दुष्काळाचे चित्र, त्याचे खोटे अहवाल, गाव, शेती, नदी, झाडे विकून माणूस मात्र आजच्या मार्केटमध्ये निव्वळ वस्तू झाला आहे. म्हणून आता वावरही या उद्ध्वस्तीकरणात आपले मृत्युपत्र तयार करून आपले आंतरिक दु;ख आणि अंतिम इच्छा व्यक्त करते. ‘बांधावरील झाडे चिमण्यापाखरांच्या साठी राखून ठेवावी, बैलं भलेही विकली असतील मात्र बैलगाडी कृषीसंस्कृतीची निशाणी म्हणून उरू द्यावी.’ यातूनच निसर्ग आणि ग्रामसंस्कृतीचे प्रेम व्यक्त झाले आहे.
प्राचार्य डॉ. पंडितराव पवार
‘सरस्वती’ नंदनवन चांदशी ता. जि. नाशिक ४२२००३
मो. ९४२३१८१०८७
साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवी ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘भुईशास्त्र’ या बहुचर्चित काव्यसंग्रहानंतरचा ‘कासरा’ हा कसदार कवितासंग्रह वाचनात आला. गावशिव, शेतीभाती, जनावरे, झाडे, उद्ध्वस्त होत चाललेली कृषिसंस्कृती आणि तेथील मेटाकुटीला आलेली माणसं त्यांना वेठीस धरणारी वर्तमान व्यवस्था हे पाटेकरांचे निरीक्षणाचे आणि चिंतनाचे काव्यविषय आहेत. विविध आत्मभानासह पाटेकरांनी हे विषय आपल्या कवितेतून प्रकट केले आहेत. विश्वाचं मूळ असलेली कृषिसंस्कृती व्यवस्थेच्या कुटील कारस्थानाने नष्ट होत चालली आहे. ज्या मातीतून पीक उभं रहायचं, धनधान्य पिकून यायचं. त्या मातीची वर्तमान अवस्था अतिशय बिकट झाली आहे. हे सारं तळामुळासह कवितेच्या केंद्रभागी येत राहतं.
सरकारी धोरणे, नवनवीन बांधकामे, शहरी उद्योगधंदे आणि भांडवलशाही इत्यादीमुळे ग्रामजीवनाला ‘कासऱ्या’चा विळखा पडला आहे. गावाचे गावपण उद्ध्वस्त होऊन धूळ आणि धुळीचे लोट सर्वत्र उडत आहेत. या कवीच्या नजरेतून निसटत नाही. कवी अस्वस्थ होऊन म्हणतो
धुळीचा लोट डोळ्यात
अन् अतिशय दु:खद घटना
की माती मरून पडलीय (पृ. १२८)
माती मरून पडल्यावर ग्रामसंस्कृतीच संपली हे कवीचे शल्य आहे. आणि ‘मातीच जर नष्ट झाली तर कविता लिहिण्याचं कारणच आपोआप संपुष्टात येईल.’ माती आणि मातीवर जगणारा माणूस संपला तर मानवी जीवनाचे सत्व आणि स्वत्वच संपेल. ही जीव कुरतडणारी व्यथा कवीला अस्वस्थ करते. हीच अस्वस्थता कवीला कवितेसाठी आशय पुरवते. यात चिंतन आहे, भविष्यवेध आहे. आणि विश्वात्मक मानवता आहे. ‘शहरे झकास आणि गावे भकास’ करणारी व्यवस्था ग्रामीण जीवनच ‘खुरमुंडी’ घालून जखडून टाकीत आहेत. कवीच्या शब्दात सांगायचे तर-
‘जागीच जखडून धरणारा
वर्तमान वास्तवाचा हा ‘कासरा;
त्याचा पीळ सैल होण्याऐवजी
दिवसेंदिवस आवळतंच चाललाय
व्यवस्थेच्या तुरुंगात जागच्या जागी
खुरमुंडी… (पृ. १२४)
या ओळीतील ‘वर्तमान’, ‘कासरा’, ‘पीळ’, ‘आवळत’, ‘व्यवस्था’, ‘खुरमुंडी’- या शब्दांतील दाहक वास्तव हेच या कवितांचे बीज म्हणता येईल. खऱ्या कवीचा कस त्याच्या या अशा शब्द निवडीतच तपासता येतो.
