February 22, 2024
Book Review of Ishwarya Patekar Kasara Poetry collection
Home » कृषिग्रामसंस्कृतीच्या गळाघोटीतून उमटलेला हुंकार : कासरा
मुक्त संवाद

कृषिग्रामसंस्कृतीच्या गळाघोटीतून उमटलेला हुंकार : कासरा

एखाद्या कवीच्या कवितेत प्रतीके आणि प्रतिमा आशयानुरूप उमटतात त्या आपल्या भवतालाचे सालंकृत प्रतिबिंब बनून. अघोरी वास्तवाच्या पडसावल्या नेणिवेच्या अस्पर्शीत प्रदेशात घुमत असतांना कवी त्यांच्या मागावर असतो. कल्पनेची सुई या विभ्रमान वास्तवावर रोखीत असतो. अशा कवितेत आशयाला अलंकृत करण्याचे प्रयोजन असते. एक सततचे दडपण असते. आणि नेमके हेच दडपण झुगारून काही कविता आपली सम्यक वेदना मांडू शकते, कवी ऐश्वर्य पाटेकर या जातकुळीतील कवी आहेत.

“कासरा” कुण्या कल्पनेच्या विभ्रमांना न जुमानणारा कवितासंच आहे. पाटेकर सरांचे भुईशास्त्र, जु वाचले आहे. आणि त्यांच्या लेखनातली तिडीक सर्वदूर पोचलीही आहे. अनेक पुरस्कारांनी सन्मानित असल्यावरही सतत ताकदीचे लिहीत राहणे आजच्या काळात दुर्मिळ लक्षण आहे. पाटेकर यांनी मातीच्या ओटीपोटाशी मारलेली मिठी तशीच घट्ट दिसून येते, ती ‘कासऱ्याच्या” निमित्ताने अधिक ठळक ही होते.

पॉप्युलर प्रकाशनाकडून आलेला कासरा एक खऱ्या अर्थाने ‘पूर्ण’ कविता आहे. यातली कविता सूचक नाही. पठडीबंद नाही. तर हे रुदन आहे. नष्टप्राय होण्याच्या मार्गावर असलेल्या एखाद्या आदिम सभ्यतेची प्रतिनिधी असल्यासारखी अग्रभागी एकांड्या शिलेदारासारखी आहे. या संग्रहात काय नाही? इथे आईची चुलीचा विस्तव कुरवाळणारी बोटं आहेत, गोठ्यात गाईच्या हंबरण्यासोबतच येणारे शेणामुताचे काळीजव्यापी गंधसंवेदन आहे, पिरसायबाबाच्या यात्रेतील बालमनावर उमटलेले आणि इतका काळ तसेच ठळक असलेले हवेहवेसे कोवळे ओरखडे आहेत, उन्हा-पावसात होरपळणाऱ्या , सुलाखून निघणाऱ्या शिसवाच्या हाताच्या आयाबाया आहेत,भाषेच्या लसलसत्या हिरव्या झाडावर कवितेचे कोंब फुलवावेत म्हणून आदिम चेतनेला घातलेले साकडे आहे, आवडाई, मथुबाई सारखी व्यक्तिस्मृती आहेत, गाव माती झाडे पक्षी पृथ्वी यांच्या सलामतीसाठीची भाकलेली पर्यावरणवादी करुणा आहे, गाय- बैल-वासरापासून मुंग्या -झाडे ही सारी एका “दडपून” टाकणाऱ्या अजस्र बुलडोझरखाली येत चालल्याची “वैश्विक रुदनाची” भावना आहे.

कासरा तसं पहायला गेलं तर एकंदरीतच गाव सोडून पोटासाठी शहर -नगरात वसलेल्या आजच्या पिढीच्या अबोध मनात ठसून बसलेल्या एका देश-भावमूलक आठवचित्रांचे शब्दात मांडलेले गंभीर स्वगत आहे. सरसकट सर्वच पातळीवर “सामान्यवाद” रुजवत चाललेल्या एका राक्षसी वेगाने पसरत चाललेल्या “वावटळीत ” आपल्या माणूस म्हणून असण्याची, आपली मातीत खोल असलेली मुळे तपासून पाहणारी,आणि कुठेही आक्रस्ताळी वा एकांगी न वाटणारी संयत धारदार कविता आहे ही. एक संयत अस्वस्थता प्रेरित करण्याची क्षमता या संग्रहात दिसून येते. ग्राम -कृषी – संस्कृतीतील नितळपण , निर्व्याजपण हरवत चालल्याची ,एखाद्या कोवळ्या वासराच्या डोळ्यातलं कारुण्य टिपणारी ही कविता निश्चितच वाचकाला अंतर्मुख करते हे मात्र नक्की.

मातीच जर नष्ट झाली तर कविता लिहिण्याचं कारणच आपोआप संपुष्टात येईल. या ओळी आहेत ऐश्वर्य पाटेकर यांच्या ‘कासरा’ कवितासंग्रहातील. बैलगाडी ओढतात आणि कासरा मालकाच्या हातात असतो. मालक मुठभर वैरण न टाकता, निगा न राखता बैलाचे अतोनात शोषण करावे तशी आजची नवी भांडवली व्यवस्था कृषिजन समूहाचे शोषण करत आहे. हे ही कविता आवर्जून नोंदवते. हा कवी गाव, माती, गावगाडा या साऱ्याचे वर्तमान आपल्या परीने तपासात, अन्वय लावत त्याची यथासांग चिकित्सा करतो. कृषिजन संस्कृतीच्या गाभ्यातील ताणतणाव या कवितेच्या केंद्रभागी आहेत. त्यामुळेच तो ‘मी माझ्यात अख्खं गाव घेऊन फिरतोय’ असं संग्रहाच्या सुरुवातीच्या पानावरच नोंदवतो. ‘खाऊजा’ धोरण स्वीकारल्यानंतर महानगर बुलडोझरसारखं खेड्यात घुसलं आणि खेडं अगतिक बनत गेलं. खेड्याच्या मूल्यव्यवस्थेला तडे जाऊ लागले. खेडी बकाल बनत गेली. उध्वस्त कृषिजन समूहाचा आलेखच ही कविता आपल्यासमोर मांडते. ही कविता आजच्या खेड्यापाड्यातील वर्तमानाला दिलेली तीव्र प्रतिक्रिया आहे. याचा अर्थ ही प्रतिक्रियावादी कविता आहे; असे मात्र नाही. ती सखोल चितनगर्भ कविता आहे. अत्यंत सहज सुलभ वावरणारी लय आणि नव्या शब्दांची निर्मिती, ही या कवितेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. या कवितेत प्रतिमा प्रतीकांना फारसी जागा नाही. कारण ही कविता जगण्यातील अस्सलतेचा स्वर आहे. आजच्या कृषिजन संस्कृतीचा विद्रूप चेहरा, ही कविता अधोरेखित करते. म्हणून या कवितेचे मोल अधिक आहे. या कवितेत वाचणाऱ्याला घेरून टाकत अस्वस्थ करण्याचे सामर्थ्य आहे. हेच या कवितेचे बलस्थान आहे.

डॉ. राजन गवस

पुस्तकाचे नाव – कासरा ( कवितासंग्रह)
कवी – ऐश्वर्य पाटेकर
प्रकाशक – पॉप्युलर प्रकाशन.
किंमत – २५० रुपये

Related posts

कागदी फुल…

सद्गुरुभाव रुपात भक्ती हीच खरी भक्ती

ग्लेशियरमधील चित्तथरारक प्रवास…

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More