आणि यशाचा अहंकार कधी कधी माणुसकीच विसरतो. कर्मत्यागामागची ही भूमिका जाणून घ्यायला हवी. तसे पाहता आपला सर्व व्यवहार हा देवाच्या कृपेनेच सुरू आहे. कारण श्वास थांबला तर सर्व थांबते. श्वास सुरू ठेवण्याची शक्ती आपल्यात नाही. ते चालविणारे दुसरे कोणी तरी आहे, हे विसरता कामा नये. सद्गुरू त्यावरच तर नियंत्रण मिळवायला शिकवतात. तेच आत्मज्ञान हस्तगत करायला सांगतात. आत्मज्ञानी व्हायला सांगतात.
।। हरि ॐ ।।
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.