कवीने आपल्या कवितांची ‘मी माझ्यात अख्ख गाव घेऊन फिरतोय’, ‘वावराचं मृत्युपत्र’, ‘कसं मूळ धरू या मातीत’, ‘मी माझी कविताच परत करू इच्छितोय’ – या चार विभागात मांडणी केली आहे. त्यातून कवीची आत्मनिष्ठा, गावाचे शहरीकरण, कवीची घुसमट, वर्तमान वास्तव आणि कवीची अभिव्यक्ती, स्वप्नरंजन इत्यादी आयाम येथे कवीने अंतर्मुख होऊन अत्यंत संयमाने आजची ग्रामसंस्कृती, बारा बलुतेदार, सामान्य माणूस, त्याचे प्रश्न आणि एकंदरच निसर्गऱ्हास कधी कधी वाच्यार्थाने तर कधी लक्ष्यार्थ ओलांडून सूचित करतो. कधी कधी निवेदन करतो तर कधी माणसे निसर्गघटक यांचेशी संवादी होऊन आपली पोटतिडिक अभिव्यक्त करतो.
आपली कविता, तिचा आशय या वास्तवात हरवून गेला तर कवितेचे भवितव्य काय ? हा प्रश्न कवीला अस्वस्थ करतो. एकंदरीत आजचे खाऊजा संस्कृतीचे ग्लोबल जग; माणसाचे माणूसपण संपवून वस्तूकरणाकडे घेऊन जाण्यात यशस्वी होत आहे. यात कवीला तिळमात्र शंका राहिली नाही.
कवी आणि त्याची कविता यांचे आंतरिक नाते असते. त्यामुळे कवीचा भवताल कवीला आशय पुरवतो आणि त्यातून कवी अभिव्यक्त होतो. पण भवताल उद्ध्वस्त झाला तर-कवी म्हणतो,
जर का माणसाच्या आत मुळ्या रोवून
त्यास मातीसारखंच जखडून असेल
त्या कवितेला वेगळ्या घराची गरजच काय? (पृ. ७९)
म्हणून कविता अन्यत्र कुठेच नसून माणसाच्या नसानसा उसवत काळजात वावरते. हीच कवीची आत्मनिष्ठा होय.
कवी आपल्या ग्रामजीवनाला- जीवन जाणीवांना विविध पद्धतीने जपून ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. आईची चूल त्याला जपायची आहे, घराची मातकट भिंत आणि दगडाचं जातं आज आधुनिक जगात उद्ध्वस्त होत आहे. एवढेच नव्हे ते विविध प्राणी. पक्षी, झाडे. कीडामुंगीही नष्ट होत चालली आहे म्हणून कवी म्हणतो,
थोडक्यात, हिर्व्या चैतन्याचा लसलसता कोंब
जळून खाक व्हायच्या आत
मला त्याचं शेवटचं चित्र शब्दांत काढून ठेवायचं आहे
जिला शेवटच नाही, अशी शेवटची कविता
लिहून ठेवायची आहे
कारण नष्ट होत जाणाऱ्या शेवटच्या माणसाला आता
कविताच वाचवणार आहे..(पृ. १३)
सर्व सभोवताल नष्ट झाल्यावर निदान कविताच सामान्य माणसाला वाचवणार आहे. जीवनप्रत्यय देणार आहे. ही कवीची ठाम धारणा किती महत्त्वाची आहे. कवीची आपल्या कवितेवर असीम निष्ठा आहे. आणि कवी कवितेची ताकद जाणून आहे. जे जे काही नष्ट होणार आहे किंवा होतं आहे त्यास फक्त कवितेच्या जोरावरच शाबूत ठेवता येणार आहे. वर्तमान व्यवस्थेत बोलणाऱ्यांची मुस्कटदाबी, त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केली जाते आहे. एक दबावतंत्र सर्वसामन्यावर लादलं जातंय. त्या गोष्टीलाच कवी चोख उत्तर देतो आहे.
