May 23, 2024
विश्वाचे आर्त

कोणत्या गोष्टी करण्यामुळे समाधीचा लाभ होतो ?

तीव्रसंवेगानामासन्न:..

ज्यांच्या ठिकाणी तीव्र वैराग्य उत्पन्न होते, त्यांनी सातत्याने अभ्यास केला तर, लवकरात लवकर समाधीचा लाभ होतो.
व्यावहारिक दृष्ट्या विचार करत असताना असे दिसते, की तीव्र वैराग्य म्हणजे इतर आकर्षणांपासून आपले मन आपल्या ध्येयावर केंद्रित करावे. मनाच्या सर्व शक्ती केंद्रित केल्या की, ध्येयसिद्धी लवकर होते.

योग कशाला म्हणतात ?

भगवद्गीतेत’योग:कर्मसु कौशलम्’असे म्हटले आहे. म्हणजे आपल्या कामात कौशल्य असणे, मन देऊन, चित्त देऊन काम पूर्ण करणे यालाच योग म्हणतात. गीतेच्या दुसऱ्या अध्यायात श्री कृष्ण अर्जुनाला सांगतो:
योगस्थ:कुरु कर्माणि सङ्गम् त्यक्त्वा धनञ्जय |सिद्ध्यसिद्ध्यो:समो भूत्वा समत्वं योग उच्यते
योगाकडे लक्ष देऊन कर्तव्यकर्मे कर.कर्मफलाची आशा सोडून, यश-अपयश यांची तमा न बाळगता, नेमून दिलेले काम चोखपणे कर.
तुम्ही म्हणाल, इथे या व्यवहाराचा काय संबंध?.आपल्याला आपली प्राचीन ज्ञानसाधना आध्यात्मिक व लौकिक यशप्राप्तीसाठीसुद्धा उपयोगात आणता येते, हे मला लक्ष्यात आणून द्यायचे आहे.

सूत्र-२२. मृदुमध्याधिमात्रत्वात् ततोअपि विशेष:

कोणत्या गोष्टी करण्यामुळे समाधीचा लाभ होतो, याबद्दलचा विचार या आधीच्या सूत्रात मांडला आहे. साधनेत मृदु, मध्य आणि अधिमात्र असे प्रकार आहेत.

मृदु – यात पूर्वजन्मीच्या संस्कारांचे अडथळे येऊन अभ्यासाची गती मंद होते. मध्य – यात वर्तमानात होत असलेले संस्कार, उपलब्ध वातावरण यांचा समावेश होतो.

अधिमात्र – यात साधन करत असताना साधक कुणाच्या संगतीत असतो, कसे वागतो, त्याचे परिणाम काय, या गोष्टी येतात. जीवनात प्रत्येक गोष्ट त्रिविध असते. उदा. अधम, मध्यम, उत्तम. प्रकृती, विकृती, संस्कृती.आधिभौतिक, आधिदैविक, आध्यात्मिक. साधकांसाठी बेहोशीचा एक क्षण सुद्धा मृत्यूसमान असतो. हे लक्ष्यात घेऊन आपली प्रगती करू इच्छिणाऱ्याने या त्रिगुणात्मकतेवर लक्ष देऊन, अत्यावश्यक, आवश्यक आणि अनावश्यक यांतील तारतम्य बाळगून जीवनात वागावे. त्या अनुषंगाने त्यांना फळ मिळत जाईल.

लेखन – अ. रा. यार्दी

Related posts

स्वराज्याचा विचारच स्वराज्य उभे करतो

अवचितयावरी सर्वस्व सांडिजे । चोख तरी तोचि भांडारी कीजे । (एकतरी ओवी अनुभवावी)

समाधिपाद – योग साधनेतील विघ्ने कोणती ?

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406