खेड्यातील ‘बायांचा’ संघर्ष आणि मातीवरील प्रेम येथे विस्तारत जाते. ‘मातीच्या लेकी उकरतात मातीचं काळीज, देतात स्वप्न पेरून ‘ हा आशावाद कवीची असीम ग्रामनिष्ठा सूचित करते. ‘डोळ्यात विजेचं काजळ घालून ‘मातीचे वाळे’ पायात घालून, मातीच्या लेकी प्रखर वास्तव झेलतात. आणि पिसाळलेल्या व वासनेच्या नांग्या ठेचून आपले स्वत्व जपतात. ग्रामीण वास्तव म्हणजे ग्रामीण बोलीचे हिरवे झाडच असल्याचे कवी आत्मप्रत्ययातून मांडतो. ‘आई, चूल आणि सूर्य’ यांचे एकात्मपणही प्रतिमातूनच व्यक्त होते. समाज सुखाचा शोध सर्वत्र घेत फिरतो पण त्यास सामान्य माणसाचा निरपेक्ष आनंद देणारा सुखाचा सदरा दिसतच नाही. कारण सुखाची धारणा व्यक्तीसापेक्ष असते. हेच जीवनसत्य कवी ‘विसा परसरामच्या सुखाचे कारण’ या कवितेमध्ये वाच्यार्थ ओलांडून ध्वन्यार्थाने सांगून जातो.
आजच्या भांडवलशाहीचा शिरकाव गावात झाला. जमिनीचा सातबारा कंपनीच्या नावे होताच ‘आता माती खोक खोक खोकू लागलीय कंपनीच्या धुराड्यातून प्रदूषण.’ हीच तर खाऊजा संस्कृतीची चाहूल आहे. आणि त्याचा अपरिहार्य परिणाम म्हणजे ‘आवडाई, ग्लोबल म्हैस फतकल मारून बसलीय तुझ्या वावरत.’ हाच ग्रामीण वास्तवाच्या वाताहतीचा श्रीगणेशा म्हणता येईल.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या, दुष्काळ, प्रसारमाध्यमे आणि शासनाची फसवी धोरणे. यांचाही विचार येथे कधी वास्तवाच्या पातळीवर तर कधी उपहासाने व्यक्त झाला आहे. ‘गवरी थापावी तसं काळीज थोडंच थापता येतं?’ हेच खरे आहे. गावातल्या विहिरी किती असाह्य स्त्रियांना सामावून घेतात. आज डांबरी सडकेने शहरीकरणातून वाटा पायवाटा गिळंकृत केल्या आहेत. ही ग्रामवास्तवाची ऱ्हासचिन्हे आहेत. झाडाची आत्महत्या, नदीचे कोरडेपण आणि कवीचा एस. टी मधील प्रवास यातून भूत- वर्तमान-भविष्यकाळाचे वास्तव प्रकटते. गावाच्या ऱ्हासातून देशही कंबरेत वाक पडून म्हातारा होतोय; कारण गाव अलीकडे मानेत डुगडुग करीत चालला आहे. गावातले लोक उघड्या आभाळाखालचे ‘रिअल सुपर मॅन’ आहेत. मुले शहरात जाऊन शहराची मुळं उखडून टाकण्याची मनसुबे रचताहेत. नव्हे शहारातही आम्हास गाव द्या अशी मागणी करताहेत, आजच्या खाऊजा संस्कृतीत नात्यागोत्यातील माणसांचेही ग्लोबल गाठोडे झालेले आहे. माणूस माणसाच्या उपयोगाचा राहिला नाही. अडीनडीला आपणच आपल्या माणसांना मदत करू शकत नाही. हे वास्तव मांडताना कवी म्हणतो,
सगळ्यांनाच दाखवलेत आपण रिकामे हात
कुणालाच काही मदत नाही करू शकलो
वरनं माझ्याच समस्यांचं ग्लोबल गाठोडं
मी ठेवून देतो त्यांच्या मानगुटीवर
भारानं पाठीत वाकत ते निघून जातात
ह्या ग्लोबल व्हिलेजचा मी ग्लोबल सिटीझन ठरलोय
मात्र खरोखरच्या खेडुताला
या व्हिलेजमध्ये स्थान नाही.. (पृ. ५०)
गाव शहरात बस्तान ठोकून असल्यामुळे गावातील घराची दारे बंदच होत आहेत. पोटासाठी होणारं स्थलांतर कवीला अस्वस्थ करतं. येथील घरे, जनावरे, पडीक पडलेली वावरं, विहिरी इत्यादी ग्रामघटकांना कवीनं बोलतं केलं आहे. त्यातूनच गाव आणि शहर याची दरी कवी चित्तारत आहे, ‘माझं बोट पकडलेलं असू दे नाहक हरवशील गर्दीत!’ ही कवीची वावराला विनवणी म्हणजे वावर आणि माणूस यांच्या ताटातुटीची वेळ होय. म्हणून ही कविता भावना आणि विचार यांची घट्ट मिठी आहे; असे सतत जाणवते.
घरची खरपूस भाकर आणि जनावरांशी संवाद हा कवीचा भूतकाळही चेतनागुणोक्तीत सजग होतो. जनावरे कत्तलखान्यात जाताहेत म्हणजे ग्रामजीवनाचा अस्तच, हेच कवी सुचवितो.
दुष्काळाचे चित्र, त्याचे खोटे अहवाल, गाव, शेती, नदी, झाडे विकून माणूस मात्र आजच्या मार्केटमध्ये निव्वळ वस्तू झाला आहे. म्हणून आता वावरही या उद्ध्वस्तीकरणात आपले मृत्युपत्र तयार करून आपले आंतरिक दु;ख आणि अंतिम इच्छा व्यक्त करते. ‘बांधावरील झाडे चिमण्यापाखरांच्या साठी राखून ठेवावी, बैलं भलेही विकली असतील मात्र बैलगाडी कृषीसंस्कृतीची निशाणी म्हणून उरू द्यावी.’ यातूनच निसर्ग आणि ग्रामसंस्कृतीचे प्रेम व्यक्त झाले आहे. वावराच्या मृत्युपत्रातून कवी मांडतो.
तरीही माझ्या मृत्युपश्चात तुम्ही विकलंच मला बिगर शेतकऱ्याला
माझा तळतळाट भोवल्याशिवाय राहणार नाही. (पृ. ७५)
ही ग्रामजीवनाची शापवाणीच ठरावी. कारण बिगर शेतकरीच वावराचा सौदा करीत आहेत. एकंदरीत कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी कृषिसंस्कृतीचा जागर येथे कधी सरळ शब्दात, निवेदनाने तर कधी संवादी पद्धतीने चिंतनाच्या पातळीवर केला आहे. साहित्यिक राजन गवस यांच्या शब्दात सांगायचे तर ‘खाऊजा’ धोरण स्वीकारल्यानंतर महानगर बुलडोझर सारखं खेड्यात घुसलं आणि खेडं अगतिक बनत गेलं. खेड्यातल्या मूल्य व्यवस्थेला तडे जाऊ लागले. खेडी बकाल बनत गेली. उद्ध्वस्त कृषिजनसमुहाचा आलेखच ही कविता मांडते. हे विधान सर्वार्थाने रास्त आहे. ‘कासरा’चे मुखपृष्ठही अत्यंत अन्वर्थक आहे. कवी ऐश्वर्य पाटेकर यांचे ‘भुईशास्त्र’ काव्यसंग्रहाच्या पुढचे पाऊल म्हणजे ‘कासरा’ कवितासंग्रह असे ठामपणे म्हणता येते.
पुस्तकाचे नाव – कासरा: कवितासंग्रह
कवी: ऐश्वर्य पाटेकर
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
किंमत: २५० रुपये
पृष्ठ: १२८
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.